हे बोधवाक्य तुम्ही निश्चितच ऐकले असेल, वाचले असेल. याचा अर्थ आहे पृथ्वी हेच कुटुंब - The earth is one family. यातील वसुधैव शब्दामध्ये दोन शब्दांचा संधी आहे. वसुधा + एव = वसुधैव. कुटुम्बकम् याचा अर्थ कुटुम्ब - family. वसु शब्दाचा अर्थ आहे संपत्ती - wealth आणि वसुधा म्हणजे संपत्ती धारण करणारी – wealth holder. याच अर्थाने वसुंधरा, वसुमती असेही पृथ्वीला म्हणतात.
खरोखरच पृथ्वीचे हे नाव किती योग्य आहे! तिच्या मातीतच बीजे रुजतात, अंकुरतात, त्यांची रोपटी बनतात, वृक्ष बनतात. पृथ्वी आपल्याला अनेक धान्ये, फळे, फुले देते, वस्त्रासाठी कापूस देते, घर बांधण्यासाठी जमीन, माती देते. शिवाय ती आपल्याला मौल्यवान खनिजे देते, औषधी वनस्पती देते, खनिज तेल देते. तिच्याकडे खूप संपत्ती आहे आणि या संपत्तीची उधळमाधळ न करणे, पर्यावरणस्नेही बनणे याबद्दल तुम्ही जानेवारीच्या अंकात वाचलेच असेल.
अशी ही पृथ्वी हेच आपले कुटुंब मानून सर्वांनी एकोप्याने, सलोख्याने, सौहार्दाने राहावे हा संदेश या बोधवाक्यातून दिलेला आहे. शिवाय इथे कुटुम्बम् नाही तर कुटुम्बकम् म्हटले आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ सामान्यपणे सारखाच आहे पण कुटुम्बकम् मध्ये जो ‘क’ आहे ना, तो कुटुम्बाला लहान बनविणारा. कारण संस्कृतमध्ये एखाद्या शब्दाला जोडून येणारा ‘क’ हा प्रत्यय निरनिराळ्या अर्थांनी येतो त्यातला एक अर्थ आहे मूळ वस्तूची लहान प्रतिकृती हा. तेव्हा संपूर्ण जग हे एक छोटे कुटुंब मानले जावे ही भावना यातून व्यक्त होते.
हे वाक्य मूळचे महोपनिषद नावाच्या उपनिषदातील आहे. तिथे थोर व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना आलेला मूळ श्लोक असा आहे –
अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
पंचतंत्र आणि हितोपदेश या प्रसिद्ध कथासंग्रहांमधल्या गोष्टींमध्येही थोडा वेगळा श्लोक आहे तो असा -
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
अयं बन्धुरयं नेति = अयं बन्धुः अयं न इति। आणि परो वेति = परः + वा + इति
म्हणून संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा - हा माझा बांधव आहे, तो नाही किंवा तो परका अशी गणना संकुचित मनाची माणसे करतात. पण उदार अंतःकरणाच्या लोकांना पृथ्वी हेच लहानसे कुटुम्ब वाटते. आपल्या ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे की
हे विश्वचि माझे घर ऐसी मति जयाचि स्थिर।
किंबहुना चराचर आपणचि जाहला॥
ही सुंदर पृथ्वी आपल्याला मिळाली आहे. आपण मानवांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर तिला अधिक सुंदर बनवायला हवी. आपापसात न भांडता परस्परांना सहकार्य करून तिच्या संपत्तीचा उपभोग घ्यायला हवा. युद्धे, हिंसा टाळून बंधुभावाने राहायला हवे. केवळ माणसामाणसांमध्येच नव्हे तर कुटुंबे, संस्था, समाज आणि राष्ट्रे या सर्वांमध्ये सलोखा हवा. त्यापुढे जाऊन मानवाने निसर्गातील प्रत्येक घटकाशी सहकार्य करायला हवे हाच संदेश यातून मिळतो.
हे अर्थपूर्ण वाक्य अनेक संस्थांना आपले ब्रीदवाक्य म्हणून योग्य वाटते. पुण्याच्या सिम्बॉयसिस् या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेचे हे बोधवाक्य आहे. तिथे आपल्या भारतीय विद्यार्थ्यांबरोबरच देशोदेशीचे अनेक विद्यार्थी शिकायला येतात, एकोप्याने राहतात, ज्ञान मिळवितात. सिम्बॉयसिस् या शब्दाचा अर्थही तसाच आहे. हा मूळचा जीवशास्त्रातील शब्द असून त्याचा अर्थ दोन सजीवांमधील एकमेकांना फायदेशीर ठरणारे सहकार्य असा आहे. तोच शब्द आता परस्पर सहकार्याने दोघांनाही लाभकारक होणाऱ्या दोन व्यक्ती किंवा संस्था यांच्या नात्यासाठीही वापरला जातो.
सी. बी. एस. ई. बोर्डाशी संलग्न असलेल्या आणि दुबईसह पाच ठिकाणी शाखा असलेल्या दिल्लीच्या स्प्रिंगडेल्स स्कूल या शाळेचेही हेच ब्रीदवाक्य आहे. याशिवाय मनोरंजनाच्या क्षेत्रात विख्यात असलेल्या झी एंटरटेनमेंटनेही आपल्या बोधचिन्हात या वाक्याला स्थान दिले आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या भारतीय संसद भवनाच्या – पार्लमेंट हाऊसच्या - दर्शनी सभागृहामध्ये जी अनेक बोधवचने कोरलेली आहेत त्यांमध्ये वर दिलेल्या संपूर्ण श्लोकाचा समावेश आहे.
- डॉ. मेधा लिमये
***