Menu

कथालेखन स्पर्धा निकाल

image 31
Mar

अभिनंदन!

‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक कै. बाळकृष्ण लक्ष्मण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी ‘वयम्’ मासिक, शुक्ल परिवार व अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन, नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी कथालेखन स्पर्धेचा निकाल परीक्षकांच्या मनोगतासहित-

पाच उत्कृष्ट कथा

Ø  एकलव्य आणि अर्जुनडॉसुमन नवलकरवडाळा-मुंबई

Ø  ढक्कनविनय खंडागळेबुलढाणा

Ø  प्रथमोपचाराची किमयानिनाद भागवतडोंबिवली

Ø  प्रश्न विचारणारा मुलगाप्रसन्न दाभोलकरसातारा

Ø  अदृश्य चष्माडॉमानसी राजाध्यक्षमुंबई 

उत्तेजनार्थ कथा

Ø  कापसाची लेकडॉकैलास दौंडअहमदनगर

Ø  सलाम विश्वमानवतेलासंजय सागडेबारामती

Ø  सायकलउमेश जोशीपुणे

Ø  हसरी फुलंकांचन दीक्षितकोथरूड-पुणे

Ø  चला जाऊ शुक्रावरभारती मेहताठाणे

 

प्राथमिक फेरीच्या परीक्षकांचे मनोगत-

‘वयम्’ मासिक, शुक्ल परिवार आणि अल्पारंभ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कथालेखन स्पर्धा घेतली गेली. यात महाराष्ट्र व इतर राज्य मिळून २०० हून अधिक कथा आल्या. वय वर्षे ७ ते ९० अशा वयोगटाकडून छान प्रतिसाद होता. कथांचे विषयही खूप विविध होते. चातुर्य कथा, विज्ञान कथा, ग्रामीण आणि शहरी समाज जीवनाचे पैलू दाखवणाऱ्या कथा... यांमधून ३५ कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या.  हे काम सोपं नव्हतं.
या स्पर्धेसाठी लहान मुलांनीही चांगले प्रयत्न केले. सुमारे १०-१२ मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या कथा विजयी ठरल्या नसल्या तरी कथालेखनाचा मुलांनी केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. या मुलांमध्ये भविष्यातील कथालेखक/कथालेखिका ठळकपणे दिसत आहेत. कथांचे प्राथमिक परीक्षण करण्याची संधी आमच्यासाठी खूप आनंददायी ठरली.

-स्मिता शेंडे (समुपदेशक, IPH, समाजसेविका)
-कांचन जोशी ( लेखिका,  ‘वयम्’ समन्वयक)

 

अंतिम फेरीच्या परीक्षकांचे मनोगत-

‘गोष्ट’... प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. प्रत्येक कलेत, प्रत्येक बातमीत, प्रत्येकाच्या जगण्यात गोष्ट असते. आपल्या भोवताली सतत नव्या गोष्टी घडत असतात, काही घडून गेलेल्या असतात, काही घडण्याची कल्पना आपण करू शकतो. अशा गोष्टींना टिपण्याचा आणि त्यांना वेगळ्या प्रकारे शब्दांत बांधण्याचा प्रयत्न करणारे लेखक हे इतरांना त्या गोष्टींचा आनंद देत असतात.

आपली मराठी भाषा ही अशा अगणित गोष्टींनी समृद्ध झालेली भाषा आहे. अनेक बोलींमधल्या लोककथा आणि नव्या काळातल्या लेखकांनी लिहिलेल्या कथा, हे आपल्या भाषेचं वैभव आहे. मराठीतल्या प्रसिद्ध लेखकांपैकी एक लेखक कै. बाळकृष्ण लक्ष्मण शुक्ल. त्यांनी लिहिलेल्या कथांनी मराठी कथा साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या स्मरणार्थ 'वयम्' मासिकानं कथालेखन स्पर्धा हा एक स्तुत्य उपक्रम आयोजित केला.
सगळ्यांनाच गोष्ट ऐकायला आवडते, पण गोष्ट लिहिणं हे काम सोपं नसतं, आणि ती जर स्पर्धेकरिता लिहायची असेल, तर स्पर्धेचे नियम लक्षात घेऊन लिहिणं हे एक आव्हानच असतं. कथालेखनाची ही तारेवरची, पण आनंददायी कसरत करत महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतून 'वयम्'च्या ह्या ‘कथालेखन स्पर्धे’ला भरघोस प्रतिसाद मिळाला. सर्व लेखकांचं मनापासून कौतुक. स्पर्धेकरता आलेल्या २०० कथांमधून फक्त ५ कथा ह्या उत्तम पुरस्काराकरिता आणि ५ कथा ह्या उत्तेजनार्थ पुरस्काराकरता निवडणं म्हणजे आम्हा परीक्षकांचीच कसोटी होती. तसंच वेगवेगळी कथाबीजं, विषय, मांडणी, शैली इत्यादी प्रकारे नटलेल्या ह्या कथांचं वाचन ही एक मेजवानीही होती. बोली, प्रमाण भाषांचा वापर, उठावदार संवाद, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, प्रवाही कथन, उत्कंठावर्धक, वाचकाला नवं काही देणारं कथानक अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त अशा काही कथांनी ह्या स्पर्धेत बाजी मारली. स्पर्धेचे निकष लक्षात घेऊन परीक्षकांना निर्णय घ्यावे लागतात. त्यानुसार ह्या स्पर्धेकरिता पाठवण्यात आलेल्या कथांमधून आम्ही एकमतानं आमचा निर्णय जाहीर करत आहोत. अर्थात पुरस्कारप्राप्त कथांमध्येही काही उणिवा आहेत, पण इतर कथांच्या तुलनेत कमी. ह्या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे सर्व कथालेखकांना नक्कीच एक आत्मविश्वास मिळाला असेल, ज्याचा उपयोग त्यांना पुढील लेखनाकरता होईल. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी न झालेल्यांनाही भविष्यात कथा लिहिण्याची प्रेरणा मिळेल, याबद्दल खात्री वाटते.

सर्व सहभागी स्पर्धक-लेखक, पुरस्कारप्राप्त विजेते यांचं मनापासून अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा!

ह्या सर्जनशील उपक्रमात महत्त्वाची जबाबदारी देऊन आम्हाला सहभागी करून
घेतल्याबद्दल 'वयम्'चे मनापासून आभार.

-डॉ. सुमती जोशी (ज्येष्ठ लेखिका आणि भाषांतरकार)
-डॉ. निर्मोही फडके (ज्येष्ठ लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ)

My Cart
Empty Cart

Loading...