‘स्क्रीनच्या वापरावर ताबा’स्पर्धेचा निकाल-
सप्टेंबर २०२३च्या अंकात पालकांसाठी- ‘स्क्रीनच्या वापरावर ताबा ठेवण्याचे आमचे मार्ग’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तुम्ही पालक व मुले मिळून तुमच्या घरी स्क्रीनचा वापर नियंत्रित ठेवण्यासाठी काय काय करता, याबाबत पालकांनी २०० शब्दांत मुद्देसूद लिहून पाठवायचे होते. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. चार विजेते निवडले आहेत. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे-
*स्वरा खराटे *ऋचा जोशी *स्वप्ना लिमये *डॉ. मोनाली हर्षे
विजेत्यांचे अनुभव-
भरपूर संवाद, सहवास!
मुलांना आई-बाबांशी संवाद साधायला खरं म्हणजे खूप आवडतं. आपणं त्यांच्या जगात काय घडतं त्यावर लक्ष देऊन, रुची दाखवून प्रतिक्रिया दिली तर ती खूप खुलतात, भरभरून आपल्याशी बोलतात आणि स्क्रीन टाइमपेक्षा कितीतरी वेळ अधिक पटीने आपल्यासोबत घालवायला एका पायावर तयार होतात!
मला वाटतं, इथेच पालकांची गोची होते. कारण त्यांना तर घरातली कामं उरकायची असतात; ऑफिसची कामं संपवायची असतात; आणि काहीच नाही तर थकून-भागून आल्यावर दोन मिनिटं ते अर्धा तास शांत बसून स्वतःवर लक्ष केंद्रित करून उद्याचं प्लॅनिंग करायचं असतं. म्हणून मग मुलांच्या ‘स्क्रीन टाइम’चा जन्म होतो.
आम्ही यावर सोपा (पण कधी-कधी अंमलबजावणीस कठीण असा) उपाय शोधला, आपल्या कामांमध्ये लहान मुलांना सहभागी करून घेणं. त्या कृतीबद्दल त्यांच्याशी बोलणं! उदाहरणार्थ- आपल्याला ऑफिसचं काम असतं, तेव्हा ‘तू तुझं शाळेचं काम करतेस का?’ असं विचारून गृहपाठ करून घेणे; किंवा आपण स्वयंपाक करताना, ‘तू ही डाळ काढून, धुऊन ठेवशील का? किंवा ‘तू या झाडांना पाणी घालून काय-काय नवीन उगवलंय ते मला सांगशील का? त्याचं चित्र काढून दाखवलंस आणि रंगवलंस तर अजून भारी!’ ‘मी उद्याच प्लॅनिंग करतेय गं माझं, ‘तू तुझं आणि माझं करून एकमेकींना आपली यादी दाखवूया?’ अशा कल्पना आम्ही राबवतो. ‘तू या खोलीतील वस्तूंना जमतील तशी नावं लाव तुझ्या हस्ताक्षरात. तुझ्या कल्पनेतील स्पेलिंगप्रमाणे लिही! या उपक्रमात माझ्या साडेचार वर्षांच्या मुलीने फार धमाल आणली होती.
कधी-कधी आम्ही एकमेकींना पत्र लिहायचं ठरवतो. त्यात माझी मुलगी रेखाचित्रं काढून त्या बंद लिफाफ्यातून मला सरप्राइज म्हणून देते आणि केव्हा पटकन तो लिफाफा मी उघडून तिला शाब्बासकी देते याची वाट पाहते, तर केव्हा आईने तिला आज चिठ्ठीत काय चित्र दिलंय याची आतुरतेने वाट पाहते! अशा वस्तूंचा संग्रह तर पुढे अमूल्य ठेवा बनून जातो!
- डॉ. ऋचा जोशी- तामस्कर, मोहाली पंजाब
भरपूर पर्याय समोर ठेवणं
पालक म्हणून आधी स्वतःवर काही बंधनं आम्ही घालून घेतली. मुलगा घरी असतो तेव्हा कामापुरताच मोबाइलचा वापर करून त्याच्याशी संवाद वाढवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
मुलाला इतर छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन देतो. काही प्रेरणादायी चरित्रं, आत्मचरित्रं त्याच्यासोबत वाचली. वाचनालयात स्वतंत्र खातं उघडून दिलं. Rubic Cube सोडवायची आवड लागली, तेव्हा अनेक प्रकारचे Cube उपलब्ध करून दिले.
विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याला प्रेरित करतो, जबरदस्ती नाही. त्यानिमित्ताने अवांतर वाचन, काही नवीन शिकलं जातं. त्याने गीता पाठांतराच्या दोन परिक्षा दिल्या, जर्मन भाषा शिकला. Abacus शिकला. वैदिक गणिताचा कोर्स केला.
मैदानी खेळ खेळण्यास त्याला उद्युक्त करतो. सायकलिंग, फूटबॉल विशेष आवडीचा आहे. शाळेतून घरी आल्यावर लगोलग अभ्यास-प्रोजेक्टच्या मागे न लागता अर्धा पाऊण तास खेळायला जातो. महिन्यातून किमान एक ट्रेक आम्ही त्याच्यासोबत करतो.
मुलांना उठता-बसता उपदेश, किंवा ‘हे करू नको’ असं सांगण्यापेक्षा त्यांना इतर पर्याय सतत उपलब्ध करून देणे आणि शक्य झालं तर आपणही त्यात सामील होणं जास्त परिणामकारक ठरतं यात काही शंका नाही.
-स्वप्ना चेतन लिमये, डोंबिवली
टाइम अप!
माझा मुलगा ८ वर्षांचा आहे. तो लहानपणी मोबाइल बघायचा. अगदी जेवतानासुद्धा त्याला मोबाइल हवा असायचा. परंतु गेल्या 3 वर्षांत आमच्या घरातलं चित्र पूर्णपणे बदललं आहे. मुलाचं मोबाइल बघणं बंद झालं. बघायचा झालाच तर आम्ही वेळेची मर्यादा पाळतो. आमच्या घरात आम्ही टीव्ही काढून टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. त्याचा आम्हां सर्वांना खूप फायदा होतो. टीव्ही नसल्याने घरात एकमेकांशी संवाद छान होतो, बऱ्याचशा कल्पक गोष्टी मुलाला आणि मला सोबत करायला मिळतात. जसं की पेंटिंग, चित्र काढणं, वाचन करणं, हार्मोनियम वाजवणं.. मला मोबाइल बघायचा झालाच तर मुलगा घरी नसताना बघते किंवा मुलासमोर बघायचा झालाच तर त्याला आधी त्यामागची पार्श्वभूमी सांगते. यामुळे त्यालाही जाणीव होते की, आपली आई महत्त्वाच्या कामासाठी म्हणून स्क्रीन बघते आहे आणि मग तो पण त्याला काही मोबाइलवर काही कामाचं बघायच असेल तर आम्हांला विचारून मोबाइल बघतो. मुलाने घरात मोबाइलसाठी एक घोषवाक्य ठेवलंय - टाइम अप. म्हणजे जेव्हा कोणी घरात चुकून जास्त वेळ मोबाइल बघत असेल तेव्हा ‘टाइम अप’ची घोषणा झाली की, तत्काळ मोबाइल बंद करायचा. रात्री झोपताना एक गोष्ट वाचून दाखवायची, हा एक उपक्रम आमच्या घरात लागू केला आहे. त्यामुळे स्क्रीन टाइम ही समस्या दूर झाली आहे.
-स्वरा पराग खराटे, नाशिक
'मूक पर्याय'
‘बर्गर की, गाजराची कोशिंबीर?’ या प्रश्नाचं जसं एकमुखाने उत्तर ‘बर्गर’ येतं, तसंच ‘मैदानी खेळ की, मोबाइल गेम?’ याचंही उत्तर ‘मोबाइल’ मिळायला लागलं आणि आमच्या पिढीच्या पालकांची झोप उडाली. सुरुवातीला गंमत म्हणून, कधी नादी लावून जेवण जास्त जातंय म्हणून आम्हीच ह्या मुलांची मोबाइलशी ओळख करून दिली. आता जिथे मोठ्यांनाच मोबाइलचा विळखा पडतोय, तिथे मग लहानग्यांची काय पत्रास?
मला मात्र अचानकच अगदी अनपेक्षितपणे या मोबाइलला पर्याय गवसला. एके दिवशी शाळेतून घरी परतताना गल्लीत रस्त्याच्या कडेला दोन दगडांच्या फटीकडे बघून भटकी कुत्री गुरगुरताना दिसली. त्यांना हुसकावून जरा जवळ जाऊन पाहतो, तो एक नुकतंच जन्मलेलं, आईपासून दुरावलेलं - मांजराचं पिल्लू घाबरून, अंग चोरून ओरडत होतं. माझ्या मुलानं सत्वर त्याला उचलून घराकडे धाव घेतली. मग त्या पिल्लाच्या संगोपनामध्ये मुलगाही उत्साहाने सहभागी होऊ लागला. त्याला ड्रॉपरने दूध पाजणे, स्वच्छ करणे, त्याच्या करामती बघत त्याच्याशी खेळणे, त्याच्या रेशीमलडीसारख्या अंगावरून हात फिरवत त्याच्याशी गप्पा मारणे, चेंडूचा पाठलाग, पडद्याला लटकणे, कधी कधी लपाछपी-सोफ्याचा तळ किंवा पार हेल्मेटमध्ये घुसून लपणे. या सगळ्यांत मुलगा इतका गुंतून गेला की, त्याला मोबाइल मागण्याची आठवणही येईना. मांजराचं पिल्लू मोठं झालं आणि सातारची मावशीआजी त्याला सोबत म्हणून घेऊन गेली. पुन्हा मला भीतीने ग्रासलं, पण दुसऱ्याच दिवशी मुलगा एक कोंबडीचं पिल्लू पाळायला घेऊन आला. चिक्यासाठी खोक्याचं भोकं पाडलेलं घर, चिक्यासाठी बाजरीचे दाणे असं सुरू झालं. चिक्या मोठा होऊ लागला. त्याला तुरा आला. तो थोडासा उडायलाही पाहू लागला. आता विचार करा मित्रहो, पाचव्या मजल्यावरच्या चार खोल्यांत कोंबडा उडत फिरतोय! चौकशी करता गांधीभवनजवळ विशेष मुलांच्या शाळेचा पत्ता कळला. चिक्याला घेऊन स्कुटीवरून आमची वरात त्या शाळेत पोहोचली. तिथे आधीपासूनच दहा-बारा कोंबड्या, शेळ्या, गायी, पक्षी आणि काय काय होतं. चिक्याही त्यांच्यात मिसळून गेला. आता रोज शाळा सुटली की, चिक्याची खबरबात घेऊन - इतर प्राणी-मित्रांशी खेळूनच आम्ही घरी येतो. मोबाइलसाठी मग वेळच कुठे राहतो? खोट्या, आभासी मोबाइलच्या जगापेक्षा हे मूक, परंतु प्रेमळ प्राण्यांचं जग नक्कीच माझ्या मुलाला आनंदी आणि प्रेमळ माणूस बनवायला मदत करतं. बरोबरच तिथली इतर लहान मुलंही त्याला खऱ्या जगाची जाणीव देत राहतात, आणि मी रोज निर्धास्तपणे रात्री झोपी जाते.
-डॉ. मोनाली हर्षे, पुणे
***