Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 3

image By Wayam Magazine 11 November 2022

 On 20th April 2020, Children Magazine

वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, तुम्ही ही अनुभव-मालिका?

आज वाचा भाग- 3.

1. हेच तर खरे देव!

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द... अरे वा! मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. इतकी वर्षे जी भोलेनाथची प्रार्थना केली, ती प्रत्यक्षात आली-
_‘सांग सांग भोलेनाथ_
_सरकारी आदेश येऊन_
_परीक्षा रद्द होतील का?’_

काय मज्जा ना! पण दुसऱ्या क्षणी वाटलं, ‘परीक्षा नाही म्हणजे स्पर्धा नाही. आपल्याला स्वतःची क्षमता ओळखायची तर परीक्षा हवीच! कशाला आला हा करोना? मैदानी खेळ नाही, उन्हाळी सुट्टीचे कॅम्प नाहीत, मामाच्या गावाला जाऊन कैरी, करवंद काढण्याची मज्जा नाही. काय हे भलतंच संकट आलंय?

मग मी चित्रं काढू लागलो. पुस्तकं वाचली. लेख लिहू लागलो. मी घरात बसून बैठे खेळ, पत्त्यांचे विविध गेम शिकलो. पत्त्यांचे घर तयार करताना मन एकाग्र करावे लागते, हे लक्षात आले.

घरच्या घरी मास्क कसे बनवायचे ते आईकडून शिकलो. आपल्या देशातील लोकांवर दैवतांचा भला मोठा पगडा आहे, परंतु टीव्हीवरील बातम्या ऐकत असताना मला जाणवलं की बिचारे डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी व पोलिस हेच तर आपल्या मदतीला धावून आलेले आहेत; स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या मुलाबाळांची चिंता न करता! हेच तर सगळे आहेत जे फक्त ''मानवताधर्म'' निभावत आहेत.

हा सूक्ष्म, पण भयानक विषाणू आपल्याला हेच तर शिकवण्यासाठी आला नाही ना इथे?

-चाणक्य विदेश तांबे,
सातवी,
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, जावळी.

२. विविध अनुभवांची गोधडी

आम्हांला जेव्हा सुट्ट्या सुरू झाल्या, तेव्हा पूर्णपणे लॉकडाऊन झालेलं नव्हतं. म्हणून निदान गल्लीत क्रिकेट खेळता येत होतं. मग पूर्णपणे घरी राहायची वेळ आली, तेव्हा घर स्वच्छ करायचं ठरवलं. पंखा, भिंतीवरची थोडीफार जाळी, खिडक्या यांच्यासहित साफसफाई केली. घरातला कानाकोपरा स्वच्छ केला. आपली खोली किती अस्ताव्यस्त होती, हे लक्षात आलं.

एकदा बैठकीच्या खोलीतील फरशी घासून काढली. आमच्या शेजारच्या मावशी म्हणाल्या की, ‘आला’ वापरून फरशी पुसल्यावर छान होते, म्हणून मी ते फरशीवर टाकून फरशी पुसली तर मध्ये मध्ये खूप छान झाली, पण फार विचित्र दिसू लागली, कारण आमची फरशी थोड्या जुन्या पद्धतीची आहे. ती पूर्ण स्वच्छ दिसेना. म्हणून पूर्ण खोली परत घासून काढावी लागली. नंतर इतकी दमले की, अंगात शक्तीच उरली नाही.

आईने गोधडी शिवायला घेतली आणि मग मलाही इच्छा निर्माण झाली. मग आईकडून समजून घेऊन जसे जमतील तसे टाके घालून गोधडी शिवायला कणभर का होईना, मदत केली.

या काळात आई-बाबांशी भरपूर गप्पा मारून मी त्यांचे लहानपण जाणून घेतले.
शिवाय चित्रं काढली. ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ वस्तू बनवल्या. भरपूर पुस्तकं वाचली. एक इंग्रजी पुस्तक मराठीत करायला सुरुवात केली. त्यासाठी शब्दकोशाची मदत घेतली.

-यशस्वी वसंत चव्हाण,
सातवी,
आनंद निकेतन शाळा, नाशिक

३. मी माझं मन रमवायला शिकले

या सुट्टीत एकदम घरकोंबडा झाल्यासारखं वाटतंय. यावेळेस गावाकडे जायचं नाही, आजीकडे राहायचं नाही, कोणीच कोणाला भेटणार नाही... मात्र या डबल सुट्टीत खूप काही शिकायला मिळालंय. कितीतरी वर्षांपासून शिकायची राहिलेली रामरक्षा मी या सुट्टीत शिकून घेतली. आता मी रोज रामरक्षा म्हणू शकते. शिवाय मी डबलसीट सायकल चालवायला शिकले. यात गमतीची बाब आहे की, मी सायकल तिसरीत असताना शिकले आणि डबलसीट आता, आठवीत जाताना. म्हणजे मला इतका आत्मविश्वास नव्हता की, मी डबलसीट चालवू शकेन. तो आता कमावला. मी वेगवेगळी झाडं लावली. कधीतरी रांगोळी काढते. घरात राहण्यासंबंधी एक छानसं पोस्टर बनवलं. प्राण्या-पक्ष्यांचं मुक्तपण मला जाणवलं. प्रदूषणात घट झाल्यामुळे हवासुद्धा कशी शुद्ध झालीय हेही जाणवतेय. पानांची पानगळ सुरू झाल्यामुळे घरासमोर पानांचा ढीग झालाय. बऱ्याचदा बाबा टीव्ही बघण्यात दंग असतात. आई घरकामात बिझी असते आणि ताई तिच्या अभ्यासात. त्यामुळे एकटीला माझं मन रमवावं लागतं. मग मी स्केच काढते, हार्मोनियम वाजवते, गाणी गाते… असं मी माझं मन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमवते.

-श्रावणी संतोष सेलुकर,
सातवी,
परभणी

४. My Lockdown Experience

12th March was an unexpected last academic day of grade 7. To my dismay my due examinations were cancelled. There had been a sudden increase in my convergence and determination towards study. I was unable to confine my gladness and felt fortunate enough to have a 15-day holiday prior my examinations; great preparations and contentment were on my way. But the announcement of 21-day lockdown due to ‘COVID-19’ vanished the glory on my face and replaced it with a frown. I had never imagined that such a decision would be taken so haphazardly. That night I came across various nightmares that I wasn’t able to socialize due to social distancing and terribly missing my school. Next morning my mother gave a respite i.e. taught me cooking and then awarding me time for exploring my hobbies. Firstly I was taught Jowar’s Bhakari. After a long time there was a heart-warming experience for me of pouring my thoughts on a paper through sketches. Following days were fantastic too. I learnt to cook chapatis and minor choirs for a meal too. My mother willingly asked me for her reward, so I taught her playing a keyboard and soon ready to teach her guitar. We spontaneously practiced singing some songs together too. I even prepared my own dance routine. I continued painting with my crafty mind. There wasn’t any space left for me to complain about being bored as I was so engrossed living my talents.

Meanwhile our school made a wonderful decision of having Google classroom sessions. This was the actual icing on cake as was desperately missing the school and academics. This was one of the most memorable and valuable experiences I have ever had, sitting in the house itself!

-Aniha Sheela Praveen,
7TH
Wisdom High International School, Nashik


एप्रिल २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...