
Severity: Warning
Message: fopen(/var/cpanel/php/sessions/ea-php81/ci_session2d2688811bb8042de094aed9a528ca690afbe8a3): Failed to open stream: No space left on device
Filename: drivers/Session_files_driver.php
Line Number: 177
Backtrace:
File: /home/wayam/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct
File: /home/wayam/public_html/index.php
Line: 317
Function: require_once
Severity: Warning
Message: session_start(): Failed to read session data: user (path: /var/cpanel/php/sessions/ea-php81)
Filename: Session/Session.php
Line Number: 137
Backtrace:
File: /home/wayam/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct
File: /home/wayam/public_html/index.php
Line: 317
Function: require_once
On 14th April 2020, Children Magazine
करोना विषाणूमुळे घरातच वेळ घालवत असताना आपण किती वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो, हे मुलांकडून समजून घेण्यासारखे आहे. रोजच्या रोज ‘वयम्’च्या वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहेत. सिंधुदुर्ग ते गडचिरोली अशा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-पश्चिम सीमाभागांतूनही मुलांचे अनुभव-लेख आले आहेत. या संभ्रम-काळाबद्दल वाटणारी हुरहूर, चिंता आपल्या लेखनातून ही मुलं प्रकट करत आहेत. रडत, कंटाळत न राहता त्यांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. त्यांचे अनुभव, नव्या जाणिवा त्यांच्याच शब्दांत, पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका.. वाचताय ना?
आज वाचा भाग- 2.
परीक्षा होणार नाही म्हणजे आता अभ्यास करावा लागणार नाही असे आधी वाटले, पण मग लक्षात आले की, मला गणित हा विषय फारसा येत नाही, तर तो जरा ताईकडून शिकून घ्यावा. त्यामुळे मी रोज गणित शिकतो आहे. आईबाबा एवढा काळ घरात, हे मी प्रथमच अनुभवतोय. घरात आईला पापड, आलूचे चिप्स करायला मदत केली. चिप्स कसे करायचे ते छान समजले. या काळात मी भांडी छान घासायला शिकलो. हे काम प्रत्यक्ष करायला लागल्यावर ते काम छान रीतीने कसे करायचे ते कळले. भांडी घासताना खरकट्या भांड्यांमध्ये पाणी टाकून ठेवले नाही, तर भांडी घासताना हात दुखतो.. जळलेली भांडी घासायला तर फारच मेहनत घ्यावी लागते. अशी भांडी घासायला आईला खूप त्रास होत असेल ना, पण हे काम प्रत्यक्ष केल्यावरच माझ्या लक्षात आले!
माझ्याकडे गोष्टीची बरीच पुस्तके आहेत. मागच्या वर्षी मी ‘तोत्तोचान’ वाचले होते. त्यानंतर मी पुस्तके वाचलीच नाहीत. शाळेच्या अभ्यासामुळे वेळच मिळाला नव्हता. आता वेळ आहे म्हणून ताई आणि मी मिळून ‘आमचा बाप आणि आम्ही’ आणि ‘आयुष्याचे धडे गिरवताना’ ही पुस्तके रोज संध्याकाळी बसून वाचली.
मला वाटते, करोना हा आजार होऊ नये म्हणून सातत्यानेच काळजी घ्यावी लागेल. साबणाने हात धुणे, गर्दी न करणे, तोंडाला रुमाल बांधणे यासारख्या गोष्टी नेहमीसाठी आवश्यकच असतील. शाळा सुरू झाल्यानंतरही हे नियम आम्हा सर्व मुलांना पाळावे लागतील. जे लोक फक्त रोजच्या रोज काम करून कमावतात, ही मंडळी आत्ता काय करत असतील, अशी काळजी मला वाटते.
-प्रिन्स वानखेडे,
सातवी,
भद्रावती, जि. चंद्रपूर
या सुट्टीमुळे माझ्यातली ‘मी’ शोधण्याची एक संधी मला मिळाली आहे. आधी मी काही विषयांचा अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मी रोज वेगवेगळे छंद जोपासत आहे. वारली पेंटिंग, रांगोळी, चित्रकला, पेन्सिल शेडिंग, मंडाला आर्ट आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे वाचन. त्यात मी ‘वयम्’चे जुने अंक वाचून संपवले. त्यातील शब्दकोडी मी आणि माझ्या बहिणीने मिळून सोडवली.
आईसोबत एक तास उपासनेला बसायचे असे ठरवले. त्यातून ऊर्जा मिळाल्याचे जाणवते. ही ऊर्जा मला दुसऱ्या दिवशीच्या उपासनेला खेचून नेते.
मला लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टी खटकल्या. गावी निघून जाणारे परप्रांतीय बघून आईची मैत्रीण म्हणाली, “बरं झालं, मुंबईची घाण जातेय.” बाहेरून येणारे लोक इथे घाण करतात, असे तिचे म्हणणे मला फार खटकले. मग आई माझ्याशी संवाद साधताना मला म्हणाली की, आपण सारेच नोकरीसाठी मुंबईत आलो आहोत. आपण आपले गावातले तीनहजार स्क्वेअर फुटाचे घर सोडून इथे 700 स्क्वेअर फूटमध्ये राहत आहोत. कारण आपल्या गावात नोकरी मिळत नाही. मजूरही असेच पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठीच इथे येतात. आज ते करोनाच्या भीतीने गावी जात आहेत. मला असे वाटते की, प्रत्येक माणसाने माणुसकी जपून बोलण्याची खूप गरज आहे. अडचणीत असलेल्यांना कधी असे काही बोलू नये, जमेल तेवढी मदत करावी हे जाणवलं.
-पर्वणी रडके,
नववी,
दहिसर विद्या मंदिर, मुंबई.
मित्रमैत्रिणींची भेट होणार नाही, मग गप्पा कोणाशी मारायच्या, म्हणून मी आधी हिरमुसले होते. पण या काळात मला नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या. आम्ही रोज रात्रीच्या वेळी अंगणात बसू लागलो. आकाशातील ताऱ्यांकडे मी एकटक पाहू लागले. तारे लुकलुकत होते, तर काही तारे एकाच जागी स्थिर होते; जणूकाही ते तारे माझ्यावर रागावले आहेत असं वाटलं. (मी आतापर्यंत त्यांच्याशी मैत्री केली नाही म्हणून!) काही तारे लगबगीने त्यांच्या घरी जात असतील, असंही वाटलं. मग मी रोज त्यांना पाहू लागले. असं करता करता माझी ताऱ्यांशी गट्टी जमली. मी रोज पुस्तकही वाचत असते, त्यामुळे माझी पुस्तकांशीही मैत्री झाली.
आमच्या घराला काचेच्या खिडक्या आहेत. या खिडक्यांवर चिमणी, बुलबुल, खंड्या असे अनेक पक्षी रोज येऊन टोच मारतात. त्यांना त्यांचं प्रतिबिंब त्यात दिसतं, ते त्यांना कळत असेल का?... हळूहळू या पाखरांशीही माझं नातं जमलं. त्यातील एका बुलबुलच्या घरट्यात मी दोन पिल्ले पाहिली. मला खूप आनंद झाला.
मी रोजनिशी लिहायचे ठरवले. रोज घडलेले प्रसंग, सिक्रेट मी रोजनिशीमध्ये लिहू लागले. मला असं जाणवलं की, आत्मपरीक्षण करण्यासाठी रोजनिशी उपयोगी पडते. बचत करून कसे जगावे हे मी माझ्या आईकडून शिकले. सगळीकडे भाजीपाला, मासे-मटण मिळणे बंद झाल्याने पिठलं-भाकरीही गोड लागते हे मला कळलं.
आमच्या परसात लावलेली वांगी, मिरची, पालेभाजी मी आवडीने खाऊ लागले. जंगलातील करवंदे, त्यांची चटणी, लोणचे म्हणून तोंडी लावू लागले.
लॉकडाऊनमुळे शहरातील मंडळी छोट्याशा रूममध्ये घुसमटत असतील. परंतु मी माझ्या खेड्यातल्या घरी असल्याने मला जंगलात मोकळं फिरायला मिळतंय.
मला शाळा खूप आवडते. सरस्वतीसमोर एकच मागणे आहे, 1 मे पर्यंत तरी हे करोना-संकट दूर होऊ दे आणि आम्हांला शाळेत जाऊन नवीन इयत्तेचा आनंद लुटता येऊ दे.
-कृतिका जाधव,
सातवी,
जिल्हा परिषद शाळा भरणी नंबर 1, कणकवली, सिंधुदुर्ग
सुट्टी पडली म्हणून सुरुवातीला मी खूप खुशीत होते. नवनवीन खेळ सुरुवातीचा आठवडाभर खेळले. नंतर मला त्या खेळांचा कंटाळा आला. मग मी आमच्या बाईंनी सांगितल्याप्रमाणे भरपूर चित्रे व फिगर काढण्याचा सराव करू लागले. इंटरनेटचा वापर करून कागदाच्या नवीन नवीन वस्तू तयार केल्या व घर सजवलं. घराच्या भिंतीवर छान छान, रंगीत चित्रं काढली.
मला आवडणारे पदार्थ आईच्या मदतीने बनवले. खूप मज्जा आली. मी माझ्या आईसोबत पापड बनवले. मी चाळीत राहते. इथले वातावरण काही वेगळेच आहे. आसपास काही जण सतत बाहेर पडताना दिसतात. सरकार नेहमी सांगतंय की, घरातून बाहेर पडू नका, तरीसुद्धा लोक ऐकत नाहीत. सर्वांनी घरात राहून या संकटाला दूर करावे, असे मला वाटते.
-सलोनी वृंदावन,
सातवी,
अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, गोरेगाव, मुंबई.
सुट्टी.. आणि नेमका आमचा टीव्ही चालत नव्हता. लगेच आठवले की, माझ्याकडे चेसचा गेम (बुद्धिबळ) आहे. तो काढला आणि खेळायला लागलो. शेजारच्या दादासोबत चेस खेळू लागलो. दादा मला खेळातील वेगवेगळ्या चाली शिकवत होता. खेळता-खेळता मी या खेळात प्रवीण झालो. कधी पप्पांसोबत, तर कधी दादासोबत चेस खेळून सुट्टीचा आनंद उपभोगत होतो.
एकदा माझ्या मम्मीने अंगणामध्ये वेगळाच लंगडीचा खेळ शिकवला. यामध्ये एक मीटर अंतरावर सहा डबे असतात. एक छोटा डबा असतो, त्यात दगड असतो. त्या सर्व डब्यांभोवती लंगडी घालत चक्कर लावून यायची. त्यातला दगड उचलून लंगडी घालत परत यायचे. हा गेम आता आमच्या कॉलनीत फेमस झालाय. प्रत्येक जण संध्याकाळी आपापल्या अंगणात हा खेळ खेळू लागले.
रात्री जेवणानंतर आम्ही घरी एका अक्षरावरून सुरू होणारे नाव, गाव, वस्तू, प्राणी, आडनाव असा खेळ खेळतो.
सकाळी आम्ही सर्वजण आजीसोबत पूजेला बसतो, आरती करतो. या सुट्टीमुळे मला वर्तमानपत्र वाचण्याची आवड निर्माण झाली आहे.
-सम्यक सुधीर काटवलकर,
चौथी,
प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूल,चामोर्शी, जिल्हा गडचिरोली
एप्रिल २०२० ‘वयम्’