
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १८ दिवस राहून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी काही भन्नाट प्रयोग केले आहेत. हे सात निरनिराळे प्रयोग कोणते, ते जाणून घेऊ या.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातला १८ दिवसांचा मुक्काम संपवून परत धरतीवर आले. त्यावेळचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. त्यांना धड नीट उभं राहता येत नव्हतं. इतरांनी त्यांना आधार देऊन उभं केलं होतं आणि चालायलाही मदत केली होती. त्याचं कारण आपल्याला माहितीच आहे. अंतराळात शून्यवत गुरुत्वाकर्षणाच्या (Zero Gravitation) वातावरणात सतत तरंगतच राहावं लागतं. पायांच्या स्नायूंना (Muscles) काही कामच करावं लागत नाही. साहजिकच ते कमजोर होत जातात. आणि आपली ताकद परत मिळवण्यासाठी त्यांच्यावर काही उपचार करावे लागतात.
केवळ अठराच दिवस अंतराळात घालवल्यानंतर ही परिस्थिती. मग तिथं दीर्घ काळ वास्तव्य करायचं असेल तर आपल्या शरीरावर काय आणि कसे परिणाम होतील, याची माहिती तर मिळवायला हवी. आपली अंतराळसंशोधन संस्था इस्रो हिनं आता ‘गगनयान’ हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. आजवर चंद्रावर स्वारी करून झाली, मंगळापर्यंतही मजल मारली, निरनिराळ्या कामांसाठीचे किती उपग्रह अंतराळात स्थापित केले यांची तर गणतीच नाही. पण यांपैकी एकाही मोहिमेत माणसाचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. सगळी यानं मानवरहित होती, परंतु गगनयानातून आपल्याच अंतराळवीराला आपल्याच यानातून अंतराळात पाठवलं जाणार आहे. त्याची पूर्वतयारी करायला नको? तीच शुभांशु शुक्ला यांनी केली आहे.
त्यासाठी त्यांनी एक नाही, दोन नाही, तब्बल सात निरनिराळे प्रयोग पार पाडले आहेत.
पहिला प्रयोग अर्थात स्वतःवरचा. त्यातून मग त्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर काय परिणाम होतो आणि ते सहन करण्याची नैसर्गिक मर्यादा काय आहे, याचा आढावा घेणं; त्यासाठी त्यांची शारीरिक तपासणी सतत होईल याची व्यवस्था केली गेली होती. स्नायूंची जी झीज होते, ती कशी कमी करायची आणि झालेली झीज परत कशी भरून काढायची याविषयीचं संशोधन आता करता येईल. तसंच मुळातच स्नायूंची वाढ कशी होते, कमजोर झालेल्या स्नायूंना परत बळकटी कशी दिली जाते याविषयीही कळीची माहिती मिळू शकेल. हृदयाच्या ठोक्यांवर, रक्ताभिसरणावरही, त्या पर्यावरणाचा काही प्रभाव पडतो का, हेही समजून घेणं जरुरीचं आहे. आणि काही अनिष्ट परिणाम होत असतील तर ते कसे टाळायचे यासाठीची उपाययोजनाही विकसित करायला हवी.
केवळ मानवप्राणीच नाही तर सर्वच सजीव, अंतराळातील वातावरणाचा कसा सामना करतात, हेही जाणून घ्यायचं होतं. त्यासाठीची सुरुवात अगदी लहान प्राण्यांपासून केली. शुभांशु आपल्याबरोबर तारडीग्रास, किंवा ज्यांना पाणअस्वल म्हणतात, अशा लहानखुऱ्या आठ पायांच्या प्राण्यांना घेऊन गेले होते. त्यांची निवड करण्याचं कारण म्हणजे हे सजीव उच्च तापमान, अंतराळातील पोकळी किंवा किरणोत्सर्ग (Radiation) यांसारख्या कठोर परिस्थितीलाही भीक घालत नाहीत. मग अंतराळातही ते आपली हीच क्षमता टिकवून ठेवू शकतील का, याचा अभ्यास शुभांशुनी दुसऱ्या प्रयोगात केला. ते नुसतेच जिवंत राहण्याची धडपड करतात, की इजेची दुरुस्ती करणं, शरीरातील यंत्रणा कार्यक्षम ठेवणं इतकंच काय; तर नव्या पिढीला जन्म देणं या सजीवांच्या यच्चयावत गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांची जनुकीय (Genetic) स्तरावरची छाननी केली गेली. यातून, अशा प्रकारच्या अतिशय विपरीत परिस्थितीतही सजीव कसे वागतात, तसंच अनिष्ट परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी कोणती उपाययोजना करायला हवी, याविषयीचं मार्गदर्शन मिळणार आहे.
तिसरा प्रयोग करताना आपल्याला सर्वाधिक मजा आली, असं खुद्द शुभांशुनीच म्हटलं आहे. कारण त्यात त्यांनी मेथी, मूग, यासारख्या धान्यांच्या बियांना मोड आणण्याचे प्रयत्न केले. त्यातून त्यांचं पोषणमूल्यं टिकून राहतं की काय याचीही चाचपणी केली गेली. मोड जर व्यवस्थित येत असतील तर मग त्यांची लागवडही तिथं करता येईल, असा विचार आहे. चंद्र म्हणा, मंगळ म्हणा किंवा इतर ग्रहांवर वस्ती करण्याचे माणसाचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. पण त्यासाठी अन्नधान्याची रसद प्रत्येक वेळी धरतीवरून पुरवायची हा आतबट्ट्याचा व्यवहार होईल. त्याऐवजी तिथेच जर शेती करता आली तर काय बहार होईल!
माणसाला जगण्यासाठी अन्नाइतकीच, किंबहुना अंमळ जास्तीच, प्राणवायूची, ऑक्सिजनची गरज भासते. तो तर अंतराळात दुर्मिळ आहे. खरं सांगायचं तर जवळजवळ नाहीच. त्याच्या पुरवठ्यासाठी धरतीवरून नेलेल्या त्याच्या साठ्यावरच अवलंबून राहावं लागतं. त्या ऐवजी तिथेच तो निर्माण करता येईल का, असा प्रश्न उभा ठाकताच, सर्वांनाच आठवण झाली ती हरितनील जीवाणूंची. पृथ्वीचा जन्म झाला तेव्हाही पर्यावरणात ऑक्सिजन नव्हता. पण हे हरितनील जीवाणू (Bactaria) आणि शैवाल (Algae) मात्र जोमानं वाढत होते. त्यांच्या अंगी आजच्या वनस्पतींसारखीच सूर्यप्रकाश शोषून घेत त्यापासून स्वतःचा आहार उत्पादित करण्याची क्षमता होती, त्या प्रक्रियेत ऑक्सिजन टाकाऊ म्हणून बाहेर टाकला जात होता. तोच वातावरणात साचून राहिला आणि मग त्याच्यावर आपलं जीवन साकारणाऱ्या इतर सजीवांचा उदय झाला. मग त्याच जीवाणूंना परत कामाला का लावलं जाऊ नये, असा विचार करून शुभांशुनी तीही कामगिरी पार पाडली.
अंतराळवीरांना आपल्या दैनंदिन कामासाठीही सतत निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर अवलंबून राहावं लागतं. सतत त्यांचा वापर करावा लागतो. संगणकाच्या माध्यमातून तो पार पाडला जातो. पण त्यासाठी त्याच्यासमोर ठाण मांडून बसता येत नाही. तरंगत असतानाच त्याच्याबरोबर संवाद साधावा लागतो. हे सांगायला सोपं वाटलं तरी तसं ते नाही. त्या स्थितीत नेमक्या बटणांवरच बोट दाबलं जाईल याची खात्री नसते. ते कसं साध्य करता येईल, याचीही चाचपणी आवश्यक आहे. त्यात जर काही समस्या उद्भवत असतील तर त्यांचं निराकरण कसं करायचं, त्यासाठी त्या यंत्रणांचा रचनाबंधच बदलावा लागेल का, याचा विचार करता येईल.
हा सर्व खटाटोप का करायचा? - कारण अंतराळात वस्ती करण्याची कितीही स्वप्नं आज पाहिली जात असली तरी ती प्रत्यक्षात अजूनही दूर आहेत. पण म्हणतात ना, दूरदृष्टी ठेवून नियोजन करणं केव्हाही फायद्याचं असतं. तेच तत्त्व इथेही लागू पडतं. शिवाय या अनुभवाचा लाभ धरतीवरच्या आयुष्यालाही होणार आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या पर्यावरणात रासायनिक तसंच भौतिकी प्रक्रियाही वेगळ्या प्रकारे पार पडतात. त्यांचा उपयोग नव्या औषधांच्या, खतांच्या, कीटकनाशकांच्या, धातूंपासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांच्या उत्पादनासाठी किफायतशीररीत्या करता येईल, असा ठाम विश्वास वैज्ञानिकांना आणि उद्योजकांना वाटतो आहे. तो साकार करण्यासाठी शुभांशुनी केलेल्या या प्रयोगांची फलश्रुती कामी येणार आहे.
-डॉ. बाळ फोंडके
dr. balphondke@gmail.com
(ज्येष्ठ वैज्ञानिक व विज्ञान लेखक)