By Praveen Dawane, On 24th July 2020, Children Magazine
हिरव्या सुंदर वनराईची काळजी न घेणाऱ्या माणसाच्या जगातला उलटा चष्मा प्राण्यांच्या जगात पोहोचला. हुप्प हुप्प करीत धमाल करणाऱ्या मुंगेरीची ही गोष्ट. हसवेल आणि विचारही करायला लावेल-
सगळ्या नातवंडात मुंगेरी अगदी द्वाड ! आजी-आजोबा मेटाकुटीला येत मुंगेरीला समजावता समजावता. मुंगेरीचे आई-बाबा लेकरांसाठी आणि त्यांच्या आजी-आजोबांसाठी कुठे फळं मिळतात का ते बघायला कोवळ्या उन्हाचं बोट धरूनच बाहेर पडत नि नाना-नानींवर मुंगेरी व चंदेरीला सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडे. चंदेरी ही अक्षरशः गुणी मुलगी होती. सक्काळीच आई-बाबांनी शिकवलेल्या नव्या धड्याचा ती सराव करीत असे. छोट्या फांदीवर तोल सावरून कसं बसायचं, एका फांदीवरून दुस-या फांदीवर झुपकन् उडी कशी मारायची, जाळीतून कोवळी करवंद काढताना हाताला काटा कसा लागू द्यायचा नाही; माणसांनी टाकलेल्या पुडीतल्या शेंगदाण्याऐंवजी –नव्यानं येणा-या कैरीचा आंबटपणा कसा गोड मानायचा असा सगळा सराव नाना-नानींच्या देखरेखीखाली छान करायची.
पण हा धाकटा मुंगेरी- थोडा-थोडा नाही अधिकंच ‘अधिक’! नाना-नानी अगदी मेटाकुटीला येत असत. ‘अरे, मुंगेरी नुसता रस्त्यावरच टुक् टुक् बघत, कुणी एखादं अर्ध फळ फेकेल का, याची वाट पहात रहाशील तर आळशी होशील. न् राजा, आळशांना आपल्या प्राणी जगात थारा नाही रे!’ असं समजावता समजावता लालीनानी हैराण व्हायची.
पण मुंगेरी हट्टी- तो म्हणायचा, ‘लाली नानी , अगं, इथं बसून केळी मिळतात, चणे मिळतात, मग कशाला धावाधाव करायची- या फांदीवरून त्या फांदीवर? शिवाय कुणी काही खायला देतंय का याची वाट बघण्यातही मेहनत आहेच की!’
लालू नाना म्हणायचे,’हा-मुंगेरी ना, बुद्धिमान आळशी आहे, अशांना समजावणं जड जातं गं !’ मोठी चंदेरीही धाकट्या भावाला खूप समजावायची. एकदा तर कानाशी येऊन हळूच म्हणाली, ‘मुंगू, तुझा हा वाभ्रट स्वभाव एखाद दिवशी अंगाशी येईल हां, आपल्या या हिरव्या जंगलाच्या गावात -ती मोटारच्या जंगलातली माणसं येतात. इथली शांतताच काय, इथली स्वच्छता बिघडवतात. आपल्याला पाहून स्वत:चं मनोरंजन करून घेतात; पण मुंगू, त्यांच्या फार नादी लागू नकोस हां- अरे गाड्यांचा नि कसला कसला धूर भरून आपलं स्वच्छ जग कसं दुषित करतात; त्यानंच मध्ये आपली आजी श्वास कोंडून आजारी पडली होती. त्यांच्या कुठल्याही वस्तूंना हात लावू नकोस; अरे, आता बघ फळांचा ऋतू आलाय; पलीकडल्या आमराईत बघ गोडगोड आंबे आलेत नि जांभळाच्या करंड्याच्या करंड्या- जांभळाच्या झाडाच्या फांदीवर लगडल्यात; तिथं जा. या जबाबदारी विसरलेल्या माणसांच्या जगात कशाला रे – तुझी वणवण-!’ एवढं ऐकलं, पण मुंगेरी आपला ‘हुप्प !’
चंदेरीनं पुन्हा प्रयत्न केला- ‘काय रे ?’
पण मग मुंगेरी एकदम चिडचिडून म्हणाला, ‘हे बघ ताई, मला नकोस अक्कल शिकवू ! उलट मला एक गम्मत सापडलेय्- माणसाच्या जगातली. खरं तर मी ती तुला दाखवणारं होतो; पण जाऊ दे, तू आपली मलाच ‘पकवणार !’ चंदेरी फिस्सकन हसली. ‘काय गं ताई, असं कुचकटासारखं हसायला काय झालं?’ ‘काही नाही– माणसांच्या जगात जाऊन जाऊन त्यांची भाषापण तुझ्या तोंडी यायला लागली.’ पकवणार!’
चंदेरी हसून नाना-नानींकडे पळाली खरी; पण तिच्या डोक्यात एकच भुंगा.
‘काय बरं सापडलं असेल-मुंगेरीला !’
असा विचार करतानाच तिला एक रसरशीत जांभूळ सापडलं आणि त्याचा मऊमऊ जांभळट रंगाचा नि तुरटगोड चवीचा आनंद घेण्यात ती मग्न झाली. थोड्या वेळानं तर उचापतीत रमणा-या मुंगेरीला अशी काही वेगळी वस्तू सापडलेय हेही ती विसरली नि मुंगेरीची ही नवीन खट्याळकी लालूनाना नि लालीनानीला सांगायचीच राहून गेली. झालं !
दुस-या दिवशीच दुपारी लालूनाना नि लालीनानींचं आकाशध्यान सुरु असतानाच मुंगेरी कडमडला नि एकदम म्हणाला, ‘नाना-नानी, वर आकाशाकडे काय पहाताय, माझ्याकडे पाहा-नीट पाहा. दोघांनी आपल्या पांढरट पापण्या उघडून पहाण्याचा प्रयत्न केला, पण अंधुकसं जाणवलं, पण त्यानाही नीट कळलं नाही.
‘नाना, बघा-आपलं हिरवं जग बदललं. मला आता छान काळंसावळं दिसायला लागलंय नि आता मीही मोटारीच्या टपावर बसून त्यांच्या जगात जाणार बरं का!’
‘कुणाच्या?’
‘माणसांच्या. ते नाही का आपल्या जगात येतात.’
‘अरे, पण तिथं तू खाणार काय?’
‘पहा पहा-फ्र्सानाची पुडी.’
‘प्लॅस्टिकची !’
‘खाऊन फेकायची !’
‘त्यांच्यासारखी?’
‘हो.’
‘अरे, आधीच आपलं सारं जंगल त्यांनी प्लॅस्टिकनं किती खराब केलंय; बघ त्यामुळे पाणी अडली; आषाढात पाऊस आला तरी जमीन ओली होणार कशी? मग पाणीच जमिनीत नाही गेलं तर नवे झरे येणार कसे? बाला, तू सुद्धा प्लॅस्टिकमधून अन्न खाणार ! नि पिणार कुठलं पाणी त्यांच्या जगात जाऊन?’
‘नाना-नाणी, ती पण एक गंमत आहे, ही पहा.’
‘आँ ? हे काय? नानी दचकलीच.
‘पाण्याची बाटली!’
‘ती सुद्धा प्लॅस्टिकची ! हाय रामा !’ लाली नानीनं नि लालूनानांनीही एकदम आपल्या मुल दैवतालाच हक मारली.
‘मुंगेरी- अरे, पावसाच्या पाण्यानं भरलेल्या निळ्या तळ्याचं गोड पाणी पिणारी मंडळी आपण, आता या प्लॅस्टिकच्या बाटलीतनं?’
मुंगेरी चिं-चिं करीत हसला. इतका मोठ्यानं की नुकतंच घरटं बांधून अंमळ विसावलेली ढंपू कौची जोडीही दचकली. आणि त्यांनी कावकाव सुरु केली. जरा दुपारचा डोळा लागलेली चानी झुपकेदार शेपटी डोळ्यावरून बाजूला घेऊन. ‘काय मेल्यानं उच्छाद अम्द्लाय ! जरा झोपू देईल तर शप्पथ !’ अशा नजरेनं पाहिलं.
पण मुंगेरी महाराज स्वत:च्याच तालात ! आपल्या पिटुकल्या कानातलं छोट्टं यंत्र त्यांनी अनपेक्षितपणे नानीच्या कानाला लावलं. असह्य गोंगाट ऐकल्यानं नानी हडबडली आणि पेरू खाऊन सुस्तावलेल्या पोटावरून हात फिरवण-या नानांच्या कानाला ते एका झटक्यात लावलं. नानाही थोडे दचकलेच, पण त्यांनी वेध घेतला- हा काय प्रकार?
‘क्काय नाना, आहे की नाय् मज्जा?’ मुंगेरीनं आपल्या कोवळ्या लाल बोटांनी आजोबांची समाधी भंग करून विचारलं. ‘याला मोबाईल म्हणतात नि कणाल इयर फोन लावून गाणी ऐकतात माणसं.’ ‘तुला सगळं कुठून कळलं?’
‘मग आपल्या जंगलात पिकनिकला येणा-या मुलांकडे मी पाहिलं; त्यांचंच तर पळवलं नि हा चष्मा सुद्धा. बघा बघा लावून !’ लालू नाना वैतागले. ‘अरे, केवढा गोंगाट आंत भरलाय.’ ‘यालाच ‘म्युझिक’ म्हणतात. डीजे डीजे –असं नाचतात.’ मुंगेरी जोरात नाचू लागला. त्यात चार पान ढळली न् एक फांदी तुटता तुटता थांबली. नाना-नानी झाल्या प्रकारानं घाबरले; चंदेरीला हाक मारू लागले. तेवढ्यात चांगली ताजी जांभळ न् करवंद घेऊन नेहमीपेक्षा थोडं लवकरच मुंगेरीचे आई-बाबाही आले. जरा लवकर जाऊन चकित करू या सा-यांना, या विचारानं! पण समोरचं दृश्य बघून त्या दोघानाही काही कळेना.
घाबरलेले नाना-नानी; चंदेरीही धापा टाकत आलेली. त्यात एका हातात प्लॅस्टिकची बाटली, प्लॅस्टिकची पिशवी, आणि त्यात कानाला- माणसाच्या जगातलं यंत्र लावून, आपल्या हिरव्या जंगल जगाची कुठलीच फिकीर न करता नाचणारा मुंगेरी ! आपला लाडका मुंगेरी !
हुप्प ! हुप्प ! त्यांनी काळजीनं पाहिलं. सतत जंगलाचं जग झाडं तोडून, खाल्लेलं तिथंच टाकून, प्लॅस्टिकचा यथेच्छ कचरा करून बिघडवून टाकणा-या काही बेफिकीर व्यक्तींच्या संगतीनं आपला मुन्गेरीही तसाच झाला नाही ना !
‘या मुंगेरीचं असं काय झालं. त्यानं हा भलता चष्मा कुठला लावला?’
नाना म्हणाले, ‘माणसाच्या जगातला उलटा चष्मा. ज्यांना झाडांचं, फळा-फुलांचं, मातीचं, प्राण्यांचं जग प्रेमानं जपता येत नाही अशा माणसाचा हा चष्मा आधी काढ त्याचा. तुम्ही आई-बाप; बिझी-सारखे दूर. कबूल; आमच्यासाठीच; पण त्यांच्याकडे लक्ष द्या. दोघं गुणी आहेत रे !
मुंगेरी चपापला. त्याच्या बाबांनी त्याचा उलटा चष्मा काढला; स्वच्छ डोळ्यांनी आपलं जंगल त्याला पुन्हा दाखवलं नि समजूतीच्या स्वरात मुंगेरीचे बाबा म्हणाले, ‘अगं आई, विशेष काही नाही. यानं माणसाच्या जगातला चष्मा डोळ्यांना लावला आणि कांही त्यांच्या संगीतानी भरले. म्हणून हा असा उनाडपणा. आता चार दिवस मीच रजा घेतो आणि चंदेरी आणि या मोठ्या होऊ लागलेल्या मुंगेरीला अजून दूरच्या जंगलात नेऊन नवीन धडे देतो. खूप जंगल अजून वाचायचंय त्यांनी. उंबराच्या मुळाशी स्वच्छ ओले झरे अजून शिल्लक आहेत; त्या पाण्याची चव यांनी चाखलेलीच नाही आणि आता बघ वसंतऋतूत इथं न आलेल्या खूप सा-या पाखरांची खरीखुरी गाणी ऐकायचेत त्यांनी. मग बघ, मुंगेरीही तुम्हाला आवडेल असा कर्तबगार नातू होईल !’ लालू-लालीचे डोळे भरून आले.
मुन्गेरीही शांत झाला आणि कुणाच्या तरी गाडीजवळ सापडलेला माणसाच्या डोळ्याचा गॉगल आणि मोबाईल परत केला. ‘जा-जिथून घेतलास तिथे ठेवून परत ये- बाळा ! आणि हे प्लॅस्टिकही दूर ठेव ! आपण असं वागायचं नाही सोन्या !’ कित्ती दिवसांनी आईनं असं ‘सोन्या, म्हणून कुशीत घेतलं. म्हणून मुंगेरीलाही ऊबदार वाटलं. चंदेरीलाही बरं वाटलं, आला बुवा मुंगेरी वळणावर !
लालू नाना- लाली नानींनी एकमेकांकडे आनंदानं पाह्यलं. आणि सारेजण- मऊ मऊ जांभळं आणि काळी हिरवी करवंद खाण्यात दंग झाली.
जुलै २०२० ‘वयम्’