‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’चे ब्रीदवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात.शालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाइट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून हे मासिक सुरू केले आहे.
Read moreश्रीकांतजी त्यांच्या व्यवसायामधे अत्यंत व्यग्र असूनही सामाजिक कार्यात विशेष रूची घेतात. आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ वरवडे (जि. रत्नागिरी) गांवात त्यांनी ज्युनियर कॉलेजपर्यंत साकारलेलं ज्ञानमंदिर जिथे आज ३००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात ही त्याची साक्ष आहे. तसंच कंपनीच्या माध्यमातून ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्ससाठी पुण्याच्या स.प. महाविद्यालयामधे मार्गदर्शन केलं जातं. याचबरोबर ॲनॅलिटीकल इन्स्ट्रुमेंटच्या पदव्युत्तर पदविकेसाठी ठाण्याच्या बेडेकर कॉलेजला भरीव सहकार्य केलं जातं. लहान मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते ‘वयम्’ नावाच्या एका आदर्श मासिकाचं प्रकाशन करतात ज्याची सभासदसंख्या ६५०० एवढी आहे. तसेच या मासिकाला आजवर अनेक स्थानिक आणि राज्य पुरस्कार लाभले आहेत. गरजू युवा बॅडमिंटनपटूंना ते आर्थिक सहाय्य करतात. दापोलीतील वणौशी सारख्या निसर्गरम्य ठिकाणी क्रीडाप्रेमींसाठी ‘मिनी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स’ देखील त्यांनी सुरु केला आहे.
भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि सल्लागार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा सन्मानांनी गौरवले गेलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल काकोडकर. विज्ञान आणि समाजाची नाळ जोडण्यासाठी झटणाऱ्या डॉ. काकोडकर यांना मुलांच्या शिक्षणात विशेष रुची आहे. ‘वयम्’च्या सल्लागार मंडळात त्यांचा समावेश असणे, ही गौरवाची बाब आहे.
डॉ. उदय निरगुडकर हे अभ्यासू पत्रकार, मुलाखतकार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात व टीव्ही मिडियात यशस्वी कारकीर्द गाजवणारे उदय निरगुडकर समाजातील असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तींचा शोध घेत असतात आणि त्यांना समाजासमोर आणत असतात.
राज्यसभेतील खासदार, ज्येष्ठ पत्रकार आणि व्याख्याते कुमार केतकर यांना आजच्या मुलांच्या बौद्धिक, वैचारिक व सामाजिक विकासात विलक्षण रस आहे. ‘वयम्’च्या सुरुवातीपासून प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मोलाचे पाठबळ मिळत आहे.
अत्यंत लोकप्रिय बाल-कुमार साहित्यिक राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी झोकून देऊन काम करत आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवले गेलेले राजीव तांबे मुलांच्या साहित्यात सतत वेगवेगळे लेखन-प्रयोग करत असतात. त्यांचा कल्पक व सक्रीय सहभाग ‘वयम्’ला समृद्ध करणारा आहे.
प्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ, लेखक, वक्ते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे Institute For Psychological Health (IPH) चे कार्यकारी विश्वस्त आहेत. 'बहुरंगी बहर' हा प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतून सुरू झाला आहे. बहुविध बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचा शोध आणि विकास याबद्दल असलेल्या असोशीतून ते 'वयम्' मासिकाशी घट्ट जोडले गेले आहेत.