Menu

विश्वविक्रमी गुकेश

image By Wayam Magazine 13 December 2024

१८ वर्षीय गुकेशने बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्याच्या यशाचे गमक सांगणारा लेख-

कॅनडातील टोरॅन्टो येथे झालेल्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय दोमाराजू गुकेश याने अजिंक्यपद जिंकून सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली. त्याने चक्क जगज्जेत्याला आव्हान द्यायचे?

माजी जगज्जेता आणि आजचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने गुकेशचे अभिनंदन करताना मार्मिक टिपणी केली. तो म्हणाला की, गुकेश वयाने एवढा लहान आहे की, त्याला ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धांचे मानसिक दडपण म्हणजे काय याची कल्पनाही नव्हती. गंमत सोडा, पण जगातील रथीमहारथी खेळात असताना त्यांच्या वरचा क्रमांक मिळवणे काही सोपे काम नाही. योगासने करून मानसिक स्वास्थ्य सुधारणाऱ्या गुकेशने तब्बल ३ आठवडे चालणाऱ्या या महास्पर्धेत विजय मिळवला.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात-

नाक-कान-घसातज्ज्ञ वडील आणि मायक्रोबायोलॉजिस्ट आई अशा उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या गुकेशने सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. दोन वर्षांतच त्याने आशियाई स्पर्धेत ९ वर्षांखालील मुलांच्या गटात अजिंक्यपद मिळवले. त्याच्या प्रगतीचा वेग तुफान होता. २०१५ साली चँग माई (थायलंड) येथील आशियाई १२ वर्षांखालील मुलांची स्पर्धा गुकेशने गाजवली. ‘क्लासिकल’(Classical), ‘जलदगती’(Rapid) आणि ‘विद्युत्  गती’(Blitz) या तिन्ही प्रकारांत गुकेशने भारतासाठी सुवर्णपदक मिळवले. ‘जलदगती’ आणि ‘विद्युत्  गती’ प्रकारांमध्ये भारतीय संघाला सांघिक अजिंक्यपदे मिळवून दिली. एका स्पर्धेत ५ सुवर्ण! याला तर आपण बुद्धिबळातील मार्क स्पिट्झ म्हणू या!

चँग माईहून परत येताना वाटेत गुकेश ‘बँकॉक ओपन’ ही आशियातील महत्त्वाची स्पर्धा खेळला. या स्पर्धेत त्याने माजी जागतिक आव्हानवीर नायजेल शॉर्ट याचा पराभव करताना स्वतःसाठी ‘इंटरनॅशनल मास्टर’चा नॉर्म मिळवला. असे तीन नॉर्म मिळवणाऱ्याला जागतिक बुद्धिबळ संघटना ‘इंटरनॅशनल मास्टर’ असा किताब देते. पुढच्याच महिन्यात गुकेश वयाच्या अकराव्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर झालासुद्धा! तेव्हा गुकेशचे उद्गार होते- आता मला लवकरच ‘ग्रँडमास्टर’ झाले पाहिजे.

ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण-

एकाहून एक स्पर्धा गाजवणाऱ्या गुकेशकडे जगाचे लक्ष गेले, ते २०२२ साली चेन्नईमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमुळे! यजमान भारताला ३ संघ उतरवता आले होते. विशीच्या आतील युवक असलेल्या भारताच्या ‘ब’ संघाने ‘अ’ संघाला मागे टाकून कांस्यपदक मिळवले, ते गुकेशच्या कामगिरीमुळे. गुकेशने ‘न भूतो न भविष्यति’ असा पराक्रम करून स्वतः पहिल्या पटावरचे सुवर्णपदक मिळवले. त्या वेळी त्याने पहिल्या ८ पैकी ८ डाव जिंकले आणि त्यामध्ये शिरोव, करूआना  अशा माजी जागतिक आव्हानवीरांचा पाडाव केला होता. आतापर्यंत कास्पारोव्ह,  कार्पोव, कार्लसन अशा विश्वविजेत्यांनासुद्धा हे जमले नव्हते. आपल्याहून वयाने, अनुभवाने आणि जागतिक क्रमवारीत ज्येष्ठ असणाऱ्या खेळाडूंविरुद्धच्या गुकेशच्या या पराक्रमाने सगळ्यांची खात्रीच पटली की, हे पाणी काहीतरी वेगळेच आहे!

कॅन्डिडेट स्पर्धा ८ खेळाडूंमध्ये आणि १४ फेऱ्यांमध्ये खेळली जाते. ७ जागा तर ठरल्या होत्या आणि त्यात महाराष्ट्राचा विदित गुजराथी आणि तामिळनाडूचा प्रज्ञानंद यांची निवड झाली होती. शेवटच्या जागेसाठी चुरस होती ती उझबेकिस्तानचा अब्दुसत्तारोव आणि भारताचे गुकेश व अर्जुन इरिगेसी यांच्यात.

शिस्त आणि धीटपणा-

गुकेशला वयाच्या सातव्या वर्षीच बुद्धिबळाने झपाटले. बाकीची मुले क्रिकेट खेळण्यासाठी बोलावत असतानाही गुकेश तो मोह टाळून शाळेचा आणि बुद्धिबळाचा अभ्यास करायचा. कित्येक वेळा तर सकाळी परीक्षा, दुपारी स्पर्धा अशी दगदग त्याला सहन करावी लागे. त्याच्या प्रशिक्षकांनी दिलेला गृहपाठ असो, योगासने, व्यायाम असो, वा गोड खाण्यावर घातलेली बंधने असोत, ती त्याने कसोशीने पाळली. अशी कठोर शिस्त सतत पाळणे त्याला लहान वयात किती कठीण गेले असेल? गुकेशच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या या यशामागे त्याची स्वयंशिस्त आहे.

गुकेश किंवा त्याचे समवयस्क सहकारी खेळाडू निहाल सरीन, अर्जुन इरिगेसी किंवा प्रज्ञानंद यांच्या खेळाचे आलेख बघता ही मुलं जगाच्या पाठीवर कोठेही आणि कितीही मोठ्या खेळाडूंशी इतक्या आत्मविश्वासाने कसे तोंड देऊ शकतात, याचेच सर्वांना आश्चर्य वाटते.  स्टेज फ्राईट म्हणजे लोकांसमोर रंगमंचावर उभे राहणे हा जगातील सर्वांत मोठा मानसिक दडपणाचा प्रकार मानला जातो. जगातील लाखो लोक आपला सामना इंटरनेटवर प्रत्यक्ष पाहत आहेत, याचे किती दडपण १ वर्षांच्या गुकेशवर येत असेल! परंतु डॉ. पीटर डोव्हर्न यांनी त्यांच्या प्रबंधात लिहिल्याप्रमाणे ‘बुद्धिबळ’ हा खेळ खेळाडूंना कोणत्याही संकटाचा सामना करायला शिकवतो. गुकेश गेली ७-८ वर्षे आपली कला न घाबरता लोकांसमोर सादर करीत आहे. योगासने आणि बुद्धिबळाचा खेळ यांची योग्य सांगड घातल्यामुळेच त्याला हे सर्व जमू शकते.

बुद्धिबळाचे फायदे-

हल्ली प्रत्येक मुलाची इच्छा असते की, आपण विराट कोहली बनावे. पण उच्चविद्याभूषित पालकांनी गुकेशला बुद्धिबळपटू बनायला प्रोत्साहित केले. बुद्धिबळापासून मिळणारे फायदे त्यांना माहीत होते!

आज माझे अनेक विद्यार्थी IIT, IIM सारख्या नामांकित संस्थांमध्ये शिकून परदेशात मोठ्या पदांवर आहेत. भारतातील अनेक आघाडीच्या उद्योगपतींची मुले माझ्याकडे शिकून आज त्यांचे पिढीजात व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. या पालकांनी माझ्याकडे त्यांच्या मुलांना बुद्धिबळ शिकायला का पाठवले? त्यांना काही ग्रँडमास्टर व्हायचे नव्हते, परंतु बुद्धिबळामुळे व्यक्तिमत्त्व-विकास होतो, हे त्यांना माहीत होते. अमेरिकेतील शाळांमध्ये, मुलांची हिंसक वृत्ती दूर करण्यासाठी बुद्धिबळाचा वापर केला जात आहे.

डॉ. अल्बर्ट फ्रँक यांनी केलेला प्रयोग फार महत्त्वाचा आहे. १९७३ साली त्यांनी त्यांच्या प्रयोगासाठी झैरे नावाच्या आफ्रिकेतील सर्वांत मागासलेल्या देशाची निवड केली होती. त्यांनी समान कुवतीच्या मुलांचे दोन गट केले. एका गटाला बुद्धिबळ शिकवले. दुसऱ्या गटाला कटाक्षाने बुद्धिबळापासून दूर ठेवले. सहा महिन्यांनी त्यांची चाचणी घेण्यात आली आणि सर्वांना धक्का बसला. बुद्धिबळ शिकणारा गट दुसऱ्या गटापेक्षा अनेक बाबतींत पुढे गेला होता. विज्ञान, गणित, भूगोल अशा अनेक विषयांत त्या मुलांनी आश्चर्यकारक प्रगती केली होती.

बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांना काय काय, किती फायदे होतात आणि त्याबद्दल झालेले आंतरराष्ट्रीय प्रयोग यांविषयी पुन्हा केव्हा तरी!

-रघुनंदन गोखले
gokhale.chess@gmail.com

***

My Cart
Empty Cart

Loading...