On 9th April 2020, Children Magazine
घरोघरीची मुले सध्या घरी आहेत. यंदा करोना विषाणूमुळे अचानक मिळालेली सुट्टी शिवाय सर्व कुटुंबीयही घरी, अशा या काळात मुलांनी काय नवे अनुभव घेतले, त्यांना कोणत्या नव्या जाणिवा झाल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या रोज ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख वाचायला मिळत आहे. त्यात संभ्रम-काळाबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेल्या विविध भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात हुरहूर, काळजी, चिंता अशा भावना स्वाभाविकपणे प्रकट झाल्या असल्या तरी बहुतांश मुलांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. सुट्टी असूनही घराच्या बाहेर पडता येणार नाही, मित्रांबरोबरही खेळता येणार नाही- अशा नियमांचे पालन करण्याचा शहाणपणाही मुलांनी दाखवला आहे. या मुलांनी वेगवेगळे अनुभव घेण्याची संधी म्हणून या काळाचा वापर केला आहे. त्यांनी काय काय केले हे त्यांच्याच शब्दांत पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका वाचा-
साईराज सावंत, हा इयत्ता दुसरीत, गोरेगावच्या डोसीबाई जीजीभाय या मराठी शाळेत शिकणारा मुलगा. योग्य वेळी आवश्यक तेवढेच बोलणारा, कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा. आपल्या छोट्या भावाबद्दल भरभरून बोलणारा आणि वर्गात सर्वांचा लाडका. त्याची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्सचे काम करते. बाबा छोटासा व्यवसाय करता करता छोट्या बाळाला आणि साईराजला सांभाळत आहेत. सध्या साईराज व त्याचा ९ महिन्यांचा भाऊ बाबासोबत गावी आहे आणि आई इथे मुंबईत तिचे नर्सचे कर्तव्य पार पाडतेय, करोना झालेल्या रुग्णांची शुश्रूषा करतेय.
साईराजच्या शाळेने इयत्ता दुसरीत मुलांना चिठ्ठी लिहायला शिकवले आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी साईराजने आईला चिठ्ठी लिहिली. किती तळमळीने लिहिलंय त्याने! त्याच्या शिक्षिकेने ही चिठ्ठी ‘वयम्’ मासिकाच्या वाचकांसाठी पाठवलीये.
प्रिय आई,
आई तू दवाखान्यामधून आल्यावर काळजी घेत जा. तुझ्या दवाखान्यात करोनाचे पेशंट असतात. तू हात स्वच्छ धूत जा. तोंडाला मास्क वापरत जा. देवराजला व मला गावी सोडून पंधरा दिवस झाले. आम्ही सर्वजण काळजी करत आहोत. तू देशासाठी चांगलं काम करत आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. आपला देवराज नऊ महिन्यांचा असूनसुद्धा तू कामावर जातेस. पप्पा व मी देवराजची काळजी घेतो. मी अभ्यास पण करतो. तुझ्यासारखे मी पण देशासाठी काम करेन. तू तुझी काळजी घे.
तुझाच,
साईराज
इ. दुसरी
पहिले तीनेक दिवस आम्ही टाईमपास केला, मग मात्र शाळेच्या whats app ग्रुपवर नियमितपणे अभ्यास (गृहपाठ) यायला लागला. तो अभ्यास मी करतो. आम्ही घरात एकूण नऊ जण आहोत- छोटे चार आणि मोठे पाच जण असं आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही घरातली कामं वाटून घेतली. त्यानुसार ती कामं करताना आम्हाला मज्जाही येतेय. एके दिवशी मी, बाबा आणि वृंदाताईने मिळून स्वयंपाक केला. त्यातही खूप मजा आली. मी पोळ्या करायला शिकलो, थोड्या गोल आणि थोडे नकाशे काढले, पण चव छान होती.
मग आम्ही सगळे मिळून पत्ते, कॅरम, बुद्धिबळ असे बैठे खेळायला लागलो. पत्त्यांमध्ये मी Not at home, Challenge, झब्बू, बदामसात असे नवीन नवीन खेळ शिकलो. मी वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या- पुठ्ठ्याची बंदूक केली. डायरी तयार केली, त्यात मी रोज नवीन काय केलं ते लिहितो. घरातल्या सर्व मोठ्यांकडे फोन आहे, म्हणून मी माझ्यासाठी वॉकी-टॉकी तयार केला. सुट्टीत मी भांडी घासायला आणि फरशी पुसायला शिकलो.
एकदा आम्ही गच्ची स्वच्छ केली व गच्चीवरच बसून जेवलो. कित्ती मजा आली म्हणून सांगू! मी रोज संध्याकाळी गच्चीवर जाऊन आकाश बघतो, ढगांचे वेगवेगळे आकार, रंग पाहून खूप छान वाटतं! आमच्याकडे (पूर्वी व्यापार नावाचा खेळ असायचा, ना तसा) ''Life'' नावाचा एक खेळ आहे, त्यातील नोटा मोजण्यात माझा बराच वेळ गेला. माझ्या आईने अक्षरे आणि स्वरचिन्हाचे पत्ते तयार केले आहेत, त्यापासून आम्ही शब्द तयार करतो. शिवाय राजीव तांबे यांच्या पुस्तकांतून नवीन खेळ शोधून काढले. जसे की- खुर्च्यांच्या भेंड्या, एका पिशवीत काही वस्तू ठेवून फक्त स्पर्शाने त्या ओळखायच्या आणि नंतर लिहायच्या.
एका संध्याकाळी आम्ही रोपांना आळे केले, पाणी घातले.
आणि एक राहिलंच, मी घरात सर्वात छोटा आहे ना, त्यामुळे बहिणींच्या खोड्या काढताना मजा येतेय.
प्रजोत दीपाली प्रदीप कुलकर्णी,
इयत्ता चौथी, आनंदनिकेतन शाळा, नाशिक
करोना विषाणूंमुळे आमच्या ग्रामीण भागातील शाळाही बंद झाल्या. अशावेळी शुभदा चौकर यांनी ‘वयम्’ मासिकातून आम्हाला सांगितल्याप्रमाणे ‘मनाचा प्रोसेसर’ चालू ठेवला. विषाणूची पूर्ण माहिती मिळवली. भारत सरकारचे यावरील कॉमिक्स वाचून काढले. मागील काही ‘वयम्’ चाळत असताना शुभांगी चेतन यांनी सप्टेंबर 2018च्या अंकासाठी सुंदर मुखपृष्ठ साकारलेय, ते नीट पाहिले. मला ते खूप आवडले. असे सुंदर निसर्गसौंदर्य कोकणात असते, असे मी अनेकदा वाचले आहे. असेच एक चित्र मीही काढले. त्यातून माझ्या भागातील सभोवतालची परिस्थिती दर्शवण्याचा छोटासा प्रयत्न मी केला. माझ्या चित्रामध्ये मी थंडी संपून उन्हाकडे होणारी आगेकूच दाखवली आहे. संक्रमण होताना झाडे वातावरणाशी कसे जुळवून घेतात, ते दिसत आहे. कडक उन्हाळ्याचा सामना करणारी झाडे आपले हात आकाशाकडे करून हिरवे दान मागत असतात... ते वरुणदेवाला सांगतात की बाबा, यावर्षी मुसळधार पाऊस पडू दे!
- धनश्री शिंदे,
आठवी,
नंदूरबार
शाळेतून खूप अभ्यासही दिला होता. काही वेळ अभ्यास करायचा, काही वेळ खेळायचं व नंतर टी.व्ही पाहायचा यातच सगळा वेळ निघून जायचा. एक आठवडा होवून गेला... दररोज तेच तेच करून खूप बोअर होऊ लागले. नंतर मी वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या ठरवलं. खूप कल्पनाही सुचायच्या, परंतु ते बनवण्याचे साहित्य निम्मे असायचे तर निम्मे नसायचे. एके दिवशी मला अचानक केक खाण्याचा इच्छा झाली. मग मी YouTube च्या साह्याने केक बनवण्याचे सर्व साहित्य लिहून घेतले. बिस्कीट केक केला. त्यासाठी मला बिस्कीटाचे चार पुडे, खाण्याचा सोडा, अर्धा लीटर दूध, काजू-बदाम, एक बटर पेपर, 6 ते 10 चॉकलेटस, कूकर, पातेले, मिक्सरचे भांडे आणि एक छोटी प्लेट इत्यादी साहित्य लागले. प्रथम बिस्किटांचे छोटे-छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले. ते एकदम पिठासारखे झाले, नंतर ते पीठ दुधात मिक्स करून घेतले. त्यानंतर तो केक फुगण्यासाठी त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकला व ते मिश्रण एका पातेल्यात काढण्याआधी पातेल्याला आतून तेल लावले. नंतर त्यात एक बटर पेपर ठेवला. ते मिश्रण पातेल्यात ओतले. नंतर ते पातेले कुकरमध्ये ठेवले. कूकर बंद केला आणि केक तयार होण्यासाठी गॅसवर ठेवला. अर्ध्या तासाने केक तयार झाला. केक खूप छान झाला. सर्वांना खूप खूप आवडला. मला खूपच मज्जा आली.
-प्रतिक्षा अंकुश पाटील,
इयत्ता- आठवी, जिल्हा परिषद शाळा, आळते
सुरुवातीला मोबाईलवर खेळायला, मित्रांबरोबर चॅटींग करायला आणि टीव्ही पाहायला मजा आली पण चार-पाच दिवसांनी त्याचा कंटाळा यायला लागला. माझ्या लहान भावाबरोबर कॅरम खेळूनही कंटाळा आला. मग वाटायला लागलं-
नको बाप्पा नको आम्हाला करोना वेकेशन
यामुळे आलंय आम्हांला नसतं टेन्शन
मग मी यूट्यूबवर बघून कलाकारी सुरू केली. क्रेप पेपरपासून गुलाबाची फुले बनवली. वर्तमानपत्रापासून वॉल हँगिंग बनवलं. नंतर वर्तमानपत्रापासून झोपडी बनवली- हॉटेल आणि गार्डनमध्ये लाकडापासून बनवलल्या असतात ना, तशा झोपड्या! सध्या धाग्याचे वॉल हँगिंग बनवतेय. अधून मधून माझ्यातील कवीयत्री मान वर काढत असते. मी छत्रपती शिवाजी महाराजांवर, निसर्गावर, पावसावर कविता केल्या. रोज सकाळी उठल्यावर व्यायाम, योगासने करते. सूर्यनमस्कार घालते. साऱ्यांनाच घरात बसून कंटाळा आला असेल पण तुमच्या स्वतःसाठी आणि कुटुंबीयांसाठी तरी घरी राहा. घरच्यांबरोबर गाण्यांच्या भेंड्या खेळा, मजा करा, कारण घरात राहणं म्हणजे कोरोनाला दूर करणं.
-नेहा पाटील, दहावी
मी माझ्या आईला पहिल्यांदा जेवण बनवण्यात मदत केली. मी हे काम आधी कधीच केले नव्हते. घराच्या सफाईच्या कामात आई व बाबांना खूप मदत केली. मी नेहमी संतोष सरांकडे तबला शिकतो, पण मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, पण इंटरनेटमार्फत तबला शिकता येतो, हे माझ्यासाठी नवीन होते. रात्र झाल्यावर मी व ताई बुद्धीबळ, कॅरम खेळतो, त्यात दरवेळी ताई जिंकते. जेवल्यानंतर आई-बाबादेखील आमच्या खेळात सामील होतात. आम्ही सर्वजण पत्ते, सापशिडी असे खेळ खेळतो. इतके दिवस सलगपणे एकत्र घरी गप्पांची मैफिल जमवण्याचा अनुभव कधीच घेतलेला नव्हता. परिवारासोबत काही आनंदाचे क्षण घालवून या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याने जास्त आनंद झाला.
-जय भास्कर राऊत
इयत्ता आठवी
मी आतापर्यंत कायम नुसते बसून खायचो, आयते, आईच्या हातचे. परंतु या सुट्टीत स्वतः जेवण बनवून खाल्ले. हा आनंद काही वेगळाच असतो हे कळला. आई-वडील सर्वजण एकत्र घरात बसून संवाद साधू लागलो. मला कविता करण्याची फार आवड आहे. हा आवडता छंद मी सुट्टीत जोपासला आणि जवळजवळ आतापर्यंत 25 कविता केल्या आहेत. चित्रकला आणि माझा 36चा आकडा! परंतु या सुट्टीत चित्र काढण्याचा सराव केला. सुरुवातीला काही चित्रांचा सत्यानाश झाला, परंतु मी हार न मानता चित्र काढत राहिलो, याचा परिणाम म्हनोन माझ्याकडे असलेल्या चित्रकलेच्या वह्या संपून गेल्या.
-लौकिक भोगले, दहावी
मी आणि माझा छोटा भाऊ विधीत घरकामात आईला मदत करो. छोटी-छोटी कामे करतोय. जसे की, सकाळी अंथरून काढणे, फरशी पुसणे, भाजी निवडणे. रोजची दुपार म्हणजे नाटकांचा टाइम! श्रीमंत दामोदर पंत, ती फुलराणी, वऱ्हाड निघाले लंडनला अशी नाटकं इंटरनेटवरून पहिली. घराच्या बाहेर न पडता कुटुंबासमवेत आम्ही सर्वजण एवढे आनंदी राहू शकतो, हे आम्ही पहिल्यांदाच अनुभवतोय.
-विनीत शिंदे,
द. ह. कवठे प्रशाला पंढरपूर
एप्रिल २०२० ‘वयम्’