‘आली दिवाळी, भुवन उजळी, आनंद घे अवतार’ दिवाळी, नवरात्र, होळी… कुठलाही सण आपल्यासोबत आनंद घेऊन येतो. का होतो तो आनंद? का हवे असतात आपल्याला सण आणि उत्सव?
अगदी आदिमानवाच्या काळापासून उत्सव ही माणसाच्या मनाची गरज आहे. आदिमानव शोधीपारधी होता. अन्नाच्या, शिकारीच्या शोधात वणवणताना त्याला सगळीकडून शत्रूंचं, संकटांचं भय असे. त्या वेगवेगळ्या संकटांवर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्या मेंदूतल्या एका केंद्राची होती. ते मेंदूच्या बुडाशी असलेलं बदामाच्या आकाराचं केंद्र (Amygdala) सतत धोक्याची घंटा वाजवत राही. मेंदूच्या इतर सगळ्या कर्त्याकरवत्या केंद्रांचं लक्ष नेहमी त्या बदामकेंद्रावरच खिळून असे. पण माणसाला जर कधी मोठी शिकार मिळाली तर काही काळ पोटाची निश्चिंती, थोडासा आराम, गुहेचा निवारा असं सुख लाभे. बदामकेंद्राला सक्तीची सुट्टी मिळे. इतर केंद्रांना मोकळीक मिळे. मग मेंदूतला कलाकार जागा होई. गुहेच्या भिंतीवर शिकारीची चित्रं काढली जात. खाणं-पिणं-नाचणं असा उत्सव साजरा होई. मेंदूच्या गाभ्यात आनंद-रसायनांचा पाझर होई.
मेंदूच्या गाभ्याला लागूनच, त्याच्या पुढ्यात Nucleus accumbens नावाचं एक केंद्र असतं. त्याला आपण ‘शेजारी’ केंद्र म्हणू. कुठल्याही अनुभवावर ‘हवाहवासा’ किंवा ‘नकोनकोसा’ असा शिक्का मारणं, हे त्या केंद्राचं काम. शिकारीनंतरच्या उत्सवात पाझरणाऱ्या ‘डोपामीन’ नावाच्या आनंदरसायनामुळे त्या ‘शेजारी’ केंद्राला जाग येई. त्या उत्सवाच्या सुरक्षित, आनंदी अनुभवावर ‘झक्कास’ असं शिक्कामोर्तब होई. आदिमानवाला तोच अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायची इच्छा होई. म्हणून आधीच्या शिकारीची बेगमी संपण्यापूर्वीच त्याला नव्या शिकारीचे वेध लागत. आनंद-रसायनांना पूर यायला नुसती नव्या शिकारीची, त्यानंतरच्या श्रमसाफल्याच्या उत्सवाची कुणकुणदेखील पुरेशी असे.
असं होता होता मानवाला त्या आनंदाची चटक लागली. श्रमसाफल्याचा उत्सव मानवी संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा बनला. पुढे शोधीपारधी स्थिरावला, शेतकरी झाला. सुगीचा, धान्यसमृद्धीचा उत्सव सुरू झाला.
प्राचीन रोममध्ये ‘सॅटर्नालिया’ हा धान्यसमृद्धीचा उत्सव असे. दिवाळी, थॅंक्सगिव्हिंग, हॅलोवीन हे सुगीचे उत्सव अजूनही साजरे होतात. मळणी होऊन धान्य घरात आलं की, रोजच्या धकाधकीच्या अनिश्चिततेपासून थोडासा आराम मिळतो. सणाच्या दिवशी काय करायचं तेही, अभ्यंगस्नान, कारीट फोडणं, भाऊबीजेला ओवाळणी असं सगळं आधीपासूनच निश्चित ठरलेलं असतं. बदामकेंद्राची भुणभुण नसते.
मग मेंदूतली कलाकार केंद्रं सुंदर रांगोळ्या, रंगीबेरंगी आकाशकंदील, आरास, किल्ल्यांची सजावट वगैरेंमध्ये गुंगतात. तशा कलाकृती हातून साकारल्या की मेंदूच्या गाभ्यात नवी आनंदरसायनं तयार होतात. आनंदचक्रच सुरू होतं. नवे कपडे, गोड खाऊ, फटाके अशा सगळ्या छान अनुभवांनी, लक्ष्मीची, हिशेबाच्या चोपड्यांची पूजा, प्रार्थना यांनी ‘शेजारी’ केंद्राचा ‘पुन्हा पुन्हा हवं’ असा शेरा ठळक, अधोरेखित होतो.
आईने उटणं लावून न्हाऊ घालणं, पाडव्याची ओवाळणी, भाऊबीज हे नात्यांचे उत्सव असतात. त्या प्रेमाच्या जवळिकीमुळे ‘ऑक्सिटोसिन’ नावाचं ममता-रसायन मेंदूच्या गाभ्यात पाझरतं. ते ती नाती तर पक्की करतंच, शिवाय हृदयाचं काम, रक्तदाब यांनाही सुरळीत ठेवतं. शेजारीपाजारी, गल्लीतली मित्रमंडळी, समस्त गावकरी अशांनी मिळून सांघिक उत्सव साजरा केला की त्या सगळ्या समुदायात तशा ममता-इफेक्टमुळे एकोपा निर्माण होतो. लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजात तशीच एकात्मता आपसूक निर्माण झाली.
ईश्वरावर भिस्त टाकणाऱ्या वटसावित्रीच्या, हरितालिकेच्या भक्तिभावानेदेखील ‘पुन्हा पुन्हा हवं’ शेरा ठळक होतो. होळी हा मनातल्या दुष्ट प्रवृत्ती जाळून टाकायचा सण. वर्षभर मालकांसाठी खपणाऱ्या बैलांचा सन्मान करायला बैलपोळ्याचा सण असतो. ‘सॅटर्नालियाच्या’ (प्राचीन रोमन सण) दिवशी मालक गुलामांची बडदास्त ठेवत. तशा सात्विक, उदात्त विचारांनी देखील मेंदूत आनंद-रसायनं पाझरतात.
ईशान्य चीनमध्ये रक्त गोठवणाऱ्या थंडीत लोक बर्फापासून सुंदर शिल्पं घडवतात. तशा नवनिर्मितीत मन रमलं की मेंदूत ‘मॉर्फीन’ या अमली पदार्थाचे चुलतभाऊ, ‘एन्डॉर्फिन’ नावाची आनंद-रसायनं पाझरतात. ती त्यांना त्यांच्या हालअपेष्टा विसरायला लावतात. मग ‘डोपामीन’ आणि ‘शेजारी केंद्र’ त्या हिमशिल्पोत्सवावर देखील 'हवाहवासा' असं ठळक शिक्कामोर्तब करतात.
सण, उत्सव हे जीवनाच्या ओढगस्तीतले सुखद स्वल्पविराम आहेत. खरोखरच ती माणसाची मानसिक, भावनिक, सामाजिक चॉकलेटं आहेत!
-डॉ. उज्ज्वला दळवी
***