Menu

वेदनेशी असलेलं नातं

image By Wayam Magazine 19 August 2023

दाराशी आलेल्याला आपल्यातला तुकडा देणं ही आपली संस्कृती आहे. यावर कोणी म्हणेल, ‘मग रांगच लागेल दारात!’ पण त्यावर एका भिकार्‍याच्या तोंडून ऐकलेले बोल आठवतात... वाचा, हा ललित लेख-

“तुमच्या घरात कोण कोण आहे?” असा प्रश्न विचारल्यावर आपण पटकन उत्तर देतो –“ आई, बाबा, आजी, आजोबा, लहान किंवा मोठा भाऊ-बहीण!”  कारण घरातल्या त्या त्या व्यक्तींशी असलेलं आपलं नातं. ही सारी माणसं या नात्यांनी आपल्याशी जोडलेली असतात. काही नाती अशी असतात, ज्यांना नाव द्यायच्या आत ती थांबतात. म्हणजे तो तेवढ्यापुरता अनुभव असतो. काही वेळा तर नंतर ती माणसं आपल्याला भेटतही नाहीत. एकदा काय झालं, मी लोकलने कुठेतरी निघाले होते. वेळ संध्याकाळची होती नि दिवस सुट्टीचा. गर्दी नव्हती नि लोकल सुटली. मी धावत जाऊन पकडली. चालत्या लोकलचा अंदाज नव्हता. माझा हात जोरात मधल्या कठड्यावर आपटला. जीव कळवळला. डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. समोरच्या बाकावरील एक बाई माझ्या जवळ येऊन बसली. तिच्याजवळचा बाम तिनं माझ्या हातावर चोळायला सुरुवात केली. मला बरं वाटू लागलं. मी डोळे मिटून बसले जरा वेळ. थोड्या वेळाने डोळे उघडून बघते तर ती बाई स्टेशनवर उतरून गेली होती. कोण, कुठली, तिचं नाव काय, काहीच विचारता आलं नाही. ना तिचे आभार मानता आले. लक्षात मात्र राहिली आजपर्यंत. काय नातं होतं तिचं माझं? काय नाव देऊ? मला वाटतं माझ्या वेदनेशी, दु:खाशी तिचं नातं जुळलं. वेदना कमी झाली, तीही निघून गेली. काय म्हणावं?

एक मात्र जाणवलं की एक असं नातं असतं, जे दोन जिवांना एकत्र आणतं. हे नातं असतं त्या समोरच्या व्यक्तीच्या दु:खाशी... त्या जाणिवेशी, त्या संवेदनेशी. ते दु:ख आपलं वाटू लागतं. अशा घटना खरंतर रोज घडतात. कोण पडतं, कोण जखमी होतं, दर वेळी आपली पावलं तिथे थांबत नाहीत. फुंकर मारायलाही वेळ नसतो, कारण समोरच्या माणसाशी आपलं काही नातंच निर्माण होत नाही. त्या दु:खाची जाणीव आपल्या मनाला होत नाही. 

करुणा, दया, प्रेम, माया अशा अनेक भावना एकत्र होऊन जे मनात निर्माण होतं, त्यामुळे दु:खाची जाणीव आपल्याला होते. ही जाणीवच अनेक मोठी मोठी कामं उभी करते. तुम्ही सांगा, एखाद्या बाबा आमटे यांना कुणाचं सडलेलं शरीर पाहून त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावासा का वाटला? कारण त्या सडलेल्या शरीरातील वेदनेशी त्यांचं नातं जुळलं नि ते कायमचं घट्ट बांधलं गेलं. 

‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ या तुकारामांच्या ओवीचा संदर्भ हाच आहे की, त्या दु:खाला आपलं मानणं. पण तो अर्थ जगण्यात येत नाही तोवर निरुपयोगी आहे. 

पूर्वी नि आजही खेड्यापाड्यात आपल्याकडे पानावर ‘निवद’ म्हणजे नैवेद्य बाहेर ठेवण्याचा प्रघात आहे. कुणासाठी? म्हणे वास्तूसाठी. वास्तू थोडीच खाते? शिवाय शेजारी पाणीही ओतलं जातं. मग कुणी पक्षी येतो खाऊन जातो, पाणी पिऊन जातो. हे सवयीचं होतं. त्या पक्ष्याने नैवेद्य खाल्ल्याचा आनंद आपल्याला होतो. एखाद दिवशी कोणी नैवेद्य खाल्ला नाही तर रुखरुख लागते. आपल्यातले चार घास कुणी खाणं किंवा उपाशीपोटी राहिलेल्यांचं पोट आपल्यामुळे भरणं हा आनंद असतो. घटना साधी पण अर्थ मोठा. 

दाराशी आलेल्याला आपल्यातला तुकडा देणं ही आपली संस्कृती आहे. त्यासाठी दार उघडं हवं, कवाडं मोकळी हवीत. यावर कोणी म्हणेल, ‘मग रांगच लागेल दारात!’ पण त्यावर एका भिका र्‍याच्या तोंडून ऐकलेले बोल आठवतात. एक भिकारी म्हणाला होता, ‘पोट भरलेलं समजतं, दुसऱ्याचं वरबाडणं चांगलं नाही.’ हेही एकाचं दुसऱ्याच्या वेदनेशी असलेलं नातंच आहे नि मनाचा मोठेपणा आहे.

यंदा चिपळूण, महाड परिसरात  निसर्गाने आपला अक्राळविक्राळ जबडा उघडला. होत्याचं नव्हतं झालं. लोक व्याकूळ झाले. पण बघता बघता मदतीचा ओघ सुरू  झाला. कोकणच्या रस्त्यावर मुंबईकडून येणार्‍या वाहतुकीत बहुतांश वाहनं मदतीच्या गाड्यांची होती. किती प्रकारची मदत आली! काहींनी तर कुणाकुणाच्या घरी जाऊन श्रमाची मदत केली. चिखल तुडवून घरं स्वच्छ केली. माणूस माणसाच्या दु:खाशी कसं नातं बांधतो याचं प्रत्यंतर आलं. फेसबुकची पानं मदतीच्या आव्हानाने भरली. ज्याला जे जमेल ते ते तो देऊ लागला. वेदनेचा उमाळा शांत झाला. माणूस माणसाने केलेल्या सहकार्याने सावरला. 

अशात एक दृश्य पाहिलं. एका सुक्या जागी गोधड्या वाळत टाकल्या होत्या. चार वर्षांची एक मुलगी चिखल लागलेली पुस्तकं पुसत होती नि पुन्हा त्याच मातीनं चित्र रंगवत होती. सगळ्या दु:खात, वेदनेत ते आशावादी दृश्य आनंद देत होतं. हे सगळं तात्कालिक असलं तरी मनाला उभारी देणारं असतं. इथेही नातं असतं फक्त कुणाच्यातरी दु:खाशी. त्यावर ही फुंकर!

आपण आपल्या आजूबाजूला मनापासून बघायचं की लक्षात येतं, आपल्याकडे खूप आहे, यातलं कुणाला देता येईल? ज्याच्याकडे नाही तो जीव किती वाईट वाटून घेत असेल! करूया मदत त्याच्या ह्या दु:खाला; कदाचित यातून मैत्रीचा अर्थ समजेल. ही सहवेदना असली, की आपल्याला आनंद देणारी अनेक नाती जोडली जातात.  

-रेणू दांडेकर

***

My Cart
Empty Cart

Loading...