Menu

सत्यमेव जयते

image By Wayam Magazine 25 January 2024

‘तमसो मा ज्योतिर्गमय, ‘विद्या विनयेन शोभते’, ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’, ‘योगक्षेमं वहाम्यहम्... अशी अनेक बोधवाक्यं तुम्ही वाचली असतील. तुमच्या शाळेचे बोधवाक्य कोणते आहे? तेही संस्कृत भाषेतील आहे का? अनेक कंपन्या, संस्था, शाळा यांची बोधवाक्यं (Slogan/ Motto) संस्कृत भाषेतील असतात. बोधवाक्य हे एक लहानसे वाक्य असते आणि ते संस्थेची ध्येयधोरणे, मूल्ये प्रकट करते. संस्कृत ही भारतातली प्राचीन भाषा.. आपल्या देशाचा गौरवपूर्ण वारसा! तिला भारतात अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला असल्याने अनेक सरकारी, निमसरकारी, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आपले बोधवाक्य संस्कृत भाषेतील ठेवतात. आपण ‘वयम्’मधून संस्कृत भाषेतील अशा काही बोधवाक्यांचे अर्थ जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया तुम्हा सर्वांच्या परिचयाच्या बोधवाक्याने-

सत्यमेव जयते

हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो - Truth alone triumphs.” 

भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळच्या सारनाथ येथील अशोकस्तंभाचे चित्र आहे. सम्राट अशोक इसवीसनापूर्वी तिसऱ्या शतकात होऊन गेला. त्याने  प्रजाहित व धर्मोपदेश या संबंधी दिलेल्या आज्ञा ज्या स्तंभांवर कोरलेल्या आहेत त्या दगडी स्तंभांना अशोकस्तंभ म्हणतात. अशोकाच्या विस्तीर्ण साम्राज्यभर असे स्तंभ विखुरलेले होते. ज्या ठिकाणी जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धास ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी पहिले धर्मप्रवचन दिले त्या सारनाथ येथे हे स्तंभशीर्ष १९०५ मध्ये उत्खननात सापडले आणि सध्या ते सारनाथ येथे वस्तुसंग्रहालयात ठेवलेले आहे. यात शक्तीचे प्रतीक असलेले चार सिंह (मागचा एक सिंह बोधचिन्हात दिसत नाही) विशिष्ट मौर्य शैलीत कोरलेले असून त्यांच्या खाली नक्षीदार वर्तुळाकार बैठक आहे. या बैठकीवरही चार प्राणी कोरलेले आहेत. ते सिंह, घोडा, बैल, हत्ती असे असून अनुक्रमे उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व या चार दिशांचे रखवालदार मानलेले आहेत. याशिवाय चोवीस आरे असलेले चक्रही तेथे आहे आणि खाली पूर्ण उमललेले उलटे कमळ आहे. बोधचिन्हाखाली ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य देवनागरी लिपीत लिहिलेले आहे.

हे वाक्य ‘मुंडकोपनिषद’ या ग्रंथातील म्हणजे ‘मुंडक’ या नावाच्या उपनिषदातील आहे. ‘उपनिषदे’ हे संस्कृत भाषेतील तत्त्वज्ञानविषयक प्राचीन ग्रंथ आहेत. ‘मुंडक’ याचा अर्थ मस्तक किंवा उत्तमांग. ज्याप्रमाणे मानवाचे मस्तक ज्ञानसंपादनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते तसे मुंडकोपनिषद ब्रह्मज्ञानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या उपनिषदात सत्याचे श्रेष्ठत्व सांगताना पुढील मंत्र येतो: 

सत्यमेव जयते न अनृतम् सत्येन पन्था विततो देवयानः ।

येनाक्रमन्ति ऋषयो हि आप्तकामाः यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥

संपूर्ण मंत्राचा अर्थ असा : सत्याचाच विजय होतो; असत्याचा, अमंगलाचा नाही. सत्यानेच ‘देवयान मार्ग’ म्हणजे जीवनाचा श्रेष्ठ मार्ग आखलेला आहे. सर्व इच्छा तृप्त झालेले ज्ञानी लोक याच मार्गाने सत्याच्या अंतिम स्थानी जातात. 

या मंत्रातील सर्वात महत्त्वाचे ‘सत्यमेव जयते’ हे पहिले दोन शब्द लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते पंडित मदनमोहन मालवीय यांना. १९१८मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी दिल्ली येथील अधिवेशनात या बोधवचनाचा गौरवाने उल्लेख केला होता. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि पहिल्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी १९५०रोजी हे वाक्य आपल्या अधिकृत बोधचिन्हात स्वीकारले गेले.

-मेधा लिमये 

***


My Cart
Empty Cart

Loading...