Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 9

image By Wayam Magazine 14 November 2022

घरच्या घरी, कित्तीतरी!

‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 9 मध्ये मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

आज वाचा भाग- 9.

1. गंध मातीचा मनात झिरपला!

माझं दहावीचं वर्ष होतं. त्यामुळे या उन्हाळी सुट्टीची वाट मी बऱ्याच दिवसांपासून पाहत होते. मी ठरवलं होतं, बाबांनी काढून ठेवलेली निवडक पुस्तकं वाचायची आणि मातीच्या छोट्या छोट्या भांड्यांवर पेंटिंग करायचं. जानेवारी महिन्यात, एक माणूस लहान, मध्यम आकाराचे मातीचे खूप पॉट घेऊन विकत होता. अगदी मस्त आकार होते त्या सुगडांचे. आईने ते पॉट घेऊन ठेवले होते. सुट्टी लागल्याबरोबर मी कामाला लागले. हे मातीचे सुगड पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले. खमंग भाजलेली माती असावी. धुऊन कापडाने पुसताना त्याचा मस्त वास येत होता. हळुवारपणे ब्रश रंगात बुडवून त्या पॉटवरती रंगवण्यात एक विलक्षण मजा आली. मी या पॉटवर वारली डिझाइन, नारळांच्या झाडांचे आकार असं जे जे वाटलं ते ते केलं. आई, बाबा व माझ्या लहान्या भावालाही हे पॉट खूप आवडले. बाबांनी तर आमच्या घरातील हॉलमधून वर जायच्या एका एका पायरीवर एकेक पॉट अशी मांडणी केली. या मांडणीमुळे सगळे पॉट एकत्रित खूप छान दिसत होते. मनातल्या गोष्टी, मनापासून करता आल्यानंतरचं फिलिंग कसं मस्त असतं, ते मी अनुभवलं.

-जान्हवी श्रीराम गव्हाणे,
दहावी
टायनी एंजल्स स्कूल, नांदेड

२. लेखणी आणि ब्रशचा मुक्त वापर

खूप निवांत वेळ असल्यामुळे या सुट्टीत खूप दिवसांनी मी कविता करायला घेतली आणि ती छानही जमली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. कविता, गोष्टी असं खूप काही मला सुचत गेलं. जे सुचेल ते लिहायचं असं मी ठरवलं.

मला चित्र काढता येत नाहीत, असा उगाचच माझा समज होता. पण या सुट्टीत तोही दूर झाला. मी विविध चित्रं काढून बघितली. चित्र काढून मिळणारं समाधान, आनंद याचा मी पुरेपूर अनुभव घेतला.

-वृंदा संदीप नीलिमा कुलकर्णी,
दहावी
आनंद निकेतन, नाशिक

३. एकसाथ प्रार्थना

सध्या टीव्हीवर ज्या जुन्या मालिका चालू आहेत, त्या बघताना वेळ छान जातो. दुपारी आम्ही जुने गाजलेले मराठी व हिंदी चित्रपट व नाटकं बघतोय. रोज सायंकाळी आम्ही ब्रह्मविद्येचा सराव करतो. त्यानंतर मी रोज शास्त्रीय गायनाचा रियाज करतो. शिवाय आम्ही घरातील सर्वजण एकत्र बसून रोज रामरक्षा, मारुती स्तोत्र, अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र यासारखी स्तोत्रं म्हणतो. कधीकधी मी फोनवर मित्रांशी आणि भावाशी गप्पा मारतो.

घरात ज्या गोष्टी आहेत त्यातून नाविन्यपूर्ण पदार्थ घरी बनत आहेत. मीही स्वतः तीन-चार पदार्थ शिकलो, ते म्हणजे चहा करणे, पापड भाजणे, डोसा, घावन करणे. या लॉकडाऊनमध्ये मी सर्वात महत्त्वाचं काही शिकलो असेल तर ते हे, की कुठलंही संकट आलं, कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपण त्याला शांतपणे आणि धीराने सामोरे जाऊ शकतो. कोरोना विषाणूचे संकटही आपण असेच परतवून लावू शकतो.

-यश भागवत,
सातवी

४. विविध कलांचा अनुभव

या सुट्टीत एकदा आईने मला रांगोळी काढायला सांगितली, आणि मग मी ठरवून टाकलं की, रोज दारात मीच रांगोळी काढणार! एकदा मी पोळी लाटून व भाजून बघितली. माझी पोळी बघून आजीला खूपच कौतुक वाटलं.

मी आणि माझा भाऊ रोज काहीतरी नवीन खेळ खेळतो... सापशिडी, चेस, असे. पुठ्ठयापासून कपाट केलं. भावाला पुठ्ठयाची एक कार करून खेळायला दिली. तो रोज त्याच कारशी खेळतोय. लहानपणापासून मी रामायण आणि महाभारत यांच्या गोष्टी बाबांकडून ऐकल्या आहेत, त्यामुळे आता टीव्हीवर या मालिका बघायला आवडतात. शिवाय आता तर मी रामरक्षा आणि पसायदान म्हणायला शिकले.

गुलाबाच्या झाडाला आलेल्या कोवळ्या पानापासून ते फूल येईपर्यंत मी त्या झाडाला रोज बघत होते. ते बघताना एक नवीन पक्षी पण दिसायचा मला.

दोन कविताही केल्या- एक निसर्गावर, एक पावसावर. या स्पर्धेमुळे लिहिण्याचा अनुभवही मी घेतला.

-स्वरा राहुल पाटणकर,
चौथी,
पुणे

५. शाळेपलीकडील शिक्षण

आधी मी केलेले सुट्टीतील अनेक बेत फसलेच. मामाच्या गावी समुद्रावर जायचं, आंबा पॅकिंग करायचं आणि मामाच्या कोलंबी शेतीची सर्व तयारी करायची; शिवाय पुणे FTII चे अॅक्टींग वर्कशॉप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणजेच आमच्या शाखेच्या प्राथमिक शिक्षा वर्गाला जाणं.. लॉकडाऊनमुळे या सगळ्यावर विरजण पडलं.

पण या संकटाने आम्हांला अनेक गोष्टी शिकवल्या. नात्यांची वीण घट्ट झाली, असं वाटलं. मम्मीबरोबर कूकर लावणं, सात कापे घावणे करणं, इडली-चटणी सांबार करणं, साबुदाण्याचे सांडगे आणि लोणचं करणं अशा गोष्टी शिकताना मी पाककलेची मजा अनुभवली.

आमच्या ‘युरेका सायन्स क्लब’च्या केणी मॅडम यांनी सायन्स व गणितातील कोडी, भाज्यांची लागवड असे अनेक उपक्रम देऊन सुट्टीची मजा आणखीनच वाढवली. संध्याकाळी आमची संघाची ऑनलाईन इ-शाखा चिन्मय दादा व रमेशजी घेतात. यात आम्ही खेळ, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सूर्यनमस्कार, अमृतवचन, गीत, प्रार्थना इत्यादी उपक्रम करतो. रामरक्षा, गणपती स्तोत्र म्हणतो. ही सुट्टी शाळेपलीकडील अभ्यास हसत-खेळत करण्यात घालवतोय. या रोगाशी दोन हात करणारे डॉक्टर्स, नर्सेस व पोलिस यंत्रणा यांचे आभार!

-चिरायु अभय दळवी,
सातवी,
कणकवली


मे २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...