Menu

वक्त

image By Wayam Magazine 11 October 2022

अम्मी, अब्बूंनी तुला आनंद व्हावा म्हणून हा रेडिओ दिला तसं आम्हांला बरं वाटावं म्हणून त्यांचा वेळ दिला असता तर... बाप-मुलींची ही छोटीशी हृद्य कथा खास फादर्स डे निमित्त-

सकाळचे सात वाजले होते. जमादारांच्या घरात नेहमीप्रमाणे रेडिओची पिरपीर चालली होती. शन्नूबेन चपात्या लाटत होती. सारा आणि दानिया शाळेला जायची तयारी करत होत्या. चपात्या भाजता भाजताच शन्नू एका हाताने रेडिओचं बटण फिरवत होती. तिला हवं ते स्टेशन सापडतच नव्हतं! "रेहने दे ना अम्मी कायको सुबह सुबह उस रेडिओ की कटकट!" दानिया वैतागून म्हणाली. "ओय चुप! किती छान छान गाणी लागतात सकाळी. और इस रेडिओको तू कुछ मत कर... तुझ्या अब्बांनी खास माझ्या वाढदिवसाला दिलाय बघ तो. मला गाणी ऐकायची भारी आवड, म्हणून खास कोल्हापूरवरून आणलाय त्यांनी."

"काश.. अब्बूंनी तुला हा रेडिओ दिला तसा आम्हांला बरं वाटावं म्हणून त्यांचा वेळ दिला असता.." असं चिमुकली सारा म्हणताच शन्नू एकदम गप्पच झाली. दोन सेकंदांची शांतता गेली आणि रेडिओवर एक गाणं वाजलं, ''छोटीसी गुडिया, नन्हीसी चिडिया...", ‘ए दिदी, हेच ना ते गाणं अब्बू आपल्यासाठी म्हणायचे ते?’ असं साराने विचारल्यावर दानिया फक्त हसली. तिच्या डोळ्यांत त्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या, झोपाळ्यावर बसलेले अब्बू आणि त्यांच्या दोन्ही मांड्यांवर डोकं ठेवून गोष्ट ऐकण्यासाठी लवंडलेल्या सारा आणि दानिया... सगळं सगळं तिला आठवत होतं, पण ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने त्या शाळेत गेल्या.

शन्नूला फार वाईट वाटलं, पण तीही काही बोलू शकली नाही. तिच्या मुली खरं तेच तर सांगत होत्या. तिनं लगेच मुज्जफरला फोन केला, "जी सुनिये ना, आज जरा घर जल्दी आईयेगा. वह क्या है ना की, बच्चे थोडे नाराज है आपसे!"

"अगं हो माहित्ये मला, पण मी तरी काय करू? काम संपेल तर त्यांना वेळ देऊ ना! पण तू काळजी करू नको, आज मी त्यांना खूप खूष करेन..." असं म्हणून त्याने फोन ठेवला. तो रात्री नऊच्या दरम्यान परत आला. तो आल्यावर दोन्ही मुली लगेच आत निघून गेल्या. शन्नूने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याने हातानेच ‘थांब’ म्हणून इशारा केला. त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती, ती घेऊन तो मुलींजवळ आला. "दानू, सारा, बघा मी काय जम्मत आणल्ये!", "आम्हांला नाही बघायची",

"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर! और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना? देख बहुत सारी लाया हू! तुम्हे पसंद है ना?"

"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू..." दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- "अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है."

माकुले हात दाखवत सारा पुटपुटली.
मुजफ्फरला त्या दोघींचं बोलणं ऐकून खूप भरून आलं. खरंच, कामाच्या रेट्यात, स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात, आपण काय गमावलंय, याची खबरच नाही लागली रे. - त्याचं काळीज ओरडत होतं.

त्याने लगेच त्या दोघींना कुशीत घेतलं. त्यांच्या डोक्यावर हात फिरवत तो बोलू लागला, "माफ करना, मेरी नन्हीं परियों... मी तुमचाच आहे, तुमच्या जवळच राहणार आहे." असं म्हणून तो त्यांना कुरवाळू लागला. आज त्या दोघी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ झोपी गेल्या. मुजफ्फर त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत राहिला आणि हात फिरवता फिरवता तेच गोड शब्द त्याच्या ओठांतून बाहेर पडत होते.. "छोटीसी गुडिया, नन्हीसी चिडिया..."

-रिया सचिन पटवर्धन
पूर्वप्रसिद्धी- ऑगस्ट २०१९
My Cart
Empty Cart

Loading...