3मिनू- सांताक्लाॅजकडे तुम्ही कधी काही मागितल्यावर?ज्योने सुध्दा मागितलं होतं.आणि मग काय घडलं ते ऐकू या? सुचिता देशपांडे यांनी लिहिलेली
ही गोष्ट Elizabeth Cody Kimmel या नामवंत लेखिकेच्या My Penguin Osbert या कथेवर आधारीत आहे.
(फक्त निवेदक.
‘ऑसबर्ट मला हवा होता ना?’हे वाक्य तीन-चार वेळा आहे.ते प्रत्येकवेळी वेगळ्या शब्दावर जोर देऊन वाचावे.)
यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही...
सांताक्लॉजला पत्र लिहून त्याच्याकडे काय मागायचं? हे मी नीट विचारपूर्वक ठरवणार आहे.
म्हणजे नक्की काय झालं सांगू का? गेल्या वर्षी ना, मी सांताकडे एक फायर इंजिन बसवलेली लालचुटूक रंगाची रेसकार मागितली- जिचं छप्पर वेगळं होऊ शकेल अशी. ...आणि सांताने मला हुबेहूब तशीच गाडी पाठवली.
मी सांताला पत्र लिहून कळवले होते(झिंगल बेलची ट्यून) की, यंदा मला माझा स्वत:चा पेंग्विन हवाय! कापूस भरलेला खोटा, खोटा नव्हे, तर थेट अंटार्क्टिकेहून आलेला- अगदी खराखुरा!
आणि काय आश्चर्य!
ख्रिसमसच्या भेटींमधे चक्क तो ठेवलेला होता! काळा आणि पांढरा. पिवळ्या चोचीचा. तो बरोबर बारा इंचांचा होता. हलणारा-चालणारा. श्वासोछ्वास करणारा. जिवंत पेंग्विन. त्याच्या गळ्यात एक टॅग होता. त्यावर लिहिलं होतं- ‘हॅलो, माझं नाव ऑसबर्ट.’
खरंच!
ऑसबर्टला पाहून मी टुणकन उडी मारली. कधी एकदा घरातल्या सगळ्यांना, माझ्या मित्रामैत्रीणींना ऑसबर्ट दाखवतोय, असं मला झालं होतं. पण ऑसबर्टला मात्र घरात राहायचं नव्हतं. त्याला बाहेर जाऊन खेळायचं होतं. बाहेर तर भुरभुरू बर्फ पडत होता. कडाक्याची थंडी होती. सोसाटय़ाचा वारा सुटला होता. जमिनीवर एक-दोन फूट उंचीचा भुसभुशीत बर्फ साठला होता. सूर्याचा तर पत्ताच नव्हता... आणि तरीही ऑसबर्टला बाहेर फिरायचं होतं.
काय करणार?
ऑसबर्ट मला हवा होता ना!
आम्ही दोघे बाहेर गेलो. बाहेर हिमवर्षाव होत होता. साठलेल्या बर्फात आम्ही घसरगुंडी खेळलो. इग्लू बनवला. बर्फाचे गोळे बनवून एकमेकांवर मारले. पकडापकडी खेळलो.
मग मी इतका दमलो की रात्री मला थेट अंथरुणात शिरावसं वाटत होतं. दुस-या दिवशी सकाळी उठताच ऑसबर्टला आंघोळ करायची होती.त्याने आंघोळीचा टब पाण्याने काठोकाठ भरला आणि मग आम्ही त्या टबात उतरलो. ऑसबर्टने लिक्विड साबणाच्या, शाम्पूच्या सगळ्या बाटल्या त्या पाण्यात उपडय़ा केल्या. रिकाम्या झालेल्या त्या बाटल्या हिमनगासारख्या टबातल्या पाण्यात तरंगत होत्या...
थोडय़ा वेळानंतर, माझी बोटं सुरकुतल्यासारखी झाली आणि पाण्यात साबण जास्त मिसळला गेल्याने अंगाला खाज सुटू लागली.
पण काय करणार?
ऑसबर्ट मला हवा होता ना!
आईने मला विचारलं की, ब्रेकफास्टला जे हवं असेल, ते ती करून देईल.
माझ्या डोळ्यांसमोर न्यूडल्स, गरमागरम सूप असं बरंच काही तरळून गेलं.
पण ऑसबर्टला हे खाणं आवडायचं नाही. गरमागरम तर बिल्कुल नाही. आणि गोड तर मुळीच नाही. त्याला ब्रेकफास्टला थंडगार क्रीममध्ये घोळवलेला हेरिंग मासा आणि समुद्री वनस्पतींचा जॅम हवा होता. मग आम्ही ब्रेकफास्टला तेच घेतलं.
ब्रेकफास्ट झाल्यानंतर टेबल आवरण्याचं, ताटल्या विसळण्याचं काम माझ्याकडे होतं. ते मी केलं आणि माझी खोली आवरायला मी वर गेलो.
जेव्हा खाली आलो आणि पाहतो... तर काय? ऑसबर्ट फ्रीजमध्ये लुडबूड करत होता. फ्रीजरमध्ये जे जे पदार्थ होते, ते बाहेर काढून त्याने त्यांचा मनोरा रचला होता. बर्फ, आईसस्क्रीम सारं काही वितळू लागलं होतं.
पण काय करणार?
ऑसबर्ट मला हवा होता ना!
मी तो सारा पसारा आवरला. स्वयंपाकघर स्वच्छ पुसून घेतलं.
त्या दिवशी दुपारी ऑसबर्ट जेव्हा केबल टीव्हीवर हवामानाचा अंदाज सांगणा-या चॅनेलवर पृथ्वीवरील बर्फ असलेला भाग बघण्यात रंगून गेला होता, तेव्हा मी त्या खोलीतून हळूच काढता पाय घेतला आणि सांताला आणखी एक पत्र लिहायला घेतलं.
प्रिय सांता,
तू आणि तुझी पत्नी कसे आहात? आम्ही मजेत आहोत. ऑसबर्ट नावाचा इतका छान पेंग्विन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही एकत्र आंघोळ करतो. हेरिंग माशाचा ब्रेकफास्टही एकत्र घेतो. सध्या दिवसभर बर्फात खेळायचा मी सराव करतोय आणि दिवसभर बर्फात खेळूनही माझी बोटं काळी-निळी पडलेली नाहीत.
तुझा मित्र,
ज्यो.
ता. क. : आणखी एक गोष्ट, सांता. जर तुला असं वाटत असेल की मला आणखी वेगळं काहीतरी गिफ्ट द्यावं आणि आधी दिलेल्या गिफ्टची अदलाबदल करावी, तरी ओके.
काही दिवसांनी, सकाळी उठलो तर बिछान्यात- माझ्या पायाशी मला एक पाकीट सापडलं. ते माझ्या नावाचं होतं आणि खाली सांताची सही होती. त्या पाकिटात लाल रंगाचा एक स्वेटर होता आणि आमच्या शहरातील प्राणिसंग्रहालयात नव्याने सुरू झालेल्या ‘अंटार्क्टिका वर्ल्ड’च्या प्रवेशाचे दोन फ्री पासेस होते. ते बघितल्यानंतर ऑसबर्टला लगेचच तिथे जावंसं वाटलं. तेही बसमधून नाही, तर चालत. प्राणिसंग्रहालय चालत जाण्याच्या अंतरावर नव्हतं.
पण काय करणार?
ऑसबर्ट मला हवा होता ना!
शेवटी आम्ही दोघे निघालो चालत!!
आम्ही ‘अंटाक्टिका वर्ल्ड’ला पोहोचलो. थेट पेंग्विन महालाकडे वळलो.
तिथे बर्फाच्या टेकडय़ा होत्या... बर्फाच्या घसरगुंडय़ा होत्या... तिथल्या भिंतींवर सीलची चित्रं रंगवली होती... छोटे छोटे खरेखुरे हिमनग पाण्यात तरंगत होते. तेवढय़ात तिथल्या एका भिंतीत बसवलेलं दार उघडलं आणि एक माणूस तिथून आत गेला. तो क्रीममध्ये घोळवलेला हेरिंग मासा पेंग्विनना भरवू लागला.
संध्याकाळी जेव्हा प्राणिसंग्रहालय बंद होण्याची वेळ आली, तेव्हा मी ऑसबर्टला म्हटले, “जाऊ या न रे आपण?”
...तो मला बिलगला.
माझ्या लक्षात आलं, की त्याला ज्या गोष्टी हव्याहव्याशा वाटत होत्या, त्या तिथे होत्या. त्याला तो पेंग्विन महाल त्याच्या घरासारखा वाटत होता. त्याला तिथून निघावंसं वाटत नव्हतं.
ऑसबर्ट ही मला मिळालेली अलौकिक भेट होती- संताने दिलेली! त्या गिफ्टमुळे मी खूप खूश होतो.
पण ऑसबर्ट? ऑसबर्टला मात्र बर्फाच्या घसरगुंडय़ा हव्या होत्या...
मी त्याला विचारलं, “तुला हा पेंग्विन महाल आवडलाय
का?”
तेव्हा त्याने करुणपणे माझ्या डोळ्यांत पाहिलं आणि नंतर ‘हो’ या अर्थाने मान डोलावली.
...मी त्याला एक घट्ट मिठी मारली आणि मग त्याला टाटा करून एकटा घरी आलो.
त्या दिवशी घरी परतल्यानंतर मला ऑसबर्टशिवाय घर सुनं सुनं वाटत होतं. मला प्रेझेन्ट म्हणून मिळालेला नवा लालचुटूक स्वेटर हाताला, पाठीला बोचत होता. पण तरीही त्यात उबदार वाटत होतं. (जिंगल बेलची ट्यून)
...आता पुढच्या ख्रिसमसला जेमतेम ११ महिने उरले आहेत. सांताक्लॉजकडे काय मागावं, हे मला पक्कं समजलंय.
माझ्याकडे एखादं हेलिकॉप्टर असलं तर... त्याचा इतर कुणाला फारसा त्रास होणार नाही नं?