Menu

दोन कोत्रांची गोष्ट वयम् मासिकात

image By Wayam Magazine 14 October 2022

बनपाव श्वानाश्रमात दाखल होतो झिंगारो! स्वभावाने उनाड.. इतरांना त्रास देण्यात आनंद मानणारा... पण रुपेशसारखा गुणी डॉगी असण्याने तेथील इतर श्वान मित्र त्याला बदलवतात. खरा आनंद कशात असतो, हे त्याला समजावून सांगतात... एक धम्माल कथा! बनपाव श्वानाश्रमात झिंगारो आला तेच एकदम उसळ्या घेत, गुर्मीने इथे-तिथे पाहात, अगदी मोगॅम्बो स्टाईलनं!

शांत पहुडलेल्या रुपेशला पाहून झिंगारोनं त्याच्यावरच गुरगुरायला सुरुवात केली. मनातल्या मनात हसत रुपेश, झिंगारोचा हा गोंधळलेला आगाऊपणा गेली दोन मिनिटं पाहात होता. आता हा आपल्यावर का बरं गुरगुरतोय, हे अर्थातच रुपेशला समजण्यापलीकडचं होतं.

झिंगारो एकदम दचकला. नेहमीची आपली गाडी वेगाने निघून गेल्याच्या आवाजानं त्याच्या निधड्या छातीत धडधडू लागलं. तो भुंकत भुंकत जीवाच्या आकांतानं कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करू लागला.

हे पाहून रुपेश फिस्सदिशी हसला. झिंगारोच्या तीक्ष्ण श्रवणेंद्रियांतून ते हसणं सुटलं नाही. ‘बघून घेईन’ या अर्थाचा एक कटाक्ष त्यानं रुपेशवर टाकला. रुपेश शांत होता, समंजस होता; पण निर्भयही. झिंगारोच्या त्या खुन्नस बघण्याकडे रूपेशने सपशेल दुर्लक्ष केलं नि त्याचवेळी त्याला आठवलं, आठ दिवसांपूर्वी आपण या ‘बनपाव’ डॉगकेअर सेंटरमध्ये आलो, तेव्हा आपणही आपल्या राघवदादाच्या गाडीच्या मागे धावण्याचा असाच अयशस्वी प्रयत्न केला होता. या कुठल्याशा अनोळखी जागेत आपल्याला एकटं सोडून जाणा-या राघवदादाचा केवढा राग आला होता आणि मग रडूही!

आपली- श्वानांची भाषा ज्याला कळते त्या ‘बनपाव’ डॉगकेअर सेंटरच्या मालकाने -- पप्पूदादानं आपल्याला कसं मस्त समजावलं होतं. डोक्यावरून हात फिरवीत थोपटीत पप्पूदादा म्हणाला होता ‘रुपेशबेटा, ट्राय टू अंडरस्टॅण्ड. अरे, तुझा रघुदादा तुला कायमचा सोडून गेलेला नाही बरं! पंधरा-वीस दिवसांचाच तर प्रश्न आहे. त्याची सगळी फॅमिली गेलेय फॉरेनला. इतक्या दूर तुला नेणं शक्य नाही नं! नि घरात एकटंच ठेवलं तर खाऊ-पिऊ कोण घालणार? म्हणून तर खास तुमची काळजी घेणा-या या श्वानाश्रमात तुझी मस्त व्यवस्था केलेय त्यानं. एकदम् आरामात राहा बरं. संध्याकाळपर्यंत इथे आधीच राहायला आलेल्या दहा-बारा जणांशी तुझी मैत्री होईल. बघ, प्यायला स्वच्छ पाण्याचा टँक आहे, डुंबायला पाँड! बागही कशी हिरवीगार! हां, पण कुंपणाबाहेर? -नो! नो! आता मूड एकदम् फ्रेश कर. चलो हॅप्पी हो जाओ!

रुपेशला लगेचच जाणवलं, राघवदादा काही दिवस भेटणार नाही हे खरंय्. पण, पप्पूदादाही प्रेमळ आहे.

तेवढ्यात एखादा बलदंड रणगाडा समोर उभा राहावा तसा उभा राहिला झिंगारो! रुपेश दचकलाच. राघवदादा आणि सा-या घराच्या आठवणींची सोनसाखळी एकदम तुटली. रुपेशला कळेच ना, असा काय वागतोय झिंगारो? ओळख ना पाळख, असा दादागिरी केल्यासारखा उभा राहातो काय? आडदांड-मॅनरलेस...!
‘‘क्काय रे- माझ्याचबद्दल सोचते हो ना?’’
‘‘अं? हो-’’ रूपेशने दबकतच उत्तर दिले.
‘‘फिर मन में क्यों? बोल की खुल्लमखुल्ला.’’
‘‘काय बोलणार? तू असा उगीचच रागावल्यासारखा का वागतोयस्?’’
‘‘ती अपनी स्टाईल है!’’
‘‘स्टाईल?’’
‘‘मग? झिंगारो म्हणतात मला.’’
‘‘झिंगारो?’’

‘‘हो, पण तू नुसता झिंगारो नाय बोलायचा; झिंगारोभाई!’’

‘‘झिंगारो, थोडं हळू आवाजात बोल ना?’’

‘‘हे बघा मी शांत राहीन, ओरडेन, किंवा अस्सा डिजे नाचेन; कुन्नाचं ऐकणार नाय्, काSSय?’ झिंगारो एकदम भीषण आवाज काढून नाचायलाच लागला. अगदी वेगळाच आवाज ऐकून पप्पूदादा धावत आला. झिंगारो त्याच्याहीकडे एकदम् बुबुळं मोठी करून गुरगुरायला लागला.

पप्पूदादाने झिंगारोला आपल्या बलदंड हाताने प्रेमाने जवळ घेतलं, पण छे! मग जरबेचा हिसका दाखवत पप्पूदादा म्हणाला, ‘‘हे शेवटचं असं उनाड वागणं! झिंगारो, हे तुझ्या मन्टोदादाचं घर नाही; हा श्वानाश्रम आहे.’’

‘‘असेल, मला काय त्याचं?’’

‘‘तेच सांगतोय; केअर सेंटरमधल्या इतर डॉगींना त्रास होऊन चालणार नाही. समजलं?’’

झिंगारो एकदम कावराबावरा झाला. सावधपणे म्हणाला, ‘‘तुला आपुनकी भाषा समजते?’’

‘‘होय, आणि सरळ चांगल्या भाषेतच बोलायचं. काय? शेपूटच नाही, वेळ आली तर तुझी जीभही सरळ करेन मी. बघ हा रुपेश तुझ्याच एवढा आहे. आतही खूप गुणी डॉगी आहेत. मजा करा, पण इतरांना त्रास द्यायचा नाही. आता फक्त शब्दानं सांगतोय, नाहीतर... ’’

‘‘आत काय?’’

‘‘सांगेल रुपेश!’’ झिंगारो थोडा घाबरलेला दिसला. मग मायेनं जवळ घेत म्हणाला, ‘‘झिंगारो, नियम हे पाळण्यासाठी असतात. खात्री आहे, येथून तू तुझ्या घरी जाशील तेव्हा तू तुझ्या मन्टोदादालाही बदलवशील, इतका गुणी होशील. माणसांपेक्षा तुमच्याबद्दल मला अधिक विश्वास आहे!’’

पप्पूदादा ऐटबाजपणे उठला. ‘बाSSय’ करीत निघून गेला.

रुपेश म्हणाला, ‘‘झिंगारोभाई!’’

‘‘नको, झिंगोच म्हण.’’

‘‘बरं, दोस्ता झिंगो, या केअर सेंटरमध्ये फक्त खाणं-पिणं नाही, संस्कारही केले जातात. खेळ शिकवले जातात. कळेल हळूहळू, जा फ्रेश हो! मस्त पाँड आहे. जरा सूर मारून पोहून ये, तोवर तुझं लंच घेऊन राजू येईल.’’

‘‘तोही डॉगीच?’’
‘‘नाही, इथला वेटर!’’
‘‘हां, मग वांधा नाय.’’
झिंगारोनं खूप दिवसांत केली नव्हती इतकी मस्त अंघोळ केली. बंगल्यातल्या बंद बंद खोलीपेक्षा खुल्या आकाशाखाली छोट्या तळ्यात डुंबण्याने झिंगारो खूश होता. आता भूकही सपाटून लागली. राजूदादानं तेवढ्यात चकचकीत डिशमध्ये जेवणही आणलं.

घाईघाईनं झिंगारोनं त्याचा फडशा पाडला. थोडं जेवण ताटातच ठेवलं. रुपेश तेवढ्यात तिथं आला. झिंगारोला म्हणाला, ‘‘झिंगो, अरे, पप्पूदादानं तुझं असं अन्न टाकलेलं ताट पाहिलं तर रात्रीचं जेवण मिळणार नाही तुला.’’

‘‘म्हणजे?’ ’

‘‘अरे, पोटभर जेवा, पण ताटात काही टाकायचं नाही, हा इथला नियम आहे.’’ ‘‘हा काय नियम?’’

‘‘होय; ताट स्वच्छ करायचं, अन्न असं टाकायचं नाही. अरे, पप्पूदादानं सांगितलं ना आम्हांला, ‘‘तुम्ही भाग्यवान आहात; चांगल्या घरात प्रेमानं पाळतात तुम्हांला, तुमच्यातल्याच काहीजणांना एक वेळचं अन्न शोधायला, उन्हात वणवण करावी लागते. लोकांचं ‘हाड् हाड्’ ऐकावं लागतं. पण आपल्याला तेच अन्न पुढ्यात मिळतं, तर त्या अन्नाचा मान ठेवा.’’

‘‘खरंय रे! मैने तो ऐसा सोचाही नही था’’. झिंगारो खरंच विचार करू लागला होता. डोकं खाजवत त्यानं रुपेशला विचारलं, ‘‘अरे, हा पप्पूदादा केअरटेकर की रिंगमास्टर?’’ रुपेश गालातच हसला नि म्हणाला, ‘‘गुणी डॉगींसाठी केअरटेकर नि शिस्त मोडणा-यांसाठी... ’’

‘‘पुरे पुरे, कळलं बरं!’’

जेवून सुस्तावल्यानं नेमलेल्या जागी झिंगारो झोपीही गेला. पण जागा झाला तो ताजातवाना होऊन. एकदम जुन्या सवयी जाणार थोड्याच? आता खेळायला बाहेर पडलेल्या केअर सेंटरमधल्या इतर डॉगींना त्रास द्यायला त्यानं सुरुवात केली. कुणाचा चेंडू पळव, तो लपव, कुणाची शेपटीच ओढ, कुणाला पंजा बोच, सगळेच हैराण झाले. कुठून आला हा भयंकर झिंगारो.

पिटुकला मंगू डॉगी म्हणाला, ‘‘पप्पूदादा, त्या झिंगोला तरी दूर सोड नाहीतर आम्हांला तरी आमच्या घरी पाठव.’’

चंकू तर मुसमुसतच होती. पप्पूदादानं तिच्या मऊमायाळू केसांतून हात फिरवीत म्हटलं, ‘‘चंकू, काय झालं?’’

‘‘हे बघ, माझ्या शेपटीचे केसच तोडले त्या नव्या झिंगोनं, त्याचं बोलणंही विचित्रच! पप्पूदादा, इथे पाच सहा दिवस आमचे मजेत गेले, पण आता आज हा झिंगारो आल्यापासनं...’’

पप्पूदादानं तिला थोपटलं. तो बोलू लागला- ‘‘हे झिंगारो प्रकरण काही वेगळंच दिसतंय. आत्तापर्यंत आनंदात असलेला हा आपला ‘बनपाव’ श्वानाश्रम एवढा उदास कधीच नव्हता. झिंगारोमुळे इथली शांतता हरवून चालणार नाही. त्यानं थेट मन्टोदादाला, म्हणजे झिंगारोच्या मालकालाच फोन लावला. मन्टोदादाच्या असिस्टंटने फोन घेतला. भर दुपारी फोन केल्याबद्दल त्या असिस्टंटनेच रघूदादाला चार नको ते शब्द सुनावले. शिवाय मन्टोदादाला डिस्टर्ब न करण्याबद्दल धमकावलेही.

चतुर पप्पूदादाला कळलं, झिंगारो असं वागतो, यात त्याची काहीही चूक नाही. घरातल्यांचं वागणं तो बघतो आहे. जसे आसपासचे वातावरण तसेच वागणारे हे निष्पाप श्वान!

फोन ठेवला, तेव्हा पप्पूदादाच्या पायाशीच रुपेश बसला होता. डोळ्यांत उदासी, शेपटीची मंद हालचाल. जणू तो त्याला सांगत होता, ‘‘पप्पूदादा, अजून एखादा दिवस जाऊ दे, होईल सगळं ठीक.’’ पप्पूदादाला काही सुचेना.

त्यानं त्याचा असिस्टंट राजूला विचारलं. राजू सरळ म्हणाला, ‘‘माझ्याही ध्यानात आलंय. मोठा खोडसाळ डॉगी आहे झिंगारो. त्याला पिंज-यातच ठेवा. शिवाय आतही साखळी लावू या. एक दिवस उपाशी ठेवू या, तेव्हा अद्दल घडेल.’’ पप्पूदादा म्हणाला, ‘‘अरे, हा काही कुत्र्यांचा तुरुंग नाही. हे त्यांचं पाळणाघर आहे. बघ ना, इथे किती अनोळखी डॉगी येतात, त्यांची एकमेकांशी मैत्री होतेच, पण त्यांना न्यायला-सोडायला येणा-या माणसांचीही नाती जुळतात. ह्या गुणी कुत्र्यांनी किती नवीन घरं जोडली आहेत!’’ .. पप्पूदादाचा स्वर व्याकुळ झाला. तेव्हढ्यात त्याच्या पायाच्या बोटांना मऊ ओला स्पर्श झालेला त्याला जाणवला. रुपेश आपल्या गुलाबी जिभेनं त्याला काही सांगू इच्छित होता.

‘‘बोल रुपेश’’.

‘‘दादा, झिंगारो वाईट नाही. त्याला खरं तर चांगले नि वाईट यातला फरकच माहीत नाहीये. नको त्याला पिंज-यात ठेवूस. मी ऐकलंय सगळं. मी घेतो पुढाकार. आमच्या आनंदासाठी त्याला कैद नको रे! दादा, तो ज्यांच्या घरात वाढला, त्यांच्यासारखाच तो बोलणार- वागणार. मी समजावतो झिंगारोला.’’ रुपेशचं बोलणं ऐकून पप्पूदादा सुखावला. डोळ्यांनीच म्हणाला- ‘‘ओके!’’ सर्वांना पुरतं छळून दमल्यामुळे सुखावलेल्या झिंगारोला, रुपेशला पाहून आनंद झाला.

‘‘क्क्याय राव?- झालोच की नाही आल्या आल्या किंग इथले?’’ ‘‘तेच सांगायला आलोय !’’

‘‘का SS य?’’ पंजानं कॉलर झटकून डावा कान कुर्यात उडवत झिंगारोनं विचारलं. ‘‘या किंगची रवानगी उद्या तुरुंगात होणार आहे.’’

‘‘कुणाची बिशाद?’’

‘‘झिंगो, सर्व डॉगीजनी तक्रार केलीय तुझ्याबद्दल, सर्वांना तू खूप त्रास दिलास. साधे-सरळ आहेत सगळे. प्रेमळही! तू ही तसाच हो. अरे, असं कुणाला त्रास देऊन राजा होण्यात कसला आलाय आनंद? प्रेमानं जिंकून घे सर्वांना.’’ ‘‘यार रुपेश, तू वेगळंच बोलतोस रे. आपुनने ऐसा कभी सुनाच नही ! हम तो मन्टो दादा के...’’

‘‘झिंगो, सगळे मन्टोदादाला घाबरतात. त्याला कुणीही चांगलं म्हणत नाही. तो अनेकदा तुरुंगात असतो. झिंगारो, त्याचं असं वागणं तुला आवडतं? माझा प्रेमळ रघुदादा सर्वांशी कसा प्रेमाने वागतो, ते मी सतत पाहतो. तुला मिळतं हे कधी पाहायला? अरे, गुंड माणसाचा गुंड कुत्रा अशी तुझी ओळख तुला आवडेल? नाही ना? मग बदल स्वतःला. तुझं नशीब चांगलं म्हणून इथं आलास. बघ शिस्तीनं, प्रेमानं वागून मिळणारा आनंद. गुर्मीने वागण्याहून निराळा असतो तो. आता विचार तू कर. नाहीतर, कधी नव्हे ते पप्पूदादाला तुला पिंजऱ्यात ठेवावं लागेल. आणि आम्हांलाच आवडणार नाही तुला असं पिंजऱ्यात ठेवलेलं,’’ झिंगारो मन लावून ऐकत होता. एकदम गप्प झाला तो.

रुपेशनं झिंगारोच्या मानेवर पुढचा हात ठेवून विचारलं, ‘‘मित्रा, बोअर झालास का रे?’’

‘‘नाही रे, वाटलं, फक्त चार- पाच तासांत मी माझ्याच मंडळींमध्ये इतका नकोसा झालो. इतका का वाईट आहे मी!’’

...रुपेशनं खुणेचा एक आवाज केला. दबक्या पावलांनी एक एक डॉगी बाहेर आले आणि झिंगारोच्या समोर अर्धवर्तुळाकार बसले. प्रत्येकाच्या डोळ्यांत उत्सुकता, राग, संयम - यांचं एक अद्भुत मिश्रण होतं. सहसा ‘बनपाव’ केअर सेंटरमध्ये नसते अशी एक वेगळीच शांतता पसरली.

झिंगारोने त्यांना विचारलं- ‘सगळे रागावलात ना माझ्यावर?’’

होSS एका सुरात सारे म्हणाले. पण क्षमा कराल या नव्या मित्राला?! ‘‘मनापासून क्षमा मागतोय मी.’’ चंकू, मंकू, रिंगो, नॅन्सी सगळे एकमेकांकडे अविश्वासाने बघत राहिले. अरे सुधारण्याचा एक चान्स द्या या मित्राला.

ओके. नक्की. आता आम्हीच सांगू पप्पू दादाला, झिंगारोला शिक्षा नको. तो आमच्याचबरोबर खेळणार...

रुपेश, थँक यू !

‘‘मला एकट्याला नको, या साऱ्यांना म्हण, आणि बरं का झिंगो, घरी जाशील ना, तेव्हाही चांगलाच वाग. तुझं वागणं पाहून पिंटो बदलायला हवा. जाताना इथली चार गुलाबाची फुलं घेऊन जा. त्याच्या हातातून बंदूक काढून घे आणि ती फुलं त्याला दे. अरे, प्राणी बदलतात तर माणसं का नाही बदलणार?’’

दुसऱ्या दिवशीची सकाळ जास्तच प्रसन्न होती. रिंगो आणि झिंगारो चक्क बॅट-बॉल खेळत होते नि फिल्डिंगला चंकू, मंकू, नन्सी सारेच!

रघुदादा आणि राजूला हे पाहताना वाटलं- सारं स्वप्न तर नाही ना ! रघू राजूला म्हणाला, ‘खरंच प्राणी किती समजूतदार ! किती लगेच बदलतात...’’ ‘‘खरंय रघुदादा, पण त्यासाठी प्रेम करणारा रघुदादाही लागतोच ना!’’
रघुदादाने राजूकडे अभिमानाने पाहिलं तेवढ्यात रुपेश तोंडात चेंडू धरून आला. झिंगारोने रघुदादाला खेळायला बोलावलं. कोण कोणाबरोबर खेळतंय हे कळणारच नाही असं खेळ सुरू झाला- मैत्रीचा ! मायेचा!!

-प्रवीण दवणे
My Cart
Empty Cart

Loading...