Menu

स्पर्धा आणि तुलना होणारच!

image By Wayam Magazine 27 March 2024

आज अनेक क्षेत्रांत स्पर्धा आहे. तुम्हांला स्पर्धेचा सामना करावा लागतो. कुठलंही अपयश किंवा तुलना ही तुमच्या खाजगी व्यक्तिमत्त्वाला लावून घेतली नाहीत, तर तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ग्रुम करू शकता.  माझा अमुक एक निर्णय चुकला होता, पण मी त्यातून हे शिकले, हे जर तुम्हांला कळलं तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही, मित्रांनो. 

आई शिक्षिका, वडिलांना वाचनाची आवड, भाऊ नाटकात कामं करायचा असं पोषक वातावरण असलेल्या घरात मी लहानाची मोठी झाले. चांगली पुस्तकं, चांगलं साहित्य घरी नेहमी आणलं जायचं आणि वाचलं जायचं. वाचून त्यावर चर्चा केली जायची.  शाळेत मी अभ्यासात हुशार होते.  मुळात अभ्यास मला आवडायचा,  त्यामुळे मी तो मनापासून करायचे. आई-वडिलांना माझ्या अभ्यासाची कधी चिंता नव्हती. ‘अभ्यास करता करता तू या क्षेत्रात कशी आलीस,’ असं मला सगळेजण नेहमी विचारतात. या क्षेत्रात यायचा निर्णय जरी माझा असला तरी माझ्यातला हा गुण आई-बाबा आणि दादाने सगळ्यात आधी ओळखला होता. त्याचं झालं असं की, दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी राज्य नाट्यस्पर्धेसाठी एका नाटकात काम केलं होतं. ते काम मी चांगलं केलं, मला त्यात बक्षीस मिळालं, सगळ्यांनी कौतुक केलं, वगैरे वगैरे! तोपर्यंत माझा नाटक, अभिनय या विषयाशी काहीच संबंध नव्हता. मी माझ्या अभ्यासात असायचे. दहावीची परीक्षा झाल्यावर चांगली दोन-अडीच महिन्यांची मोठी सुट्टी होती म्हणून खरंतर मी त्या नाटकात काम केलं होतं. एके दिवशी आईला मी म्हटलं, ‘आत्तापर्यंतच्या सगळ्या सुट्ट्यांमध्ये माझी ही सुट्टी सर्वात बेस्ट होती. या सुट्टीत मला खरंच खूप मजा आली.’ 

मग आईने विचारलं, “कशामुळे तुला असं वाटतंय?’  

मी सांगितलं की,  ‘”नाटकाच्या तालमी,  प्रयोग,  नाटक वगैरे करताना मला जाम मजा आली.” 

आईच्याही हे लक्षात आलं होतं, कारण मी नेहमीपेक्षा जास्त उत्साही आणि खूश दिसत होते. हा बदल त्या नाटकामुळे झाला होता. माझा वाढलेला आत्मविश्वास आणि वागण्या-बोलण्यात झालेला बदल आई-बाबांनी टिपला होता.  तुम्हांला तुमची एक ओळख सापडते, तसं काहीसं झालं. माझ्यात जे चांगले बदल झाले ते कशामुळे, हे माझ्या पालकांनी समजून घेतलं; आणि हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.  

सुदैवाने या क्षेत्रात येताच मला खूप नवीन शिकायला मिळालं. याच क्षेत्रात माझं काम असणार आहे, हे मला लवकर कळलं होतं असं मी आज म्हणू शकते. पण तेव्हा असंही होऊ शकलं असतं की मला भले वाटत होतं, पण पुढे काही मनासारखं घडलंच नसतं. अभिनयात करियर करण्याचं मी ठरवलं तिथपासून ते मी नावारूपाला आले यात - मध्ये बरीच वर्षं गेली. पहिली सात-आठ वर्षं मी माझ्या परीने फक्त काम एके काम करत होते. तरीही फारसं कुणी मला ओळखत नव्हतं. पैसे मिळण्याचीही बोंबच होती. 

आपण जेव्हा कुठलंही क्षेत्र निवडतो, म्हणजे तुम्ही मुलांनी अगदी कुठल्याही अनवट वाटेवरच्या क्षेत्राचा विचार करून ठेवला असेल, उदाहरणार्थ कुणी म्हणेल मला कुकींगमध्ये इंटरेस्ट आहे, कुणी म्हणेल की मला इस्त्रीचं मोठं दुकान काढायचं आहे, असं काहीही तुम्ही ठरवलं असेल तर माझं सांगणं हे आहे की जे आपल्याला मनापासून वाटलं आहे त्यासोबत आपण टिकून राहिलं पाहिजे. अशीही एक वेळ येते की, जेव्हा सगळ्यांचा आपल्या स्वप्नावरचा विश्वास उडतो. 

मी मुंबईत आल्यानंतर साधारण सहा-सात वर्षांनी मला माझ्या बाबांनी विचारलं होतं की, परत येतेस का पुण्याला? वेगळं काही शिकावंसं वाटतंय का? कारण त्या काळात खेद वाटावा असे प्रसंग खूप यायचे. हाततोंडाशी आलेलं काम गेलं किंवा निवड झाली नाही असं व्हायचं. पण मग तेव्हा ‘आपण घेतलेला निर्णय आणि आपण’ याची जर खूप घट्ट मैत्री झालेली असेल तरच आपण एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे त्या निर्णयाला चिकटून राहतो. मी निर्णय घेतला आहे आणि मी आणखी प्रयत्न करेन, असा स्वतःला विश्वास वाटला पाहिजे. त्या कठीण काळातही मला असं कधीच वाटलं नाही की, की यापेक्षा ना, मी पुढे शिकायला हवं होतं.. खरंच असं कधीच वाटलं नाही.  मी नाट्यशास्त्राची पदवी घेतली होती आणि तरी माझं शिक्षण रोज चालूच होतं. मी माझ्या कामातून सतत नवीन शिकत होतेच आणि ते अजूनही सुरू आहेच. त्यामुळे आता मला असं वाटतंय की, अजून एखादी वेगळी पदवी घ्यायला आवडेल. पण माझं मुख्य काम सांभाळून तेही शिकायचं असं माझ्या डोक्यात आहे. 

आपल्या आयुष्यातील निर्णय आपण स्वत: घेतले की, त्याची जबाबदारीही आपल्यावर आपसूकच येते. माझ्या पालकांनी तर लहानपणापासून आमचे निर्णय आम्हांला घ्यायला शिकवलं. ‘आम्ही पाठीशी आहोत, पण निर्णय तू घे’ अशी शिकवण होती. ‘तू म्हणालीस म्हणून मी तेव्हा ते केलं’ हे म्हणणं फार सोपं असतं. दुसर्‍याला ब्लेम करणं सोपं असतं. ती सवयच आम्हांला आई-बाबांनी कधी लावली नाही. पण जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा त्याची जबाबदारी कशी येते याचं भान दिलं.  जेव्हा जे वाटतं ते करावं आणि जे स्वतःहून केलंय त्या निर्णयाबरोबर कायम राहावं.

यश मिळवणं जेवढं अवघड असतं त्यापेक्षा अवघड असतं ते यश टिकवणं. आजकाल अनिश्चितता प्रत्येक क्षेत्रात असते. अशावेळी सातत्य,  माणूस म्हणून एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, विचारांचं स्थैर्य हे गुण फार महत्त्वाचे  असतात. आमच्या क्षेत्रालाही हे लागू होतं. प्रसिद्धी अर्ध्या रात्रीत मिळू शकते, आता तर सोशल मीडियामुळे ते अजूनच सोपं झालंय. तुम्ही ज्यामुळे प्रसिद्ध झाला आहात तेच तुम्हांला करायचं आहे का, हे सतत चाचपडून बघावं लागतं. ‘मला कोणासारखं तरी व्हायचं आहे’ असं माझं कधीच नव्हतं. मी नेहमी माझ्यातील  ‘सर्वोत्तम’ जे आहे ते शोधत आले आणि म्हणून मला परत परत काहीतरी करत राहावंसं वाटतं. 

मुंबईत घर आणि गाडी एवढंच माझं ध्येय ठरलं असतं तर मग ते मिळाल्यावर माझी प्रगती खुंटली असती.  अनिश्चितता असणं आणि स्थैर्य नसणं या गोष्टींचा आयुष्यात जर सकारात्मक उपयोग करता आला तर उत्तम. 

मला मुळातच एका माणसाची दुसर्‍याशी तुलना केलेली आवडत नाही.  पण समोरच्याकडे जेव्हा दोन पर्याय असतात, तेव्हा तो त्या दोन्हीत तुलनाच करतो.  आमच्या क्षेत्रात दिग्दर्शक-निर्माते यांच्याकडे जेव्हा असे दोन पर्याय असतात तेव्हा तुलना होतेच. मला वाईट वाटायचं की, माझी निवड का नाही झाली; पण बरेचवेळा तुमची निवड का नाही झाली यापेक्षा त्या भूमिकेची गरज वेगळी होती आणि म्हणून दुसर्‍या कुणाची तरी निवड झाली, असा तो प्रकार असतो. लक्षात ठेवा की, कुठलंही अपयश किंवा तुलना ही तुमच्या खाजगी व्यक्तिमत्त्वाला लावून घेतली नाहीत तर तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ग्रुम करू शकता.  माझा अमुक एक निर्णय चुकला होता, पण मी त्यातून हे शिकले हे जर तुम्हांला कळलं तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही मित्रांनो! स्पर्धा आणि तुलना याला कधीच घाबरू नका. परीक्षा बघणारे क्षण येतात आणि जातातही. आपण विचारांनी स्थिर राहिलं पाहिजे. आपल्या विचारांची बैठक पक्की असली पाहिजे.

कामाच्या  वेळी  काम,  अभ्यासाच्या वेळी अभ्यास,  शाळेच्या वेळी शाळा-कॉलेज आपण करतोच  आणि ते केलंच पाहिजे. पण या दरम्यान मिळणार्‍या मोकळ्या वेळेत तुम्हांला जे आवडतं, ज्यात तुमचं मन चांगलं रमतं ते करायला पाहिजे. मला हस्तकलेची खूप आवड आहे. दोन दिवस सुट्टी मिळाली की, मी कागद,  कापड आणून कलाकुसर करते. विणकाम,  भरतकाम करते अजूनही. त्यातून दुसर्‍या कुणाला काहीही फायदा नाही, पण माझं मन रमतं. 

स्पर्धेच्या वातावरणात वावरताना, माणूस म्हणून जगायचं जर सोडलं तर गोष्टी खूप अवघड होत होऊन जातात. म्हणून ते होऊ द्यायचं नाही, हे माझ्या आईने मला शिकवलं. अशा असंख्य गोष्टी आहेत की, ज्या माणूस म्हणून आपल्याला खूप समृद्ध करून जातात. तुम्हांला नक्की कोणत्या गोष्टीने खुणावलं आहे, त्यापासून तुम्ही दूर जाता कामा नये. जे सांगायचं आहे त्यासाठी लाजायचं नाही आणि त्यासाठी लागेल ते सगळं निग्रहाने करायचं. आपली वेडी स्वप्नं असू शकतात, पण त्याविषयी ठाम राहिलं पाहिजे आणि सर्व शक्यता चाचपडून बघितल्या पाहिजेत. अगदी अपयशाची शक्यता सुद्धा. अशी तयारी केली की, अपयश त्रास देत नाही आणि आपण यशस्वी होतो, हा माझा अनुभव आहे. खूप मोठे व्हा, चांगले माणूस व्हा, याच शुभेच्छा.  

मुक्ता बर्वे 

शब्दांकन- मनीषा नित्सुरे-जोशी

***

My Cart
Empty Cart

Loading...