वाचनाची किमया !
By Wayam Magazine 12 October 2023
मुलांनो, वाचन आणि लेखन या एकाच नाण्याच्या दोन बाजू. वाचन आहे म्हणून लेखन तसंच लेखन आहे म्हणून वाचन. या दोन्ही गोष्टी तयार झाल्या भाषेतून. म्हणजे भाषा महत्वाची. ही भाषा निर्माण होते तुमच्या माझ्या मेंदूत.
मनातले विचार, भावना दुसरयांना सांगण्याचं साधन म्हणजे भाषा. बोलीभाषा, लेखीभाषा, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, अभिनयकला, देहबोली अशी विचार दुसरया पर्यंत पोचविण्याची जी साधनं आहेत ती सगळी भाषेत मोडतात. फ़्रेंच, इंग्लीश, मराठी वगैरे निरनिराळ्या भागातील भाषेची रूपं आहेत.
भाषा ही माणसाला निसर्गानं दिली. ती लाखो वर्षं विकसित होत आली म्हणून माणूस हा इतर प्राण्यां पेक्षा वेगळा झाला. भाषा आणि हातांचं कौशल्य यांचा जवळचा संबंध आहे.
माणूस दोन पायावर उभा राहू लागला म्हणून त्याचे हात मोकळे राहिले. मेंदूत भाषेची केंद्रं उत्क्रांत त्यावेळी हाताची मेंदूतील केंद्रे विकसीत होत होती. माणसाचा आणि माकडांचा पंजा पहा. माणसाच्या हाताचा आंगठा इतर चारही बोटांना स्पर्श करू शकतो. माकडाला असं करता येत नाही. या अंगठ्या मुळे माणूस लेखणी धरू शकतो. म्हणून माणूस लिहू लागला व वाचू लागला. मग चला लिहूया चला वाचूया.
कशाला वाचयचं
ज्ञान मिळवणं ही मानवाच्या मेंदूची भूक आहे. दिवस आळसात गेला की तुम्ही म्हणता, ‘शी; आज काय बोअर झालो’ आपल्या मेंदूला काही नवीन मिळालं नाही की आपण बोअर होतो. ‘ज्ञान’ हा शब्द जरा जड आहे म्हणून घाबरून जाऊ नका. छोट्या भावाला किंवा बहिणीला ही चिमणी आहे हे कळतं तेव्हा त्याला ज्ञान होतं. तुम्ही जसजसे मोठे होत जाता तस तसं ज्ञानाचं रुप बदलतं येवढचं.
ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातील एक मार्ग म्हणजे वाचन. म्हंटलं तर हा तसा सोपा मार्ग आहे.
एक माणूस सगळे अनुभव घेऊ शकत नाही म्हणजे आपण सगळे एव्हरेस्ट वर जाऊ शकत नाही. पण ज्यांनी गिर्यारोहण केलं आहे. त्यांनी लिहून ठेवलेले अनुभव वाचून वाचक तो थरार थोड्या फ़ार प्रमाणात अनुभवू शकतो. याचा अर्थ वाचनानं वाचक त्याच्या अनुभवाची चौकट मोठी करू शकतो. कवी केशवसूत यानी म्हंटलं आहे ‘जगाचा आकार केवढा/ ज्याच्या त्याच्या डोक्या येवढा’. तेव्हा तुमच्या जगाचा आकार तुम्हाला मोठा करायचा असेल तर वाचन हा त्यासाठी चांगला उपाय आहे. वाचनाने विवीध विचार मेंदूत पोचतात. वाचन हा मेंदूचा व्यायाम आहे. तो व्यायाम केला तर बुद्धी बलवान होऊ शकते.
वाचनाची सवय अगदी बालवया पासून करायला हवी. वाचनाचे बरेच गुप्त परिणाम असतात. त्यातील एक महत्वाचा परिणाम सांगतो. वाचतो म्हणजे आपण काय करतो तर दुसरयाचं म्हणणं ऐकून घेतो. गोष्टीतील भावना आपल्याला हेलावतात. यामुळे आपल्याला दुसरयाचं म्हणणं ऐकून घेण्याची सवय होते. या सगळ्याचा माणसाच्या ‘इमोशनल इंटेलिजन्सशी’ संबंध आहे. इमोशनल इंटलिजन्स म्हणजे भावनिक हुशारी. स्वत:च्या तसेच दुसरयाच्या भावना जाणून घेण्याची क्षमता. वाचनाने ही क्षमता वाढते. त्यासाठी सगळ्या प्रकारचं वाचन कुमारवयापासून केलं पहिजे.
का बरं होतं असं?
कल्पना करा, तुम्ही टेनिस मच पाहात आहात. टेनिसपटू खेळताना त्याच्या मेंदूतील ज्या पेशी काम करत असतात, उद्दीपित होत असतात, तशाच मेंदूपेशी तुम्ही मच बघत असताना तुमच्या मनात देखील उद्दीपित होतात. या पेशींना मिरर न्युराॅन्स किंवा दर्पण पेशी म्हणतात. या दर्पण पेशी तुमचा टेनिस मच पाहण्याचा अनुभव द्विगुणीत करतात.
वाचक जेव्हा कथा, कविता कादंबरी असं ललित साहित्य जेव्हा वाचतो, तेव्हा तो त्यातील अनुभव स्वतःच्या जीवनाशी पडताळून पाहतो. त्यावर विचार करतो. ते विचार स्वतःच्या मानतील विचारांशी तोलून बघतो. हे सर्व सहजपणे, नकळतपणे घडत असतं. म्हणजे ‘चला, आता हे वाकॅह्ल्यावर आपण आपल्या अनुभवाशी पडताळून बघुया’ असा विचार वाचकाला करावा लागत नाही. ही वाचनाची जमेची बाजू आहे.. हीच गंमत आहे.
कशाला लिहायचं
माणसाला गप्पा मारायला आवडतात, स्वत:चे विचार दुसरयाला सांगायला पटवायला आवडतात. ते जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोचावेत म्हणून माणूस लिहीतो. आज नवीन तंत्रज्ञान आलं, माणूस संगणकावर लिहीतो, SMS करतो. पण माणसानं लिहीणं काही सोडलेलं नाही.
माणूस लिहू लागला की त्याचे विचार आकार घेऊ लागतात. एखादा प्रसंग लिहीताना तो कळत नकळत त्याला तिखटमिठ लावून सांगतो. म्हणजे लेखक प्रसंगाला ‘कलात्मक रूप’ देतो असं मोठी माणसं म्हणतात. एखादा अनुभव मग तो भावनिक असो वा बौद्धिक तो तीव्रतेने सांगायचा असतो तेव्हां लेखक लिहीतो. त्याचीच कथा होते.
जमिनी वरच्या वाटा, रस्ते दोन ठिकाणांना जोडतात. त्याप्रमाणे कथा, गोष्ट दोन मनांना जोडते. एक गंमत सांगतो. सैबेरियातील रूक्ष वाळवंटात ‘वाटा’ महत्वाच्या तशा गोष्टी सुद्धा महत्वाच्या. वाळवंटातून चालताना दोन्ही उपयोगी पडतात. वाट व गोष्ट या दोघांना सैबेरियन भाषेत खांटी हा एकच शब्द आहे.
लेखनात आपोआप नवीन शब्द तयार होतात तसंच जुन्या शब्दांना नवीन अर्थ प्राप्त होतात. आई म्हणते ‘फ़ारच ‘शहाणा’ आहेस तू’ आणि जेव्हां ती म्हणते ‘खरंच किती ‘शहाणा’ आहे माझा बाळ’. दोन्ही वाक्यात ‘शहाणा’ या शब्दाचा अर्थ निराळा.
तुम्ही सुद्धा एकमेकात बोलताना नवीन भाषा तयार करता त्याला ‘प’ची भाषा किंवा ‘अर्फ़’ची भाषा म्हणता. अर्थात ती एक गंमत असते. पण तुमच्या पिढीची अशी एक भाषा असते. त्यात तुम्ही तयार केलेले कितीतरी नवीन शब्द असतात. ते हळुहळू भाषेच्या मुख्य प्रवाहात येतात आणि वापरले जातात. शब्द तुम्ही तयार करता मग ते शब्द कोषात जाऊन बसतात. ऑक्सफ़र्ड सारखे शब्दकोष दरवर्षी इंग्लीश मध्ये आलेल्या नव्या शब्दांची यादी प्रकाशित करतात व त्यातील कोणता शब्द सगळ्यात लोकप्रिय तेही ‘डिक्लेअर’ घोषीत करतात.
त्याला ‘वर्ड ऑफ़ द इयर’ म्हणतात. तुम्ही म्हणाल ‘सहीच’!
पारंपरिक आणि डिजिटल
पारंपरिक वाचन म्हणजे पुस्तक घेऊन तर डिजिटल म्हणजे संगणकीय साधनांवर वाचन. तुम्ही पुस्तकंही वाचता आणि संगणक, आय पॅड, टॅबलेट वर सुद्धा वाचता, गेम्स खेळता. पण वाचनाचा महत्वाचा म्हणजे ‘अटेंशन’ लक्ष देऊन वाचणं.
तुम्ही गोष्ट वाचत आहात. गोष्ट तुम्हाला आवडली आहे. तुम्हाला मुद्दाम लक्ष द्यावं लागत नाही. ती गोष्ट तुमचं अटेंशन खेचून घेते. आई तिकडे हाका मारते आहे पण तुमचं तिकडे लक्ष जात नाही.
आता हा दुसरा प्रकार पहा. विज्ञान, इतिहास, भुगोल या पैकी काही तरी तुम्ही वाचत आहात. पण लक्ष सारखं दुसरी कडेच जात आहे. काल मित्राशी झालेल्या भांडणाचे विचार सतत येत आहेत. डोकं खुपसून सुद्धा ‘अटेंशन’ नसल्या मुळे शब्द डोक्यात शिरत नाही आहेत. प्रयत्नानं ‘अटेंशन’ तेथे खेचून आणावं लागत आहे.
ललित विषय लक्ष खेचून घेतात तर वैचारिक विषया कडे लक्ष देऊन वाचावं लागतं. ललित वाचन व वैचारीक वाचन याच्यात हा फ़रक आहे.
डिजिटल वाचनात हाच धोका असतो. तुम्ही भराभर ‘सर्फ़’ करत जाता. माहिती मिळत जाते. पण त्यातील किती लक्षात रहातं हे अटेंशन वर अवलंबून असतं.
वरवरचं वाचन आणि सखोल वाचन यातील आणखी एक फ़रक सागंतो.
सखोल वाचनाला चिंतन मननाची जोड द्यावी लागते. चिंतन मनन म्हणजे वाचलेल्या बद्दल विचार करणे. ही सवय प्रयत्नाने लागते.
नवीन अवयव
माणूस पंचज्ञानेंद्रियां मार्फ़त ज्ञान मिळवत असतो. पण त्याही पलिकडे जाऊन आणखी ज्ञान मिळवण्याचा त्याला ध्यास असतो. ज्ञान मिळवण्यासाठी ही इंद्रिये त्याला तोटकी वाटू लागली. जर हात पाय तुटला तर जसा कृत्रिम अवयव बसवतात तसे बौद्धिक कृत्रिम अवयव त्याने तयार केले. हस्तलेखन, छपाई, त्यातून निर्माण होणारी पुस्तकं हे मानवाचे बौद्धिक अवयव आहेत. पण येवढ्यावर माणूस थांबला नाही. त्याने टेलिफोन, रेडियो, फिल्म, टेलिव्हिजन, संगणक हे मानवाचे नवीन अवयव. या नवीन अवयवां मुळे माहिती मिळवण्याची गती अफाट वाढली. या माहितीच्या महाजालातून योग्य अयोग्य, चुक बरोबर शोधणं महत्वाचं. या नवीन अवयवांचा सुयोग्य वापर करणं ही तुमच्यासाठी आजची गरज आहे.
स्मृती व ज्ञान
गेल्या वर्षीचं वैद्यक नोबेल मेंदूतज्ज्ञाना मिळालं आहे. जागे बद्दलच्या स्मृती (स्मरण किंवा आठवण) कशा तयार होतात? आपण एकाच मार्गानं पुन:पुन्हा जातो, तेव्हा मेंदूत जागेचा नकाशा कसा तयार होतो? याचा शोध डॉ.एडवर्ड मॉसर, डॉ. मे ब्रेट मॉसर, डॉ. जॉन ओकिफे या तिघांनी लावला.
यातून महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्या सारखा आहे. स्मृतीचा व ज्ञानाचा निकटचा संबंध आहे. स्मृती तयार होण्यासाठी मेंदूतील चेतापेशींच्या जोडण्या तयार व्हाव्या लागतात व त्या दृढ व्हाव्या लागतात. सखोल वाचनानं मेंदूतील पेशींच्या जोडण्या दृढ होतात. ज्ञान पक्कं होतं म्हणून वाचन महत्वाचं.
थोडक्यात, वाचनामुळे आपलं अनुभवांच जग मोठं होतं. वाचनामुळे दुसर्याच्या अनुभवांवर आपण विचार करतो. त्यामुळे आपली विचार करण्याची शक्ती वाढते. म्हणजेच तर्कबुद्धी वाढते. संवेदनशीलता वाढते. भावनिक हुशारी विकसित होते.
म्हणजेच- वाचनातून विचार, विचारातून विकास!
-डॉ. आनंद जोशी
***