देशविदेशात नृत्याचे वेगवेगळे कार्यक्रम सादर करणारी, उत्तम कोरिओग्राफर असणारी सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस! ‘बिनधास्त’, ‘सावरखेड - एक गाव’, ‘मिशन चॅम्पियन’, ‘कायद्याचं बोला’, ‘सरकारनामा’, ‘पहेली’ अशा चित्रपटांमधून आणि ‘पिंपळपान’ ‘भटकंती’, ‘पेशवाई’ अशा मालिकांमधून तिने अभिनय केला आहे.
ज्येष्ठ नृत्यांगना पं. रोहिणी भाटे यांची शिष्या असलेल्या शर्वरीने पुणे विद्यापीठातून कथ्थकमध्ये M.A. करताना पहिलं येण्याचा मान मिळवला आहे. तिला संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’ (दिल्लीहून दिला जाणारा नृत्यातला राष्ट्रीय पुरस्कार), यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
शर्वरीचं किशोरवय कसं होतं, ते तिच्याकडूनच जाणून घेऊ या!
मी जेव्हा माझं लहानपण आठवते तेव्हा आपोआपच चेहऱ्यावर एक स्माईल येतं. मी पुण्याची आहे. तेव्हा आमचं एकत्र कुटुंब होतं. आजी-आजोबा, काका-काकू, आई-बाबा, माझी मोठी बहीण आणि मी असे आम्ही सगळे एकत्र राहायचो. आमच्या घरात कायम पाहुणे मंडळी असायची. आमच्या बिल्डिंगमध्येही पुष्कळ मुलं होती. त्यामुळे रोज भरपूर खेळणं व्हायचं.
डबा ऐसपैस, साखळी असे सगळे खेळ आम्ही मनसोक्त खेळायचो, पतंग उडवायचो. आमच्याकडे तेव्हा टीव्हीदेखील नव्हता. आजोबा शेजारी बातम्या बघायला जायचे! पण टीव्ही नसला तरी ‘आता काय करायचं?’
असा प्रश्न तेव्हा कधीच पडला नाही! आम्ही जेव्हा भातुकली खेळायचो, तेव्हाही एकीने दाणे आणायचे, एकीने गूळ आणायचा, मग दाण्याचा लाडू करायचा असं सगळं मिळून करायचो. खूप आपुलकीचं असं वातावरण आजूबाजूला असायचं. पुढे मग काका-काकू दुसरीकडे राहायला गेले. आम्ही विभक्त कुटुंबात राहायला लागलो. त्यामुळे एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब अशा दोन्ही बाजू मी अनुभवल्या आहेत.
माझ्या बाबांना निसर्गाची अतिशय आवड! ते आम्हांला शनिवार-रविवारी वारजे वगैरे निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जायचे. तिथे आम्ही शेती बघायचो, भाज्या बघायचो, ऋतूप्रमाणे मिळणाऱ्या भाज्या-फळं बघायला मजा यायची. त्यामुळे माझ्यातही बागकाम, भाज्या यांची आवड निर्माण झाली. आजही मी अगदी काहीही खरेदी करायचं नसलं तरी संध्याकाळी कोपऱ्यापर्यंत चक्कर मारते. संध्याकाळी बाजारात येणाऱ्या ताज्या भाज्या-पालेभाज्या बघायला मला खूप आवडतं. उन्हाळ्यात माझ्या कुंडीतल्या मोगऱ्याला आलेलं फूल बघताना मला मनापासून आनंद होतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची वृत्ती लहानपणीच रुजली. मी लहान असताना आई स्वतः आम्हांला दिवाळीत नवे कपडे शिवायची. वर्षातून एकदाच नवे कपडे मिळायचे, त्यामुळे त्याचा आनंद जास्त असायचा.
मी पाचवीपासून ‘सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल’मध्ये शिकत होते. आम्ही मैत्रिणी सायकलवरून गप्पा मारत शाळेत जायचो. तेव्हा आजच्याइतकं ट्रॅफिक नसल्यामुळे ते शक्यही व्हायचं. शाळेतल्या सगळ्या वक्तृत्व, नाट्य अशा स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे. सातवी-आठवीत तर मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्लिश अशा प्रत्येक भाषेतल्या वक्तृत्व स्पर्धेत मला बक्षिसं मिळाली होती! शाळेतल्या बाईंनी मला नेहमीच खूप प्रोत्साहन दिलं. अनेक स्पर्धांमध्ये मी सातत्याने भाग घ्यायचे. आमच्या शाळेत कलेला पोषक वातावरण होतं. मी अभ्यासातही चांगली होते. अगदी पहिल्या दहा नंबरांमध्ये नसले तरी मला ७५ - ८० टक्के मार्क्स मिळायचे. घरातूनही कधी ‘अमुक इतके टक्के मिळालेच पाहिजेत’ असा दबाव नसायचा. मला दहावीत ८० टक्के मिळाले होते. मार्क्स, अॅडमिशन यासाठी आत्तासारखी स्पर्धा तेव्हा नसायची. माझ्या पालकांचं एवढंच म्हणणं होतं की, कोणत्याही क्षेत्रात काम करा पण जे कराल ते उत्तम करा.
माझे बाबा ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’मध्ये होते, खूप कष्टाने ते तिथे M.D. पदापर्यंत
पोहोचले होते. तिथे त्यांना अनेक सोयीसुविधा मिळूनही त्यांनी त्याचा कधीच गैरवापर केला नाही. कामाशी एकनिष्ठ राहणं हे मी त्यांच्याकडून शिकले. त्यामुळे ‘माझं कामच बोलेल, त्यातून मला जे पुढचं काम मिळेल ते कामच माझ्यासाठी खरी पावती असेल,’ असं मला नेहमीच वाटत आलंय. काम मिळवण्यासाठी सतत इतरांच्या संपर्कात राहणं वगैरे मी कधी केलं नाही.
माझ्या ताईने पेंटिंगमध्ये पदवी मिळवली. मी पुणे विद्यापीठातून नृत्यात M.A. केलं. विद्यापीठात जाऊन ‘नृत्य’ हा विषय शिकायचा हे मी दहावीत असतानाच ठरवलं होतं. माझ्या आईला तिच्या लहानपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड होती. पण तिच्या वडिलांनी तिला नृत्य शिकू दिलं नाही, अगदी शाळेच्या गॅदरिंगमध्येही भाग घेऊ दिला नाही. त्यामुळे माझ्या आईची खूप इच्छा होती की मी शास्त्रीय नृत्य शिकावं. मी लहान असताना गाण्यांवर तासन्तास नाच करत असायचे. त्यामुळे आईला माझ्यात तो नृत्याचा सुप्त गुण असल्याचं जाणवलं. मी सात वर्षांची असताना तिने मला, माझ्या गुरू पं. रोहिणी भाटे यांच्या नृत्यभारती अॅकडमीमध्ये दाखल केलं. तेव्हा कधीकधी शाळेतून आल्यावर रोज संध्याकाळी क्लासला जायचा मला खूप कंटाळा यायचा. माझ्या मैत्रिणी तेव्हा खेळत असायच्या आणि मला क्लासला जावं लागायचं! मग मी कधीतरी ‘पोटात दुखतंय’ वगैरे कारणं सांगून दांडी मारायचे. पण नंतर माझी कारणं आईच्या लक्षात आली आणि ती मला सक्तीने क्लासला पाठवायला लागली. ती म्हणायची की बरं वाटत नसेल तर तिथे जाऊन नुसती बाकीच्यांचं नृत्य बघत बस, पण क्लासला जायचंच. मला वाटतं की, हा push फार महत्त्वाचा असतो. अर्थात आईला माझ्यात नृत्याचे गुण दिसत होते म्हणून तिने तेव्हा थोडी कठोर भूमिका घेतली. पण त्यामुळे मला माझ्या आयुष्याचं ‘ध्येय’ सापडलं!
रोहिणीताईंकडे कथ्थक शिकताना त्यांनी माझ्यात नृत्याची बीजं तर रुजवलीच, पण इतर अनेक गोष्टी शिकवल्या. मुख्य म्हणजे त्यांनी मला सौंदर्यदृष्टी दिली. माझं नशीब चांगलं म्हणून मला त्यांच्यासारख्या गुरू लाभल्या. त्यांचा साहित्याचा व्यासंग दांडगा होता. मला वाचनाची अगदी आतून म्हणतात तशी आवड नव्हती. पण कलेशी संबंधित पुस्तकं मी आवर्जून वाचते.
कुणी ‘काही आवर्जून वाचायला हवं’ असं पुस्तक सुचवलं तर तेही वाचते. साधनाताई आमटे यांचं ‘समिधा’ हे पुस्तक मला खूप आवडतं. कविता वाचायला आवडतात.
रोहिणीताईंमुळे मला इतरही अनेक कलांचा आनंद घेता आला. मी पुढे अभिनयाच्या क्षेत्रात काम केलं, तरी मला नृत्याशी एकनिष्ठ राहता आलं. दैनंदिन मालिकांमध्ये काम करण्याच्या संधी मिळूनही मी त्या नाकारू शकले आणि त्याची कोणतीही खंत माझ्या मनात नाही, कारण ‘नृत्य’ हाच माझा श्वास आहे. माझ्या गुरूंकडून मला शिस्त, आदर या गोष्टीही शिकायला मिळाल्या. वेळेच्या बाबतीतही रोहिणीताई खूप शिस्तीच्या होत्या. एकदा मी क्लासला ५-१० मिनिटं उशिरा पोहोचले तर त्यांनी metronome लावून रियाज सुरू केला होता. दहा मिनिटं त्या माझ्याशी काहीच बोलल्या नाहीत. मग म्हणाल्या, “तू उशिरा आल्यामुळे तुझा रियाज राहिला, तो मी केला..”
मग पुन्हा कधी उशिरा क्लासला जायची हिंमतच झाली नाही!
रोहिणीताईंमुळे मी आयुष्यात खूप काही शिकले. माझे आई-बाबा, माझ्या गुरू यांच्यामुळे लहानपणापासून कलेचा आणि एकूणच संवेदनशीलतेचा संस्कार माझ्यावर झाला आणि त्याने माझं व्यक्तिमत्त्व घडवलंय! चौकट मी टाळाटाळ केली, वेळ पाळली नाही अशा प्रसंगांत माझ्या आईने, गुरूंनी थोडी कठोर भूमिका घेतली. कडक वागल्या त्या माझ्याशी. पण त्यामुळे मला माझ्या आयुष्याचं ‘ध्येय’ सापडलं! मला वाटतं, काही वेळा असे धक्के महत्त्वाचे असतात.
-अंजली कुलकर्णी-शेवडे
***