आपण लिहितो ते नंतर ‘वाचता यावं’ या उद्देशाने, पण सुलेखन म्हणजे परत परत पाहताच राहावं असं अक्षर. सुलेखनाचा वापर करून आपण आपला प्रकल्प, वही सुंदर करू शकतो. त्यापासून समाधान मिळवू शकतो.
आटपाट नगर होतं. तिथं होती एक शाळा- 'शिरोडकर हायस्कूल’! शाळेत तुमच्यासारखी सऽऽगळी हुश्शार मुलं यायची. आता तुम्ही
म्हणाल की, सगळ्यांचा कसा पहिला नंबर येईल बरं?
पण हुशार म्हणजे काय फक्त
पहिला नंबर येणारे का? ती झाली अभ्यासातली
हुशारी... त्याशिवाय खेळातले हुशार, गाण्यातले हुशार, बोलण्यातले हुशार,
चित्रकलेतले हुशार असे सगळे
पण असतातच की शाळेत! आपली गोष्ट आहे 'अक्षरं लिहिणाऱ्या हुशार मुलाची’. चक्रावला असाल ना?
तर झालं असं की,
'हा’ बसायचा शेवटच्या बाकावर. एक दिवस वर्गात सर आले आणि त्यांनी
याला विचारलं की, तू रोज फळ्यावर सुविचार लिहिशील का?
हे काम करायला कोणी तयार
नसायचं. यानं लगेच 'हो’ म्हटलं. झाली सुरुवात... रोज फळ्यावर नवीन सुविचार लिहायचा,
त्याभोवती सुशोभन करायचं, दिनविशेष लिहायचा,
कोणी पाहुणे येणार असतील तर
फळा त्याप्रमाणे सजवायचा.. बघता-बघता या 'सुशोभनमंत्र्याची’ कीर्ती शाळाभर पसरली की हो! लांब-लांबच्या वर्गातून फळा
पाहायला मुलं-मुली यायला लागल्या.
पहिल्या बाकावरच्या मुलांची शेवटच्या बाकाकडे रोज रीघ लागू
लागली, आम्हांला पण आमची वही सजवून हवी म्हणून.
आज हा मुलगा अगदी मोठ्ठा माणूस झाला आहे आणि तरी
त्याच्याकडे रांग लागलेलीच असते, 'आम्हांलापण सुरेख अक्षरात
आमचं नाव लिहून द्या म्हणून.’ हा सुरेख अक्षराचा मुलगा
म्हणजे प्रसिद्ध सुलेखनकार-'अच्युत पालव’. अक्षरांच्या क्षेत्राचा
जादूगार! सुशोभनमंत्री ते सुलेखनकार हा प्रवास कसा झाला? सुलेखन म्हणजे काय?
त्याचा वापर कुठे कुठे होतो
हे आणि असे ढीऽऽगभर प्रश्न काढून मी पालवसरांना भेटायला गेले. त्यांची मुलाखत घेता
घेता त्यांना असे प्रश्न विचारले की, त्यामुळे आपल्याला काही
शिकायला मिळेल. सुलेखन म्हणजे काय, सुंदर व नेटके लिहिल्याने आपल्या
व्यक्तिमत्त्वात कसा काय फरक पडू शकतो,
हे मी त्यांच्याकडून जाणून
घेतले.
सुंदर अक्षर आणि सुलेखन
'वळणदार व प्रमाणबद्ध अक्षर म्हणजे सुंदर अक्षर’ अशी साधारणपणे व्याख्या करता येईल. सुलेखन (calligraphy) हे त्यापुढचं एक पाऊल. वळणदार आणि कलात्मक अक्षर म्हणजे सुलेखन! सुलेखन हे शास्त्र आहे आणि कलादेखील. 'आपण अक्षर वळवू तसं वळतं. जन्मत: अक्षर सुंदर नसलं तरी प्रयत्नाने ते घडवता येतं. अक्षराला एक प्रकारची शिस्त हवी. आपण लिहितो ते नंतर ‘वाचता यावं’ या उद्देशाने, पण सुलेखन म्हणजे परत परत पाहतच राहावं असं अक्षर. सुलेखनाची व्याख्या किती मस्त सांगितली सरांनी!
सुलेखनाचा इतिहास
Calligraphy हा शब्द kallos= beauty आणि graphe = writing या ग्रीक शब्दांपासून बनला आहे. या कलेची मुळं भारतीय नाहीत. युरोपीय देश आणि अरेबिक देशात याचा उगम आणि प्रसार झाला. आखाती देशात देवांची चित्रं काढायला मनाई आहे, त्यामुळे तिथे लेखनकलेवर वेगवेगळे प्रयोग होत राहिले. शिवाय उर्दू लिपीत अधिक वळणं आहेत त्यामुळे त्या आकारांशी/ गोलाईशी खेळण्याच्या संधी अधिक. आपल्याकडे सम्राट अशोकाच्या काळात शिलालेखनाचा बराच प्रसार झाला. त्यात प्रामुख्याने खरोष्टी आणि ब्राह्मी या लिप्या वापरल्या जायच्या. शिवाय भूर्जपत्र , ताडपत्र यांवर लेखन व्हायचं. मराठे-पेशव्यांच्या काळात खलित्यातून निरोप लिहून धाडले जायचे. त्यासाठी दरबारात निष्णात लेखनिक असायचे. गंमत म्हणजे प्रत्येकाच्या लिहिण्याच्या पद्धतीनुसार त्या लिपीला नाव पडायचं. जसं की 'चिटणिसी वळण’. सुरुवातीच्या लिप्यांवर फारसीचा प्रभाव होता, कारण अर्थातच मुघलांचं आपल्यावर असलेलं राज्य! मग हळूहळू कागदाचा शोध लागला, शाई आली, बोरू जाऊन पेन आलं. या सगळ्यामुळे लेखनाच्या क्षेत्रात क्रांती घडली. भारतात अजूनही सुलेखन-कला फारशी विकसित झालेली नाही. अच्युत पालव यांनी मात्र सुलेखन- कला सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न सतत केला.
मुलं, अभ्यास आणि सुलेखन
सरांची स्वत:ची गोष्ट तुम्ही सुरुवातीला
वाचलीत. अशी कितीतरी उदाहरणं सरांकडे आहेत की, ज्यांच्या आयुष्यात सुलेखानामुळे मोठाच फरक पडला. एक उडाणटप्पू मुलगा सरांकडे
यायला लागला. तो आई-बाबांचं अजिबात ऐकत नसे आणि एका जागी स्थिर बसणं तर त्याला
माहितीच नव्हतं. पालवसर सांगत होते- 'या मुलाला मी रेषांमध्ये इतका गुरफटवला की, हा पठ्ठ्या नंतर जागचा हलायला तयार नसायचा. शेवटी त्यानं सुलेखनाचा उपयोग करत
एक छान प्रकल्प तयार केला आणि तो त्याच्या शाळेत दाखवला. मित्र-मैत्रिणी, शिक्षक सर्वांनाच तो इतका आवडला की, सगळ्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं.’
अनेक जणांची तक्रार असते की, पेपर कितीही छान आणि मोठा लिहिला तरी मार्क्स मनासारखे मिळत नाहीत. एकदा एका मुलाला असेच कमी मार्क्स मिळाले,
तेव्हा त्यानं
आपल्या पालकांकडे तक्रार केली. शिक्षिका तर ठाम होत्या की, त्यांनी दिलेले गुण बरोबर आहेत. मग पालव सरांनी
एक प्रयोग करायचं ठरवलं. पालक, शिक्षक आणि तो
मुलगा यांना एकत्र आणलं. मुलाचा पेपर पालकांना दाखवला आणि तो वाचायला सांगितला.
पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे
झाली... पालक तो पेपर वाचूच शकत नव्हते, कारण खरोखरच त्यातलं अक्षर इतकं अगम्य होतं की, साक्षात ब्रह्मदेवाची कसोटी लागावी! मित्रांनो, खरंच आपण कधी शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करतो का? इतक्या मुलांची इतक्या वेगवेगळ्या प्रकारची
अक्षरं लावून वाचायला किती संयम लागत असेल बरं!
अक्षरे जोडा, माणसे जोडा
सन २००७-०८. पालवसरांच्या कारकिर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली होती. काहीतरी भव्य प्रकल्प हाती घ्यायचा असं डोक्यात घोळत होतं. ते म्हणतात, 'भारत हा जसा कृषिप्रधान देश आहे, तसा तो लिपीप्रधान देशही आहे.’ त्यांनी संकल्प सोडला अक्षरांच्या माध्यमातून माणसं जोडण्याचा, भारतभ्रमण करण्याचा. तब्बल तीन महिन्यांची भ्रमंती करत त्यांनी राज्या-राज्यात आपल्या कलेचा प्रसार केला. कुठे प्रदर्शन भरव, कुठे कार्यशाळा घे, कुठे त्या राज्यातल्या calligraphy artistsना भेट, तर कुठे सामान्य लोकांसाठी अगदी रस्त्यावर सुलेखनाची प्रात्यक्षिकं कर... असे वेगवेगळे मार्ग चोखाळत त्यांनी सुलेखन घराघरात पोचवलं. सरांबरोबर आठ तरुण मुलांची टीम या प्रकल्पात गुंतली होती. पंजाबमध्ये तर वेगळाच अनुभव आला. तिथल्या लोकांनी सरांचे फोटोज् internet वर शोधून त्याची मोठाली posters बनवून लावली होती. इतकं स्वागत आणि प्रेम नक्कीच ऊर्जा देणारं होतं, अगदी पुढची २५ वर्षं कामाला पुरेल इतकं!
'अक्षर’ या शब्दातच याचा अर्थ दडलाय, 'अक्षर’ म्हणजे जे कधीही नाश पावत नाही. ‘तुम्हांला
माहिती आहे ना,
आपल्या 'वयम्’च्या प्रत्येक
अंकाची कलात्मक उंची वाढवण्याचं काम पालवसर करत असतात. 'वयम्’च्या पहिल्या पानावर डाव्या हाताच्या स्तंभात तुम्ही त्यांचं नाव नेहमी वाचत
असाल. बरं का मित्रांनो, आपण सगळेच काही
त्यांच्यासारखे मोठ्ठे सुलेखनकार बनू असं नाही, पण आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण सुलेखनाचा वापर नक्कीच करू शकतो. तुमच्या
शाळेतले प्रोजेक्ट किंवा शुभेच्छा-पत्रं यात सुलेखनाचा वापर केला, तर त्यावर तुमची स्वत:ची अशी एक वेगळी छाप
पडेल. पालव सरांच्या विद्याथ्र्यांनी केलेल्या सुलेखनाचं एक पुस्तक प्रकशित झालंय-
‘The manual of hand-writing’
शिवाय त्यांच्या स्वत:च्या कामाचं पुस्तक म्हणजे The world of calligraphy!
सर म्हणतात, ''आपण माणूस समजून घेतो, तशी अक्षरं
समजून घ्यायला हवीत. अक्षर म्हणजे नुसते आकार नाहीत, त्याला भावार्थ आहे. तो समजून घेतला तर आपल्या व्यक्त होण्याच्या पद्धती
बदलतील- कागदावर आणि ख:या आयुष्यातसुद्धा! आपले व्यक्त होणे सुंदर आणि अर्थपूर्ण
असेल तर आपल्याला त्यातून समाधान मिळते.”
-आसावरी फडके