१५ मार्च, जागतिक ग्राहक हक्क दिन, त्यानिमित्त खास बालग्राहकांसाठी-
अंकितचा वाढदिवस अगदी जोशात सुरू होता. मित्रांची फौज जमली होती. गाण्यावर ठेका धरून काही नाचत होते. काही मोठ्यामोठ्याने गात होते. तेवढ्यात राहुल हुश्श करीत आला.
अंकित म्हणाला , “दादा झाली का प्रॅक्टिस? किती दमलायस ! तरी तुला म्हटले की क्रिकेट टीममध्ये राहायचे ना? मग, रोज स्पोर्ट ड्रिंक घे म्हणून, तर आई.. ”
लगेच केतनने री ओढली, ‘अरे खरंच, तो माझ्या दादाचा मित्र अथलेट आहे ना, रोज तो काहीतरी एनर्जी ड्रिंक घेतो, रोज प्रॅक्टिसला जाताना. एकदम फिट आहे बघ, त्याने की नाही लगेच स्फूर्ती येते. अजिबात थकायला होत नाही” आणि मग अंकितच्या आईला आतून येताना बघून हळूच म्हणतो कसा ‘ मी पण एकदा थोडी चव घेतली होती, मस्त लागली रे !’
राहुलने मात्र मान हलविली, “नाही रे आई म्हणते, त्यात कॅफिन असते, आणि ते शरीराला चांगले नाही. त्या पेक्षा लिंबूपाणी घेत जा, फ्रेश वाटेल. शक्ती मिळावी म्हणून आई बरेच वेळा जूस देते.” राहूलचं बोलणं आईच्या कानावर पडलं होतंच. हातातला लिंबू सरबताच्या ग्लासेसचा ट्रे मुलांसमोर धरताना, आई कौतुकाने राहुलकडे बघत होती. “आणि बरं का केतन, त्या ड्रिंकने जी एनर्जी येते ना ती अगदी तात्पुरती असते. त्यापेक्षा पाणी भरपूर प्यावे. तुम्ही ना टीव्हीवर काय काय बघता, आणि मग तसं करायला जाता. बिस्किटे खाऊन कोणी उंच होत नाही. आणि बूस्ट पिऊन शक्ती येत नाही.” अंकितच्या आईचे हे बोलणे म्हणजे मुलांना कितीतरी जाहिरातींची आठवण करून देणारे होते जणूकाही. कोल्ड्रिंक, बिस्किटे, चॉकलेट्स, मोटारी, सहली, छोटी भूक ... यादी तर लांबलचक होती. इतकंच काय आपल्या आजीच्या गुडघ्यांचे ऑपरेशन त्या अमुक जाहिरातीतल्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये करायचं आहे, अस आर्याने किती ऐटीत सांगितलं. ते ऐकून मात्र राहुलदादा म्हणाला, ‘अगं आर्या, ऑपरेशनसाठी डॉक्टर हुशार असणं जास्ती महत्त्वाचं नाही का ? आणि जी जाहिरात करतात तीच उत्तम असं काही नसतं, बरं का?”
तेवढ्यात अंकितचा मामा गिफ्ट पॅकेट घेऊन आला. अंकितला पॅकेट आणि शुभेच्छा देत म्हणाला, “बघ तुला आवडेल !” मात्र मामाने गिफ्ट म्हणून पुस्तक आणलेले पाहून अंकित थोडा हिरमुसला. म्हणाला, “म्हणजे पुस्तक छान आहे, पण मला वाटले की तू एखादा व्हिडिओ गेम आणशील.”
“अरे तीन-चार महिन्यांपूर्वी तर आणला होता. तुझा स्पर्धेत पहिला नंबर आला होता, तेव्हा ! विसरलास? आणि आता पुढची दोन वर्षे महत्त्वाची आहेत. चांगले मार्क्स मिळाले तर कुठेही सहज ऍडमिशन मिळेल. ठीक आहे, पार्टी एन्जॉय करा,” असे म्हणत मामा त्याच्या बहिणीशी गप्पा मारायला स्वयंपाकघरात शिरला.
मामाची ‘पुढची दोन वर्षे महत्त्वाची’, ही कॉमेंट मुलांना एकदम वेगळ्याच विषयाकडे घेउन गेली. शेजारच्या सायली मावशीचा कोणी नातेवाईक अभिनयाची कार्यशाळा करून सिने-नाट्यक्षेत्रात गेला, असं अंकितला माहीत होतं, ते सांगून तो म्हणाला, “त्या कार्यशाळेची जाहिरात पाहूनच तर तो गेला तिकडे. जाहिरात नसती तर कळेल तरी का, की अशी कार्यशाळा आहे, असा कोर्स आहे, तिकडे नवीन कॉलेज आहे. मग? आता पुढच्या अभ्यासासाठी क्लास, कॉलेज ह्याच्या जाहिरातींची आठवण येते. प्रत्येकाच्या आसपास कोणीतरी वैमानिक, कोणीतरी नौदल अधिकारी, तर कोणी परदेशात शिक्षणासाठी जाऊन पुढे तेथेच नोकरी करीत असतो. मग आपल्यालाही असं काही व्हायचे असेल तर? तयारी करून घेणाऱ्या, प्रवेशाची खात्री देणाऱ्या जाहिरातींची माहिती ,यावर चर्चा सुरू होते.
किरण थोडा हिरमुसून म्हणाला, तुम्हांला ठाऊक आहे ना, मला नाट्यस्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते, आणि मला आवडही आहे”, सगळे मान डोलावतात. “म्हणून मी ऍक्टिंग कोर्सची जाहिरात बाबांना दाखवली तर त्यांनी म्हटलं, “ह्या जाहिरातींवर फारसा विश्वास ठेवू नको. भलीथोरली फी भरून फसवणूक होण्याची शक्यता जास्त ! तेव्हा जाहिरातींचा खरे खोटेपणा बघितला पाहिजे. आणि आधी शिक्षण पूर्ण कर.”
हे ऐकल्यावर चैतन्य म्हणाला,
“हो रे माझी आई पण हेच म्हणते. ‘आम्ही तयारी करून घेतो, प्रवेशाची खात्री आणि जॉब गॅरेंटी देतो’ असं सगळे जाहिरातींमध्ये सांगतात. त्यासाठी मोठी फी आकारतात. मात्र बरेच वेळा जाहिरातींना भुलून लोक फसतात, तिच्या ऑफिसमध्ये अशी काही फसवणूक झालेले लोक आहेत म्हणे.” त्याने असं म्हणेपर्यंत..
“चला मुलांनो हात धुऊन घ्या,” म्हणत अंकितची आई आणि मावशी मोठे ट्रे घेऊन आल्या. हात धुऊन आल्यावर काही वेळ आमच्याकडे डेटॉलचा हँडवॉश, आमच्याकडे काजोल करते त्या ऍडसारखा लाइफबॉयचा हँडवॉश आहे. म्हणजे मी आईकडे हट्टच धरला होता, की ह्या महिन्यात तोच आणायचा म्हणून, अशा सगळ्या गप्पा परत एकदा आम्ही कसं जाहिरातीत दाखवतात, ते आणतो, वापरतो ह्याच मुद्द्याकडे वळल्या. त्या ऐकत असलेली मावशी म्हणाली, ‘दुसऱ्या साबणाने धुतले तरी काय बिघडते? जाहिरातीमधील मॉडेल बघून आणि जिंगल गात साबण घेण्यापेक्षा त्या पॅकेटवरची माहिती वाचून ठरवा की कोणता साबण घ्यायचा.’
मुलांचे लक्ष आता डिशमध्ये कायकाय आहे, इकडे होत. शिरा, वडे आणि मध्यभागी दोन मोठे बाउल भरून नाचणीचे पापड, कुरडया वगैरे तळून ठेवल्या होत्या. मावशीने आणलेलं फ्रुटसॅलेड होतंच. कुरडई हातात धरून बॉबी म्हणाला, “ये क्या है रे अंकित, बहोत अच्छा है, वेफर्स जैसेही कूछ है क्या ” मग सगळे त्याला कुरडईबद्दल माहिती देऊ लागले. अंकित म्हणाला, मी तर आईला कोल्डड्रिंक आणि वेफर्स आणूया म्हटले, पण त्याने असं पोट नसतं भरलं.” त्यावर रोहित म्हणाला, ”अरे जाऊ दे. पुढच्या महिन्यात माझा बर्थ-डे आहे ना, तेव्हा मी आईला त्या इटालियन पास्ता नूडल्स बनवायला सांगितले आहे. त्याने पोट पण भरेल.”
‘इटालियन पास्ता? हे काय नवीन ?’- इति रवी “ मग रवीला सगळ्यांनी वेड्यात काढले. “काय रवी टीव्हीवर ती ऍड नाही का पाहिलीस? आम्हा मित्र मैत्रिणींना चर्चा करायची आहे, असे म्हणत आईला हाकलून देते ,ती ऍड” असे किरणने म्हणताच सगळे कोरसमध्ये “हाकलून काय?” असे त्याच्यावर तुटूनच पडले ‘अरे म्हणजे दार ढकलते. ते काही बरं नाही वाटत, असे किरणने म्हटले, ते सगळ्यांना पटले. पुढे मग जाहिराती आणि त्यांच्या जिंगल्स जोरजोरात म्हणत आणि घरगुती पौष्टिक पदार्थांवर ताव मारत पार्टी रंगत गेली.
-नलिनी कुलकर्णी
***