उत्तम चित्रकार, शिल्पकार, आर्किटेक्ट अशा प्रत्येकी पाच कलाकारांची नावं सांगा, असं कोणी विचारलं, तर येतील सांगता? इंटरनेटवर सर्च करून त्यांच्या कलाकृती पाहिल्यात तर जाम गुंग व्हाल!
इंटरनेट यायच्या आधी आर्ट स्कूलला असताना अभ्यासासाठी आम्हांला आधार होता पुस्तकांचाच. कलेचा इतिहास शिकताना, पूर्वीच्या चित्रकार - शिल्पकारांची कामं अभ्यासताना आतासारखं गूगल, यूट्युब आमच्या हाताशी नव्हतं. त्यामुळे हे सiगळं आम्ही पुस्तकांतून, फोटोंमधून बघायचो. लिओनार्दो दा विंची, रेम्ब्रा, व्हॅन गॉग, पिकासो, राफाएल, गॉगिन, हेन्री मतीस ते अगदी भारतातल्या राजा रवी वर्मा, अबनिन्द्रनाथ टागोर, नंदलाल बोस ते एम. एफ. हुसेन, एस. एच. रझा, वासुदेव गायतोंडे, प्रभाकर बरवे अशा अनेकांचा परिचय आधी पुस्तकांतूनच झाला.
ही सगळी नावं लिहिल्यावर आठवलं, मी शाळेत होते तेव्हा ‘जनरल नॉलेज- GK’च्या अनेक क्विझ व्हायच्या. त्यात जास्तीत जास्त प्रश्न असायचे सायन्स, भूगोल, इतिहास, स्पोर्ट्स, चालू घडामोडी आणि क्वचित कधीतरी भाषा, संगीत, चित्रपट विषयातले. शाळेनंतर आर्ट स्कूलमध्ये गेल्यावर आणि मग चित्रकार म्हणून मला लक्षात आलं,m या GK मध्ये चित्रकार, शिल्पकार, जाहिरातदार यांच्याबद्दल कधी कोणता प्रश्न आल्याचं मला तरी आठवत नव्हतं.
आपल्या देशातल्या चित्रकार, शिल्पकार, आर्किटेक्ट किंवा जाहिराती ज्यांच्या कल्पक डोक्यातून जन्माला येतात असे कलाकार - अशांची प्रत्येकी पाच नावं सांगा, असं कोणी विचारलं, तर नावं आठवावी लागतात. पाहा बघू, तुम्हांला किती जण आठवतायत ते? याचं कारण म्हणजे आवर्जून याकडे लक्ष द्यायला आपल्याला कोणी सांगतच नाही. अनेक मुलांना हेही माहीत नसतं की, त्यांच्या पाठ्यपुस्तकातील चित्रांचे चित्रकार कोण कोण आहेत ते!
चित्रांची प्रदर्शनं किती जण बघतात? कलाकारांची चरित्रं कितीजण वाचतात? मित्रांनो, तुम्हांला अनेक गोष्टी इंटरनेटच्या एका क्लिकवर देशा-परदेशातील अनेक चित्र-शिल्पकारांचं काम पाहता येईल. त्यांच्या कलाकृती अभ्यासता येतील. त्यांची चरित्रवजा माहिती कळू शकेल.
सुट्टीत एखाद्या आर्ट गॅलरीला किंवा चित्रांच्या प्रदर्शनाला जरूर भेट द्या. तिथल्या चित्रकारांशी गप्पा मारा. तुमच्या शंका त्यांना विचारा. तुम्हीही वेगवेगळ्या शैलीतील भरपूर चित्रं काढा, कागद आणि रंग याच्याशी खेळा.
चित्रकलेचा अभ्यास आणि कलावंत हे दोन शब्द समोर आले की, सगळ्यात आधी आठवतो तो चौदाव्या शतकातला इटलीतील प्रतिभावान कलावंत ‘लिओनार्दो दा विंची!’ मोनालिसा, द लास्ट सपर, फ्लोरेन्समधले कॅथेड्रलचे घुमट आजही लिओनार्दोच्या प्रतिभेची प्रचीती देतात. एका आयुष्यात या माणसाने किती विषयातलं ज्ञान मिळवावं, याला तोडच नाही. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, शरीरशास्त्र, गणित, विज्ञान, साहित्य, संगीत, अभियांत्रिकी-यंत्रशास्त्र, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र इतक्या साऱ्या विषयांतलं ज्ञान त्याला होतं. लहानपणापासून अनेक विषयांत त्याला असलेलं कुतूहल, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, त्यातून त्याने काढून ठेवलेली टिपणं, स्केचेस हे काम त्याने आयुष्याच्या अखेरपर्यंत केलं. भरपूर वाचन, विविध क्षेत्रातल्या लोकांशी चर्चाविमर्श, चित्रकलेचे रंग, ब्रश बनवण्याची तंत्रं स्वतः शिकून, प्रत्यक्ष बनवून त्याची निर्मिती करणं असे अनेक उद्योग त्याने ‘अभ्यास’ म्हणून केले. एखादी गोष्ट मुळापासून जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न असे. त्याला अनेक प्रश्न पडत. आजूबाजूला घडणाऱ्या घटना डोळसपणे बघून त्या अशा का घडतात, याचा शास्त्रीय अभ्यास करण्याकडे त्याचा कल असे. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेल्या ‘कॅनव्हास’ या पुस्तकात लिओनार्दोचं चरित्र थोडक्यात, पण ओघवत्या शैलीत रेखाटलं आहे.
लिओनार्दोचं एक वाक्य आहे- ‘Knowledge of all things is possible.’ लिओनार्दोचं आयुष्य म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठीचा शोधच होता. त्या शोधातूनच अनेक अजरामर कलाकृतींची आणि यंत्रतंत्रांची निर्मिती त्याच्या हातून झाली असणार, यात शंकाच नाही.
मित्रांनो, तुमच्यापैकी सगळेजण कलावंत होतीलच असं नाही, पण आपल्या मेंदूत असलेल्या अनेक केंद्रांमधे अनेक प्रकारचं ज्ञान मिळवायची ताकद असते. अनेक गोष्टी मुळापासून समजून घ्यायची ताकद असते. अशा वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास केलात, खूप वाचलंत, स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी धडपडलात तर मेंदू खऱ्या अर्थाने चार्ज होईल.
-अदिती जोगळेकर-हर्डीकर
***