Menu

दोन चाकांचा रंजक प्रवास

image By Wayam Magazine 02 June 2023

सायकल हा सगळ्यांचा लाडका आणि अत्यंत उपयुक्त वाहन प्रकार! २-३ वर्षाच्या मुलापासून ते वयस्क लोकांपर्यत सगळे सायकल चालवू शकतात. ना लायसन्स (वाहन परवाना)ची गरज, ना महागड्या पेट्रोल, डिझेल, गॅसची गरज! या वाहनामुळे व्यायाम होतोच; शिवाय पार्किंगची  जागादेखील फार जात नाही. शिवाय किंमतही वाजवी असते. 

लाकडाची सायकल, बिना पेडलची सायकल, मग चक्क चार फूट उंच चाकावर बसवलेले पेडल असलेली सायकल ते आताची मॉडर्न सायकल असा सायकलचा दोन चाकी प्रवास मनोरंजक आहे.

 १८१७-१८ मध्ये पहिल्यांदा जर्मनीच्या कार्ल ड्रिस याने सायकल तयार करून पाहिली. पण त्या सायकलला पेडलच नव्हते!  काहीतरी भन्नाट करायचं म्हणून खरं तर एका भल्या मोठ्या चाकाची सायकल त्याने तयार केली. हिला पेडल नसल्याने पायानेच ओढत, धावत धावत तिला चालवायला लागायचे. लोकांना सुरुवातीला धमाल वाटली. कार्लच्या आधी कुणीतरी लाकडाची सायकल तयार करण्याचादेखील प्रयत्न केला होता म्हणे! कार्लने तयार केलेली सायकल बरेच जणांनी हौसेने चालवली. परंतु कार्ल ड्रिसला ७ किमी अंतर पार करायला एक तास लागला होता! हा वेळ बघून त्या सायकलवर ‘हॉबी हॉर्स’ असा शिक्का बसला!  

 सायकल की बोनशेकर ?

 कार्लच्या सायकल प्रयोगाने काही संशोधक मात्र या वाहनाकडे आकर्षित झाले. काही फ्रेंच संशोधकांनी यात डोकं खुपसलं आणि १८६०-७० साली एक भले मोठे चाक आणि एक छोटे चाक, मोठ्या चाकाला पेडल अशी खऱ्या अर्थाने 'बायसिकल' तयार झाली. हाडं खिळखिळी करणारी याची रचना आणि चार फुटावर बसून चालवताना होणारा थरकाप लक्षात घेऊन याला 'बोनशेकर' हेच नाव पडलं. याच्या साहसी स्पर्धा देखील घेतल्या जाऊ लागल्या. काही धडपड्या इंग्लिश संशोधकांनी या सायकलमध्ये आणखी सुधारणा केल्या. जेम्स स्टरले याच्या मॉडेलला बरीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर काही 'बायसिकल क्लब' पण निघाले. थॉमस स्टीव्हन याने तर ही सायकल घेऊन जगप्रवास करण्याचा प्रयत्न केला.

खरी 'बायसिकल'! 

साहसी सायकलींची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली. मग ही दुचाकी ‘वाहन’ म्हणून वापर करता येईल का, याचा विचार काही सायकलप्रेमी करू लागले. त्या काळात घोड्यांचा वापर अधिक होत असे. घोड्याची जागा सायकल घेऊ शकेल का, हा विचार तेव्हा क्रांतिकारी होता.  

 आणि मग १८८५च्या आसपास जेम्स स्टरले याच्या भाच्याने सुरक्षित अशी सायकल तयार केली. दोन्ही चाकं सारख्या आकाराची, कमी उंचीची, चांगली चेन आणि पेडल असलेली ही सायकल तीच आहे, जी आज जगभर वापरली जाते. त्यात कालांतराने काही बदल होत गेले. गीअरची सायकल, माऊंटन सायकल, स्टंट सायकल, इलेक्ट्रिक सायकल, फोल्डिंग सायकल असे अनेक प्रकार आता आलेत.  

 सायकल- रंजक नोंदी!

 · सायकल चालवणारे लोक हे जगभरात 'कूल डुडस' म्हणून प्रसिद्ध आहेत. ते हसत-खेळत जगणारे आणि कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करू शकणारे असतात, असं मानलं जातं.

· सायकल हे गरिबांना परवडणारं आणि श्रीमंतांनाही आवडणारं वाहन आहे, जे प्रदूषण करत नाही आणि आरोग्य चांगलं राखतं. 

· सॅनतोस आणि साऊथ ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीने २०१५ साली १३५ फूट लांबीची अवाढव्य सायकल तयार केली होती. 

· जर्मनीच्या दीदीने १० फूट ९ इंच व्यासाच्या (डायमिटर) चाकाची सायकल तयार केली आणि ती चालवून पण दाखवली!

· सायकल ही जगभरातल्या चित्रपटांचादेखील आवडीचा विषय आहे. ‘फास्टर फेणे’ ते ‘छोटा भीम’ सगळ्यांचं सायकल हे लाडकं वाहन आहे! 

० बायसिकल थीफ, एलिझाबेथ एकादशी असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात ‘सायकल’ मध्यवर्ती आहे. आणखी कोणकोणत्या सिनेमांत सायकलचा वापर केलाय, याची यादी कराल?

· जगात कोपनहेगन, बर्लिन, टोकियो अशी अनेक ‘सायकलची शहरे’ म्हणून प्रसिद्ध आहेत. इथे रोज सायकलनेच ऑफिसला जा-ये करणारे बहुसंख्य लोक आहेत आणि त्यांच्यासाठी वेगळे सायकल ट्रॅक्स किंवा रस्ते आहेत. एका वेळी १२-१३ हजार सायकली मावतील इतके भव्य पार्किंग झोन तयार केले आहेत. भूतानसारख्या डोंगराळ देशात सायकलने जा-ये करणाऱ्याला विशेष मान देण्यात येतो. 

· जगातील सगळ्यात कठीण ट्रान्स सैबेरीयन सायकल स्पर्धा पूर्ण करून जागतिक क्रमवारीत चौथ्या नंबरवर आलेला आणि आशियातील एकमेव सायकलपटू म्हणून नागपूरचा डॉ. अमित समर्थ याची विक्रमी नोंद आहे.  

· आतापर्यंत भारतात ‘पुणे’ हे सायकलचे शहर म्हणून ओळखले जायचे, आता त्यात लुधियानाची भर पडली आहे. भारतातील अनेक शहरांत व गावांतही सायकल लोकप्रिय आहेच. 

सोनाली कोलारकर-सोनार


 ***

My Cart
Empty Cart

Loading...