माझ्या 'वयम्'च्या दोस्तांनो, तुम्हाला खरं सांगू का? एक शिक्षक विद्यार्थ्याला जेवढं काही शिकवत असतो ना, त्याच्यापेक्षा अधिक तो आपल्या विद्यार्थ्यांकडूनच कळत नकळत शिकत असतो. मग हे शिकणं वर्गाच्या भिंतीपुरतं मर्यादित राहतच नाही.
माझी जि.प. प्राथमिक शाळा गुहिणी ही भोर (जि. पुणे) या तालुक्यातील अतिशय दुर्गम अशी शाळा आहे. कदाचित तुम्हाला उपलब्ध असणा-या भौतिक सोई-सुविधा माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध नाहीत. पण म्हणून काय झालं? सह्याद्री पर्वताचे उंच कडे, धबधबे,बांबूची बने, जंगले व पशू-पक्षी अशा कित्येक गोष्टींचा खजिना माझ्या मुलांकडे आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही वाचला असेल. महाराजांच्या राजगड व तोरणा गडाच्या पायथ्याशीच माझी शाळा आहे. त्यामुळे माझे विद्यार्थी शिवाजी महाराजांचे खरेखुरे मावळे आहेत.
मुलांसोबत गप्पा मारायला मला खूप आवडते; त्यामुळेच तर मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं.
एक दिवस इयत्ता 6वीतला संपत शाळेत थोडा उशिरा आला. याचं कारण विचारलं तर तो घाबरत म्हणाला,
"सर, जंगलात फास बगायला गेल्तो."
जंगल, फास आणि संपतचे वय याचा मला काहीच बोध होईना. म्हणून मी त्याला सविस्तर माहिती सांगायला सांगितलं. आदल्या दिवशी सुट्टी होती. तेव्हा तो गावाजवळच्या जंगलात रानकोंबड्या पकडण्यासाठी फास लावून आला होता. शिकार सापडलीय का हे पाहण्यासाठी तो आज पुन्हा जंगलात गेला होता.
"तुला असे फास बनवायला येतात का? "मी विचारले.
"हो सर." खाली मान करून त्याने उत्तर दिले आणि मग मी म्हणालो,
"मला शिकव की फास बनवायला."
त्याला नवल वाटलं. जवळच असलेल्या सिमेंटच्या रिकाम्या पिशवीचे 5-6 धागे त्याने आणले. मांडीवर मस्त वळून त्याची दोरी बनवली आणि अफलातून अशा गाठी मारत त्याने खरोखरच फास बनवून दाखवला. या फासात रानकोंबडी कशी फसते, याचेही प्रात्यक्षिक दाखवले, तेव्हा मी अचंबित झालो.
विविध धाग्यांपासून मुले 5 ते 6 फास बनवतात. हे सर्व फास एका दोरीमध्ये गुंफून जंगलात बांबूच्या ठोकलेल्या खुट्यांना किंवा झाडाला जमिनीलगत बांधतात. खळ्यावरची मळणी झाली की यातून शिल्लक राहिलेला पोलक्याना म्हणजेच नाचणी किंवा भाताचे तुकडे या फासात टाकला जातो. दाणे खाण्यासाठी आलेल्या रानकोंबड्या, सकातरी यामध्ये अडकतात.
खेकड्यांचे मुठे, ढिंगुळ, कासड, चिंबुरी असे अनेक प्रकार मुलांमुळेच मला समजू लागले. पाऊसकाळात भले मोठे खेकडे पकडणे ही मुलांची खासियत आहे.
"खेकडा बिळात आहे की नाही हे तुम्हाला कसे रे समजतं?" माझ्या बाळबोध प्रश्नाला हसून तानाजीचे आलेले उत्तर असे- "बिळातलं पाणी घडूळ झालं तर त्यात खेकूड आस्तो. अशा बिळात काठीनं गटवायचं; (हलवत ठेवणे)" तर हा तानाजी गळाला लहान गांडूळं अडकवून सुट्टीच्या दिवशी कधीतरी ओढ्याला मासेमारीदेखील करतो. केवळ हौस म्हणून नव्हे तर जेवणाची तजवीज म्हणूनच या गोष्टी होतात; कारण इथे कोणताही भाजीपाला पिकत नाही. पावसाळी दिवसात डोंगरकपारीत उगवणा-या तांदळी, कुरडू, आळंबं, नाची, काटवेल आणि शेंडवेल अशा कित्येक रानभाज्यांची माहिती मुलांमुळेच मला समजली.
या मावळमुलुखातील प्रत्येक झाड, पशूपक्षी व अन्य जीव यांच्याशी माझ्या मुलांचं निसर्गदत्त नातं आहे. शहरी मुलांनी पुस्तकात बघितलेला निसर्ग ही मुले रोजच जगतात. करवंदी, आमगुळं व फणसाचा रानमेवा चाखत आणि सुनकी, करडईच्या फुलांचा ताटवा झेलत ही मुलं खडतर परिस्थितीशी चिवटपणे झुंजत असतात. निरीक्षणक्षमता, निर्णयक्षमता, धाडसीपणा आणि कल्पकता अशा कित्येक गोष्टी मुलांच्या अनुभवातून समजून घेता येतात.
शाळेबाहेरच्या खुल्या रानाचं खुलं पुस्तक मुलंच मला शिकवतात, मला समृद्ध करतात; म्हणून तर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मी एक विद्यार्थी आहे.
-प्रमोद प्रकाश धायगुडे
***