Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 5

image By Wayam Magazine 14 November 2022

मुलांना एरव्ही मोकळा वेळ मिळणे दुर्मीळ झाले आहे. शांत, निवांत वेळ मिळताच ही मुले किती वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात, बघा. वयम् वाचक मुलांच्या अनुभव-लेख मालिकेचा हा 5वा भाग!

1. मनमोहक नर्सरी

सगळीकडे ‘बंद’ची कुणकुण लागताच आम्ही पुण्यापासून जवळच असलेल्या माझ्या आजोळी येऊन दाखल झालो. आज्जी-आजोबांच्या मोठ्या घरात मामा, मामी आणि भावंडांनी भरलेल्या गोकुळात मी रमून गेलो. नंतर मात्र मित्रांची आठवण येऊन मी आईच्या मागे भुणभुण सुरू केली... ‘बोअर झालोय’ हा जप ऐकून तिने मला समजावले की, आलेल्या संकटाकडे त्रास म्हणून न बघता संधी म्हणून बघ, म्हणजे सुचेल काहीतरी. आणि खरंच तसं झालं. एक दिवशी दुपारी सगळीकडे सामसूम झाल्यावर माझ्यातला चित्रकार जागा झाला. परसातल्या लालभडक कुंडीवर पांढरी वारलीची नक्षी काढली. त्यात इवलीशी हिरवीगार रोपं लावून, मनमोहक नर्सरीच तयार झाली. काळ्याकुट्ट टायरवर पांढरीशुभ्र वारली चितारल्यावर कुणी कल्पनाही केली नसती की, त्याच्या सुंदर बैठका होतील, किंवा झाडाला टांगल्यावर आईला हिंदोळ्यावर बसून झोके घेता येतील आणि छोट्या विषुला फोटोसाठी छान ठिकाणही मिळेल. घरातल्या सगळ्यांनी माझं कौतुकही केलं. या सगळ्यात माझा छान वेळ गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा आत्मविश्वास वाढला. आईच्या मागे भुणभुण नसल्यामुळे तीही खूश. लहान भावंडांना सहभागी करून घेतल्यामुळे ती मजेत रमली. आणि या सगळ्यांना खूश पाहून आज्जी-आजोबा पण सुखावले. मी ठरवलंय की, करोना तर हद्दपार होईल, लॉकडाऊनही संपेल, पण यापुढे मी मात्र महिन्यातल्या एका रविवारी स्वतःच बंद घोषित करून माझे हे छंद जोपासणार आहे.

-आर्य विलास वाटाणे

2. लिखाणाचा सराव

सारख्या सारख्या बातम्या बघून मनात भीती निर्माण होत असल्याने मी बातम्या बघणे कमी केले आहे. दादाच्या मदतीने मी शाळेचा राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. ‘निवडक किशोर’ खंडातील गोष्टी वाचतो. माझ्याकडे ‘सक्षम’ नावाचे एक पुस्तक आहे. त्यातील संवादलेखन, बातमी आणि पत्रलेखन या विषयांवर काम चालू आहे. माझे हे लेखन कधीतरी बाबा तपासतात, त्यावर सूचना देतात. मी लिहिलेले पहिले लेखन मलाच वाचायला सांगतात, नंतर माझ्या पण लक्षात येतं की, खूप चुका झाल्या आहेत. मग मी पुन्हा लिहितो, त्यामुळे दुसरे लेखन चांगले होते, असे माझ्याही लक्षात येत आहे. माझी शाळा सकाळी सात वाजता असल्याने मी आईला फारशी मदत करत नव्हतो. पण आता करतो. मी खिचडी करायला शिकलो. चहा छान जमायला लागला आहे. यापुढे आई जेव्हा कामावरून थकून येईल तेव्हा मी नक्कीच खिचडी करू शकेन.

-चिन्मय मोरे,
सहावी

3. शाळेची ओढ

या सुट्टीत सकाळी सात वाजता ताई आणि मी मिळून व्यायाम करतो. काही दिवस आम्ही संगणकावर स्पॅनिश भाषा शिकत होतो. पण काही दिवसांनी त्याचा कंटाळा आला. आम्ही टीव्हीवर रामायण बघतो. कधी मी व माझ्या शाळेतल्या काही मैत्रिणी व्हिडीओ कॉल करून एकमेकींशी बोलतो. वेगवेगळी पुस्तकं वाचून झाली. बोक्या सातबंडे, सिक्रेट सेव्हन इ. काही दिवसांनी त्याचाही कंटाळा येऊ लागला. आता नाच बसवत आहे. पण आता जास्त दिवस सुट्टी नको, लगेच शाळा सुरू व्हायला हवी.

-सानिका कशाळकर,
पाचवी,
आनंद निकेतन

4. कुटुंबीयांशी संवाद

या सुट्टीचा सदुपयोग करायचा, असे मी ठरवले. मी माझा नवा दिनक्रम तयार केला. सकाळी लवकर उठणे, झाडांना पाणी घालणे, व्यायाम करणे, घरकामात आईला मदत करणे, ताईसोबत थोडा वेळ खेळ व दंगामस्ती करणे आणि काही वेळ नवीन अभ्यास करणे. यासाठी मी स्पर्धापरीक्षेचा व ‘नेटिझन्स’चा ऑनलाइन क्लास लावला. तसेच आवडीची चित्रे काढतोय. कुटुंबीयांशी संवाद साधयला वेळ मिळतोय, म्हणून काका-काकी, चुलत बहीण-भाऊ, आत्या, दीदी यांच्यासोबत गप्पा मारतो. त्यातूनही किती नवीन-नवीन माहिती मिळतेय! अशाने माझे मन प्रसन्न राहत आहे.

-श्रीनिवास महालिंग हुंडेकर,
सातवी,
ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर.

5. वाचनाची सवय लागली

माझ्या अभ्यासामुळे मला इतर गोष्टींसाठी वेळ मिळत नव्हता. आता मी नवनवीन पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. मला त्यातून नवनवीन गोष्टी कळत आहेत. मी दररोज स्तोत्र पठण करू लागले. कुटुंबातील आम्ही सर्वजण एकत्रितरित्या जेवतो, यापूर्वी एकत्रितरीत्या कोणी जेवत नसे. आता मी दररोज वडिलांसोबत कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, पत्त्यांचे घर बनवणे इत्यादी खेळ खेळते. या लॉकडाऊमध्ये मला नवनवीन गोष्टी समजल्या म्हणजे समाजात वावरताना थोडे अंतर ठेवणे, आपले हात स्वच्छ धुणे, पौष्टिक जेवण सेवन करणे, निसर्गाची नासधूस न करणे, इत्यादी.

-देवयानी उदय पाठक,
पाचवी,
सारडा कन्या विद्या मंदिर, नाशिक

6. ऑनलाइन मज्जा

करोनामुळे मिळालेल्या सुट्टीत काय करायचे, यावर चर्चा करायला मी आणि माझ्या मित्रांनी एक ऑनलाइन मिटिंग घेतली. आम्ही मुलांनी असे ठरवले की, मी त्यांना ‘स्क्रॅच’ ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकवायची. मग मी त्यांना इव्हेन्ट्स शिकवले, नंतर लुप्स, मग सेन्सिंग शिकवले. गेले महिनाभर आम्ही एकमेकांच्या मदतीने ‘स्क्रॅच’मध्ये नवीन नवीन गोष्टी शिकत आहोत. आता तर आम्ही ‘स्क्रॅच’मध्ये प्रोग्रॅम करून एक गोष्टसुद्धा बनवली आहे. आमच्या ‘स्क्रॅच’च्या ग्रुपमधल्या निधीने कोडी सोडवायचा एक ऑनलाइन ग्रुप सुरू केला आहे. आम्ही ऑनलाइन भेटून एकमेकांना कोडी घालतो, ती कशी सोडवली ते सांगतो, त्यामुळे आमचा दिवस मस्त जातो. उरलेल्या वेळात मी यूट्युबवर वेगवेगळ्या गोष्टींचे अभिवाचन करत असतो. सर्जनशील पालक- समूहाच्या ‘टाइम मशीन’ या ऑनलाइन उपक्रमात काही पालक, ते कोणता जॉब किंवा व्यवसाय करतात, हे सांगतात. त्यातून मला ‘करिअर म्हणजे काय?’ हे समजायला मदत होत आहे. त्याचबरोबर मी आजीला साबुदाणा पापड बनवायला मदत केली. बटाटेवडे केले. तांदळाची पापडी बनवायला मदत केली. सांडगे वाळत घालायला मदत केली. तसेच मी सईकडे जाऊन गुलाबाच्या फ्लेवरचा सेंद्रिय साबणसुद्धा बनवला. अशी भरपूर मज्जा चालली आहे.

-स्नेह एरंडे,
पुणे,
होमस्कूलिंग

7. चित्रकलेशी नव्याने गट्टी

मी आतापर्यंत कायम नुसते बसून खायचो, आयते, आईच्या हातचे. परंतु या सुट्टीत स्वतः जेवण बनवून खाल्ले. हा आनंद काही वेगळाच असतो हे कळला. आई-वडील सर्वजण एकत्र घरात बसून संवाद साधू लागलो. मला कविता करण्याची फार आवड आहे. हा आवडता छंद मी सुट्टीत जोपासला आणि जवळजवळ आतापर्यंत 25 कविता केल्या आहेत. चित्रकला आणि माझा 36चा आकडा! परंतु या सुट्टीत चित्र काढण्याचा सराव केला. सुरुवातीला काही चित्रांचा सत्यानाश झाला, परंतु मी हार न मानता चित्र काढत राहिलो, याचा परिणाम म्हनोन माझ्याकडे असलेल्या चित्रकलेच्या वह्या संपून गेल्या.

-लौकिक भोगले, दहावी

8. सहवास हा आनंदाचा

मी आणि माझा छोटा भाऊ विधीत घरकामात आईला मदत करो. छोटी-छोटी कामे करतोय. जसे की, सकाळी अंथरून काढणे, फरशी पुसणे, भाजी निवडणे. रोजची दुपार म्हणजे नाटकांचा टाइम! श्रीमंत दामोदर पंत, ती फुलराणी, वऱ्हाड निघाले लंडनला अशी नाटकं इंटरनेटवरून पहिली. घराच्या बाहेर न पडता कुटुंबासमवेत आम्ही सर्वजण एवढे आनंदी राहू शकतो, हे आम्ही पहिल्यांदाच अनुभवतोय.

-विनीत शिंदे,
द. ह. कवठे प्रशाला पंढरपूर


एप्रिल २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...