Menu

उत्तमें ढमढमे पादे - एक मनोरंजक कथा किशोरवयीन मुलांसाठी

image By Wayam Magazine 07 October 2022

शाळा सुटून दहाच मिनिटं झाली असतील किंवा नसतील. इवान धापा टाकत घरी आला. तडक संडासात घुसला. पोट जाम बिघडलं होतं. संडासातून बाहेर आल्यावर एकदम पाय दुखायला लागले. खाली वाकत पाय दाबत-दाबतच तो हॉलमध्ये आला तर आजी त्याला बघून हसायला लागली... “आज्जी, हसू नको नं गं. मी आजोबांची नक्कल करत नाहीये. खरंच! आपल्या ‘यलो रूम’ मधून आलोय. आज एकदम जोरात लागली म्हणून शाळा सुटल्या सुटल्या धावत घरी आलो. आता पाय पण दुखताहेत.’’

“हं... रस्त्यावरची पावभाजी आणि पाणीपुरी बोलायला लागलेत का पोटात? बघ बरं तुझं तू. नाहीतर पुन्हा ओरडशील, आजीफज्जी, सारखं आमच्या स्नॅक्सवर जळू नको म्हणून!” इवानची आजी तोंड वेडावत, गमतीत बोलली.

इवाननं नुसतं भुवया वाकड्या करून तिच्याकडं पाहत चिडवायला जीभ बाहेर काढली. इतक्यात ‘ड्रुम्म्ब...ढ्रामSSS’ असा आवाज आणि जोडीला नाकाला नक्कोच वाटेल असा घाणेरडा वास इवानच्या बुडाखालुन आला...आजोबांनी घरात शिरता शिरता तो आवाज ऐकला आणि त्याला उत्तर दिल्यासारखा दुसरा आवाज त्यांच्याकडूनही आला. बिनवासाचा आवाज! आजीला हसू आवरेना. यावर चक्क नेहमीसारखं न चिडता इवान कोचावर शांतपणे रेलून पडून राहिला. आजोबांना कळल की इवानच्या पोटाचं काहीतरी बिनसलंय. त्यांनी आपल्या खोलीत जाऊन एक छोटी डबी आणली व ती उघडून इवानसमोर ठेवली. इवाननं नुसतं ‘हे क्काय’ म्हणत त्यांच्याकडं पाहिलं. सुंठगुळाची गोळी आहे. जिभेवर ठेव. बरं वाटेल असं आजोबा म्हणाले. इवाननं निमूटपणानं त्यांचं ऐकलं. दुपारपासून दोनदा ‘यलो रूम’ ची स्वारी केल्यापासून इवानला कसंतरी होत होतं. या गोळीनं तसं होणं थोडं कमी झालं.

थोड्यावेळात ऑफिसमधून आई आली. बाबा आला. त्यांना सगळं कळलंच. दरम्यान इवान आणखी एकदा ‘यलो रूम’ मध्ये जाऊन आला. संडासला जातोय असं सांगणं त्याला खूप कसंतरी वाटायचं म्हणून बाबानं त्याला ‘यलो रूम’ हा शब्द सापडवून दिला होता. लहानपणापासूनच इवानचा कोठा तसा हलका... प्रतिकारशक्ती कमी. त्यामुळं हवेत जरासा झालेला बदल किंवा खाण्यात जरा काही वेगळ आलं की इवानचं पोट गडबडून जायचं. आजी नेहमी म्हणायची, “हवेतला बदल वेधशाळेतून कळायच्या आत आमच्या इवानचं पोट सांगू शकतं.”

दंगामस्ती करणारा, उधळणारा इवान दुसरीतून तिसरीत गेल्यावर बदलायला लागला होता. थोडा गप्प गप्पच झाला होता... रागही त्याला लगेच यायचा. कुणी कुणाला काही सांगत असेल तर ते आपल्याबद्दलच चाललंय असं त्याला वाटायचं. शर्टला, पँटला सारखा हात लावून तो वास घेऊन बघायला लागला होता. घरी आल्यावर तो घाईनं संडासात घुसे आणि शाळेत निघेनिघेपर्यंतही सारखा जाऊन येई. बाबा एकदा म्हणालेही, “इवान, तुला काय ‘यलो रूम’ चा छंद लागलाय का?” – पण इवानला त्याच्या पोटाबद्दल, सारखे गॅसेस फुटण्याबद्दल काहीही बोललेलं आवडेनासं झालं होतं. मागच्या वर्षापर्यंत त्याला या सगळ्याची धमाल यायची. हॉलमध्ये आडवंतिडवं पडून सगळे टी.व्ही. पाहत असताना इवानच्या बुडाखालून ‘पुर्रर्र’ असा आवाज झाला की पाठोपाठ बाबांचा ड्रमड्रूम आवाज यायचा... मग आजोबांची फुसकुली सुटायची. सगळे जोरजोरानं हसायचे. इवान आईला म्हणायचाही की ``आई, तुझा कधी कसा आवाज येत नाही गं?...’’ आई म्हणायची, “लहानपणी आमची आई फटके द्यायची आवाज आला तर! म्हणायची, मुलींना शोभत का हे? बाबा मात्र रागवायचे नाहीत. ते म्हणायचे, अगं वेळेवर स्वच्छताघरात जावं, पाणी भरपूर प्यावं, शरीराला कष्टवाव... मग वेळीअवेळी असे फटाके फुटत नाहीत. वर्षातून ठराविक वेळा आम्हाला एरंडेल प्यायला लावायचे. घाण वाटायची खूप, पण पोट एकदम हलकं हलकं व्हायचं.”

शाळेत इवानला मित्र चिडवायचे. ‘पादरा पावटा’ म्हणायचे. इवानला स्वतःची खूप लाज वाटायला लागली होती. परवाचीच गोष्ट. मॅमनी गणितं सोडवायला दिली होती. सगळे सोडवत होते इतक्यात वर्गभर ‘तोच’ वास पसरला. कुणी नाकाला रुमाल लावला, कुणी श्वास रोखला, कुणी वॅकवॅक करायला लागलं. कुजबुज वाढली. इवानला वाटलं होतं तसंच झालं. मॅमनी विचारलं, “कुणाचा बॉम्ब फुटला?” – तर सगळे फिदीफिदी हसत इवानकड बघायला लागले. इवानला रडूच आलं. खरतर त्याने काहीच केलं नव्हतं... पण वर्गात कुणाच्याही बुडाखालून आवाज आला किंवा वास सुटला की सगळे इवानकडे बोट करायचे. मॅम सगळ्यांना रागावल्या, पण इवानला वाटलं की त्याही तोंडावर रुमाल ठेऊन आतून हसत होत्या. बराच वेळ नाटुकल्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर शाळेत स्नॅक्स खायला दिले तेव्हाही वर्गातली निकिता त्याला ऐकू जाईल असं म्हणाली, “इवानला कशाला देता खायला? पादऱ्याला पावट्याचं निमित्त! चार दिवस पुन्हा प्रॅक्टिस चुकेल त्याची.”

इवान रागानं लाल झाला, पण काहीच करू शकला नव्हता कारण चूक आपलीच आहे असं त्याला वाटत होतं. त्यामुळंच कुणाशीच काही बोलू नये, कशातच भाग घेऊ नये असं त्याला वाटायला लागलं होतं. इतरांच्या सततच्या चिडवाचिडवीमुळे त्याला कारण नसताना स्वतःचा वास यायला लागला होता... त्यामुळं तो सतत घाबरलेला, काळजीत असलेला दिसायला लागला होता.

रात्री जेवायला बसायची वेळ झाली होती. आई त्यावेळी टी.व्ही. बंद करून जेवायचा हट्ट धरायची. इवान आणि बाबांची तिच्याविरोधात याबाबतीत नेहमीच गट्टी व्हायची. तशी झाली. इवानची आई नम्रता ओरडलीच, “काय रे मयूर, तू इवानचा बाप आहेस आणि त्याच्यासारखंच वागतोस? तो लहान आहे अरे. तू समजावून सांगायचं की त्याला साथ द्यायची? टी.व्ही. कड बघत तुम्ही दोघं खाता तेव्हा तुमचं लक्ष नसतं जेवणात. कुठल्याही पदार्थाची चव तुम्हाला कळत नाही. अन्न नीट चावून खाण्याकडे लक्ष नसतं तुमचं आणि जेवता जेवता तुम्ही मोठ्यानं हसता, लोळता, बोलता यामुळं पुन्हा तुम्हांला दोघांनाही गॅसचा त्रास वाढतो, हे कळतंय का तुम्हांला?”

“अगं नमू...जावू दे गं कंटाळून आलोय म्हणून म्हटलं टी.व्ही. बघत खातो. पण तुझं खरंय. आपण टेबलावर नीट बसूनच जेवूया...” मयुरनं माघार घेतली. त्याबरोबर इवान लगेच रुसला. जेवणार नाहीच म्हणाला... आजी म्हणाली, “इवान दिवसभर पोट गुडगुडतय म्हणून अर्धपोटी आहे...टी.व्ही. तर टी.व्ही. बघत खाऊ दे... दे ग नम्रता त्याला आजच्यापुरत. उद्यापासून तुझे ऐकणार नाही बरं का इवान!” आजीनं समजूत काढली. इवाननं जेवणाच ताट हातात घेतल्यावर ती खूष झाली, म्हणाली, “बाबांनो, पादा पण नांदा!”

झालं! आपल्या खालून निघणाऱ्या आवाजावर आजी असं डायरेक्ट बोलल्यामुळ इवानला शाळेतली चिडवाचिडवी आठवली आणि त्याचा पुन्हा मूड गेला. आपल्याला सगळे मुद्दाम बोलतात असं वाटून इवान हिरमुसला. कसाबसा वरणभात खाऊन त्यानं जेवण संपवलं. नातू पुन्हा अर्धपोटी राहिल्यामुळ आजीही दुःखी झाली. इवानला नेमकं कशामुळे वाईट वाटलं नि त्याचा मूड गेला हे तिलाही कळल नाही... पण आजोबांना कळल होतं... त्यांना त्यांचं लहानपणच आठवत होतं आणि मोठेपणही! आजोबांनी रात्री झोपताना ठरवलं की इवानशी सगळं शेअर करायचं...त्यांनी टी.व्ही. पुढं बसलेल्या इवानला हळूच विचारलं, “काय रे...आज आपण दोघंच झोपूया का आमच्या खोलीत. मला तुला काहीतरी सांगायचं...” इवान म्हणाला, “ओके”.

इवान आणि आजोबांनी खोलीतली लाईट बंद करून झिरो बल्ब लावला. गळ्यापर्यंत गोधडी ओढून घेत एकमेकांकडे कुशी केली. आजोबा म्हणाले, “इवान, अरे तुला आठवतं, मी दोन महिन्यांपूर्वी डॉक्टरकडं गेलो होतो?” “हो. तुम्हाला पोटात दुखत होतं म्हणून नं...”

“हो, पण खरं कारण वेगळंच होतं... मला अपानवायूचा जरा त्रास होतो नं, अरे म्हणजे गॅसेसचा त्रास होतो, मग मी पादतो... तुझ्यासमोर असं झालं की मला लाजल्यासारखं होतं. असं वाटतं, तू काय म्हणशील... म्हणून डॉक्टरला विचारायला गेलो होतो... तो माझ्या मित्राचाच मुलगा. आमच्या गप्पा जरा रंगल्या. त्याला म्हणे मी लहानपणी खूप आवडायचो. तो म्हणाला, “काका, तुम्हांला आठवतं का... माझ्या वाढदिवसाला तुम्ही आला होतात तेव्हा ‘हॅपी बड्डे टू यू... हत्ती पादला पुयू पुयू’ म्हणाला होतात... मोठ्ठी माणसं अशी बिनधास्त बोलू शकतात हे कळल्यामुळ मी आणि माझे मित्र तुमच्यावर खूष झालो होतो. तुम्ही दोन गमतीशीर ओळी शिकवल्या होत्या...? तुला माहिती आहे इवान, डॉक्टरनं आणि मी त्या पुन्हा म्हणून पाहिल्या.” “कुठल्या हो आजोबा? मला पण सांगा ना.” “उत्तमे ढमढमे पादे, टाराटूरीचे मध्यमे पादांनाम फुस्कुली राणी, तस्य घाणी न जायते...”

आजोबांनी शब्दाशब्दावर जोर देत ओळी श्लोकाप्रमाणे म्हणून दाखवल्यावर इवानला हसू आवरेना. जोरानं हसताना आजोबा आणि नातू दोघांच्याही पोटात खळबळ झाली. इवाननं बुडातून तर आजोबांनी तोंडातून गॅस सोडला. आजूबाजूला कुणी असेल तर पादण्याचा आवाज दबका काढण्याची धडपड, तो दाबला तर लांबत जाणारा फुग्याची हवा सोडल्यासारखा आवाज, पोटात गॅस दंगा करत असताना अंगाची एक बाजू किंचित उचलून त्याला वाट करून देणं, फटाक्याच्या फुसक्या बारसारखे सोडलेले बार आणि मग इकडंतिकडं बघून कुणी ऐकलं नाही ना हे पाहणं अशा कितीतरी गंमती आजोबा आणि इवानच्यात रंगल्या. कधीकधी पोटात नुसतंच काहीतरी हलत, डर्रडर्र, कँवकँव आवाज करतं त्याचीही चर्चा झाली. इवानला मग उत्तानपाद राजाची गोष्ट आठवली म्हणून त्यानं विचारलंही, की आजोबा या राजालाही हा प्रोब्लेम होता का हो, म्हणून त्याचं नाव उत्तानपाद ठेवलं त्याच्या आईनं?

मोकळा होत होत मजेत आल्यावर इवाननं शाळेतला चिडवाचिडवीचा सगळा किस्सा सांगितला आणि विचारलं, “बघा हो आजोबा, ढेकर दिल्यावर पण गॅसच जातो आणि पादल्यावर पण गॅसच जातो. तरीही लोक ढेकराला हसत नाहीत आणि खालून जरा टूरटूर झालं तर हसतात... मला खूप राग येतो...”

“तेच तर सांगतोय तुला. डॉक्टरनं मला सांगितलं की आवाजाची तर गंमत वाटतेच लोकांना, पण घाणेरडा वास येतो म्हणून चिडवलं जातं रे. ढेकर देतो तेव्हा तोंडातून एकटा कार्बनडाय ऑक्साईड जातो... अन्न नीट न पचल्यामुळ किंवा जेवताखाताना सतत बोलल्यामुळ पोटात गॅस जमा होतो. न पचलेलं अन्न कुजत आणि त्यातून गॅस बाहेर पडतो...त्यात मिथेन, कार्बनडाय ऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजन असे पाच वायू असतात... म्हणून बुडाकडनं गॅस जातो तेव्हा नाकाला झोंबणारा उग्र वास येतो... पण जर भरपूर कोशिंबीरी खाल्ल्या, भाज्या खाल्ल्या... भरपूर पाणी प्यायलं तर पाचनसंस्था नीट काम करायला लागते आणि हे सगळं कमी होतं... टूरटूर वाजलं तरी त्यात तोंड लपवण्यासारखं काही नाही...’’

``आजोबा, असं म्हणाला तो डॉक्टर..?. गॅस दाबला तर त्रास होईल म्हणाला?’’ ``उचकी, ढेकर, पादण मुद्दाम दाबू नका, शरीराचं ऐका म्हणाला. माझं टेन्शन कमी झालं त्यामुळं. कवळी आहे तर अन्न नीट चावून खायचा आळस करू नका, असंही म्हणाला बेटा!” “हाहाहा... आजोबा! तुम्ही पण चावून खाण्याचा आळस करता आणि मला सांगता काय की बत्तीस वेळा चावून खा! बरं झालं डॉक्टरच तुम्हाला रागावले.”

“पण आता शाळेत तोंड एवढूसं करून बसलास तर मी तुला रागवेन... एक नवीन म्हण तयार करूया आपण, ‘लाजला तो संपला...’ – अरे आहेस कुठं, तुला माहिती आहे अंतराळवीरांच्या स्पेस स्टेशनसाठी म्हणे त्यावेळी एकोणीस मिलियन की कितीतरी कोटींचा संडास बांधला होता... तो तोपर्यंत जगातला सर्वात महागडा संडास होता... एवढे पेपरात फोटो येतात, अवकाशात काम करायला मिळत म्हणून संडासाला बुट्टी मारू म्हणले नव्हते अंतराळवीर! आणि तू...”

तेवढयात आजोबांच्या बुडाखालून पिर्रपिर्र असा नाजूक आवाज आला... गाल जबड्यात ओढून त्यांनी गच्च डोळे मिटले नि म्हणाले, “सॉरी इवान...” इवान कुजबुजला...’लाजला तो संपला!’

-सोनाली नावांगुळ
My Cart
Empty Cart

Loading...