
‘वयम्’ दोस्तांनो,
यंदा २६ जानेवारीला झेंडावंदन करताना माझ्या उरात अधिकच आनंद आणि अभिमान विलसत होता. कारण माझ्या जुन्या मित्राला आणि आपल्या ‘वयम्’ कुटुंबातील ज्येष्ठ सहकाऱ्याला पद्मश्री सन्मान जाहीर झाला होता.
त्यांची माझी ओळख झाली तेव्हाचा त्यांचा चेहरा आजही आठवतोय. ते ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात आम्हांला एक डायरी दाखवायला आले होते. १९९४-९५ मधली गोष्ट आहे ही. संत तुकाराम आणि संत रामदास स्वामी यांच्या अभंगांच्या ओळी त्यांनी छान अक्षरात चितारून सुंदर डायरी प्रसिद्ध केली होती. स्वत:चे काम मनापासून केल्यानंतरच्या समाधानाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव अजून आठवतोय.
कालांतराने ते आमचे सुलेखनकार म्हणून सहकारी झाले. त्यामुळे त्यांचे काम प्रत्यक्ष बघण्याचा आनंद उपभोगता आला. ‘पक्षी’ शब्दाच्या वेलांटीला चोच आणि डोळे मिळायचे. ‘कुंपण’ शब्दाची अक्षरं काटेरी व्हायची. ‘विठ्ठल’ या अक्षरांतून कमरेवर कर ठेवून उभा आलेला देव प्रकट व्हायचा आणि ‘ग’ला सोंड मिळून त्याचा गणपती व्हायचा. तरी प्रत्येक वर्षी नवा गणपती आणि वेगळा विठ्ठल! आम्ही दरवर्षी पावसाळ्यात विशेष पुरवणी करायचो. त्यात त्यांनी अक्षर-चित्रांद्वारे पावसाची रिमझिम, रिपरिप, धिंगाणा अशा सर्व छटा साकारल्यानंतर वृत्तपत्राची ती पानं संग्राह्य चित्रांसारखी व्हायची.
‘वयम्’च्या लोगोपासून आतल्या हेडिंगपर्यंत सर्वत्र आपण अच्युत पालव यांची अक्षर-कला अनुभवतो. कधी ते एखादी कविता आपल्याला चितारून देतात. ‘वयम्’ची एकंदर सजावट तुम्हांला भावते, कारण त्याला अच्युत-स्पर्श आहे!
श्रेष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आम्ही त्यांच्यावर ‘लोकसत्ता’चा खास विशेषांक केला होता, त्यात अच्युत यांनी विंदांच्या कविता सुलेखनातून जिवंत केल्या होत्या. विंदांच्या सत्काराचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांनी आयोजित केला होता. त्यावेळी संपूर्ण हॉलला सजावट होती फक्त अच्युत पालव यांनी रेखाटलेल्या विंदांच्या कवितांची!
अच्युत पालव यांच्याकडे मोठाली पिशवी भरून सुलेखन करण्यासाठी साधनं असतात. त्यात अनेक प्रकारची पेनं, बोरू, टूथब्रश, दाढीचा ब्रश असं काय काय असतं! त्यांचे अनेकविध प्रयोग पाहिले आहेत. थेट जमिनीवर झाडू, मॉप यांच्या साह्याने भव्य अक्षरचित्र साकार करणं; आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, महेश काळे गात असताना तो सुरेलपणा अक्षरचित्रांतून चितारणं; गुलजार यांच्या कवितांना सुलेखनांतून भावनांचा साज चढवणं असे अनेक! तरुणांना त्यांच्या टीशर्टवर अक्षरांचं डिझाइन काढून दे, ते करायला त्यांना शिकव, छत्रीवर पाऊसगाणी रेखाटून पावसाचं स्वागत करण्याची कार्यशाळा मुलांसाठी घे- असेही उद्योग ते सतत करत असतात. त्यामुळे त्या प्रत्येकाला सुलेखन-कला आपलीशी वाटते. एकंदरीत अच्युतचा स्वभावही सर्वांना आपलंसं करण्याचा आहे.
भारतातील वेगवेगळ्या लिपी अभ्यासत, त्या त्या प्रांतातल्या सुलेखनकारांना भेटत त्यांनी मध्यंतरी भारतभर अक्षर-यात्रा केली. भारताच्या अनेक राज्यांत सुलेखनाची प्रदर्शनं भरवली. अमेरिका, जर्मनी अशा अनेक देशांत त्यांच्या कलेची प्रदर्शनं झाली आहेत. त्यांना अनेक जागतिक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी आपली देवनागरी लिपी जगभर पोचवली.
अच्युत पालव यांनी त्यांच्या आवडीच्या कामात स्वत:ला पूर्ण झोकून दिलं- अगदी शालेय वयापासून आजपर्यंत. परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये असताना त्यांच्या नाबर गुरुजींनी त्यांची सुंदर अक्षरं रेखाटण्याची आवड हेरली आणि रोज शाळेच्या फळ्यावर सुविचार लिहिशील का, असं विचारलं. अच्युतने ‘हो’ म्हटलं. लहानग्या अच्युतने ते काम जबाबदारी म्हणून स्वीकारलं. नेमाने आणि नेटाने त्यांनी फळा सजवण्याचं काम सुंदर केलं.
पुढे ते नामांकित अशा सर जे. जे. स्कूल इन्स्टिट्यूट ऑफ अॅप्लाइड आर्टला गेले. तिथे त्यांनी र. कृ. जोशी सरांचं सुलेखन विषयावरचं व्याख्यान ऐकलं आणि मनाशी ठरवलं की, हेच आपलं करियर. र. कृ. जोशी हे सुलेखानातील फार मोठं नाव. हे जोशी सर पुढे त्यांचे गुरू झाले. ते कला संचालक पदावर असलेल्या ‘उल्का अडव्हर्टायझिंग कंपनी’ची मोडी लिपीच्या विकासासाठी असलेली शिष्यवृत्ती अच्युत पालव यांना मिळाली.
आपल्या भारत देशांत अनेक भाषा आणि लिपी आहेत. आपल्या देवनागरी लिपीच्या वेलांट्या, उकार याबद्दल जगभर सर्वांना आकर्षण वाटतं. मग आपण या अक्षरकलेत करियर का नाही करू शकणार, एक जन्म पुरणार नाही त्यासाठी- असा विचार करून अच्युत पालव यांनी स्वत:ला या कलेत कायम झोकून दिलंय. त्यांची पत्नी श्रद्धा, मुलगा ऋतू आणि सून सायली हेही कलाकार आहेत. अच्युतचा प्रत्येक कार्यक्रम सुरेख सादर करण्यात हे संपूर्ण कुटुंब सामील असतं.
‘पद्मश्री’ अच्युत पालव यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
‘अक्षर’ म्हणजे कधी संपत नाही ते! अक्षराचा अत्युच्च ध्यास धरलेल्या आपल्या मित्राच्या ‘पद्मश्री’निमित्त त्याच्या श्रेयाचं रहस्य सांगावंसं वाटलं तुम्हांला!
यंदाच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दिल्या गेलेल्या पुरस्कारांतही ‘वयम्’ कुटुंबातील काही जणांचा समावेश आहे. २०२४ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार विजेते रा. रं. बोराडे यांच्या गोष्टी आपण ‘वयम्’ मासिकात प्रसिद्ध केलेल्या आहेत. ते वेळोवेळी ‘वयम्’ अंक आवडल्याची दाद देत. (या बातमीनंतर चार दिवसांनी त्यांचं वयाच्या ८५व्या वर्षी निधन झालं.) शिवाय, डॉ. आनंद नाडकर्णी, कवी प्रशांत असनारे, लेखक सुबोध जावडेकर, डॉ. प्रमोद बेजकर आणि ज्योत्स्ना प्रकाशनचे विकास परांजपे हेही आपल्या ‘वयम्’चे कुटुंबीय. त्यामुळे विशेष आनंद!
-शुभदा चौकर
cshubhada@gmail.com