Menu

जागतिक मातृभाषा दिन

image By Wayam Magazine 21 February 2025

नेदरलँड्समध्ये ऑटम सुरू झाला की झाडांची पानं पिवळी, केशरी होऊ लागतात. त्याच सुमारास ग्रोसरी शॉपमध्ये शेंदरी रंगाचं गोलाकार आकाराचं पर्सीमन (Persimmon) नावाचं फळ सर्वत्र मिळू लागतं. पर्सीमन हे या फळाचं इंग्लिश नाव!  युरोपमध्ये या फळाला ‘काकी’ म्हणतात. मला हे फळ युरोपमध्ये राहायला लागल्यावरच कळलं, आणि त्यामुळे इकडच्या लोकांसारखं मीदेखील या फळाला काकीच म्हणते. ‘पर्सीमन’ या नावापेक्षा मला ‘काकी’ हे नाव ऐकायला गोड वाटतं!


काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट- एक दिवस मी सकाळपासून लॅबमध्ये उभी राहून प्रयोग करत होते. प्रयोगाचाचे विचार डोक्यात सुरू होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत मी शरीराने आणि मनाने जाम थकले होते. माझ्या रिसर्च ग्रूपमधल्या मित्रमैत्रिणींनी मला संध्याकाळी कॉफीसाठी विचारले. माझ्या या रिसर्च ग्रूपमध्ये काही डच, इटालियन, स्पॅनिश मित्रमैत्रिणी आहेत. मी त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला गेले. आणि त्यांच्याबरोबर कॉफी पिताना एकीकडे माझ्या डब्यातील ‘काकी’ खाऊ लागले. मग मी आणि माझे मित्रमैत्रिणी काकी फळाबद्दल बोलत होतो. त्यावर माझी स्पॅनिश मैत्रिण म्हणाली, “I don’t like Kaki at all!” मला जरा नवलच वाटले आणि मला तिला विचारायचे होते, “Why? Why don’t you like kaki?” मी कदाचित खूप थकल्यामुळे असेल आणि ‘काकी’ हा शब्द मराठीत फार वेगळ्या अनुषंगाने का होईना, पण रूढ असल्यामुळे, मी चुकून माझ्याही नकळत मराठीत बोलू लागले! आणि तिला चुकून why च्या ऐवजी मी मराठीतून विचारले- “पण का?” मला अज्जिबात जाणवले देखील नाही की, मी स्पॅनिश मैत्रिणीला, डच आणि इटालियन मित्रमैत्रिणींसमोर मराठीतून प्रश्न विचारतेय! मी तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत बसले. माझ्या ‘का’ चा उच्चार माझ्या या युरोपीय मित्रमैत्रिणींना फार नवीन असल्यामुळे ते जाम गोंधळले की, मल्लिकाने अचानक कावळ्यासारखा आवाज का बरं काढला! मग माझा सावळा गोंधळ माझ्या लक्षात आला आणि मी त्यांना समजावून सांगितले की, मराठीमध्ये ‘व्हाय’ म्हणजे ‘का’!
काही महिन्यांपूर्वी एकदा असे झाले की, मी खूप समरसून, कॉम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये पूर्ण गुंतून काम करत असताना माझी डच मैत्रीण समोर आली. तिने मला विचारले, “Would you like to join for lunch?” आणि मी तिला पटकन सहज उत्तर दिले- “हो, येतेच!”

माझ्या अनेक युरोपिय मित्रमैत्रिणींची मातृभाषा इंग्लिश नाहीये. त्यांच्याबरोबर अशा गमती घडताना मी अनुभवल्या आहेत. माझा डच मित्र कशात तरी व्यग्र असताना आम्ही त्याला प्रश्न विचारला आणि जर त्याचे उत्तर नकारार्थी असेल तर no म्हणण्याऐवजी तो अभावितपणे ‘नेऽऽ’ म्हणतो. (डचमध्ये ‘नाही’ला ‘ने’ म्हणतात) माझ्या स्पॅनिश मैत्रिणीच्या तोंडून अनेकदा okay, fine, that works च्या ऐवजी ‘बाले’ हा पर्यायी स्पॅनिश शब्द निघतो! माझी इटालियन मैत्रीण that’s perfect, good work च्या ऐवजी ‘पर्फेट्टओ’ हा इटालियन पर्यायी शब्द तिच्या नकळत वापरते! तर माझ्या जर्मन मैत्रिणीला कुठे ठेच लागली, काही टोचले तर तिच्या तोंडून पटकन जर्मनमधून uppsala (जर्मन भाषेतले oops) निघते! त्यामुळे आम्ही पण एकमेकांच्या मातृभाषेतील हे उद्गार शिकलोय! मला why विचारायच्या ऐवजी माझे हे युरोपियन मित्रमैत्रिणी ‘का’ असे मराठीतून विचारू लागले आहेत! मात्र आपल्या ‘का’ला अनेक सूर आहेत. आपण कुतूहल, वैताग, त्रागा अशी प्रत्येक भावना त्या त्या वेळी वेगवेगळ्या सुरातल्या ‘का’ने व्यक्त करतो. हे काही यांना अजून जमलेले नाही. त्यामुळे ते त्यांना वाट्टेल तो लांब सूर काढून ‘का’चा उच्चार करतात. त्याची मला फार मजा वाटते.
मीही माझ्या या युरोपीय मित्रमैत्रिणींनी How are you चे उत्तर स्पॅनिशमधून ‘बाले’ किंवा इटालियनमधून ‘perfetto’ असे देते. माझ्या डच मित्राला काही नकारार्थी उत्तर द्यायचे असेल तर मी नो, nupp न म्हणता त्याच्याचसारखे सुरात नेऽऽऽ असे उत्तर देते! मला याची जाम गंमत वाटते! एरवी दिवसभर आम्ही कायम इंग्लिशमधूनच बोलत असतो.
खूप व्यग्र असताना, मेंदू थकलेला असताना आणि कोणाला तरी पटकन प्रतिक्रिया द्यायची असेल की मायबोली अशी अचानक डोकं वर काढतेच!
-मल्लिका
***

My Cart
Empty Cart

Loading...