Menu

जाहिरातीतील खाचाखोचा

image By Wayam Magazine 14 March 2025

१५ मार्च, जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जाहिरात कशी नसावी, याचे काही नियम आहेत. ते समजून घेऊ या.

टीव्ही, रेडियो, यूट्यूब सगळीकडून आपल्यावर जाहिरातींचा मारा होत असतो. रेल्वे किंवा मेट्रोतसुद्धा आपल्याला या जाहिराती शांतपणे प्रवास करू देत नाहीत. वर्तमानपत्र वाचायला घ्यावे, तर पानभर नुसत्या जाहिराती.

या जाहिराती सांगत असतात की, आमचे उत्पादन वापरा, कारण ते सर्वोत्तम आहे. टूथपेस्टवाले सांगत असतात की, आमचीच टूथपेस्ट वापरा, कारण ती तुमच्या तोंडातले ९० टक्के विषाणू मारून टाकते. साबणवाल्यांच्या दाव्यात म्हटलेले असते की, आमचाच अंघोळीचा साबण वापरा, कारण त्यामुळे तुमची कांती चमकू लागेल. काही जाहिराती इतक्या अतिशयोक्तीपूर्ण असतात की, त्याचा विनोद होतो. उदा. आमच्या शाम्पूमध्ये सुक्या मेव्याचा अर्क, काकडीचा अर्क, कांद्याचा अर्क अशी काही पोषणमूल्ये आहेत की, त्यामुळे तुमचे केस घनदाट होतील.

या जाहिराती आकर्षक बनवण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यात कधी लहान गोंडस बालके जाहिरातीत झळकतात, तर कधी खेळकर पाळीव प्राणी. बऱ्याच जाहिरातींमध्ये विनोदाचा शिडकावा असतो, तर कधी कार्टूनचा वापर केला जातो. जवळ जवळ प्रत्येक जाहिरातीत चार-पाच वाक्यांत सांगता येण्यासारखी गोष्ट असते. बऱ्याच जाहिरातींच्या शेवटी एक ‘टॅग लाइन’असते. बऱ्याच जाहिराती टॅग लाइनमुळे आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतात. टॅग लाइनवरून कशाची जाहिरात आहे हे ओळखण्याचा खेळ तुम्ही खेळून बघा, जाम मजा येते.

जाहिरातीत प्रत्येक सणाचा अतिशय हुशारीने उपयोग केला जातो. सणांच्या निमित्ताने लोक खरेदी करतात. गिफ्ट देण्यासाठी विशेष पॅक बनवले जाते. बिस्किटे किंवा चॉकलेट यांचे मिक्स पॅक बनवतात. अनेकदा या गिफ्ट पॅकची किंमत आतील प्रत्येक उत्पादनाच्या एकूण किमतीपेक्षा जास्त असते. त्यामुळे अशी गिफ्ट पॅक खरेदी करताना त्याची किंमत मोजून बघा.

काही जाहिरातींमध्ये आपल्याला पांढरा कोट घातलेली व्यक्ती एखाद्या पौष्टिक उत्पादनाविषयी सांगत असते. आपल्याला वाटते, तो/ती डॉक्टर असेल आणि आपला त्यावर विश्वास बसतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती डॉक्टर असतेच असे नाही, तर तो/ती फक्त जाहिरातीत काम करणारा अभिनेता असतो.

याशिवाय एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे सेलिब्रिटी. आपल्या आवडत्या  सेलिब्रिटीने एखादी गोष्ट सांगितली की, आपला त्यावर लगेच विश्वास बसतो. यशस्वी अभिनेते, नामवंत खेळाडू अशांना जाहिरात क्षेत्रांत विशेष स्थान मिळते.  

जाहिरातींबद्दल काही नियम आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जाहिरातींवर काही बंधने घातली गेली आहेत.

जाहिरातीत जर जीवाला घातक ठरू शकेल अशी एखादी कृती दाखवली असेल तर त्याच वेळी जाहिरातीच्या तळाशी ‘असे कृत्य करू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात’, असे दाखवणे जरुरीचे आहे. कोणीतरी सेलिब्रिटी उंचावरून उडी घेतोय, किंवा कशाचीही मदत न घेता उंचावर चढतोय वगैरे साहसी दृश्ये सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत हमखास आढळतात. त्या साहसी दृश्यात काम करणारे सेलिब्रिटी नसतात, तर ते त्यांचे डुप्लिकेट असतात. त्यांना विशेष ट्रेनिंग मिळालेले असते. काही स्टंट कॉम्प्युटरच्या मदतीने केलेले असतात.

खोटे दावे करणाऱ्या जाहिरातींबद्दल आपण तक्रार करू शकतो. अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ही भारतातील जाहिरातींवर लक्ष ठेवणारी स्वयंसेवी, ‘वॉच डॉग’ संस्था आहे. जाहिरातदारांनी एकत्र येऊन याची स्थापना केली आहे. सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा जाहिराती तपासताना उपयोग केला जातो. नवीन कायद्यानुसार जाहिरात चुकीची आढळल्यास त्यांना सांगून ती एक तर बदलावी लागते किंवा बंद करावी लागते.

ग्राहक कायद्यानुसार सेलिब्रिटींना चुकीच्या जाहिरातीबद्दल जबाबदार धरले जाते. त्यासाठी दंड, कैद किंवा दोन्ही बाबींची तरतूद आहे. कोणतीही जाहिरात करताना तो दावा खरा आहे ना, याची खात्री त्या सेलिब्रिटींनी करून घेणे आवश्यक आहे.

तुम्हांला अशा अवास्तव, फसव्या, अतिरंजित, खटकणाऱ्या जाहिराती आढळल्यास ASCIच्या Ascionline.in या वेबसाइटवर तक्रार करता येते. तक्रार करताना जाहिरातदार किंवा ब्रँडचे नाव, वेळ, तारीख आणि कुठे ती जाहिरात दिसली, ज्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात केली जात होती, त्याचे नाव, जाहिरातीची प्रत किंवा त्याचे संक्षिप्त वर्णन हे सांगणे आवश्यक आहे. तुमच्या आक्षेपाचे कारण लिहिणे आवश्यक आहे. तुमचे नाव आणि संपर्क ही माहिती गोपनीय ठेवली जाते. तुम्हांला एखादी जाहिरात खटकली तर तक्रार नोंदवून बघा.

-मंगला गाडगीळ
gadgilmangala@gmail.com
(मुंबई ग्राहक पंचायतीची कार्यकर्ती)

'वयम्' मासिकाचे सभासद नसाल तर लवकरात लवकर सभासद व्हा!

***

My Cart
Empty Cart

Loading...