१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांच्या कुमारवयातली ही एक गोष्ट-
१२ जानेवारी १८६३ या दिवशी कलकत्त्यातील दत्त कुटुंबाच्या विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांना मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव नरेंद्र ठेवलं. हा नरेंद्र म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद! शिकागो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वधर्मपरिषदेत केवळ, ‘माझ्या बंधू-भगिनींनो’ या संबोधनाने त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली आणि सर्वांना सामावून घेणा-या हिंदू धर्माचा मूळ विचार जगापुढे आला. जाती-भेद, स्त्री-पुरुष भेद अशी सर्व प्रकारची विषमता नष्ट करून या देशात समता, बंधुता आणि समाजाच्या हिताचे काम करण्याचा संदेश त्यांनी सर्वांना दिला. भारतीयांना त्यांनी दिलेल्या “उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती झाल्याविना थांबू नका.” या संदेशामुळे विविध क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. या थोर विचारवंताचा जन्मदिन हा ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त अष्टावधानी आणि सत्यप्रिय विवेकानंदांच्या कुमारवयातली एक गोष्ट-
नरेंद्र अगदी लहान असल्यापासून त्याचं बोलणं ऐकत राहावं असं होतं. एकदा दोन तासांच्या मधल्या वेळात नरेंद्रने मित्रांना असंच काहीतरी सांगायला सुरुवात केली. पुढच्या तासाचे शिक्षक आले. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्यांना मुलांच्या कुजबुजण्याचा आणि हसण्याचा आवाज आला. त्यांनी चिडून मागे पाहिलं. नेमकं कोण बोलत होतं ते कळावं म्हणून, ‘‘सांग, मी काय शिकवत होतो ते’’ असं शिक्षकांनी प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली. कोणाचंच लक्ष नसल्याने त्या मुलांना काहीच सांगता येईना. आता नरेंद्रची पाळी आली. त्याने मात्र गुरुजी काय शिकवत होते ते बरोब्बर सांगितलं. एकीकडे तो मित्रांशी बोलत असला तरी दुसरीकडे त्याचं लक्ष शिकवण्याकडे होतं. पण झालं असं की, मुलं नरेंद्रचं नाव सांगत होती, तो बोलत होता म्हणून! गुरुजींचा काही त्यावर विश्वास बसत नव्हता. कारण ते काय शिकवत आहेत हे नरेंद्रने बरोबर सांगितलं होतं. गुरुजींनी शिक्षा म्हणून नरेंद्र सोडून उरलेल्या सर्वांना उभं केलं. त्यांच्याबरोबर नरेंद्रही उभा राहिला. गुरुजींनी त्याला खाली बसायला सांगितल्यावर, तो गुरुजींना म्हणाला, ‘‘नाही गुरुजी, शिक्षा खरं तर फक्त मलाच व्हायला हवी, कारण मीच त्यांच्याशी बोलत होतो.’’
(‘स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह’ यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या ‘कथा विवेकानंदांच्या’ या पुस्तकातून साभार.)
***