![logo](https://wayam.in/assets/images/logo/updatedLogo.png)
टिंबांच्या लिपीचा शोधक ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिन ४ जानेवारीला असतो, तर पुण्यतिथी ६ जानेवारीला असते त्यांनी निर्माण केलेल्या ब्रेल लिपीची आणि त्यांचा परिचय करून देणारी ही रंजक गोष्ट-
मला बोरिवलीहून एका काकांचा फोन आला. ते विचारत होते, “मॅडम, मी नुकताच सेवानिवृत्त झालोय. पण, अलीकडे माझी दृष्टी जरा अधू व्हायला लागलीये. मला लिहायला आणि वाचायला त्रास होतोय. मी ब्रेल शिकलो तर मला फायदा होईल का?” मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. मी त्यांना बरेच उपाय सुचवले. तुम्ही लेखनिक घेऊन लिहू शकता, वाचकाच्या मदतीने हवं ते वाचू शकता... ते चटकन म्हणाले, “नाही नाही. मला वाचायला मदत घेणं चालेल पण, पण लिखाणासाठी तुम्ही मला ब्रेल शिकवू शकलात तर खूप बरं होईल. मला माझं खाजगीपण जपता येईल.” खरंच, किती कमी शब्दांत त्या काकांनी मला ब्रेलचं महत्त्व अधोरेखित करून दाखवलंहोतं! ब्रेललिपीचा उपयोग अंधांशिवाय इतरांनाही होऊ शकतो, हा विचार माझ्यासाठी नवीनच होता.
ही ब्रेल लिपी कोणी आणि कशी तयार केली? याची गोष्ट फार रंजक आहे.
४ जानेवारी १८०९ रोजी मोनिक आणि सिमॉन ब्रेल यांना बाळ झालं. या बाळाचं नाव ठेवलं लुई. लुई इतर मुलांप्रमाणेच मजेत वाढत होता. चार भावंडांमध्ये सर्वांत लहान असल्यामुळे आई-वडिलांबरोबरच तो दोन्ही बहिणी आणि मोठ्या भावाचाही खूप लाडका होता. सारं काही करून पाहण्यासाठी तो उत्सुक असे. आईसोबत घरात लुडबूड, भावाबहिणींसोबत खेळताना धडपड आणि बाबासोबत कारखान्यातली कामं. तो सगळीकडे लुडबुडायचा. असाच एकदा बाबासोबत कारखान्यात गेला असताना बाबाची नजर चुकवून त्याने दाभण उचललं. तिथे असलेलं खोगिर बनवण्याचं कातडं घेतलं आणि त्याला भोक पाडू लागला. दाभण त्याच्या हातातून सटकलं. तिच्याकडे खाली वाकून पाहात होता की काय करत होता, हे नीट कळायच्या आत ती जाड, मोठी सुई लुईच्या डोळ्यात गेली. त्याच्या किंकाळीने कारखाना हादरला. बाबा घाबरला. त्याने धावपळ करून जमतील ते उपचार केले. आई आणि भावंडांनीही लुईला त्या दिवसांत खूप जपलं. ‘एक डोळा गेला, दुसरा तरी वाचायला हवा’ यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, एका डोळ्याला झालेल्या जखमेचा संसर्ग दुसऱ्या डोळ्यालाही झाला. लुई हळूहळू पूर्णतः दृिष्टहीन झाला......
पण, जिथे सगळं संपलं असं वाटतं, तिथेच नवं काहीतरी घडवण्यासाठीची संधीही असते. लुईच्या बाबतीतही हेच झालं. ऐकून, लक्षातठेवून जितकं शिकता येईल तितकं तो शिकत होता. अशा शिकण्याला अर्थातच मर्यादा येत होत्या. शाळेत कोणीतरी वाचून दाखवेल, मग, आपण तेसमजून घेणार, मग, परीक्षा कशा द्यायच्या? अशा अनेक प्रश्नांनी लुईचं बालपण ग्रासलं होतं.
सिमॉन ब्रेल यांच्या खोगीर बनवण्याच्या कामामुळे त्यांना खूप लोक ओळखत. कोणाकडून तरी त्यांना समजलं की, पॅरिसमध्ये अंध मुलांसाठी एक शाळा आहे. ‘सर वॅलेंटाइन हाउय’ हे १७८५ पासून ‘नॅशनल इंिस्टट्यूट फॉर ब्लाइंड यूथ’ या नावाने ती शाळा चालवत होते. ब्रेल कुटुंबीयांनी लुईला दूर पाठवण्याची तयारी केली. त्रास झाला, परंतु शिक्षण लुईला पुढे नेईल, खऱ्या अर्थाने मोठं करेल, असा त्यांचा विश्वास होता. झालंही तसंच. सर वॅलेंटाइन हाउय मुलांना लिहायला वाचायला कसं शिकवता येईल, याचा नेहमी विचार करत असायचे. त्यांनी अक्षरं जाड कागदावर ठळक स्वरुपात उमटवायला सुरुवात केली. जेणेकरून, त्या अक्षराचा आकार पाहून अंध विद्यार्थी ते अचूकपणे ओळखू शकेल. अक्षर ओळख झाली खरी, पण ती तेवढी सोपी नव्हती. शिवाय, प्रत्येक अक्षरावरून बोट फिरवून ते ओळखणं वेळखाऊ होत होतं.
या शाळेत सर हाउय मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून निरनिराळ्या क्षेत्रांतल्या अनेक व्यक्तींना बोलावत. ही माणसं मुलांना गोष्टी सांगत, त्यांच्याशी गप्पा मारत. असेच एकदा फ्रान्सच्या सैन्यदलातले अधिकारी चार्ल्स बार्बिए त्यांच्याशाळेत आले. मुलांशीगप्पा मारताना ‘लढाईच्यावेळी समोरच्या सैनिकाला कळू देता तुम्ही आपापसात संवाद कसा साधता?’ असा प्रश्न त्यांना कोणीतरी विचारला. ते म्हणाले, “पूर्वी आम्ही अतिशय बारीक अक्षरांत संदेश लिहून पाठवत असू. त्यावर उजेड टाकला की, ती अक्षरं चमकत आणि ठळक होत. पण, उजेडामुळे समोरच्या सैन्याला आमची अचूक जागा कळायची. आणि म्हणूनच स्पर्शाने लिहिता-वाचता येईल अशी एक लिपी मी तयार केली.
”चार्ल्स बार्बिए यांनी तयार केलेली लिपी ही १४ टिंबांची होती. त्यांनी मुलांना त्यातली काही अक्षरं शिकवली. मुलांनी ती लगेच आत्मसात केली. त्या संध्याकाळी ते गप्पा मारून परतले मात्र, लुईच्यामनात विचारांचं वादळ घोंगावू लागलं.
लुईने या टिंबांशी विचारपूर्वक खेळायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आलं की, चौदा टिंबांचं अक्षर समजून घ्यायला पूर्णबोट वरपासून खालपर्यंत फिरवावं लागतं. डोळस व्यक्ती जसं एका दृिष्टक्षेपातच अक्षर ओळखते, तसंच एका स्पर्शातच हेही अक्षर अंधांनाओळखता यायला हवं, असं लुईलावाटत होतं. लुईने या टिंबांच्या अनेक रचना करून पाहिल्या. ‘ट्राय अॅण्ड एरर’ या पद्धतीचा अवलंब करून लुई सहा टिंबांच्या रचनेशी पोहोचला. त्याने विशिष्ट रचनांना एकेक अक्षराचीओळख दिली आणि टिंबांवर आधारित, अंध विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येईल अशी लिपी तयार झाली. प्रयत्नांची शिकस्त करून लुईने तयार केलेली लिपी म्हणजेच ‘ब्रेललिपी.’ ही लिपीलुईने १८२४ साली म्हणजेच त्याच्या वयाच्या फक्त पंधराव्या वर्षीच तयार केली.
आपण अनेकदा असं वाचलं असेल की, ब्रेलमुळे अंधांसाठी ज्ञानाची कवाडं खुली झाली. याला शब्दशः प्रत्यक्षात उतरवणारे सुद्धा लुई ब्रेलच होते. ज्या शाळेत ते विद्यार्थी म्हणून शिकले, त्याच शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. लुईंनी आपल्या विद्यार्थ्यांना ही सहा टिंबांची लिपी शिकवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांमध्येही लिपी ‘ब्रेललिपी’ म्हणून लोकप्रिय झाली. लुईंनी अनेक पुस्तकांचं ब्रेल लिपीमध्ये लिप्यांतर केलं. ब्रेल लिपीची माहिती देणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. ‘न्यू मेथड फॉर रिप्रेझेंटिंग बाय डॉट्स’, ‘द फॉर्म ऑफ लेटर्स’, ‘द १८३९ ब्रॉशर’ ही लुईंची काही पुस्तकं.
पण, जितकी मेहनत लुईंना ही लिपी तयार करण्यासाठी करावी लागली, तितकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक संघर्ष ह्या लिपीला ‘जागतिक दर्जाची लिपी’ म्हणून मान्यता मिळवण्यासाठी करावा लागला. लुई ब्रेल यांचा मृत्यू ६ जानेवारी १८५२ रोजी झाला. फ्रान्स विद्यापीठाने मात्र या लिपीला अधिकृत लिपी म्हणून स्वीकारलं नव्हतं. लुईंच्या विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलनं केली. शेवटी, १८५४ साली, लुईंचं देहावसान झाल्यानंतर दोन वर्षांनी फ्रान्स विद्यापीठाने ही लिपी स्विकारली. हळूहळू अंधांसाठी काम करणाऱ्या इतर देशातल्या संस्थांनी, शाळांनी ही लिपी स्वीकारली. अंध असून आपल्याला स्वतंत्रपणे लिहिता-वाचता येण्याचा आनंद या लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी मूळ प्रेरणा ठरला आहे.
पण, तरीही लुईंच्या या आविष्काराला जागतिक मान्यता मिळाली नव्हतीच. त्यांच्या मृत्यूच्या तब्बल १०० वर्षांनंतर १९५२ साली फ्रान्सने लुईंना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला. या सोहळ्यात लुई ब्रेल यांनी तयार केलेल्या ब्रेल लिपीला अधिकृतपणे जागतिक लिपीचा दर्जा बहाल करण्यात आला. शिवाय, लुईंच्याकुप्रे येथे असलेल्या मूळ कबरीतून त्यांचं शरीर बाहेर काढलं आणि थोर व्यक्तींच्या बरोबरीने शासकीय इतमामाने त्यांचं पॅरिसमध्ये पुन्हा दफन करण्यात आलं. आज ब्रेल लिपी वाचणारं सगळं जग लुई ब्रेल यांच्या ऋणात आहेत.
-अनुजा संखे
anujasankhe@gmail.com
(बँक अधिकारी आणि लेखिका)
***