Menu

बालसाहित्याचे पुनरुत्‍थान होवो..

image By Wayam Magazine 24 June 2024

बालसाहित्याचे पुनरुत्‍थान होवो..

साहित्य अकादमी प्रमाणेच मी आणखी एके ठिकाणी ‘बाल साहित्याची निवड करण्यासाठी’ अंतीम परीक्षक होतो. त्यामुळे नुकतीच प्रकाशित झालेली बालसाहित्यातील सुमारे 53 पुस्तके मी काळजीपूर्वक वाचली. यामधे कथा, कविता, कादंबरी आणि स्पूट लेखन असे साहित्य प्रकार होते.

युनेस्कोच्या व्याखेनुसार पुस्तक किमान 49 पानांचे हवे. त्यामुळे जी पुस्तके किमान 49 पानांची किंवा त्यापेक्षा अधिक आहेत अशाच पुस्तकांचा विचार साहित्य अकादमीने केला. दुसर्‍या ठिकाणी मात्र अशी काही अट नव्हती. यातून आढळलेल्या काही गोष्टी निरीक्षण स्वरुपात स्वच्छपणे मांडण्याचा प्रयत्‍न करतो आहे.

अर्थात ही केवळ निरिक्षणे आहेत मी आत्ता वाचलेल्या मराठीतल्या बालसाहित्याविषयी. पण हा काही संपूर्ण मराठी बालसाहित्याचा धांडोळा तर नव्हेच आणि समीक्षा तर नव्हेच नव्हे. यामधे अनेक त्रुटी असणे स्वाभाविकच आहे.

• बालसाहित्याचं प्रयोजनच बालसाहित्यकाराला समजत नाही की काय? असा प्रश्न किमान 80 टक्‍के पुस्तकं वाचताना मला पडला. सतत उपदेशाच्या पिचकार्‍या मारणं, सुविचारांचा सडा शिंपणं आणि हे कमी पडतं म्हणून की काय त्यावर ‘मूल्यांचं टॉपिंग’ करणं याला बालसाहित्य कसं म्हणता येईल. ‘मी शिकवणारा आणि तो अज्ञ बालक शिकणारा’ अशी भूमिका घेऊन लिहिलेले जे आहे ते बालसाहित्य नाही असं मला वाटतं. बालसाहित्याचे किंवा साहित्याचे नेमके प्रयोजन काय? मुलांना शिकवणं, उपदेश करणं, तात्पर्य सांगणं, संस्कार करणं किंवा त्यांना घडवणं हे तर नव्हे आणि नव्हेच. बालसाहित्याचं प्रयोजन आहे, मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य हे मुलांना शिकवत नाही तर शिकण्याच्या अनेकानेक पध्दती, विविध पर्याय मुलांसमोर सहजी उलगडून ठेवतं आणि मुलाला त्याच्यातील सूप्त शक्ती व सर्जनशीलता यांची जाणीव करून देतं. कारण बालसाहित्याचा पाया हा ‘मुलांना गृहित धरणे’ हा नसून ‘मुलांवरचा अपार विश्वास आणि मुलांवर निरपेक्ष प्रेम’ हा आहे.

• बालकविता वाचणे हा माझ्यासाठी त्रासदायक अनुभव होता. बहुतेक सर्व कवितांचे विषय हे पाऊस, निसर्ग, माझी शाळा, माझी आई, सुंदर ते पर्यावरण कसे करावे, प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी काढलेल्या शाळा आणि त्या शाळेत गाणं शिकवणारी कोकिळा, प्राण्यांची दुकाने इ. केवळ यमक जुळवणं किंवा शब्दार्थ, म्हणी एकमेकांत गुंफणं म्हणजे कविता नव्हे. आणि भरमार विशेषणांची कलाबुतं लावणं म्हणजे कवितेला गुदमरवून टाकणं. विंदा, शांताबाई, इंदिरा संत, पाडगावकर यांच्या बालकविता या कविंनी वाचल्या आहेत का? आणि वाचल्या असतील तर त्या समजून घेण्याचा प्रयत्‍न केला आहे का? असा प्रश्न मला ‘त्यांच्या कविता’ वाचताना पडतो. विंदांच्या बालकविता जेव्हा मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्याच वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या कविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देतात. म्हणून त्या बालकविता मोठ्यामाणसांना अधिक प्रगल्भ करतात.

• मुळातच आपल्या बालसाहित्यात फॅंटसी फारच कमी लिहिली जाते. फॅंटसीला तर्काची बैठक लागते. काहीतरी अचाट लिहिणं म्हणजे फॅंटसी नव्हे. जंगलातल्या एका सशाने सिंहाला विहिरीत ढकलून दिले ही काही फॅंटसी नाही. पण जेव्हा तो ससा सिंहाला म्हणाला, ‘महाराज विहिरीत डोकावून पाहा. तिथे अजून एक सिंह आहे.’ ही फॅंटसी आहे कारण ती तर्कशुध्द आहे. जेव्हा मुलाच्या नजरेतून बघता येतं, समजून घेता येतं तेव्हाच मुलांच्या भाषेत बालसाहित्य आणि फॅंटसी लिहिता येते. मग आपल्याइथेच हा प्रॉब्लेम का येतो. मला वाटतं, काही मोठ्या माणसंचं बालपण हे करपून गेलेलं असतं. त्यामुळे त्याच्यांत दडलेलं मूल हे एकतर चिरचिरं-किरकिरं तरी असतं किवा अपार नॉस्टॅलजिक. अशी माणसं मुलांसाठी नाही लिहू शकत. किंबहुना कुठलाही मोठा माणूस तो ‘मोठा’ आहे म्हणून मुलांसाठी नाही लिहू शकत. समोरचं मूल गूण-दोषासकट स्वीकारण्याची तयारी आणि मुलाला उपदेश न करता सर्व पूर्वग्रह बाजूला सारुन मुलाकडून शिकण्याची आंतरिक इच्छा असेल तरंच तो मोठा माणूस लहान मुलात, मूल होऊन मिसळू लागतो. अशावेळी त्या मोठ्या माणसात लपलेलं मूल फक्त चौकसंच नाही तर खट्याळ ही असावं लागतं. फॅंटसीला तर्काप्रमाणेच आणखी एक किनार आहे विज्ञानाची. ही पिढी विज्ञान तंत्रज्ञान, चॅटजिपीटी, एआय सोबत मोठी होत आहे. आता प्रश्न असा आहे की मुलांसाठी लिहिणारे विज्ञानाच्या चष्म्यातून फॅंटसीला भिडत असतील तरच ती मुलांना आपली वाटेल. अवैज्ञानिक फॅंटसी मुलांच्या पचनी पडत नाही. मुलांसाठी चांगलं लिहिणं कठीणंच आहे पण अशक्य मात्र नाही.

• कथांचा विचार केला तर विविध कथाप्रकार इथे सशक्तपणे रुजलेच नाहीत. विज्ञान वेधकथा, विज्ञान रहस्यकथा, अंतराळविज्ञान कथा, समुद्रप्रवासाच्या साहसीकथा, रहस्यकथा, भुतांच्या गोष्टी, महायुध्दांच्या कथा, गुप्तहेरांच्या कथा, जादुगारांच्या अचाटकथा असं खूप सांगता येईल. यातील अपवादात्मक काही प्रयोग झाले आहेत पण त्यात सातत्य नाही. इंग्रजीमधे या साहित्यप्रकारात विपूल साहित्य उपलब्ध आहे. त्यांच्या वेगवेगळे नायक आणि नायिका बालसाहित्यात अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. असं असताना आपण आत्ता नेमकं कुठे कमी पडत आहोत हे एकदा शोधायलाच हवं.

• पूर्वी सत्यकथा, हंस किंवा अंतर्नाद मासिकात लेख, गोष्ट किंवा कविता प्रकाशित झाली की ते प्रतिष्टीत समजलं जायचं. याचं कारण होतं त्या-त्या संपादकानी त्या-त्या लेखनावर संपादकीय संस्कार केलेले आहेत म्हणून. चांगला संपादक हा समोरच्या लेखकाला ‘काय लिही’ ते कदापी सांगत नाही, तर ‘कसं लिहिता येईल’ याविषयी तो मांडणी करतो आणि प्रेरित ही करतो. लेखकाला नवीन दिशा दाखवतो. म्हणूनच आलेलं साहित्य जसंच्या तसं छापणार्‍याला संपादक नाहीतर संकलक म्हणतात. बालसाहित्यातील काही संपादकांचा अपवाद वगळता संकलकांचाच सुकाळ झाल्यामुळे तर बालसाहित्याची तब्येत बेताचीच झाली नसेल?

• आता तुम्हाला प्रश्न पडेल, ‘मला चांगलं बालसाहित्य वाचायलाच मिळालं नाही का? सतत मी नकारात्‍मकच का बोलत आहे?’ असं तुमच्या मनात येणं हे योग्यच आहे. मला असं नकारात्‍मक लिहिताना खूप त्रास होतो आहेच. पण मी वर सांगितल्याप्रमाणे मी हे सारं त्या 80 टक्कें विषयी सांगत आहे.

• वेगळे विषय घेऊन लिहिणारे, वेगळाच साहित्यप्रकार हाताळणारे काही तरुण बालसाहित्यकार आहेत. त्यांचे प्रयत्‍न ही चांगले आहेत. पण हे नव्या दमाचे बालसाहित्यकार संपादकांच्या संपर्कात यायला हवेत, त्यांची पुन्हा पुन्हा लिहिण्याची तयारी हवी आणि मुख्य म्हणजे आपल्याच लेखनाकडे त्रयस्थपणे पाहात त्याचं विश्लेषण करण्याची समज हवी. पण हे बालसाहित्यकार संकलकांच्या कळपात सामील झाल्याने बालसाहित्याला ओहोटी लागते आहे असं माझं एक प्रांजळ निरीक्षण आहे.

• आता बालसाहित्यात जसं मुलांच्या विचारांना चालना देणारं, त्यांना विचार प्रवृत्त करणारं साहित्य हवं आहे तसंच विचार रचण्याची प्रक्रिया उलगडणारं सर्जनशील साहित्य पण हवं आहे. मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणारं साहित्य हवं आहे. म्हणूनच आता मराठीतल्या बालसाहित्याचे पुनरुत्‍थान व्हायला हवं.

• बालसाहित्यातील या आणि अशा बाबींवर आमची अकादमीमधे चर्चा झाली. त्यावेळी सकस साहित्याचे निकष ठरवून आम्हाला एकाच पुस्तकाची निवड करायची होती आणि ती ही मिटींगला उपस्थित असलेल्यांच्या एकमताने.

• ‘एक ही चूक नसलेले सर्वार्थाने श्रेष्ठ पुस्तक आणि कुशाग्र बुध्दिमत्तेचा सर्वश्रेष्ठ परिक्षक’ असं काही नसतं. प्रत्येकात गुण-दोष असतातच. थोडंफार कमी-जास्त हे असंतच. म्हणून समोर आलेल्या पुस्तकातील गुणांची बेरीज करायला, त्या-त्या पुस्तकांची शक्तिस्थानं नोंदवायला आम्ही सुरुवात केली. आणि अंतीमत: भारत सासणे यांचं ‘समशेर आणि भूतबंगला’ हे पुस्तक योग्य वाटलं.

• ‘समशेर आणि भूतबंगला’ या पुस्तकाचा विचार करताना आम्ही त्यातील साहित्या बरोबरच पुस्तकाची मांडणी आणि चित्र ही ‘मूलकेंद्री’ आहेत का? हे ही पाहिलं. फक्त साहित्याचा विचार न करता समग्र पुस्तकाचाच विचार करावा, हा त्या मागचा विचार. लेखकाने जे सांगितलं आहे तेच चित्रकाराने काढणे अपेक्षित नाही. लेखनातील आशय चित्रकार आपल्या चित्रातून पुढे नेतो का, हे महत्वाचं आहे. चित्रांची मांडणी आणि चित्रातील व्हाइट स्पेस ही तितकीच महत्वाची असते. गिरीश सहस्रबुध्दे यांची चित्रे कथेला योग्य न्याय देतात असे वाटले.

• समशेरच्या माध्यमातून ‘बुध्दी-चातुर्य आणि साहस कथांचा’ नवीन फॉर्म सासणे मराठीत रुजवत आहेत आणि बालसाहित्याला एक नायक देत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

• समशेरच्या कथांचं वैशिष्ठ्य म्हणजे या योगायोगाने सजलेल्या रहस्यकथा नाहीत. मुलांच्या भाषेतल्या आणि मुलांच्या अवतीभवती घडणार्‍या या कथा आहेत. रहस्य, मैत्री, भिती, निराशा, साहस आणि बुध्दिमत्ता यांचा गोफ असा काही गुंफला आहे की वाचताना मुले आधी समशेर होतात आणि समशेर संकटात अडकला की मुले त्रयस्थ होऊन भराभरा वाचतात. हे या कथांचे मला शक्तीस्थान वाटते.

• समशेरच्या कथा खचितच मुलांसाठी आहेत तशाच त्या मोठ्यांसाठी पण आहेत. बुध्दिचा आणि चातुर्याचा वापर करुन रहस्याची केलेली उकल ही नेहमीच द्विस्तरात्‍मक असते. 

• रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणार्‍या ‘सहज पाठ’ या तीन पुस्तीका लिहिल्या. त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगाल मधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून. हे सहज पाठ म्हणजे ‘शरीर शिक्षणाचे पण आत्मा म्हणजे गाणी, गोष्टी, कविता, संगीत व गमती-जमती.’ मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं शरीराशी नाही याची रवींद्रनाथांना जाणीव होती. मुले गोष्टी वाचत, गाणी म्हणत, गमती-जमती करत कधी शिकली हे त्यांना कळतंच नसे. केवळ मनोरंजन नाही तर “ करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे” असा त्यांचा दृष्टीकोन होता. आपण आपला दृष्टीकोन अधिक सकारात्‍मक आणि विकसित केला तर बालसाहित्याचे पुनरुत्‍थान होइलच.

-राजीव तांबे

***

My Cart
Empty Cart

Loading...