By Hemant Mone, On 12th May 2020, Children Magazine
‘वयम’ वाचकांनो, पहाटे उठून जरा आकाशात बघा. गुरु, शनी व मंगळ सध्या आपल्याला सहजपणे दर्शन देत आहेत. पहाटे 5 चे सुमारास एकाच वेळी आकाशात तीन ग्रहांचे सुंदर दर्शन होते आहे. त्यासाठी द्विनेत्री, दुर्बिण अशा कोणत्याही साधनाची जरुरी नाही. आपले डोळे त्यासाठी समर्थ आहेत. आता हे ग्रह कसे पहायचे ते सांगतो. पहाटे 5 ते 5.30 ही वेळ सर्वात उत्तम. दक्षीणेकडे तोंड करा. तुमच्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे (पश्चिमेक्डून पूर्वेकडे ) क्रमाने गुरु, शनी व मंगळ यांचे दर्शन होईल. गुरु या तिघांमध्ये तेजस्वी आहे. गुरु—शनी एकाच नजरेत येतात. या दोघांपासून मंगळ डाव्या हातास (पूर्वेकडे) थोडा दूर आहे.
मंगळवाऱ दि. 12 ते शनिवार दि.16 पर्यंत निरीक्षण केल्यास आकाश दर्शनाबरोबरच चंद्राचे सरकणेही लक्षात येईल. या काळात ग्रहांच्या स्थितीत लक्षात येण्यासारखा कोणताच बदल होणार नाही. मंगळवाऱ दि. 12 च्या पहाटे चंद्राजवळ गुरु व शनी सहज ओळखता येतील. बुधवार दि. 13 रोजी चंद्र शनीच्या जवळ पोहोचलेला असेल. गुरुवार दि.15 रोजी चंद्र मंगळाला भेटेल. शुक्रवार दि. १६ रोजी चंद्राच्या रेषेत उजवीकडे (पश्चिमेस) अनुक्रमे मंगळ, शनी आणि गुरु यांचे सुरम्य दर्शन होईल.
मे २०२० ‘वयम्’