Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 7

image By Wayam Magazine 14 November 2022

On 5th May 2020, Children Magazine

मदत घेण्याची कला!

अचानक भरपूर वेळ मिळाल्यावर तो कारणी लावण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे, ही मुलं न शिकवता शिकली. आपले शिक्षक, आजी-आजोबा, दादा-ताई, शिबिर किंवा क्लब चालवणारी त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हात धरून त्यांनी नवं काहीतरी करून पाहिलं.
‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

आज वाचा भाग- 7.

1. नॉलेज, स्किल अप ⬆

तसं बघितलं तर सुट्टी काही मला नवीन नाही, कारण तिसरीनंतर मी दोन वर्षे शाळेमध्ये गेलोच नाही. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी होम स्कूलिंगचा मार्ग पत्करला होता. त्या दोन वर्षांत मी माझ्या आवडीच्या विषयांचा अभ्यास केला- गणित व कॉम्प्युटर. मग 2019 मध्ये सहावीत प्रवेश घेतला आणि मी होमवर्क, वेगवेगळ्या परीक्षा यात अडकलो. दररोज सायकल फिरवायची राहूनच जायचं. आता गच्चीवर रोज सायकल फिरविण्याचा आनंद उपभोगतो. रोज सकाळी केर काढायला, फरशी साफ करून आईला मदत करायला शिकलोय. आमच्या घरी टीव्ही नाही. पण इंटरनेटच्या साह्याने मला वाटेल त्यावेळी मी ‘रामायण’ बघतो. इतिहास विषयसुद्धा असा गोष्टीरूपात शिकवला जावा आणि इतिहास विषयाची परीक्षा नसावी, असं माझं ठाम मत आहे.

दिल्ली येथील ‘अविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून मी ॲप बनवायचं प्राथमिक ज्ञान मिळवलं. गुगल तसेच MIT या अमेरिकन संस्थांनी MIT APP INVENTOR ही वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ घेऊन मी विद्यार्थ्यांना उपयुक्त अस Mathsfriend नावाचं ॲप बनवलं.. गणिताशी निगडित असं हे ॲप आहे. तुम्हीसुद्धा नक्की ॲप बनवायला शिकून घ्या; आणि बरं का, मला तुम्हांला मदत करायला नक्कीच आवडेल. सगळ्यांना घरबसल्या संस्कृत शिकता यावे, यासाठी आता मी संस्कृत संभाषण शिकवणारे एक ॲप तयार करणार आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक काजरेकर सर यासाठी आवश्यक ते पाठ उपलब्ध करून देणार आहेत.

रोबोटिक हासुद्धा माझा आवडता विषय असल्यामुळे त्याच्याशी निगडित विविध वेबसाइटला भेट देऊन त्याचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न मी करत आहे.

-समीहन भूषण पांगम, सहावी
डिचोली गोवा

२. पक्ष्यांचा सहवास

झोपेतून उठताना अंगणात पाहिले तर सगळ्या चिमण्या एकत्र येऊन चिवचिवाट करत होत्या. इथे आमचं एकत्र येणं बंद आणि यांच्या मात्र एकत्रित सभा सुरू! चिवचिवाट करून त्यांच्या घशाला कोरड पडू नये म्हणून मी दररोज त्यांना पाणी व दाणे घालतो. चिमण्यांचं ठीक आहे हो, पण कधीही न दिसणारे वेगवेगळे पक्षी पण आता धिटुकले होऊन अंगणात, गच्चीवर यायला लागले आहेत.

मी आजीकडे राहायला आलोय. घर प्रत्येक कानाकोपऱ्यातून कसं पुसावं हे मला आजोबांनी शिकवलं.

केलेलं लिखाण आजीने मला टाइप करायला सांगितलं. टायपिंग वेगात व्हावं म्हणून दादाने मला बोलून कसं टाईप करायचं हे शिकवलं.

शाळा सुरू असताना इच्छा असूनसुद्धा बासरीवादन कमी व्हायचं, म्हणून ठरवलं की दररोज अर्धा तास बासरी वाजवायची. माझा बास्केटबॉलचा क्लास बंद झाल्याने मी आईसोबत घरी योगासनं व प्राणायाम करायचं ठरवलं. चार-पाच वर्षांचा असताना मला भगवद्गीतेतील बरेचसे अध्याय पाठ होते. पण कंटाळा केल्याने तेही विसरायला झाले होते. म्हणून या सुट्टीत ठरवलेय, आता पूर्ण भगवद्गीता पाठ करायची.

तरी एक दिवस कंटाळा येऊन मी फार रडलो. मग मास्क घालून अंगणात चालत असताना वाटलं की, मी कुठे मनाली अथवा काश्मीरला गेलोय का! हवाच एवढी शुद्ध जाणवत होती ना!!

घरीच राहून नवीन गोष्टी शिकायला लावणारी ही माझ्या आयुष्यातील पहिलीच मोठी सुट्टी.

-सुधन्वा संजीवन देवधर, सहावी,
आनंद निकेतन शाळा, नाशिक

३. बाबांशी गट्टी

बाबा सतत बाहेर असल्यामुळे माझ्या वाट्याला कधीच येत नाहीत. या काळात बाबांचा सहवास लाभणार म्हणून खूप आनंद झाला. मला क्राफ्ट आणि चित्रं काढायला खूप आवडतात. मी बोटांचे ठसे, काटाचमच्याचे ठसे, फुलांचे ठसे, झाडांची लहान मोठ्या आकाराची पाने यांच्यापासून चित्रं काढली. तसंच मी आजीवर एक कविताही लिहिली आहे. माझी आजी लोणचं बनवत होती, तेव्हा मी लक्ष नसताना हळूच लोणचं पळवलं.

बाबा मला गड नदीवर घेऊन गेले होते. तेव्हा मी खूप वेळ पाण्यात पाय सोडून बसले होते. मासे पायांना चावत होते. त्या गुदगुल्या पण मस्त वाटत होत्या.

मी आणि बाबांनी मिळून कलिंगडाची कुल्फी तयार केली.
बाबांनी काही शेतकऱ्यांकडून भाजी आणि कलिंगडं आणली आहेत. ती आमच्या परिसरात सर्वांना आम्ही देतो. भाजी मोजून देणे, हिशोब लिहिणे हेही मी शिकले.

शिवाय मी ‘वयम्’मधील लेख वाचते आहे. त्यातील कोडी सोडवायला मला खूप आवडतात. संध्याकाळी मम्मा आणि बाबा माझ्याबरोबर बॅडमिंटन खेळतात. रोज आजोबांबरोबर शुभंकरोती म्हणते.

आमच्या ‘युरेका सायन्स’च्या ग्रुप वर केणी मॅडम रोज नवीन टास्क देतात. त्यातही मी सहभागी होते. रांगोळी काढणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, कोडी सोडवणे असे बरेच उपक्रम सुरू आहेत.

-राशी संदीप राणे, चौथी,
विद्यामंदिर हायस्कूल

४. मायेची ऊब जाणवली

मी मनातल्या मनात सुट्टयांचे जे जे प्लॅनिंग केले होते, त्यातले या सुट्टयांमध्ये काहीच करता येणार नव्हते. रसवंतीत जाऊन ऊसाचा रस पिता येणार नव्हता. दरवेळेस सुट्टया फक्त आम्हांला असतात, पण यावेळी पप्पांना पण सुट्टी असल्याने पप्पा आम्हांला खूप वेळ देतायत. माझी मम्मी सुंदर शिवणकाम करतेच, पण यावेळी पप्पांनी सुद्धा तिला शिवणकामात मदत केली आणि त्या दोघांनी मिळून आमच्या तिघींसाठी एकदम मस्त असे तीन ड्रेस शिवले. हे ड्रेस माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत, कारण हे मम्मी आणि पप्पा दोघांनी मिळून शिवलेले असल्यामुळे त्या दोघांच्या मायेची ऊब मला जाणवते.

आमच्या कुटुंबात असलेली आपुलकी, एकमेकांची काळजी, एकमेकांबद्दल प्रेम, एकमेकांसाठी एकत्रित वेळ याचा अनुभव मला या सुट्टीत आला. पण त्याचबरोबर करोनाशी लढा देत असलेल्या रुग्णांचे कुटुंब, त्यांच्यावर इलाज करणारे डॉक्टरांचे कुटुंब, पोलिसांचे कुटुंब यांना एकमेकांपासून दूर राहावे लागतेय याचे वाईट वाटले.

सुट्टीत ताईने मला छान छान पुस्तकं वाचायला दिली. माझा अभ्यास अजिबात बुडाला नाही, कारण आमचे सर्व शिक्षक व्हॉट्स ॲप गृपवर रोज नवीन अभ्यास, कोडे, अभ्यासाचे व्हिडिओ, टेस्ट पाठवत होते.
या काळात मला तीन नवीन चांगल्या सवयी लागल्या; त्या म्हणजे वर्तमानपत्र वाचणे, बातम्या पाहणे आणि व्यायाम करणे.

-शरयू विठ्ठल शिंदे,
सातवी
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभेफळ, ता. /जि. -औरंगाबाद

५. कलाकृती- दगडांवर व कपडावरही

सकाळी उठल्याउठल्या ताज्या हवेत घरासमोरच बॅडमिंटन खेळत आमच्या दोघांच्या दिवसाची सुरुवात होते. हा पण सेफ डिस्टंस् ठेवून बरं का! मग आजोबांसोबत घरातल्या बागेला पाणी घालण्याची मज्जा काही वेगळीच! झाडांशी ओळख करून घेणं, झाडावर चढणं, बागेत येणारे पक्षी पाहणं, त्यांचे आवाज कानात टिपून घेणं या सगळ्या गोष्टी आम्ही रोजच्या आयुष्यात विसरलोच होतो. पण आता या मजा पुन्हा अनुभवू लागलोय.

बागेतून वेगवेगळ्या आकाराचे दगड शोधून त्यावर स्टोन आर्ट पण शिकलोय. आम्ही केलेलं सुंदर ‘स्टोन आर्ट’ बघून आई-बाबा देखील चकीत झाले.
गोष्टीची पुस्तकं आणि रोजचे पेपरही वाचतो आम्ही.
जरा आजीच्या किचनमध्ये डोकावतो आणि नवीन मेनू तयार करतो. कधी केक, कधी चॉकलेट, कधी मिल्कशेक...

नवीन मास्क बनवायला शिकलो आणि हॅन्डबॅग्ज बनवायलाही. आम्ही बनवलेले मास्क आमचे आजी, आजोबा, शेजारी सर्वजण वापरतात. आजोबा पण आम्ही बनवलेल्या वेगवेगळ्या हॅन्डबॅग्ज घेऊन दुकानात जातात, तेव्हा काय मस्त वाटतं! एंब्रॉयडरी करायलादेखील शिकलो आम्ही! वेळ मिळाला की, आईचा मोबाइल घेऊन आमच्या ‘युरेका सायन्स क्लब’ च्या वॉटस् अप ग्रुपवर केणी मॅडम आणि इतरांनी पाठवलेली माहिती वाचतो. कोडी सोडवतो. करोनाबद्दलचं ज्ञान बरंचसं यातूनच मिळालं आम्हांला. वेळ कसा जातो हे समजतच नाही.

-आर्या मडव (नववी),
आणि वेद मडव (सातवी),
जांभवडे इंग्लिश मिडीयम स्कूल.

6. New Realisation!

Now in this lockdown, I can know that how the animals feel in the cage. We should not keep them at our home, far from their parents and kids. My dad have time for us and he is playing with us. I admire our Government for helping us to keep away from Corona.

-Akanksha kushwaha,
5th

7. Proud of My Father

Because of LockDown days, l learned new things like cooking with my mother. I could watch two epics Ramayana and Mahabharata. When all of us are at home, the great people like doctors, policemen, nurses, pharmacists, and vegetable sellers are serving the nation. My father is Pharmacist, I am proud of my father. Salute to all of them.

-Gargi Amol Gundawar,
7th
St. Xavier''s High S School Hingna, NAGPUR.


मे २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...