Menu

सोन्याचा हार - लहान मुलांसाठी सुंदर गोष्ट

image By Wayam Magazine 07 November 2022

बघता बघता इतरही सर्व जण आले. असदखानाचं सगळं कोंडाळंच जमलं. असदखान म्हणजे एक प्रस्थच होतं. बेगमसाहिबांचा भाऊ. बादशहानं बिरबलाचं उगीचच स्तोम माजवून ठेवलं आहे, असा असदखानाचा पक्का समज होता. त्याचा पाणउतारा कऱण्याची संधीच तो पाहत असे. आणि एकदा का तो बादशहाच्या मर्जीतून उतरला की मग त्याची जागा आपल्यालाच मिळणार, याची त्याला खात्री होती. बेगमसाहिबांनीच त्याला तसं वचन दिलं होतं. पण आजवर बिरबल त्यांना पुरून उरला होता. त्यामुळे असदखान आणि त्याचे टोळभैरव दोस्त नवनवी कारस्थानं रचत असत.

“मैने आपको इतनी जल्दीसे बुलाया इसकी वजह है. बिरबलको खुले आम नंगा करनेकी एक तरकीब मैने सोची है”

नंगा?

“अरे, नही नही, नंगा मतलब बिल्कुल नंगा. अंगावर एक कपडा असणार नाही. आणि भल्या बाजारातून ओरडत जाईल तो, अशीच युक्ती आहे माझ्याकडे.” गालातल्या गालात हसत आणि मिशांना पीळ देत असदखान म्हणाला, “सुनो, कलही मैने एक कहानी पढी. वहां तुर्कीके पडोस मे ग्रीस नामका एक देश है. तिथं सिरॅक्यूस नावाची एक नगरी आहे. हायरो नावाचा एक राजा तिथं होता. त्याच्या दरबारात या बिरबलासारखाच एक खुदको होशियार समझनेवाला शक्स था. आर्किमिडिज नाम था उसका. तर त्या राजानं एक सोन्याचा हार बनवला. त्याला मंदिरात तो नजराणा द्यायचा होता. हार तो एकदम बढिया बना. पण राजाला शंका आली की ती बनवणार्‍या कारागीरानं काही हेराफेरी केली होती. उसमे सौ टका सोना नही था. कुछ मिलावट थी. चांदीकी या पितलकी या और किसीकी. तर त्यानं त्या आर्कमिडीजला बोलावून सांगितलं की तो हार शुद्ध आहे की त्यात भेसळ आहे ते शोधून काढ. मात्र तो हार इतका बहारदार बना था की त्याची मोडतोड होता कामा नये. त्याच्यावर कोणतंही तेजाब टाकून त्याची परीक्षा घ्यायची नाही.” 

"यह कैसे मुमकीन है?”

ʻक्यूं नही? वह आर्कमिडिजको अपने होशियारीका गर्व जो था! म्हणून तर राजानं त्यालाच घातला होता तो सवाल. आर्कमिडीज गेला आणि घरी जाऊन त्यानं घुसलखान्यात हौदामध्ये पाणी भरलं. नंतर कपडे काढून तो त्या हौदात शिरला. त्यात बसता बसता त्यातलं पाणी बाहेर सांडलं. त्या बरोबर त्या हाराची शुद्धता शोधण्याची तरकीब त्याला सापडली आणि मग तो तसाच हौदातून उतरून नंगाच राजाकडे धावत सुटला. अंगावरून पाणी निथळतंय, कपड्यांची शुद्ध नाही असाच तो धावत सुटला. दरबारात पोचला.’

“वह तो ठीक है. उसकी बेइज्जती हुई होगी. मगर इसका और बिरबलका क्या ताल्लुक?” नेहमीप्रमाणे अमजदअलींनी विचारलं. त्यांच्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकत असदखान सांगू लागला, “आप कभी नही समझेंगे. अरे आपण बादशहाला बेगमसाठी असाच एक हार बनवून घ्यायला सांगायचं. आणि तो आला की त्यात भेसळ आहे, तो कारागीर नमकहराम आहे, असा आरडाओरडा करायचा. बादशहाला सांगून बिरबलाला त्याची शुद्धता तपासायला सांगायची. त्यासाठी मग बिरबल हौदात शिरला की त्यालाही आर्कमिडीजचा तोडगा सापडेल आणि तोही त्याच्यासारखा नंगाच धावत धावत दरबारात येईल. तसा तो आला की आपण त्याची फजिती करायची. बिरबल पागल झालाय हे बादशहाला पटवून द्यायला मग किती वेळ लागेल?”

ʻसुभानल्ला! खाँसाहब आपका दिमाखभी बडा तेज चलता है. यह तो बिरबलभी कभी नही सोच सकता.ʼ सगळ्यांनी असदखानाचं अभिनंदन करत एकच जल्लोष केला.

पुढचं सगळं असदखानानं योजल्याप्रमाणेच घडायला सुरुवात झाली. असदखानानं आपल्या बहिणीला पटवलं. बर्‍याच दिवसात बादशहानं तिला काही तोहफा दिला नाही याची याद करून दिली. बादशहाचं प्रेम जरा पातळ व्हायला लागलंय की काय अशी शंका त्यानं व्यक्त केली. तो भुंगा बेगमसाहिबाँच्या डोक्यात गुणगुणायला लागला. त्यांनी बादशहाकडे हट्ट धरला, सोन्याचा एक दिमाखदार हार आपल्याला पाहिजे, असं त्यांनी बादशहाला निक्षून सांगितलं. त्यात बेगमची सालगिराहही जवळ आली होती. ती संधी साधून तिला खूष करावं असं बादशहालाही वाटलं. त्यानं नेहमीप्रमाणे बिरबलाचा सल्ला घेतला. त्यानंही तो विचार उचलून धरला. पण ही मागणी मलिका-ए-आलमनी असदखानाच्या सूचनेवरून केलीय, हे समजताच तो जरा सावध झाला. असदखानाच्या टोळभैरवांचा हा काहीतरी नवा डाव असावा असा संशय त्याला आला.

झालं. बादशहाचा हुकूम सुटला. एकच धावपळ उडाली. शहरातले उत्तमोत्तम कारागीर तो हार बनवण्याची संधी आपल्यालाच मिळावी, यासाठी धडपडू लागले. पण ते कंत्राट मिळालं बिरबलानं आणलेल्या एका सोनाराला. चांगला ८०० ग्रॅम सोन्याचा हार तयार होऊ लागला.

हार तयार झाला. दरबारात तो पेश झाला. पाहताक्षणी सगळा दरबार उठून उभा राहिला. आजवर तसा दागिना कोणी पाहिला नव्हता. त्याच्या झगमगाटानं सगळे जण भारावून गेले होते. कोणाच्याही तोंडून शब्द फुटत नव्हता. “ सुभानल्ला! सुभानल्ला!” हातात घेतलेल्या त्या हारावरची नजर ढळू न देता बादशहा म्हणाला, “क्यौं बिरबल, कैसी लग रही है यह चीज?” “क्या कहे हुजूर! आकाशातली नक्षत्रं गुंफूनच तो तयार केला गेलाय असं वाटतं. मलिका-ए-आलमना खूप शोभून दिसेल, जहाँपनाह.”

“गुस्ताखी माफ, खाविंद.” बिरबलानं हाराची स्तुती केल्याचं ऐकून हाच तो क्षण असं मानून असदखानानं बोलायला सुरुवात केली- “बिरबलसाहब ठीकही फर्मा रहे है. जन्नतसे लाई हुई चीजही लग रही है. मगर मुझे थोडा शक है. कही इसमे कुछ मिलावट तो नही? कहीं ऐसा न हो जाये के मलिका-ए-आलमने इसे पहननेके बादही उसका पता चले...”  “कहना क्या चाहते है आप असदमियाँ?” थोडंफार चमकून बादशहानं विचारलं.

“हो सकती है...” असदखानाच्या टोळक्यानं गलका केला. बादशहालाही ते पटल्यासारखं वाटलं. तरीही त्यानं बिरबलाला विचारलंच, “तुम्हारी क्या राय है, बिरबल?”

“मलाही असदखानांचं म्हणणं पटतंय, हुजूर.”

“तो फिर तय हुआ खाविंद. और यह जाचपडताल बिरबलसाहबके सिवा और कोई भला कर भी कैसे करेगा!”

बादशहानंही ती सूचना उचलून धरली. आणि बिरबलालाच त्या हाराची शुद्धता पडताळून पाहायला सांगितलं.

आपल्याला कोंडीत पकडण्यासाठी असदखानानं ही चाल रचली आहे याची आता बिरबलाला खात्रीच पटली. पण बादशहाला नाही म्हणणंही अशक्य होतं. त्यानं एका आठवड्याची सवड मागून घेतली. आठवडा उलटला. सगळे दरबारी लवकरच हजर झाले. सर्वांनाच आता बिरबल काय करतो याची उत्सुकता होती. बिरबल आला. पूर्ण पोशाखानिशी. बरोबर त्यानं तो हार बनवणार्‍या सोनारालाही आणलं होतं. बादशहाला कुर्निसात करून बिरबलानं आपल्या सेवकांना खूण केली. त्या बरोबर त्यांनी एक तराजू, एक लाकडाचा मोठा ठोकळा, लोखंडाचा लहान ठोकळा, सोन्याचा तो हार, एक सोन्याची वीट, पाण्याचा एक छोटासा काचेचा हौद आणि अर्थात बादलीतून पाणी आणून तिथं ठेवलं. बादशहा ते पाहून चकित झाला. त्यानं विचारलं, “बिरबल, यह क्या मजाक है?”

“मजाक नाही, खाविंद, हाराची जाचपडताल सर्व दरबाराच्या समक्षच करण्यासाठी हा सारा इंतजाम केला आहे. आता बघा हे दोन ठोकळे, एक लाकडाचा आणि एक लोखंडाचा. आपण त्यांचं वजन करूया.” “असं म्हणत त्यानं ते ठोकळे तराजूच्या दोन पारड्यांमध्ये घातले. तराजूनं जराशी वरखाली हालचाल केली पण मग तो जमिनीला समांतर असा स्थिर राहिला. कोणतंही पारडं वर नाही की खाली नाही.”

“परवरदिगार, या दोन्ही ठोकळ्यांचं वजन सारखंच आहे, तरीही त्यांचं आकारमान मात्र वेगळं आहे. लाकडाचा ठोकळा कितीतरी मोठा आहे. कारण त्यांचं वजन सारखंच असलं तरी घनता मात्र निरनिराळी आहे. लाकडाची कमी आहे म्हणून त्याचं आकारमान जास्ती आहे. आता हे दोन्ही ठोकळे आपण पाण्यात बुडवुया.”

त्यानं परत खूण करताच सेवकांनी त्या काचेच्या हौदात पाणी भरलं. बिरबलानं ते ठोकळे त्या पाण्यात सोडले. लोखंडाचा ठोकळा तत्क्षणीच तळाला गेला. लाकडाचा मात्र तरंगत राहिला.

हायरो राजानं सोन्याच्या मुकुटाची आता मला सांगण्यात आली आहे तशीच परीक्षा घेण्यासाठी जेव्हा आर्किमिडिजला सांगितलं तेव्हा तो स्वतः स्नानासाठी हौदात बसल्यानंतर पाणी हौदाबाहेर पडलं. ते पाहून त्याला निसर्गाच्या या तत्त्वाची ओळख पटली आणि तो तसाच नंगा धावत धावत दरबारात हजर झाला. मला तसं करण्याची गरज भासली नाही कारण त्याच आर्किमिडिजनं सांगितलेल्या तत्त्वाचा मी अभ्यास केलाय. जेव्हा कोणतीही वस्तू पाण्यात ठेवली जाते तेव्हा ती त्यातलं काही पाणी बाजूला सारते. किती पाणी बाजूला सारलं जातं हे त्या वस्तूच्या घनतेवर ठरतं. दोन वस्तूंचं वजन सारखंच असलं तरी घनता सारखीच असेल असं नाही. त्यामुळं बाजूला सारलेल्या पाण्याचं वजनही वेगवेगळं असेल. त्या वजनाच्या प्रमाणात मग ते पाणी त्या वस्तूला वर ढकलणारं बल ठरवतं. त्यानुसार मग पाण्यातलं त्या वस्तूचं वजन ठरतं.

हा हार तयार करणारे हे कुशल सोनारमहाशय इथं आले आहेत. त्यांनी या हाराच्या वजनाइतकंच वजन असलेली ही सोन्याची वीटही आणली आहे. आपण तो हार आणि ती वीट या तराजूनं तोलून त्यांची वजनं खरोखरीच सारखी आहेत हे पाहूनच घेऊया.

बोलताबोलता बिरबलानं तो हार आणि ती वीट तराजूत घातलीही. तराजू समतोल राहिला. दोन्हींच वजन एकसारखंच असल्याचं स्पष्ट झालं. “आता समजा हा हार तयार करताना त्यात मिलावट असेल तर मग हाराची घनता आणि शुद्ध सोन्याची घनता सारखी असणार नाही. त्यानुसार मग पाण्यात धरलेल्या तराजूची पारडी एकाच पातळीत राहणार नाही. जर ती कमी असेल तर हाराचं पारडं वर जाईल.”

पुढं होत बिरबलानं तो तराजू हौदातल्या पाण्यात बुडवला. थोडा वेळ पारडी तशीच एकाच पातळीत राहिली. पण थोड्याच वेळात हाराचं पारडं वर गेलं. हाराची घनता कमी असल्याचं दिसून आलं. म्हणजेच हारात मिलावट होती. “हमारा शक सही निकला. हम तो शुरूसेही कहते थे के यह बिरबलसाहबनं चुना हुआ सुनार बदमाष है, उसने जरूर मिलावट की होगी...”  सगळ्या दरबारानंच पाहिलं होतं. बादशहा तर रागानं लालेलाल झाला. त्यानं त्या सोनाराला जेरबंद करण्याचा हुकूम सोडला. तो बिचारा थरथरत, गयावया करत कसाबसा उभा राहिला होता. बिरबलानंच त्याला पकडण्यासाठी येणार्‍या सैनिकांना थोपवत त्याला धीर दिला. “जहाँपनाह, गुन्हेगाराला जरूर सजा मिळायला हवी. सक्त सजा मिळायला हवी. पण आपण तसा निवाडा करण्यापूर्वी या सोनाराचं म्हणणं ऐकून तर घ्यायला हवं.”

सोनार घाबरत बोलू लागला- “खाविंद, हार बनवताना सोन्याची तार तयार करावी लागते. मग अशा तारांना वाकवत त्यांची गुंफण करावी लागते. शुद्ध सोन्याची तार तशी नरम असते. ती सहज वाकते पण तितकीच सहज ती तुटते. ती तुटू नये, ताठच राहावी म्हणून मग तिचा नरमपणा कमी करावा लागतो. त्यासाठी आम्ही त्यात थोडं तांबं मिसळतो. त्यामुळं सोन्याची झळाळी कमी होत नाही. उलट त्याच्यावर एक हवीहवीशी वाटणारी तांबूस छटा चढते. हा हार बनवण्यासाठी अतिशय तलम बारीक तारा बनवायच्या होत्या. म्हणूनच आम्ही त्यात थोडं तांबं मिसळलं. तसं केलं नसतं तर त्या तारा हलक्याशा धक्क्यानंही तुटल्या असत्या. हार बिघडला असता. माफी असावी हुजूर. हुजूर या सोनाराचं म्हणणं खरंच आहे. मी अनेक सोनारांना विचारून त्याची खात्री करून घेतली आहे. तरीही पटत नसेल तर असदमियाँनी त्यांच्या गळ्यातला तो सोन्याचा कंठा द्यावा. त्यातही अशी मिलावट आहे की नाही हेही तपासून पाहूया.”

आपलीच युक्ती आपल्याच गळ्याशी आल्याचं पाहून असदखानाचं धाबं दणाणलं. गळ्यातला कंठा हातात घट्ट पकडून ठेवत तो कसंबसं म्हणाला, “नही, नही, उसकी कोई जरूरत नही. हमारा बिरबलसाहबके कहनेपर पूरा भरौसा है. यह हार बढियाही है और उसे बढिया बनानेके लियेही यह मिलावट की गयी है.” 

बादशहानंच खजान्चीला बोलावून त्या सोनाराला त्याचा मेहनताना आणि वर बक्षिसी म्हणून शंभर मोहरा देण्याचा हुकूम दिला. सगळा दरबार बिरबलाच्या हुशारीचं कौतुक करत पांगू लागला.

असदखानाचा कंपू मात्र त्या तराजूच्या पाण्यातल्या पडलेल्या पारड्यासारखा पडेल चेहरा करत नवं कोणतं कारस्थान करावं, या विचारात बसून राहिला.

-डॉ. बाळ फोंडके
My Cart
Empty Cart

Loading...