Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 6

image By Wayam Magazine 14 November 2022

On 30th April 2020, Children Magazine

मुलं वाचत नाहीत.. त्यांना अभ्यास नकोसा वाटतो... ही गृहितकं चुकीची आहेत. निदान ‘वयम्’ मासिकाशी निगडित असलेली मुलं तरी छान वाचतात, स्वतः स्वतःला हवं ते आवडीने शिकतायत. त्यासाठी मनापासून अभ्यास करतात. संधी, वेळ आणि वाव मिळताच ही मुलं किती काय काय करताहेत, बघा! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

आज वाचा भाग- 6.

1. वाचनात रममाण

सुट्टीच्या पहिल्या दिवशीच अतुल देऊळगावकर यांचं ‘ग्रेटाची हाक’ हे पुस्तक हातात घेतलं आणि बघता बघता संपवलंसुद्धा! ‘ग्रेटाची हाक’ पुस्तक वाचताना मी किती वेळेस तरी आईजवळ रडले. मग आईने सांगितलं की, तुला जे वाटतं ते लिहून काढ; आणि वहीवर लिहून काढलं. ते आईच्या मदतीने देऊळगावकर सरांना इ-मेलने पाठवलं. त्यावर त्यांची प्रतिक्रिया आली आणि एक-दोन वेळा फोनसुद्धा आला. आभाळ ठेंगणं झालं होतं!

आई म्हणाली, “बाळा, एवढ्याने हरखून जाऊ नकोस आणि इथे थांबूही नकोस.” मग माझी गाडी पुन्हा वाचनावर आली. ‘द डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’ हे पुस्तक घेतलं. त्या पुस्तकातून मी काय शिकले हे शब्दांत मांडू शकत नाही. दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा झालेला अमानुष छळ वाचून खूप म्हणजे खूप वाईट वाटलं.

यानंतर मी ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हे पुस्तक वाचलं. हे तर माझ्या खूप आवडीच्या लेखिकेचं पुस्तक! सुधा मूर्ती यांनी त्या पुस्तकात खऱ्या घडलेल्या 20 गोष्टी लिहिल्या आहेत.

धनंजय कीर यांचं ‘महात्मा फुले’ हे चरित्रही मी वाचलं. महात्मा फुले यांच्याकडून मी महत्त्वाच्या चार गोष्टी शिकले 1. संयम, जो माझ्याकडे बिलकूलच नव्हता. 2. प्रयत्न करत राहिले पाहिजे. 3. दृष्टिकोन कसा असावा आणि 4. सत्य हाच ईश्वर मानणे. आणखी एक उपक्रम मी केला. सर्व नातेवाइकांच्या नावाच्या चिठ्ठय़ा केल्या. आणि रोज एका नातेवाइकाची चिठ्ठी काढून त्यांना मी पत्र लिहिलं. खरं तर फोनमुळे पत्र लिहिण्याची सवय नाही. परंतु या उपक्रमामुळे माझ्या त्या व्यक्तीविषयीच्या भावना, आपुलकी, प्रेम ह्या गोष्टी मला त्या पत्रामधून व्यक्त करता आल्या.

आमच्या घराच्या बाजूला एक मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राऊंडमध्ये 35 ते 40 कुटुंबं अडकली आहेत, जी रस्त्यावर काही ना काही वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात. माझ्या पप्पांनी व त्यांच्या मित्रांनी मिळून त्या लोकांना एका महिन्याचं किराणा सामान दिलं. या दरम्यान पप्पांनी केलेली धडपड मला खूप जवळून पाहायला मिळाली.

-समृद्धी अजय महाजन,
आठवी,
गांधी विद्यालय, परभणी.

२. दासबोध वाचन

यंदा दहावी अंतिम परीक्षेनंतरची सुट्टी खूप नियोजित होती. सहली, शिबिरं आखलेली होती. परंतु सर्व नियोजनावर पाणी फेरलं गेलं. मग मी नवा दिनक्रम आखला. दासबोध-वाचन करायचं ठरवलं. आई-बाबा, आजी-आजोबा यांच्यासमोर रोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास वाचून मी सर्व अध्याय वाचून संपवले. दररोज आम्ही प्रत्येक अध्यायावर चर्चा करत असू.

वाचन, गाणी ऐकणं यामध्येही मधला वेळ जातो. शिवाय आम्ही घरी रोज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत असतो.

सध्या मी कोरियन भाषा ऑनलाइन शिकत आहे. मी आणि बाबा दिवसातून एक पिक्चर पाहतो; मग त्यावर आम्ही चर्चा करतो. तसेच मी आईकडून एक्सेल शिकून घेत आहे. आमिश हे माझे आवडते लेखक आहेत. त्यांची ‘मेहूलाचे मृत्युंजय’, ‘रहस्य नागांचे’, ‘शपथ वायुपुत्राची’ अशी अनेक पुस्तकं मी वाचली आहेत. सध्या मी त्यांचं ‘प्रतिभेचा इंद्रधनू’ हे पुस्तक वाचत आहे.

फावल्या वेळात मी कॅलिग्राफीची प्रॅक्टिसही करतोय.

-जयवर्धन केणी,
इयत्ता दहावी,
विद्या मंदिर हायस्कूल, कणकवली

३. इंस्टाग्रामवर पुस्तकांचं अभिवाचन

मी सहज म्हणून एक ऑडियो चॅनल सुरू केलं. शास्त्रीय भाषेत त्याला ‘ऑडियो जॉकी’ म्हणतात. या ऑडियो जॉकीचं नाव – ‘Book in your city, Happiness’. ''तोत्तोचान'' आणि ''बोक्या सातबंडे'' या दोन पुस्तकांचं माझ्याबरोबर असलेलं नातं मी त्या ऑडियो जॉकी (चॅनल) मधून मांडलं. अनेकांनी मला व्हिडिओ करण्याबद्दल सुचवलं. म्हणून, मी happy minds नावाने व्हिडिओ केले. त्यात ''सत्यजित रे'' यांच्या ''फॅन्टास्टिक फेलुदा'' या पुस्तकसंचाबद्दल सांगितलं. ते माझ्या वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केल्यावर सगळ्यांना खूपच आवडलं. तेव्हा इंस्टाग्राम वर _happy.minds हे अकाउंट सुरू केलं, ज्यावर मी काढत असलेली चित्रं आणि अनेक वेगवेगळी पुस्तकं, कविता, गाणी, चित्रपट, ठिकाणं यांबद्दल माहिती देणारे व्हिडिओ टाकते. सर्वांनी नक्की फॉलो करा हं माझं पेज! शिवाय मी माझा दहावीचा अभ्यास सुरू केलेला आहे. एरव्ही घरात कधीही न केलेली कामे, उदाहरणार्थ, भांडी घासणे, भाजी निवडणे, कपडे वाळत घालणे इत्यादी करायला शिकले. शिवाय, मी दूरदर्शन वाहिनीवरील ‘ब्योमकेश बक्षी’ व ‘चाणक्य’ या मालिकाही पाहत आहे. तसेच, वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन, गाणी ऐकणे, नृत्यसराव या गोष्टींमध्ये मी माझा वेळ घालवते.

- वेदिका नेत्रा हृषिकेश,
दहावी,
बदलापूर.

४. गांधीजी समजून घेतेय

मी सुरुवातीला 3-D चित्र काढायला शिकले. आईने कागदाची सुंदर अशी अनेक प्रकारची फुलं बनवली. तिलाही थोडी थोडी मदत केली. मी बाबांबरोबर बुद्धिबळाचे नवीन डावपेच शिकले. लॉकडाऊनमुळे ऑनलाइन स्पर्धा झाल्या. त्यात मीही सहभाग घेतला. त्यातीलच एक स्पर्धा म्हणजे ‘ओळख महात्म्याची’. ही स्पर्धा ‘बॅ. नाथ पै सेवांगण’, मालवण यांच्यामार्फत घेण्यात आली होती. यात दररोज दुपारी 3 वाजता महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित दहा प्रश्न यायचे. ते शोधायचे आणि सेवांगण मालवणच्या whatsapp ग्रुपवर पाठवायचे. ब-याच वेळा ते प्रश्न शोधण्यासाठी गांधीजींच्या जीवनावरील काही पुस्तकं वाचावी लागत, तर काही वेळा आम्हांला इंटरनेटचा वापर करावा लागायचा. या स्पर्धेमुळे मला गांधीजींच्या जीवनावर आधारित काही किस्से समजले. यामुळे गांधीजींच्या जीवनावरील काही लेख मी वाचले. घरी बसूनही सुट्टीची मजा कशी घ्यायची, हे या सुट्टीत उमगले. चित्रं काढणे, कविता लिहिणे, वाचन करणे, निबंध लिहिणे, नाटकं पाहणे... कित्ती गोष्टी घरच्या घरी केल्या.

यशश्री गुरुनाथ ताम्हणकर,
तिसरी,
जि. प. प्राथमिक केंद्रशाळा, मसुरे नं.1 ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.

5. चांगल्या सवयी लागल्या

मी ठरवलं, ही मिळालेली सुट्टी वाया घालवायची नाही. ह्या विषाणूला घाबरायचंसुद्धा नाही आणि ही सुट्टी सत्कारणीही लावायची. या विषाणूशी लढताना मला काही चांगल्या सवयी लागल्या आणि तेही माझ्या नकळत! वारंवार साबणाने हात धुऊन स्वच्छ करणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणे अशा अनेक! माझ्या आवडत्या चायनीज भेल, बर्गर, पिझ्झा यांची जागा आता घरच्या, आईच्या हातच्या पदार्थांनी घेतली आहे. हे पदार्थही इतके आवडू शकतात, हे मला या सुट्टीतच समजलं. एके दिवशी मला भेळ खाल्ल्याशिवाय राहवलं नाही, म्हणून मी आईसोबत घरच्या घरी भेळ बनवली! मी आता रोज माझ्या आवडीची गोष्टीची पुस्तकं वाचतोय. त्याचबरोबर माझा चित्रकलेचा छंद जोपासण्यासाठी मला पुरेपूर वेळ मिळालाय. आमच्या घरी एक जुना रुबिक्स क्यूब कित्येक दिवस पडून होता. दादाकडून सध्या मी तो शिकून घेत आहे. रोज संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र मिळून घरी कॅरम खेळतो.

-दिलीप मोरये,
पाचवी,
विद्या मंदिर, दहिसर

6. Much longing ‘me time’!

At first I felt miserable just by the thought of Lock Down. But as the days passed, I started getting to know myself better. At last, I had the ‘me time’ which I was longing for since months. I started pursuing all my hobbies like reading books, cooking various delicacies like Tawa Pulav. I also prepared the Choco lava cake which is each of our favourites. I have been making rangolis and painting a lot, bringing right from forts to abstract paintings on the canvas. I did some origami which is one of my oldest hobbies. I’ve been knitting a purse for days. Playing cards for hours and singing songs has been an all time favourite. Apart from all this, I’ve lately been learning Deutsche or German online and the shlokas from Bhagwad Geeta with the continuing encouragement of my mother. I spend quite a lot of my time binge watching on Netflix which I couldn’t do when I was in the 10th grade and listening to all sorts of songs and dancing along their beats. Overall I’d say that this lockdown is a blessing in disguise which is uniting families and is allowing us to give ourselves some time.

-Madhura Shrikhande,
10th St Colambo High School,
Nana Chauk, mumbai


एप्रिल २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...