मिनू- सुट्टीत जिथे ट्रिपला जाशील, तिथे कुठे नदीच्या काठी सपाट-गोल आकाराचा एखादा दगड मिळाला, तर नक्की घेऊन ये! स्वरुपा वक्नाली आपल्याला त्याचा पेपरवेट कसा बनवायचा ते सांगतायत! ते ही अगदी कमी साहित्यात!
निवेदक-
एक सपाट गोलाकार दगड, अॅक्रेलिक कलर्स, वॉर्निश, हात आणि ब्रश पुसायला जुन्या कपड्याचं फडकं हे सर्व साहित्य हाताशी ठेव.काम सुरू करण्यापूर्वी रद्दी पेपर अंथरुन घे म्हणजे टेबल किंवा जमीन खराब होणार नाही.
आता आपण पेपरवेट तयार करायला सुरुवात करू या!
प्रथम दगड स्वच्छ धुऊन घे आणि पुसून कोरडा कर. मग त्याचा पृष्ठभाग खडबडीत असेल तर तो पाॅलिशपेपरने घासून गुळगुळीत कर. त्यानंतर त्यावर तुझ्या आवडीनुसार पेन्सिलने चित्र काढून घे. मग ते चित्र सावकाशपणे रंगव. रंग वाळल्यावर वरून ब्रशने वॉर्निश लाव. व्यवस्थित सुकू दे. झाला तुझा पेपरवेट तय्यार!
पेपरवेट सुकेपर्यंत रंगांच्या बाटल्या व्यवस्थित बंद कर. ब्रश धुवून ठेव. फडकं धुवायला टाक. अंथरलेला रद्दी पेपर पुन्हा व्यवस्थित घडी करुन जागेवर ठेव. सुंदर पेपरवेट आणि नीटनेटकेपणा दोन्हीसाठी मोठ्यांकडून नक्की शाबासकी मिळेल!