कारगिल युद्धाच्या काळात सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांना ‘१८ द
ग्रेनेडियर्स' या सैन्यपथकातून द्रास भागात आणले गेले. पाकिस्तानी घुसखोर सैनिकांनी कब्जा मिळवलेल्या कारगिलच्या उंच पर्वतरांगांमधील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या टायगर हिल्सवर कब्जा मिळवण्याचा आदेश १८ ग्रेनेडियर्सच्या कमांडो पथकाला मिळाला. मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव हे याच क्षणाची वाट पाहत होते. टायगर हिल्सवर हल्ला करण्याचे नियोजन समजून घेऊन त्यांच्या तुकडीचे नेतृत्व करीत ते
१९९९ साली जुलैच्या पहिल्या आठवड्यात टायगर हिलवर चढाई करायला सज्ज झाले.
कारगिल पर्वतांच्या उंच उंच रांगा, सातत्याने पडणारा बर्फ, निर्मनुष्य परिसर, दऱ्याखोऱ्यांमध्ये पसरलेली नीरव शांतता आणि कमालीच्या थंड वातावरणात अतिशय खडतर पर्वत, शस्त्रांसह चढायचे हे मोठे आव्हानच होते. खालून टायगर हिल्सवर बोफोर्स गनमधून मारा सुरू होता. मेजर सुभेदार योगेंद्र सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांचे कमांडो पथक ४ जुलैच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत टायगर हिल्सच्या दिशेने निघाले. वाटेत ‘टोलोलिंग’ हे पाकिस्तानी घुसखोर सैनिकांनी बळकावलेले भारतीय ठाणे लागले. ते कमांडोंच्या प्लॅटूनने सहजतेने जिंकले आणि टायगर हिल्स जिंकण्यासाठी आगेकूच सुरू केली. दोन दिवस अखंड पायपीट केल्यानंतर ते टायगर हिल्सच्या पायथ्याशी पोहोचले.
टायगर हिल्सची चढण अतिशय उभी होती. मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे होते. मात्र मनाचा निग्रह करीत ते पुढे सरकत राहिले. पर्वताच्या साधारण मध्यभागी आले असताना मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी सोबत आणलेले मोठे दोर तिथल्या मोठ्या दगडांना बांधून खाली सोडले. हे दोर पकडून पर्वतावर येणे भारतीय सैनिकांना सोयीचे जाणार होते.
यानुसार कमांडो प्लॅटूनचे काही सैनिक दोर धरून चढूही लागले. मात्र याच काळात टायगर हिल्सच्या वरच्या पठारावर खंदकात लपलेल्या पाकिस्तानी घुसखोर सैनिकांनी मशीनगन आणि मॉर्टरचा जोरदार मारा सुरू केला. त्यामुळे या तुकडीचे कमांडर आणि दोन सैनिक मृत्युमुखी पडले.
मात्र मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांचा निर्धार पक्का होता. आपल्या सोबत सैनिकांना प्रोत्साहन देत, “मी स्वतः पुढे जाऊन सारा बंदोबस्त करतो, पाठोपाठ तुम्ही या” असे सांगत ती उभी चढण पार केली. आणि पहाडाच्या पठारापासून सुमारे ६० फूट दूर असतानाच शत्रूंच्या गोळ्यांनी ते जखमी झाले. त्यांच्या खांदा व पायात तीन गोळ्या घुसल्या होत्या. मात्र जिद्दी मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव डगमगले नाहीत. उलट अधिक जिद्दीने आणि त्वेषाने त्यांनी सारी चढण पार केली. पठारावर येतातच खंडकातील मशीनगन बंद पाडणे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी ओळखले. खंदकावर हल्ला केला. हातातील हॅन्ड ग्रॅनाईट खंदकात फेकला. या स्फोटात खंदकातील चारही पाकिस्तानी घुसखोर सैनिक जागीच ठार झाले. त्यांच्या धडाडणाऱ्या मशीनगन्स बंद पडल्या. यामध्ये स्वतः मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादवही जखमी झाले. जखमांमधून रक्त वाहत असतानाही न थांबता त्या अतिथंड वातावरणात ते अंधारात सरपटत दुसऱ्या खंदकाकडे जात राहिले. अती रक्तस्त्रावामुळे त्यांना ग्लानी येत होती. मात्र हा शूर योद्धा पुढे सरकतच राहिला. टायगर हिल्सवरील दुसऱ्या खंदकातून मशीन फायरिंग करणाऱ्या चारही पाकिस्तानी घुसखोर सैनिकांवर ते तुटून पडले. त्यांच्यासोबतच्या दोन भारतीय कमांडोंनी अतिशय त्वेषाने खंदकातील पाकिस्तानी घुसखोर सैनिकांवर हल्ला केला. चारही जणांना भोसकून ठार केले.
प्रजासत्ताक दिनाबद्दल अधिक वाचा
तरुण वयात कमावलेली ताकद योगेंद्रसिंहांना फार उपयोगी पडली. आता खंदकातून मारा करणारी दुसरी मशीनगनही बंद पडली. त्यामुळे खालून वर येणाऱ्या कमांडो प्लॅटूनचा मार्ग निर्धोक बनला होता. मेजर सुभेदार योगेंद्रसिंहांसोबत असणारे त्यांचे दोन सहकारी त्यांना, माघारी फिरावे असा सल्ला देत होते. योगेंद्रसिंह यांनी तो साफ नाकारला. टायगर हिल्सवर तिरंगा फडकेपर्यंत विश्रांती नाही, हा निर्धार व्यक्त केला. तोपर्यंत त्यांच्या कमांडो प्लॅटूनचे उर्वरित जवान निर्धोकपणे पठारावर पोहोचले. त्यांनी साऱ्या पठारावर ठिकठिकाणी लपलेल्या पाकिस्तानी घुसखोर सैनिकांचा खात्मा करून टायगर हिल्सवर तिरंगा फडकवला. अतिरक्तस्त्रावामुळे ग्लानी आलेल्या मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी टायगर हिल्स मुक्त करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांना तब्बल १२ गोळ्या लागल्या होत्या. तिरंग्याकडे बघत असतानाच ते खाली कोसळले. त्यांच्या कमांडो प्लॅटूनने टायगर हिल्स जिंकल्यानंतर तातडीने बेस कॅम्पवर योगेंद्रसिंह यांना आणले. पुढे हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत भरती केले.
लष्करातील डॉक्टरांनी मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या शरीरावर अनेक शस्त्रक्रिया करून शरीरात घुसलेल्या सर्व गोळ्या बाहेर काढल्या. त्यानंतर कित्येक महिने ते हॉस्पिटलमध्येच राहिले.
टायगर हिल्ससारखे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण काबीज करताना मेजर सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या ३० जणांच्या कमांडो प्लॅटूनमधील नऊ कमांडोंना प्राण गमवावे लागले. या नऊजणांना वीरमरण आले. योगेंद्र सिंह यांचे शौर्य आणि नेतृत्व यामुळे टायगर हिलवर पुन्हा भारताचा कब्जा प्रस्थापित झाला. भारतीय लष्कराला व देशाच्या सीमेला असणारा फार मोठा धोका टळला.
त्यांच्या अमाप शौर्य, धैर्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि प्राणाची बाजी लावण्याची वृत्ती यामुळे त्यांना परमवीर चक्र जाहीर झाले. परमवीर चक्र मिळाले तेव्हा सुभेदार मेजर मेजर योगेंद्र सिंह यादव हे अवघे १९ वर्षांचे होते.
१० मे १९८० रोजी उत्तर प्रदेशातील बुलंद शहराजवळील औरंगाबाद अहिर इथे जन्मलेल्या योगेंद्रसिंह यादव यांचे वडील करणसिंह यादव हेही भारतीय सैन्यात कुमाऊँ रेजिमेंटमध्ये होते. १९६५
व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. घरातील लष्करी वातावरणाचा योगेंद्रसिंहांवर लहानपणापासूनच प्रभाव पडला होता. युद्धाच्या शौर्यकथा ऐकताना त्यांचे सैन्य-भरतीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत गेले. सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतीय लष्कर सेनेत प्रवेश घेतला.
सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांची अनेक मनोगते यूट्यूब चॅनल्सवर उपलब्ध आहेत. सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांचे कार्यकर्तृत्व भारतातील तरुणांचे प्रेरणास्थान बनावे.
-प्रवीण प्र. वाळिंबे
(‘गाथा शौर्यपदकांची-परमवीर चक्र’ या पुस्तकातून)