Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 8

image By Wayam Magazine 14 November 2022

On 7th May 2020, Children Magazine

घरच्या घरी, कित्तीतरी! घरी असतानाही खूप काही शिकता येतं, याचे धडे या काळाने मुलांना दिले. मुलांनी घराची प्रयोगशाळा केली आणि पापड, केकपासून सॅनिटायझरपर्यंत काय काय करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 8 मध्ये मुलांच्या मनमुराद प्रयोगांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

आज वाचा भाग- 8.

1. घरी बसून भाषण स्पर्धेत सहभाग

या सुट्टीत कॅरम, बुद्धिबळ, लुडो सर्व सर्व गेम खेळून झाले आणि शाळेची आठवण येऊ लागली. अशात अचानक एक दिवस आमच्या शाळेच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर मॅडमचा मेसेज आला की, आजपासून आपण रोज नवीन नवीन शिकणार आहोत आणि मज्जा करणार आहोत. मग काय, आमचे सर्व शिक्षकवृंद आम्हांला रोज अभ्यास पाठवू लागले. आणि तो अभ्यास वेळेत पूर्ण करून सगळ्यात आधी फोटो कोण पाठवतो यासाठी आमच्या सर्वांमध्ये स्पर्धाच लागली. दर रविवारी ऑनलाइन टेस्ट सोडवताना लेखी पेपरपेक्षा जास्त मज्जा यायची. त्यात सर्वांत जास्त मार्क मलाच मिळत असल्याने मी ऑनलाइन टेस्टची आतुरतेने वाट पाहत असते. आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी भाषणाची एक ऑनलाइन स्पर्धा झाली आणि मला घरी बसून भाषण स्पर्धेत भाग घेता आला, याचे खूप अप्रूप वाटले. ऑनलाइन प्रमाणपत्रदेखील मिळाले. माझे आईबाबा डॉक्टर असल्याने करोना होऊ नये, म्हणून कशी काळजी घ्यायची ते सांगत असतात. मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना फोन करून ती माहिती देते. मी दररोज रामायण, महाभारत, चंद्रगुप्त मौर्य या मालिका पाहाते. या मालिकेतील महत्त्वपूर्ण आणि चांगल्या घटनांची आणि वाक्यांची वहीत नोंद करून घेते. या महाकाव्यांमधून मी शिकतेय की, कधीही आपल्याजवळ असलेल्या विशेष गुणांचा गर्व करू नये. आपण जो निश्चय करतो, तो ठाम असायला हवा. अविचाराने कोणतेही काम करू नये. राग, द्वेष यामुळे फक्त युद्ध आणि विनाशच होतो; याउलट प्रेमाने सारे जग जिंकता येते. मी रोज छान छान पुस्तकं वाचते. पुस्तकात आवडलेली वाक्ये - ओळी यांच्यादेखील नोंदी ठेवतेय. वर्तमानपत्र वाचते. या करोना रुग्णांसाठी आपण काही करू शकत नाही याचे वाईट वाटते, पण आई समजावते की, तू घरात बसून लॉकडाऊनचे नियम पाळतेस म्हणजे एक प्रकारे तू देशाची सेवाच करते आहेस!

-मंजिरी दादाराव भालेराव, सातवी
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा
कुंभेफळ, तालुका - औरंगाबाद, जिल्हा - औरंगाबाद

२. घरच्या पदार्थांची किंमत कळली

मला गाण्याची आवड आहे आणि माझे बाबा तबला छान वाजवतात. त्यांच्याबरोबर गाण्याचा रियाज रोज करते. त्याबरोबर मी आईला कुरडई, पापड करायला मदत केली. आमरसाबरोबर चवीने खाल्ली जाणारी कुरडई बनवायला किती कष्ट लागतात ते त्यादिवशी समजले! एकदा मी पोह्यांचे कटलेट केले. खरं सांगू का? या कोरोनामुळे घरच्या पदार्थांची किंमत कळली. हॉटेलचं तर नावच विसरायला झालं! घराच्या भिंतीवर मी एक छान चित्र काढलं, कविता केल्या. आमच्या शाळेने दहावीचे क्लासेस zoom वर घेतले. एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनीचे केंद्र उपप्रमुख मनोजराव देवळेकर सर आमच्याशी सद्य परिस्थितीवर बोलले. त्यांनी आम्हांला बाहेरच्या परिस्थितीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला. सद्य परिस्थितीत येणारे विचार टिपून ठेवा, असा सल्ला दिला.

-शांभवी हेमंत देशपांडे, दहावी
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, पुणे.

३. केक केला, जळका झाला!

मी मागच्या महिन्यात 17 तारखेला इतका जास्त गेम खेळलो, की तेव्हापासून आत्तापर्यंत मला फोन हातात पण मिळाला नाहीए. सुरुवातीला शाळेने दिलेला ढीगभर गृहपाठ केला, पण तो करायला खूsssssप बोअर झालं. मी खूप पुस्तकं वाचली आणि आई-बाबांनीसुद्धा खूप गोष्टी वाचून दाखवल्या. मी, आई-बाबा दररोज सकाळी व्यायाम करतो. बाबाला त्यातलं जास्त कळतं म्हणून आम्ही दोघंही त्याचंच ऐकतो. पहिले वॉर्मअप करायचं आणि मग नंतर दहा मिनिटे घरातल्या घरात पळायचं. ते एक एक आठवड्याने थोडं थोडं वाढवत जायचं. जसं की, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं. कधी कधी बोअर झालो की, कॉम्प्युटरवर एक्सरसाइजचे व्हीडिओ लावतो आणि समोर उभं राहून त्यांच्यासारखंच करतो. प्रयोग म्हणून आम्ही घरी एक केक केला. पहिल्यांदाच केला होता, खालून तो थोडा जळला. मला बरं वाटावं म्हणून सगळ्यांनी खोटंनाटं कौतुक केलं. पण त्यांचं तोंड बघूनच मला कळून गेलं! कामवाल्या मावशी सध्या नाही येत म्हणून झाडू-फरशी करतो. इतका वेळ आणि कष्ट लागतात की, बस! मी आणि आईने मिळून बाबांच्या वाढदिवसासाठी ट्यूब कलर्सनी चित्र काढलं आणि त्यावर इंग्रजीत Happy Birthday Baba असं लिहिलं. बाबांच्या डोळ्यांत पाणीच आलं.

-इशान मराठे, पाचवी
(परीक्षा न देता आता सहावीत गेलो)
आनंद निकेतन शाळा, नाशिक

४. घरच्या घरी sanitizer व mouthwash!

मी घरच्या घरी कडुनिंब, तुळस, कापूर व तुरटी यापासून आयुर्वेदिक Hand sanitizer तयार केला. गंमत म्हणून त्याची विक्रीही केली. (लॉकडाऊनच्या आधीच!) तुम्हांला याबद्दलचा व्हिडिओ पाहायचा असेल, तर youtube वर neelima karle असं सर्च करा. नंतर कापूर आणि तुरटी वापरून mouthwash पण केलाय. दात घासून झाल्यावर तो आम्ही वापरतो. छान वाटतं. आईच्या मदतीने ओल्या कचऱ्यापासून bio emzyme तयार करायला घेतलंय. गुढीपाडव्याला गाठी लागतात. पण बाहेर सगळं बंद होतं. म्हणून मी youtube वर बघून, थोडीशी आईची मदत घेऊन घरीच गाठी तयार केल्या व गुढीला घातल्या. शाळेच्या जुन्या पांढऱ्या बुटांना मी जुन्या जीन्सचं कापड चिकटवलं आणि घरच्या घरी डेनीम शूज तयार केले. माझ्या व माझ्या आईच्या पायाची साइज आता सेम झालीय. त्यामुळे हे बूट आम्ही दोघेही वापरू शकतो. दुसरे बूट मी अक्रेलिकने रंगवले आहेत. पुस्तक वाचन तर चालूच आहे. फास्टर फेणे, गजकथा, समर्थ रामदास स्वामींच्या कथा, रामायण अशी बरीच पुस्तकं वाचतोय. दासबोध वाचायला सुरुवात केलीय. त्यातली मूर्खांची लक्षणं नि पढतमूर्खाची लक्षणं वाचताना गंमत वाटली. योगासने केली. रोज होमी भाभाची zoom वर लेक्चर्स असतात. सगळ्यात जास्त वाईट वाटलं की, माझं ‘बहुरंगी बहर’ शिबिर, ज्ञानप्रबोधिनी शिबिर आणि रणथंबोर जंगल सफारी हुकली याचं!

-नंदन सचिन कार्ले,
नववी

५. वाचन आणि आईला मदत

मी या सुट्टीत माझ्या पुस्तकांचे कपाट उघडले. बाबांनी वाढदिवसाला दिलेले ‘किशोर’चे खंड, ‘छात्रप्रबोधन’चे व ‘वयम्’चे जुने अंक अशांचे प्रदर्शन मांडले आणि मग ते वाचायला घेतले. अभ्यासाच्या नादात कळली नव्हती आईची भूमिका काय असते ते. पण या सुट्टीने शिकवले आईला मदत करायला. दुपारी जेवणाचे ताट कसे वाढायचे हे आजी शिकवतेय मला. घरातील साफसफाईत आता आहेत आईच्या मदतीला माझे छोटे हात! संध्याकाळी गच्चीवर आई, आजी, बाबांसोबत शुद्ध हवेत आकाशाकडे बघत फिरते. पक्ष्यांचे मुक्तपणे विहरणे, कोकीळ पक्ष्याचे मधुर स्वर ऐकते. आईने सुंदर कुंड्या लावल्यात. चिमण्यांसाठी पाणी-दाण्याची सोय केली आहे. त्यामुळे पक्ष्यांचा चिवचिवाट सतत आनंद देत असतो. बाबांसोबत शब्दकोडे सोडवायला बसले की, कळते आपण किती कमी पडतोय; आपल्याला वाचन किती हवेय! बाबांचा स्मार्ट भ्रमणध्वनी फक्त खेळायला किंवा मामा, काका यांच्याशी बोलायला हातात मिळायचा. पण आज ‘वयम्’cdcने स्मार्ट भ्रमणध्वनी हाती घेऊन त्यावर टाइप करण्याची आणि सुट्टी अनुभव लिहून ठेवण्याची संधी दिली.

-नेहा दत्तात्रय कोठावदे, दहावी
मा.रा. सारडा कन्या विद्यालय

6. Learning in a fun way

My mother showed me how to make Idlis. I was astonished, how only 3 bowl of Rice and 1 bowl of Udad dal can make enough idlis for 11 members of our family! Usually my father does not allow me to use mobile phone. But now he shows me videos of arts, stitching and drawing which I enjoyed doing it and I am also teaching my younger brother. My grandparents told me story from Mahabharat, Bhagavad Gita, Ramayan and Krishna Lila.. I was really excited. Though I am not going to school, I am learning many new and exciting things at home in a fun way.

-Khushi Gohel


मे २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...