
लहानपणी हे गाणं नुसतं ऐकतानासुद्धा तोंडाला पाणी सुटायचं. लहानथोर सगळ्यांना सर्वांत अधिक खावाखावासा वाटणारा गोड खाऊ म्हणजे चॉकलेट! अठराव्या शतकात त्याचं शास्त्रोक्त बारसं झालं, तेव्हा शास्त्रज्ञांनी त्याचं नाव ‘थिओब्रोमा’ म्हणजे ‘देवांचं अन्न’ असं ठेवलं. इतकं काय आहे त्या चॉकलेटात?
चॉकलेट खाऊन ‘बरं' वाटतं. तसं ‘बरं’ वाटायला लावणारा चॉकलेटातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे साखर.
गोड खाल्लं की मेंदू स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. मेंदूमध्ये शाबासकी देणारी, आनंददायी रसायनं तयार होतात. डोपामीन हे त्यांच्यातलंच एक. तशी शाबासकी पुन्हा पुन्हा मिळावी म्हणून मेंदूला अधिक गोड खायचा मोह अनावर होतो.
गोड खाल्ल्यावर मेंदूत बनणारं आणखी एक रसायन म्हणजे ‘आनंद-अमाईड’, The Molecule of Bliss! गांजा, चरस, भांग घेतल्यावर जी ब्रह्मानंदी टाळी लागते तो झिंगवणारा आनंद त्या आनंद-अमाईडने होतो. पण तो अगदी थोडाच वेळ टिकतो. तोच आनंद पुन्हा पुन्हा मिळावा म्हणून व्यसनी लोक पुन्हा पुन्हा ते अमली पदार्थ घेत राहातात. अगदी त्याच कारणाने, तश्शाच ओढीने आपण चॉकलेटची वडीमागून वडी खात राहातो. चॉकलेट जितकं अधिक गोड तितकी ती खाखा अधिक असते.
फळं, दूध, मध हे पौष्टिक अन्नपदार्थ गोड लागतात. म्हणून माणसाच्या मेंदूने ‘गोड’ ही चांगल्या, पौष्टिक अन्नाची चव अशी खूणगाठच बांधली आहे. ही खूणगाठ केव्हा बांधली? अगदी पृथ्वीवर माणूसजात निर्माण झाली तेव्हाच, दीड लाख वर्षांपूर्वी! आदिमानवाच्या काळात पौष्टिक अन्न मिळवायला वणवण करावी लागे. ‘पुढचा खाण्याजोगा घास कधी मिळेल कोण जाणे!’ अशी स्थिती असायची. त्या भटकंतीत पौष्टिक खाणं सापडलं तर ते जेवढं मिळेल तेवढं बकाबका खाऊन घेणं गरजेचं असायचं. ते अत्यावश्यक काम नीट पार पडावं म्हणून निसर्गाने गोड चवीची पारख करणारे मज्जातंतू फक्त जिभेपुरतेच न ठेवता त्यांना जठरात, आतड्यांतदेखील विखरून ठेवलं. म्हणून गोड खाऊ खाल्ला की ते मज्जातंतू तशा सगळ्या ठिकाणांहून मेंदूवर ‘खा, खा’ या संदेशांचा भडिमार करतात. खरं तर एकविसाव्या शतकात हवं तेव्हा पुरेसं अन्न सहज मिळतं; पण मज्जातंतू ती जुनी साठवणीची रीत अजूनही पाळतात. म्हणूनच गोड खाऊ खाल्ला की खाखा सुटते.
लाडू, जिलबी, गुलाबजाम हेदेखील गोडच पदार्थ! हे पदार्थ भरमसाट खाल्ले जातात ते फक्त लग्नाच्या पंगतीत पैज जिंकण्यासाठीच! एरवी नाही. मग चॉकलेट खायचा सपाटा का लागतो? शिवाय चॉकलेट गोड असतं ते आता! पण सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या माया संस्कृतीतले लोक कडू कोकोबिया, तिखट मिरच्या आणि बेचव मक्याचं पीठ पाण्यात मिसळून, उकळून, घुसळून फेसाळ पेय बनवत. त्याचं नाव होतं, ‘xocolatl’ (झॉकलेटल) म्हणजे ‘कडू पाणी’! मायन लोक ते रसायन त्यांच्या समारंभांत देवाचं पेय म्हणून चाखतमाखत चवीचवीने पीत. नंतरच्या ऍझटेक संस्कृतीनेही मायन लोकांकडून ते कडू देवपेय हट्टाने घेतलं. स्पॅनिशांनी ते युरोपात नेलं.
चॉकलेटला दूधसाखरेचा साज चढला तो युरोपात पोचल्यानंतर! मग त्या कडू मायन सोमरसात इतकं आवडण्याजोगं होतं तरी काय?
चॉकलेटात तीनशेहून अधिक रासायनिक पदार्थ असतात. त्यांच्यातले देवांशी नातं जोडणारे नेमके कोणकोणते, ते शास्त्रज्ञ शोधताहेत.
बिनसाखरेच्या, कडू ‘xocolatl’ मधले काही घटक मेंदूत मॉर्फीनसारखं काम करतात. शिवाय त्याच्यात थोड्या प्रमाणात का होईना, आनंद-अमाईड असतं. आणि काही अमायनो ऍसिड्स (प्रोटीनचे घटक) असतात. त्यांच्यापासून मेंदूतली सुखदायक, उत्साहवर्धक रसायनं बनतात. त्या साऱ्यांचीही जोराची तलफ येते. त्या प्राचीन मायन लोकांना त्यांचं ‘कडू पाणी’ देवांचं अन्न वाटायचं ते त्याचमुळे!
त्याच्याशिवाय त्या कडू पाण्यात, कॉफीत असतं ते कॅफीन आणि त्याचा धाकटा, थोडा कमकुवत भाऊ theobromine हेही असायचं. त्या दोघांनीही तरतरी येते. Theobromineमुळे कॅन्सर, दमा, हृदयाचे आजार यांचं प्रमाण घटतं. स्मरणशक्ती वाढते, रक्तातलं वाईट कोलेस्टेरॉल कमी होतं आणि चांगलं कोलेस्टेरॉल वाढतं. ती दोन्ही गुणी भाऊ-रसायनं अमेरिकेच्या मूळ सोमरसात अधिक असली तरी आजच्या चॉकलेटात कमीच असतात. केवळ ते फायदे मिळवायला चॉकलेट खाण्यात अर्थ नाही.
हल्ली चॉकलेट मुबलक मिळतं, ते खाऊन वजन वाढतं, त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून चॉकलेटची खाखा सुटली की आनंद-अमाईड मिळवायचे दुसरे मार्ग शोधायचे. व्यायाम, ध्यान, योगासनं यांनी मेंदूतलं आनंद-अमाईडचं प्रमाण वाढतं. चॉकलेटची ओढ लागली की पंधरा-वीस मिनिटं तरातरा चालून किंवा वेगाने धावून यावं. जमतील ती योगासनं करावी, मेडिटेशन करावं. दर वेळी तसा उपाय केला की ती ओढ अनावर होत नाही.
याचा अर्थ चॉकलेट खायचंच नाही असा मुळीच नाही. परीक्षेच्या मध्यावरची भूक, वाढदिवसाचं सेलिब्रेशन, दोस्तांची मैफिल यांना चॉकलेट हवंच. आणि दोस्ताशी कट्टीची बट्टी करायची असली की तर चॉकलेटच हवं. खरं ना?
- डॉ. उज्जला दळवी