Menu

ऑलिम्पिकचा इतिहास आणि गमतीजमती

image By Wayam Magazine 08 August 2024

भाग १ 

उत्खननातून ऑलिम्पिकचा जन्म  
ऑलिम्पिकची जन्मकथा एकदम मजेशीर आहे. 
प्रत्येक लीप वर्षी कोणत्या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घटना घडतात? 

-अमेरिकेत होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन! 

२०२४ हे लीप वर्ष आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये आहे, आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २६ जुलै ते ११ ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. आधुनिक काळातील हे ३३वे ऑलिम्पिक आहे. अगदी पहिले ऑलिम्पिक १८९६ साली अथेन्स (ग्रीस) येथे झाले. त्यानंतर दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन झाले होते. पैकी १९१६ची ऑलिम्पिक स्पर्धा पहिल्या महायुद्धामुळे, तर १९४० आणि १९४४च्या ऑलिम्पिक स्पर्धा दुसऱ्या महायुद्धामुळे भरवता आल्या नव्हत्या.

पहिले ऑलिम्पिक ग्रीसमध्येच का झाले? आणि नंतरचे ऑलिम्पिक दर चार वर्षांनी का भरवले जाते? 

यांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पाने चाळायला लागतील. कारण अगदी पहिले ऑलिम्पिक ग्रीसमध्ये इसवी सनापूर्वी ७७६व्या वर्षांत झाल्याची नोंद आहे. तत्कालीन ग्रीसलगतच्या विविध राज्यांतील अनेक खेळाडू, ठरावीक अंतराने भरणाऱ्या या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तेथील ऑलिम्पिया या नगरीत येत असत. पण आताच्या आणि तेव्हाच्या ऑलिम्पिकमध्ये एक महत्त्वाचा फरक होता, तो म्हणजे सध्याच्या ऑलिम्पिककडे खेळांची एक स्पर्धा म्हणून बघितले जाते, पण इसवी सनापूर्वीच्या ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे एक धार्मिक सण असे. 

त्यावेळी प्रचारात असलेल्या धर्माला नाव असे नव्हते, पण त्यावेळचे ग्रीसमधील लोक अनेक देवदेवतांची पूजा करायचे. अनेक विधी, चालीरीती पाळल्या जात होत्या. खेळांच्या स्पर्धा हा त्यावेळच्या धार्मिक आचरणाचा एक भाग होता. त्यांच्या झीयस या देवतेबद्दल आदर दाखवण्यासाठी म्हणून ऑलिम्पिया या नगरीत खेळांच्या स्पर्धा होत असत. 

अगदी सुरुवातीच्या म्हणजे इसवी सनपूर्व ७७६च्या ऑलिम्पिकमध्ये फक्त धावण्याची स्पर्धा होती. पण नंतर त्यात नवनवीन खेळांची भर पडत गेली. कुस्ती, लांब उडी, भालाफेक, थाळीफेक, मुष्टियुद्ध अशा खेळांचाही नंतर समावेश झाला. सुरुवातीला फक्त एकच दिवस स्पर्धा होत असे, नंतर चार दिवस स्पर्धा घेतली जाऊ लागली. पाचव्या दिवशी स्पर्धा संपल्यानिमित्त एक सोहळा आयोजित केला जात असे. इसवी सन पूर्व ७७६ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धा इसवी सन ३९३ पर्यंत म्हणजे बारा शतके भरवल्या जात असत. इसवी सन ३९३ दरम्यान रोमन साम्राज्य हे युरोपातील एक प्रमुख सत्ताकेंद्र बनले होते. ग्रीसवर तेव्हा रोमनांचे वर्चस्व होते. त्यावेळचा रोमन सम्राट थिओडोसीसने एक आदेश काढला आणि या स्पर्धा बंद केल्या. 

त्यानंतर शेकडो वर्षे गेली. दरम्यानच्या काळात तेथे भूकंप झाले. पूर आले. त्यामुळे ऑलिम्पिया नगरीचा बराच भाग जमिनीखाली १३ मीटरपेक्षा खोल गाडला गेला. Ernst Curtius हा जर्मनीमधील एक पुरातत्त्व तज्ज्ञ आणि इतिहासकार होता. कुतूहलापोटी त्याने ग्रीसचा प्रवास केला. खूप हिंडला तो तिथे. जर्मनीला परत आल्यावर त्याची नेमणूक बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून झाली व त्याने ‘ग्रीसचा इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. जर्मनीच्या पुरातत्त्व विभागाने त्याला ऑलिम्पिया नगरीत उत्खनन करायला परवानगी दिली  होती. १८७५ ते १८८१ पर्यंत हे काम चालू होते. या उत्खननातून प्राचीन ऑलिम्पिकसंबंधीची माहिती जगापुढे आली. 

उत्खननात अनेक गोष्टी सापडल्या. अगदी त्यावेळच्या ऑलिम्पिक स्टेडियमची जागादेखील कळली. बऱ्याच वस्तूंचे अवशेष मिळाले. काही वस्तू चांगल्या स्थितीत सापडल्या. १३० पुतळे, ४० स्मारके, ६००० नाणी,  ४०० शिलालेख अशा ऐतिहासिक वस्तू सापडल्या. या उत्खननाला युरोपात मोठी प्रसिद्धी मिळाली. 
त्यावेळी  Barren Pirre de Coubertin हा १२-१३ वर्षांचा मुलगा या बातमीकडे आकर्षित झाला. 

पियरे कोबेर्टिनचा जन्म १ जानेवारी १८६३ रोजी एका फ्रेंच उमराव घराण्यात झाला होता. त्याला वाटे की, खेळ हा शिक्षणाचाच एक भाग असला पाहिजे. ब्रिटनमध्ये तशी पद्धत होती. फ्रान्सनेही तसे केले पाहिजे असे त्याला वाटे. प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे, असे त्याला वाटत होते.  १८८९ मध्ये त्याने विविध देशांतील शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, उमराव, उद्योजक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील जाणकार अशा सर्वांचे एक जागतिक संमेलन पॅरिसमध्ये भरवले.  त्या संमेलनात त्याची कल्पना उचलली गेली. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २३ जून १८९४ रोजी पॅरिसमधील सोर्बोन विद्यापीठात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ऑलिम्पिक खेळ पुन्हा सुरू करण्याचे नक्की झाले. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली गेली. 

या परिषदेत भाषण करताना पियरे कोबेर्टिन म्हणाले होते, “Wars break out because nations misunderstand each other. We shall not have peace until the prejudices that now separate the different races are outlived. To attain this end, what better means is there than to bring the youth of all countries periodically together for amicable trials of muscular strength and agility?” 

देशांमध्ये भांडणे होतात, कारण गैरसमज असतात. हे गैरसमज दूर होण्यासाठी जगभरातील तरुणांनी नियमितपणे भेटले पाहिजे!  
या परिषदेचा परिणाम म्हणून त्यानंतर केवळ दोन वर्षांनी म्हणजे १८९६ मध्ये ग्रीसमध्येच आधुनिक काळातील पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकचे आयोजन केले गेले. 
आणखी काही गमतीजमती वाचू या पुढच्या भागात. 


भाग २ 

ऑलिम्पिकच्या गमतीजमतीपार्किंगचा ‘P’ रूढ झाला ऑलिम्पिकमुळे. मॅरेथॉनचे अंतर निश्चित झाले तेही ऑलिम्पिकमधल्या एका  घटनेमुळे. सुरुवातीच्या काळातील प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये रुजलेल्या अशा नवीन कल्पनांचा वेध...  
ऑलिम्पिक म्हणजे फक्त खेळांच्या स्पर्धा नाहीत. गेल्या १२५ वर्षांत, ऑलिम्पिकच्या निमित्ताने अनेक नवीन कल्पना जन्माला आल्या. खूप गमती-जमती घडतात या जागतिक स्पर्धांमध्ये! काही वेचक, वेधक घडामोडींचा धावता आढावा घेण्याचा हा प्रयत्न- 

 आधुनिक काळातील पहिले-वहिले ऑलिम्पिक ग्रीसची राजधानी अथेन्स येथे १८९६ साली झाले. ग्रीस सोडून युरोपमधील इतर १२ देश आणि अमेरिकेतून विविध खेळांच्या स्पर्धेसाठी स्पर्धक एकत्र आले होते. एखाद्या स्पर्धेसाठी एवढ्या देशांतून खेळाडू एका ठिकाणी येण्याची ही पहिलीच वेळ होती. अथेन्स ऑलिम्पिकमधली बहुसंख्य पदके ग्रीसच्या खेळाडूंना मिळाली, पण पहिली स्पर्धा होती, तिहेरी उडी (Triple Jump). Hop-Skip-Jump म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा अमेरिकेच्या २७ वर्षीय जेम्स कॉनोली याने जिंकली. म्हणजेच, आधुनिक ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवण्याचा मान त्याला मिळाला. हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधले शिक्षण अर्धवट सोडून तो अथेन्सला गेला होता. पुढे जेम्स कॉनोली हा कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध झाला. 

 या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश केला गेला. का, त्यालाही रंजक इतिहास आहे.  त्यापूर्वीच्या प्राचीन ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनची स्पर्धा होत नसे. इ.स.पूर्व ४९०च्या दरम्यान पर्शियाने ग्रीसवर आक्रमण केले होते. पर्शियन सैन्य संख्येने जास्त असूनही ग्रीसच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. मॅरेथॉन शहराजवळ ही लढाई झाली होती.  ग्रीकांचा यात विजय झाला असल्याची बातमी देण्यासाठी फाइडपाइड्स नावाचा सैनिक मॅरेथॉनहून अथेन्सला धावत गेला. ‘आपण जिंकलो, आपण जिंकलो’ असे ओरडत खाली कोसळला आणि मरण पावला. मॅरेथॉन ते अथेन्स हे अंतर ४० किलोमीटर होते. त्यामुळे या घटनेच्या स्मरणार्थ ऑलिम्पिकमध्ये ४० किलोमीटर मॅरेथॉनचा समावेश केला गेला. 

 पुढे १९०८ साली लंडनला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडचा राजा मॅरेथॉनची स्पर्धा बघायला गेला होता. तो ज्या रॉयल बॉक्समध्ये बसणार होता, त्याच्या पुढ्यात ती संपायला हवी होती. त्यामुळे शर्यतीचे अंतर २ किलोमीटर १९५ मीटरने वाढवले गेले. आजही मॅरेथॉन शर्यतीचे अंतर ४२.१९५ किलोमीटर असते.

 ऑलिम्पिकचे आयोजन दर वेळी लीप वर्षात केले जाते. पण आत्तापर्यंत दोनदा अपवाद घडला- १९०० सालचे पॅरिस ऑलिम्पिक आणि  २०२०चे टोक्यो ऑलिम्पिक कोविडच्या साथीमुळे २०२२ मध्ये आयोजित केले गेले.

 १९०४चे ऑलिम्पिक अमेरिकेतील सेंट लुई या शहरात झाले. त्या वर्षी अमेरिकेने फ्रान्सकडून लुइसियाना हा प्रांत विकत घेतलेल्याला १०० वर्षे पूर्ण होत होती, म्हणून ऑलिम्पिकच्या बरोबरीने एक मोठा महोत्सव आयोजित केला गेला होता.  या ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना व उपविजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ पदक देण्याची पद्धत सुरू झाली, जी अजूनही कायम आहे.

 १९०८च्या लंडन ऑलिम्पिकचे वैशिष्ट्य म्हणजे या वेळी प्रथमच खास ऑलिम्पिक स्पर्धांसाठी म्हणून एक स्टेडियम नव्याने बांधले गेले. त्यावेळी  जलतरण (swimming) स्पर्धा प्रथमच नदीत वा समुद्रात न घेता स्विमिंग पूलमध्ये घेतल्या गेल्या. या ऑलिम्पिकमध्ये काही हिवाळी खेळांचाही (Winter Sports) समावेश केला गेला होता.  त्यामुळेच ते दीर्घ काळ लांबले. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले हे एकमेव ऑलिम्पिक.

 या लंडन ऑलिम्पिकमध्ये खास स्वागत-सोहळा (Opening Ceremony) साजरा केला गेला. त्यानंतर तशी प्रथाच पडली. या ऑलिम्पिकमधला एक किस्सा म्हणजे इटलीचा मॅरेथॉनपटू शर्यत संपेपर्यंत सगळ्यात पुढे होता, पण अंतिम रेषेच्या आधी काही अंतर बाकी असताना तो दमून खाली पडला. पंचांनी त्याला उठायला मदत केली. त्यानंतर असे ४ वेळा घडले. अखेर त्याने अंतिम रेषा पार केली, आणि तो पहिला आला. त्याच्या नंतर एका अमेरिकन खेळाडूने ती शर्यत पूर्ण केली. अमेरिकेच्या पथकाला जेव्हा कळले की, इटलीच्या धावपटूला शर्यत पूर्ण करण्यास इतरांनी मदत केली, तेव्हा त्यांनी आयोजकांकडे तक्रार केली. मग इटलीच्या स्पर्धकाला बाद ठरवले गेले आणि अमेरिकन खेळाडू प्रथम आल्याचे जाहीर करण्यात आले.

 १९१२च्या स्टॉकहोम ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या स्पर्धांसाठी पहिल्यांदाच विशिष्ट प्रकारच्या स्टॉप वॉचचा उपयोग करण्यात आला. या स्पर्धांमध्ये जपानने प्रथमच भाग घेतला. ऑलिम्पिकसाठी पाचही खंडांतून खेळाडू एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ!

 याच स्टॉकहोम ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या जिम थॉर्प याने कमाल केली. त्याने मोठ्या फरकाने पेंटाथलॉन व डिकेथलॉन या स्पर्धा जिंकल्या. पण आयोजकांच्या नंतर लक्षात आले की, त्याने पूर्वी एकदा बेसबॉल खेळताना मानधन घेतले होते. त्या काळात ऑलिम्पिक खेळाडू हा हौशीच असला पाहिजे, असा दंडक होता. त्यामुळे जिम थॉर्पला दिलेली पदके काढून घेतली गेली. नंतर अनेक वर्षांनी व्यावसायिक खेळाडूंनाही ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास मान्यता मिळाल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्याची पदके त्याला परत देण्याचे ठरवले. तोपर्यंत त्याचे निधन झाले होते, म्हणून त्याच्या मुलीला ती पदके दिली गेली.

 १९२०च्या बेल्जियम ऑलिम्पिकमध्ये प्रथमच एकमेकांत गुंफलेली पाच वर्तुळे असलेल्या व जगातील पाचही खंडांचे ऐक्य दर्शवणाऱ्या ऑलिम्पिक ध्वजाचे अनावरण करण्यात आले. आधुनिक ऑलिम्पिकचा जनक, तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा अध्यक्ष कुबर्तीन यानेच या ध्वजाची निर्मिती केली होती. तसेच या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ऑलिम्पिक-शपथ घेतली गेली.  त्यावेळी पहिले महायुद्ध सुरू होण्यास कारणीभूत ठरलेल्या जर्मनी, हंगेरी, ऑस्ट्रिया व बल्गेरिया या देशांतील खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली नव्हती. 

 १९२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ऑलिम्पिकचे बोधवाक्य ठरवले गेले- Citius, Altius, Fortius (Faster, Higher, Stronger). तसेच ऑलिम्पिक संपताना हल्ली जो सांगता सोहळा  (Closing Ceremony) होतो, त्याची सुरुवात या ऑलिम्पिकपासून झाली. 

 ऑलिम्पिक ज्योत तेवत ठेवण्याची पद्धत १९२८च्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकपासून सुरू झाली. याच ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रथमच हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. या नंतर १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकपर्यंत दर वेळी हॉकीमध्ये भारतानेच सलग सुवर्णपदक जिंकले. या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच महिलांना ॲथलेटिक्समध्ये भाग घ्यायला परवानगी देण्यात आली होती. 

 हल्ली पार्किंगसाठी ‘P’ अक्षर लिहिलेले बोर्ड लावलेले आपण पाहतो. त्याची सुरुवात या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकपासून झाली. १९२०च्या दशकात युरोपमध्ये कारचा वापर खूप वाढला होता. ऑलिम्पिकच्या स्पर्धा बघायला येणारे प्रेक्षक त्यांच्या गाड्या घेऊन येतील, म्हणून स्टेडियमपासून काही अंतरावर विविध ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली होती. लोकांना पार्किंगची जागा दर्शवायची कशी?  त्यासाठी पार्किंगच्या जागेजवळ ‘P’ हे अक्षर लिहिलेले बोर्ड बसवण्यात आले. आता साधी वाटणारी कल्पना,  पण तेव्हापासून  ‘P’ म्हणजे पार्किंग,  हे रूढ झाले.

 ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये कोकाकोला कंपनीने पहिल्यांदाच मार्केटिंगचा एक भाग म्हणून आयोजनासाठी सहकार्य केले. त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कोकाकोला कंपनीने प्रायोजकत्व केले आहे, हाही एक वेगळाच विक्रम!

 १९३२चे ऑलिम्पिक अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे झाले, तेव्हा जागतिक मंदी होती. मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद पडल्या होत्या. तरी ऑलिम्पिकचे आयोजन यशस्वीपणे पार पडले. पण त्याआधी अडीच महिने ते ६ महिने चाललेला हा सोहळा, यावेळी मंदीमुळे फक्त १६ दिवसांचा  झाला. तेव्हापासून ऑलिम्पिक १५ ते १८ दिवसांचे झाले. 

 या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपासून विजेत्यांना पोडियमवर उभे राहून पदक विजेत्यांच्या देशाचा झेंडा फडकावत आणि त्या देशाचे राष्ट्रगीत वाजवत पदक देण्याची पद्धत सुरू झाली, जी अजूनही पाळली जाते. 

 याच ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात भारत, जपान आणि अमेरिका या तीनच देशांच्या संघांनी भाग घेतला होता. भारताने अमेरिकेला २४-१ असे हरवले होते. एवढ्या मोठ्या फरकाने हॉकी 
स्पर्धा जिंकण्याचा हा अजूनही न मोडला गेलेला विक्रम आहे.
 १९३६चे ऑलिम्पिक जर्मनीत बर्लिन येथे घेण्याचे ठरले, तेव्हा हिटलर सत्तेवर नव्हता. पण १९३३ साली तो सत्तेवर आल्यावर जर्मनीऐवजी इतर कुठल्यातरी देशात ऑलिम्पिक भरवण्याचा विचार ऑलिम्पिक समिती करत होती. नाझी पक्षाच्या वृत्तपत्रांमधून ज्यू आणि आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी देऊ नये, अशा प्रकारच्या बातम्या, लेख प्रसिद्ध होत होते. त्यामुळे अनेक देश या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकणार होते. पण हिटलरने ज्यू आणि आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंविरोधात भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यामुळे बर्लिनमध्येच ऑलिम्पिक भरवले गेले. 

 १९३६मध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या खेळांचे टीव्हीवर प्रक्षेपण केले गेले. त्या वेळी घरोघरी टीव्ही नसत. त्यामुळे बर्लिन शहरातच २५ ठिकाणी टीव्हीवरून खेळ बघण्याची सोय करण्यात आली होती. 

 ऑलिम्पिक ज्योत ग्रीसमध्ये पेटवून विविध ॲथलेट्सनी धावत येऊन ऑलिम्पिक स्टेडियमपर्यंत आणण्याची प्रथासुद्धा या बर्लिन  ऑलिम्पिकपासूनच सुरू झाली.
बघा, ऑलिम्पिक या खेळांच्या स्पर्धेच्या निमित्ताने किती वेगवेगळ्या प्रथा, पद्धती रुजू झाल्या!


भाग ३ 

ऑलिम्पिक- अमाप संधी! 

गेल्या १२५ वर्षांत ऑलिम्पिकच्या निमित्ताने घडलेल्या गमतीजमती तुम्ही गेल्या दोन महिन्यांच्या ‘वयम्’मध्ये वाचल्या असतील. टीव्हीच्या आगमनामुळे ऑलिम्पिकची लोकप्रियता वाढली. Action Replay चा जन्मसुद्धा ऑलिम्पिकमुळे झाला. ऑलिम्पिकचे आयोजन करताना कुणी पैशांचा डोंगर जमवतात, तर कुणी कर्जात बुडतात. या स्पर्धा बघता बघता त्या स्पर्धांच्या निमित्ताने काय काय वेगळे घडत असते, याकडेही नजर ठेवा.   

ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करायला मिळणे सोपे नाही. ज्या शहरात ऑलिम्पिकचे आयोजन केले जाते, त्या शहराचा कायापालट होऊन जातो. ऑलिम्पिक स्पर्धा बघण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात, म्हणून अनेक सुविधा निर्माण केल्या जातात. नव्याने स्टेडियम्स उभारली जातात. एअरपोर्ट नव्याने बांधले जाते किंवा विमानतळाची क्षमता वाढवली जाते. हॉटेल्स बांधली जातात. रस्ते, तसेच महामार्गांची डागडुजी केली जाते. पर्यटकांमुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, टॅक्सी, टूरिस्ट-बसेस यांना मोठी मागणी असते. एकंदरीत त्या शहराच्या अर्थकारणास कमालीची गती मिळते. त्या शहराचा नावलौकिक वाढतो. एवढा की, त्या शहरात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ ऑलिम्पिक संपल्यावरही कित्येक वर्षं कायम राहतो.

 सुरुवातीच्या ऑलिम्पिकमध्ये, भाग घेणारे देश आणि खेळाडूंची संख्या मर्यादित असायची. त्यामुळे ऑलिम्पिकचे आयोजन करणे सहज शक्य होत असे. अंथरूण पाहून पाय पसरण्याची तेव्हाची पद्धत होती, त्यामुळे प्रत्येक देश / शहर त्यांची आर्थिक परिस्थिती बघून खर्च करत असत. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या १९४८च्या लंडन ऑलिम्पिकच्या वेळी इंग्लंडची आर्थिक स्थिती खालावलेली होती, त्यामुळे त्या वर्षीचे ऑलिम्पिक अतिशय काटकसरीने साजरे केले गेले. 

टीव्हीवर ऑलिम्पिकचे दर्शन 

 १९५०च्या दशकात ऑलिम्पिक स्पर्धांची लोकप्रियता वाढत गेली. त्याच वेळी टेलिव्हिजन नव्याने बाजारात येत होते. अमेरिकेच्या टीव्ही चॅनल्सनी विविध खेळांच्या स्पर्धा टीव्हीवर दाखवायला सुरुवात केली. १९६० साली अमेरिकेत झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांसाठी तेथील CBS या चॅनलने ५०,००० डॉलर देऊन प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले. तेव्हापासून ऑलिम्पिकचे आयोजन करणाऱ्यास पैसे मिळवण्याचे एक मोठे साधन उपलब्ध झाले. 

१९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये तर CBS ने जवळपास ४ लाख डॉलर देऊन प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले. त्याचबरोबर टीव्हीवरील प्रक्षेपणामुळे ऑलिम्पिक बघणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. अनेक कंपन्या जाहिरातदार/प्रायोजक म्हणून पुढे आल्या.  

Action Replay चा उगम 

 १९६०च्या हिवाळी स्पर्धांमध्ये एका स्पर्धकाकडून फाऊल झाला होता का, ते रेफ्रींना जाणून घ्यायचे होते. तेव्हा त्यांनी CBS चॅनलला त्या खेळाची व्हिडिओ टेप द्यायला सांगितली. यातूनच पुढे या चॅनलने Action Replay देण्यासाठी विशेष सुविधा निर्माण केली. आता रेफ्री सर्रास Action Replay चा आधार घेऊन निकाल सांगतात. 

 नव्या रोजगार संधी

ऑलिम्पिक जिथे आयोजित होते त्या शहराला प्रामुख्याने तिकीट विक्री, प्रायोजक, जाहिरातदार आणि टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क विकल्यामुळे उत्पन्न मिळते. टीव्ही प्रक्षेपणातून मिळालेल्या पैशांतील निम्म्याहून जास्त पैसे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला द्यायला लागतात. ही समिती, आयोजक शहराला आयोजनासाठी येणाऱ्या खर्चातील काही वाटा उचलते.  २०१६च्या ब्राझीलमधील रियो डी जेनेरो शहरात झालेल्या ऑलिम्पिकच्या वेळी तिथे २५,००० पर्यटकांना पुरतील एवढी हॉटेल्स होती, पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमानुसार  किमान ४०,००० पर्यटकांची सोय होईल एवढी हॉटेल्स असणे आवश्यक होते. त्यामुळे ब्राझीलला १५,००० हॉटेल रूम्स नव्याने बांधायला लागल्या. नवीन हॉटेल बांधणी, रस्ते बांधणी, शहराचे सुशोभन, स्पर्धकांची, प्रेक्षकांची ने-आण, त्यांच्या खाण्याची सोय, स्पर्धा आयोजनासाठी लागणारे मनुष्यबळ, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, जाहिराती, स्पर्धांचे वृत्तांकन, सोशल मीडियावरून प्रसार... कितीतरी कामे करण्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे अनेकांना वाव मिळतो.  

 आर्थिक आव्हान 

थोडक्यात, ऑलिम्पिकचे आयोजन म्हणजे एक मोठे आव्हान असते. जर खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ जमला नाही तर आर्थिक संकट येऊ शकते. १९७६च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिकच्या वेळी तर जेवढा खर्च येईल असा अंदाज होता, त्याच्या १३ पट जास्त खर्च आला. खर्च भागवण्यासाठी मग तेथील सरकारने सार्वजनिक लॉटरी सुरू केली. तेव्हा लॉटरी म्हणजे जुगार समजले जात असे, पण त्यातून उत्पन्न मिळते हे पाहून सरकारनेच लॉटरी सुरू केली. टीव्हीवर लॉटरीचा ड्रॉ दाखवून लोकांना लॉटरीची तिकिटे घ्यायला प्रवृत्त केले. तरीही मोठ्या प्रमाणात कर्ज काढावे लागले. या कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न होता. त्यामुळे तेथील सरकारने तंबाखूवर (म्हणजे अप्रत्यक्षपणे सिगरेटवर) विशेष कर लावला. असे करून दर वर्षी थोडे-थोडे करत ऑलिम्पिक संपल्यावर ३० वर्षांनी म्हणजे २००६ साली अखेर ते सर्व कर्ज फेडले.

 २००४ सालच्या अथेन्स आणि २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळी देखील आयोजनासाठी प्रचंड खर्च आला होता, कारण या शहरांनी नवीन एअरपोर्ट, रेल्वे, रस्ते, स्टेडियम नव्याने उभारले होते. अनेक शहरे ऑलिम्पिक भरवण्याची उत्सुकता दाखवतात, पण नंतर झेपत नाही असे वाटले तर माघार घेतात.  २०२४चे ऑलिम्पिक भरवण्यासाठी आधी पॅरिस, हॅम्बर्ग, बोस्टन, बुडापेस्ट, रोम आणि लॉस एंजलिस या सहा शहरांनी अर्ज केले होते. यांपैकी बोस्टनच्या नागरिकांनी या खर्चाला विरोध केला, म्हणून बोस्टन शहराने माघार घेतली. हॅम्बर्गने ऑलिम्पिक भरवायचे का नाही हे ठरवण्यासाठी चक्क सार्वमत घेतले. बहुसंख्य लोकांनी ऑलिम्पिक भरवण्याच्या विरोधात मत नोंदवले. रोमनेसुद्धा आर्थिकदृष्ट्या झेपणार नाही म्हणून अर्ज मागे घेतला. बुडापेस्टनेही तेथील नागरिकांचा विरोध बघून माघार घेतली. पॅरिस आणि लॉस एंजलिस या दोन शहरांनी मात्र ऑलिम्पिक भरवण्यास तयार असल्याचे सांगितले. मग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या २०१७च्या जुलैमध्ये झालेल्या बैठकीत २०२४चे ऑलिम्पिक पॅरिसला, २०२८चे ऑलिम्पिक लॉस एंजलिसला घेण्याचे नक्की केले.

२०३६चे ऑलिम्पिक गुजरातमध्ये? 

२०३२चे ऑलिम्पिक ब्रिस्बेन येथे घेण्याचे निश्चित झाले आहे. २०३६चे ऑलिम्पिक कुठे घ्यायचे तेही आता एक-दोन वर्षांत नक्की होईल. गुजरातमधील गांधीनगर/ अहमदाबाद येथे ऑलिम्पिक भरवण्यासाठी अर्ज करणार असल्याचे भारत सरकारने जाहीर केले आहे. बघू या आपली निवड होते का ते!  

-अनिल चक्रदेव
anil.chakradeo@gmail.com 
(‘ऑलिम्पिक’ या पुस्तकाचे लेखक)

***

My Cart
Empty Cart

Loading...