Menu

अंतराळ-विहारी

image By Wayam Magazine 11 June 2025

नमस्कार. मी शुभांशू बोलतोय. विंग कमांडर शुभांशू शुक्ला. ‘अँक्झियॉम ४’ (Axiom 4) या मोहिमेसाठी मी आणि माझे इतर दोन सहकारी नासाच्या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर काम करणार आहोत. आम्हा सर्वांमध्ये मी ज्येष्ठ असल्याने या मोहिमेचं सारथ्य माझ्याकडेच दिलं गेलं आहे. एका भारतीय अंतराळवीराला असा बहुमान दिला गेला, ही अभिमानाचीच गोष्ट आहे. 

‘रोजा’ चित्रपटातली छोटीशी मुलगी खेळत, बागडत, गाणं म्हणत जाते- ‘दिल है छोटासा, छोटीसी आशा, चांदतारोंको छुनेकी आशा, आसमानोंमे उडनेकी आशा’. सर्वच लहान मुलांच्या मनातली ती इच्छा ती सांगून टाकत असते. आकाशात स्वच्छंदपणे विहरणाऱ्या पक्ष्यांना पाहून त्याच्यासारखं आपल्यालाही आकाशगमन करता यावं, अशी आकांक्षा मनात साहजिकच उत्पन्न होते. माझंही मन माझ्या बालपणात तीच इच्छा धरून होतं. सर्वांचीच ती पूर्णत्वाला जात नाही; माझी झाली. पहिल्यांदा मी जेव्हा भारतीय हवाई दलात सामील झालो तेव्हा. आणि आता तर त्याच्याही पुढचं पाऊल टाकत मी अंतराळातच प्रवेश करतो आहे. अवकाशात धरतीपासून तब्बल साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मला मुक्काम ठोकायचा आहे. 

मी काही पहिलाच भारतीय अवकाशयात्री नाही, याची मला जाणीव आहे. कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स यांना तो मान मिळाला आहे, असं सहसा मानलं जातं. पण ते तितकंसं खरं नाही. कारण त्या दोघी भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या अमेरिकन नागरिक. आणि त्या देशाच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाच्या अंतर्गतच त्यांनी तो प्रवास केला होता. पण पूर्णार्थानं भारतीय नागरिक असलेल्या राकेश शर्मा यांनी अवकाशयात्री होण्याचा पराक्रम सर्वप्रथम साध्य केला होता. आणि आता मीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. 

तसं पाहिलं तर आम्ही दोघांनीही अंतराळगमन केलं ते परदेशी अंतराळयानांच्या मदतीनं. खरंय! पण आपणही मानवसहित अंतरिक्षसफरीचा, गगनयानाचा, कार्यक्रम आखला आहे. आणि येत्या काही काळातच आपल्याच अग्निबाणानं अंतराळ गाठण्याची कामगिरीही पार पाडली जाईल. त्याचीच पूर्वतयारी म्हणून मला आता अंतराळस्थानकावर धाडलं गेलं आहे. 

राकेश शर्मा आणि मी, आम्हा दोघांच्या अंतराळकार्यक्रमात मात्र बरेच फरक आहेत. शर्मांनी रशियाच्या ‘सोयुझ टी’ या अंतराळयानातून अवकाशात झेप घेतली होती. ज्या कुपीत बसून ते अंतराळात गेले तिचं रूपांतर कृत्रिम उपग्रहात झालं होतं. तिच्यात बसूनच आठ दिवस ते पृथ्वीप्रदक्षिणा करत होते. अर्थात त्या  दरम्यान त्यांनी काही प्रयोगही केले. मी या अंतराळस्थानकावर दोन आठवडे तळ ठोकून राहणार आहे.

राकेश शर्मा यांचं मुख्य काम अंतराळातून भारताची छायाचित्रं टिपण्याचं होतं. त्यासाठी त्यांना अतिशय संवेदनशील कॅमेरा दिला गेला होता. त्यातून त्यांनी आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची तपशीलवार माहिती मिळवली. एरवी केवळ आकाशातून टिपलेल्या छायाचित्रांमधून तीच माहिती मिळवण्यासाठी दोन वर्षं लागली असती. या माहितीचा उपयोग आपल्या दूरसंवेदनाच्या कामासाठी मोलाचा ठरला आहे. आज आपला दूरसंवेदन उपग्रह जगात अव्वल स्थानावर आहे. अवकाशात दोन हजार किलोमीटर अंतरावरून जमिनीवरील एकमेकांपासून केवळ पाच मीटर अंतरावर असणाऱ्या दोन वस्तू वेगवेगळ्या ओळखण्याची क्षमता या उपग्रहात आहे. आपल्या डोळ्यांनी नखावर हुळहुळणाऱ्या मुंगीचे पंखच काय, पण त्या पंखावरच्या मातीचे कण पाहण्यासारखंच आहे हे! या क्षमतेचा वापर करून आपण आज जगातील जमिनीवरच्या वनसंपदेच्या, उभ्या पिकांच्या तसंच जमिनीखालच्याही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या, जलस्रोतांच्या, माहितीचं व्यापारी वितरण करून बहुमोल परकीय चलन मिळवत आहोत. या उद्योगाची मुहूर्तमेढ राकेश शर्मांनी रोवली होती, हे विसरता नये.  

या छायाचित्रं टिपण्यावरून त्यांचा त्यावेळच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांच्याबरोबर झालेला एक संवाद आठवला. तो तर आता अजरामर झाला आहे. ‘त्या दूरवरून आपला देश कसा दिसतो?’ असा सवाल इंदिरा गांधी यांनी केला. त्यावर राकेश शर्मा यांनी दिलेलं उत्तर सर्वच भारतीयांच्या काळजात घर करून राहिलं आहे. ते म्हणाले होते, ̔सारे जहाँसे अच्छा!ﹸ. शब्द जरी त्यांनी इक्बाल यांच्या काव्यातून उसने घेतलेले असले, तरी भावना मात्र त्यांची स्वतःचीच होती. यच्चयावत भारतीयांच्या मनातलीच भावना त्यांनी व्यक्त केली होती. 

अंतराळयानात शून्यवत गुरुत्त्वाकर्षण असतं. त्याचा हृदयाच्या स्नायूंवर कोणता परिणाम होतो, हेही त्यांनी अजमावून पाहिलं होतं. तसंच त्या अल्प गुरुत्त्वाकर्षणाच्या पर्यावरणात दीर्घ काळ वावरण्यामुळे शरीरावर जे अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते, त्यांचं निवारण करण्यासाठी योगसाधना कितपत फायदेशीर ठरते, याचाही अभ्यास त्यांनी केला होता. 

आता मीही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील मुक्कामात असेच अनेक प्रयोग करणार आहे. या स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी आम्हा सर्वांनाही एक अग्निदिव्य पार पाडावं लागलं होतं. आम्ही धरतीवरून एका यानातून इथवर पोचलो. पण ते अंतराळस्थानकाशी व्यवस्थित जोडलं जाणं आवश्यक होतं. हीच कसोटीची वेळ होती. कारण ते यान काय किंवा अंतराळस्थानक काय, दोन्हीही स्थिर नव्हते. ताशी साडेसत्तावीस हजार किलोमीटर अशा भन्नाट वेगाने दोन्ही पृथ्वीप्रदक्षिणा करत होतो. त्या वेगात कोणतीही घट न करता आमची जोडणी व्हायची होती. हालणाऱ्या झोपाळ्यावर बसून सुईत दोरा घालताना काय तारांबळ उडते, याचा अनुभव तुम्ही घेतला असेलच. त्याचीच ही कितीतरी पटीनं सुधारलेली आवृत्ती होती. त्यासाठी आमच्या यानातल्या संगणकावर आमचा मार्ग आखून दिला होता. त्याच्याच मदतीनं मग आमचं यान स्थानकाच्या रेषेत आणलं गेलं. तरीही ही कामगिरी अगदी अचूक झाली की नाही, अशी शंका यायला नको म्हणून मग स्थानकाला जोडलेल्या रोबोच्या हातानं आम्हांला आपल्या जवळ ओढून घेतलं. हळूहळू आमची जुळणी हवी तशी व्यवस्थित झाली. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘डॉकिंग’ म्हणतात.

अजूनही बरीच सव्यापसव्य बाकी होती. जोड पक्का झालाय, कुठंही काही फट राहिलेली नाही, याची खात्री करून घेतल्यानंतर आमच्या यानातून बाहेर पडण्याचा दरवाजा उघडला गेला. ते यान आणि स्थानक यांच्यामधल्या ना इथं ना तिथं अशा एका पोकळीत आम्ही पाऊल ठेवलं. मागचा दरवाजा बंद झाला. त्या मोकळ्या प्रदेशातलं वातावरण स्थानकाशी मिळतं जुळतं आहे, हवेचा दाब समान आहे,  याची ग्वाही मिळाल्यावरच स्थानकाचा दरवाजा उघडला गेला. आम्ही, मी आणि माझ्या बरोबर असलेल्या इतर अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला. 

या मोहिमेत भारतासह अमेरिका, पोलंड, हंगेरी, ब्राझील, सौदी अरेबिया, अनेक युरोपीय देश अशा एकूण ३१ देशांनी सहभाग घेतला आहे. मी आणि माझे सहकारी तब्बल ६० प्रयोग करणार आहोत. तरीही मी अल्प गुरुत्त्वाकर्षणातील दीर्घ काळ वास्तव्याच्या परिणामांवरच लक्ष केंद्रित करणार आहे. मानवसहित अंतराळ संशोधनाचा जो महत्त्वाकांक्षी कार्यक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं हाती घेतला आहे, त्याची तयारी करण्यात या प्रयोगांच्या निष्कर्षांची कळीची भूमिका असणार आहे. 

मी करणार असलेल्या प्रयोगांपैकी काही अतिशय कल्पक आणि नाविन्यपूर्ण आहेत. ज्यांना पाण अस्वलं, वॉटर बेअर्स, अशा टोपण नावानं ओळखलं जातं ते टारडीग्रास हे अतिशय लहानखुरे प्राणी आहेत. ते अतिशय काटक आहेत. हाडं गोठवणारी थंडी, किंवा भाजून काढणारं उकळतं पाणी अशा वातावरणात ते सहज वावरतात. म्हणूनच अंतराळातल्या शून्यवत गुरुत्त्वाकर्षणाच्या पर्यावरणातही ते टिकाव धरून राहतील की काय आणि राहिल्यास त्यासाठी कोणत्या जीवरासायनिक प्रक्रियांचा त्यांना फायदा होतो, याचं निरीक्षण मी करणार आहे. भविष्यात जेव्हा अंतराळात मानवी वस्ती करण्याच्या योजना आखल्या जातील, तेव्हा त्या वातावरणाचा शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ न देता तिथल्या वास्तव्यासाठी जी तयारी करावी लागेल त्याचा मूलमंत्र या अभ्यासातून मिळण्याची आशा वैज्ञानिकांनी ठेवली आहे. तसंच त्या जीवरासायनिक क्रियांवर आधारित काही जैवतंत्रज्ञान प्रणाली जमिनीवरही साकार करता येईल, असा विश्वास त्यांना वाटतो आहे.

अंतराळस्थानकातून धरतीशी संपर्क ठेवायचा किंवा त्या स्थानकाचं नियंत्रण करायचं तर संगणकांच्या वापराला पर्याय नाही. पण त्या अल्प गुरुत्त्वाकर्षणाच्या पर्यावरणात एका जागी बसून राहता येत नाही. सतत तरंगतच राहावं लागतं. त्या अवस्थेत मग संगणकाच्या पडद्यावर लक्ष केंद्रित करण्यात काय अडचणी येऊ शकतात किंवा संगणकाशी संवाद साधण्यासाठी कीबोर्डचा, माऊसचा, वापर कितपत सहज करता येतो, हेही पाहिलं जाणार आहे. ताशी ऐंशी किलोमीटर वेगानं धावणाऱ्या मोटारीत बसून मांडीवरचा लॅपटॉप वापरताना कशी त्रेधातिरपीट उडते, हे कधी अनुभवलं आहे तुम्ही? 

अंतराळात वस्ती करायची तर ऑक्सिजनचा आणि अन्नाचा पुरवठा बिनबोभाट व्हायला हवा. प्रत्येक वेळी तो धरतीवरून तिथं नेऊन करता येणार नाही. म्हणून तिथल्या तिथेच त्यांची उपलब्धता करता येईल का, या दृष्टिकोनातून काही प्रयोग केले जाणार आहेत. त्यात ‘सायनोबॅक्टिरिया’ या जीवाणूंना कामाला लावलं जाईल. हे जीवाणू सूर्यप्रकाशाच्या मदतीनं ऑक्सिजन वायू तयार करतात. त्यांची तिथं जोपासना केल्यास अंतराळवीरांना लागणाऱ्या प्राणवायूची सोय करता येईल. तसंच तिथंच अन्नधान्य पिकवायचं झालं तर ‘मायक्रोअल्गी’ (microalgae) म्हणजे सूक्ष्म शेवाळांची शेती करण्याची योजना आहे. वनस्पतीसारख्याच असणाऱ्या या सजीवांमध्ये प्रथिनांचा आणि इतर पोषक द्रव्यांचाही मुबलक साठा असतो. त्यांची जोपासना केल्यास अंतराळवीरांच्या रसदीचा प्रश्न सोडवता येईल. 

आपण आपल्या जेवणात मोड आलेल्या कडधान्यांचा सढळ वापर करतो. अंतराळात असे मोड येऊ शकतील का, तिथंच उगवलेल्या कडधान्यांच्या ठायी हाच गुणधर्म असेल का, याचा अभ्यास केल्याशिवाय अंतराळात वस्ती करण्याच्या कार्यक्रमाला वेग मिळू शकणार नाही. त्यासाठी काही कडधान्यं माझ्या सामानात ठेवलेली आहेत. त्यांना मोड आणण्याचे प्रयोगही मी करणार आहे.

माझ्या खाण्यापिण्याची मात्र मला चिंता नाही. इस्रो आणि आपली संरक्षणविषयक संशोधन करणारी डीआरडीओ ही संस्था यातल्या वैज्ञानिकांनी माझ्यासाठी ‘घरका खाना’ तयार केला आहे. माझे सहकारी युरोपीय देशांमधून आलेले आहेत. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांची शिदोरी आमच्याबरोबर आहेच. पण खास माझ्यासाठी निरनिराळे पुलाव, मुगाच्या डाळीचा हलवा आणि आमरस, यांचाही साठा दिला गेला आहे.   

जमिनीवर असताना आपण आपल्या उठण्याबसण्यापासून ते इतर निरनिराळ्या हालचालींसाठी स्नायूंचा सतत वापर करत असतो. ते झिजून जाऊ नयेत म्हणून रुग्णांनाही चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अंतराळात सतत तरंगत राहिल्यामुळे स्नायूंना काही कामच उरत नाही. ते झिजत जातात. तिथं वस्ती करायची तर ही झीज कशी रोखता येईल, याचाही अदमास घ्यायला हवा. त्या दृष्टीनेही काही प्रयोग केले जाणार आहेत.

मी आणि माझे सहकारी यांची दिनचर्या अशी भरगच्च राहणार आहे. दोन आठवडे कसे निघून जातील हे कळणारही नाही. मग परतीचे वेध लागतील. आठ दिवसांसाठीच गेलेली सुनीता विल्यम्स तिथंच तब्बल नऊ महिने कशी अडकून पडली होती आणि तिचा परतीचा प्रवास कसा अनिश्चित झाला होता याची आठवण झालीच, तरी त्यापायी मी अस्वस्थ होणार नाही. कारण तो अपवाद होता. आजवर शेकडो अंतराळवीर आपला तिथला मुक्काम यशस्वी करून धरतीवर वेळेवर सुखरुप परत आले आहेत. तसाच मीही आपला नियोजित कार्यक्रम यथासांग पार पाडून परत धरतीवर पाऊल ठेवेन आणि माझ्या या सफरीतल्या गमतीजमती तुम्हांला सांगायला येईन, याविषयी मला जराही शंका नाही.

ओव्हर अँड आऊट!

- डॉ. बाळ फोंडके

 ***

My Cart
Empty Cart

Loading...