Menu

भरकटलेलं वादळ

image By Wayam Magazine 15 July 2024

“समुद्राचे पाणी, हवेचे प्रवाह आणि उष्णता ह्यांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल घडले तर त्याच घटकांमधून चक्रीवादळ तयार होते, असं शास्त्रज्ञ सांगतात. जगण्याच्या लयीमध्ये असे विलक्षण बदल झाले की, नेहमीच्या सवयी विस्कटतात आणि आरोग्याला त्रास देणाऱ्या सवयी तयार होतात. वेगवेगळ्या व्यसनांची वादळे, कुटुंबांच्या आकाशामध्ये अशीच तयार होतात. वादळ तयार झाले की, त्याचा भरकटलेला प्रवास सुरू होतो. शेवटी ते कोणत्यातरी किनाऱ्यावर धडकते. तिथे खूपच नुकसान करून जाते. व्यसनांच्या वादळाच्या किनाऱ्यावर असतात व्यसनात अडकलेल्या माणसाचे कुटुंबीय. कुणाची पत्नी, कुणाचे आई-वडील, भाऊ-बहिणी आणि अनेकांची मुले. वेगवेगळ्या वयांची, बुद्धीची, क्षमतांची.”

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या ‘वादळाचे किनारे’ या पुस्तकाच्या मनोगतातला हा परिच्छेद. एक व्यसनी व्यक्ती फक्त कुटुंबातल्याच नाही, तर समाजातल्या कुणाचंही किती नुकसान करू शकते; प्रसंगी जीव घेते, हे आपण अलीकडेच पुण्यातील एका तरुण मुलाच्या बेदरकारपणात पाहिलं.

‘वादळाचे किनारे’ या पुस्तकातल्या गोष्टींचे हिरो आहेत सहा विद्यार्थी. यातल्या काहींचं बालपण एका पालकाच्या व्यसनाने बाधित झालं आहे. ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या साथीने ते वादळ परतवण्यासाठी त्या कुटुंबांची चाललेली धडपड या मुलांनी जवळून अनुभवली आहे. आणि दुसऱ्या पालकाचं दु:ख, ससेहोलपट बघून ही मुलं अधिक शहाणी झाली आहेत, दुसऱ्या पालकाला आधार देत आहेत. काही मुलं स्वत: एखाद्या व्यसनात अडकली आणि प्रयत्नाने त्यातून कशी बाहेर पडली, याच्याही गोष्टी आहेत.

अलीकडे दारू पिण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अनेक घरांमध्ये आता बार असतो. सिनेमा, वेब सिरीजमधून जे पार्टी कल्चर दाखवलं जातं, त्यातून पार्टी आणि दारू, सिगरेट यांचं समीकरण आहे, असं मुलांच्या मनावर ठसतं. ‘आम्ही मोठे आहोत, म्हणून हे पितोय, लहान मुलांनी हे पिऊ नये’, असं पालकांनी सांगितलं तरी लहान-मोठे हा भेद न मानणाऱ्या मुलांना ते पटतंच असं नाही.  त्यामुळे अनेक लहान मुलं व्यसनांच्या आहारी जात आहेत, हे ‘मुक्तांगण’च्या मुक्ता पुणतांबेकर त्यांच्या मुलाखतीत सांगतात. शाळा-कॉलेजचे शिक्षकही हे वास्तव अनुभवतात.

व्यसनाधीन व्यक्ती, जगण्याचा ताल आणि तोल हरवून बसते. स्वत:च्या तना-मनाला त्रास देतेच, शिवाय तिच्या बेताल वागण्याने आजूबाजूच्यांचेही आयुष्य होरपळून निघते. ज्या मुलांच्या घरात किंवा आसपास कोणी व्यसनी व्यक्ती असते, त्या मुलांच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असू शकतात. एक म्हणजे, ते करतात तर मीही तसंच करणार. आणि दुसरी म्हणजे, ते देतात तसा त्रास मी स्वत:ला आणि इतरांना होऊ देणार नाही. यातला योग्य पर्याय काय, हे मी तुम्हांला सांगायची गरज नाही. खरं तर ‘वयम्’ वाचणाऱ्या मुलांमध्ये योग्य-अयोग्य काय, हे जाणण्याची समजशक्ती असणार; वाचणारी मुलं विचार करू शकतात!

पुण्यातल्या १७ वर्षांच्या मुलाने जे भयंकर क्रूर कृत्य केलं, तो कित्ती बाबतीत अविचारी होता बघा. पबमध्ये जाऊन दारू पिऊन त्याने स्वत:चं भान हरवलं. स्वत: कमावत नसतानाही, भरमसाट खर्च नको त्या गोष्टींवर केला. गाडी चालवण्याचं वय नसताना; आणि नशेत असताना ती चालवली. नोंदणी न झालेली पोर्शे त्याने भरधाव हाकली, म्हणजे कायदाही धुडकावून लावला. त्याच्यामुळे दोन तरुण व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला, तरी हा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय खेद-खंत न बाळगता सुटकेसाठी यत्न करताहेत.

हे असं घडतंच कसं? या मुलाच्या पालकांनी मुलाला स्वातंत्र्य देण्याच्या नशेत शिस्त, मर्यादा आणि जबाबदारीचं भान दिलंच नाही का? श्रीमंतीच्या जोरावर खूप काही चांगलं मिळवण्याची वा करण्याची ताकद होती त्याच्याकडे. त्याचा लाभ न घेता, भलता लोभ केला त्याने. त्याच्या जडणघडणीच्या काळात पालकांचं काहीतरी चुकलं असणार. पण या वयाच्या मुलांना पालक हेच फक्त आदर्श वाटू शकतात का? तुम्हांला काय वाटतं? एरव्ही पालकांकडे चिकित्सक नजरेने बघता ना तुम्ही मुलं? पालकांचं काय चूक, काय बरोबर, हे जाणवत असतं तुम्हांला. टीन-एजमधली मुलं सिलेक्टिव्ह असतात. या बेताल मुलाचं सिलेक्टिव्ह असणं सोयीस्कर असणार... पालकांच्या चुका माहीत असूनही, स्वत:ला पाहिजे त्या अनुसरायच्या, म्हणजे पालकांचा ‘Say’ बोथट होणार!

मुलांचं सिलेक्टिव्ह असणं विचारी, विवेकी पातळीवर होणं, हे त्यांच्या मोठं होण्याचं लक्षण आहे. लहान वयात दारू पिणं, गाडी चालवणं हे मोठं होण्याचे आभास आहेत. तुमच्या आजूबाजूला अशी आभासी जाणारी, बेताल वागणारी मुलं असतील तर त्यांच्याशी निगडित असणाऱ्या त्यांच्या पालकांना, शिक्षकांना सावध कराल? अशी भरकटलेली वादळं किनाऱ्यावर धडकली की, स्वत:चं आणि तिथल्या अनेकांचं नुकसान करतात. म्हणून तरी...

-शुभदा चौकर  

cshubhada@gmail.com

***


My Cart
Empty Cart

Loading...