Menu

ताप का येतो?

image By Wayam Magazine 06 April 2023

आपल्या शरीरात जेव्हा कसलीही उलाढाल युद्धपातळीवर चालू असते, तेव्हा ताप येतो.

कधी रोगजंतू,विषाणू,परकी रसायनं बाहेरून येतात. त्यांच्याशी आपल्या शरीरातल्या लढाऊ पेशी आणि इतर यंत्रणा झुंजते. त्या फौजेला नेहमीपेक्षा जरा वरच्या तापमानाला लढायला अधिक चेव येतो. म्हणून शरीर ते तापमान मुद्दाम वाढवतं. कॅन्सरमुळे किंवा जबरदस्त मार बसल्यामुळे आपल्याच शरीरात घातक, ‘तापदायक रसायनं तयार होतात.

सर्वसाधारणपणे ९८. डिग्री फॅरेनहाइट किंवा ३७. डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास, अर्ध्या डिग्रीने वरखाली अशा तापमानाला शरीरातलं नेहमीचं कामकाज उत्तम चालतं. तोंडात थर्मामीटर ठेवून मोजलं तर आपल्या शरीराचं नेहमीचं तापमान तेवढं असतं. आपल्या घरातल्या फ्रिजचं तापमान ठरावीक ठिकाणी कायम ठेवायला जसं त्याच्यात थर्मोस्टॅट असतं, तसंच थर्मोस्टॅट आपल्या मेंदूच्या बुडातल्या तापमानकेंद्रात असतं. ते केंद्र त्वचेच्या,फुप्फुसांच्या, स्नायूंच्या मदतीनं शरीराचं तापमान काटेकोरपणे सांभाळतं.

जंतू किंवा विष बाहेरून शरीरात आलं,किंवा आजारामुळे शरीरातच घातक रसायनं तयार झाली की, ती लढाऊ पेशींना समजतात.रणशिंग फुंकलं जातं. शरीरभर रासायनिक दवंडी पिटली जाते. त्यातलीच काही रसायनं थेट तापमानकेंद्राला वर्दी देतात आणि तिथल्या थर्मोस्टॅटचं सेटिंग बदलून वर सरकवतात. तापमान वाढवायचे हुकूम केंद्राकडून शरीरभर पोचतात. उष्णता राखून ठेवायला त्वचेचा रक्तपुरवठा कमी होतो. त्यासोबतच स्नायू वेगाने आकुंचन-प्रसरण पावतात. म्हणजेच हुडहुडी भरते. स्नायूंच्या त्या कामामुळे नवी उष्णता तयार होते. ताप चढतो.थर्मोस्टॅटला पोचणाऱ्या रक्ताचं तापमान त्या वरच्या सेटिंगला पोचलं की हुडहुडी थांबते.

दवंडी पिटणारी रसायनं इतर लढाऊ रसायनांचं प्रमाणही वाढवतात. त्या तापमानाला लढाऊ रक्तपेशी वेगाने शरीरभर पसरतात आणि रोगप्रतिकारक रसायनं अधिक जोरात काम करतात. तुंबळ युद्ध सुरू होतं,त्याच्यात अनेक मृत पेशींचा, रसायनांचा कचरा जमतो. ताप वाढला की, अंग दुखतं, थकवा येतो तो त्या दूषित कचऱ्यामुळे. त्या चढलेल्या तापमानाला अनेक जंतूंची वाढ खुंटते, त्यांच्यावर मात करणं लढाऊ पेशींना सोपं जातं.

तात्पुरती का होईना, लढाई जिंकली की थर्मोस्टॅटचं सेटिंग पुन्हा खाली सरकतं. मग घाम येतो, त्याचं बाष्पीभवन होतं आणि त्वचेला थंडावा येतो. त्याच वेळी त्वचेचा रक्तपुरवठा वाढतो,त्वचेतून आणि श्वासातूनही अधिक उष्णता बाहेर टाकली जाते. तिथल्या रक्ताचं आणि त्यामुळे सगळ्या शरीराचं तापमान कमी होतं. ताप उतरतो. थर्मोस्टॅटला पोचणारं रक्त पुरेसं गार झालं की घाम येणं थांबतं आणि बरं वाटतं.

तान्ह्या बाळांचं आणि आजीआजोबांचं थर्मोस्टॅट फारसं कामसू नसतं. जंतूंची लागण झाली तरी कधीकधी त्यांना ताप येत नाही आणि आजार वेळेवर लक्षात येत नाही.

करोनासाथीच्या काळात कपाळावर बंदूक रोखून तापमान मोजलं जात होतं. त्या पद्धतीत तापलेल्या कपाळाच्या त्वचेतून येणारा, अदृश्य इन्फ्रारेड प्रकाश त्या बंदुकीत पोचतो. तिथे त्याची वीज बनते. ती यंत्राने मोजता येते आणि तिच्यावरून तापमान समजतं. पण कपाळाची त्वचा उन्हातून आल्यामुळेही तापलेली असू शकते आणि घामामुळे ओली आणि थंड होऊ शकते. त्यामुळे ते बिनचूक नसतं, कामचलाऊ असतं. तशाच यंत्राने कानाच्या पडद्याचं तापमान पाहिलं तर ते मात्र अगदी थर्मोस्टॅटजवळच्या तापमानासारखंच असतं. ते तोंडातल्या तापमानापेक्षा अर्ध्या डिग्रीने आणि काखेतल्या किंवा कपाळावरच्यापेक्षा दीड डिग्री फॅरेनहाइटने अधिक असतं.

तापासाठी दिली जाणारी पॅरासिटॉमॉल(क्रोसिन), ब्रुफेनसारखी औषधं लढाईची दवंडी पिटणारी,थर्मोस्टॅटला वर्दी देणारी रसायनं तयार होऊ देत नाहीत. कपाळावर थंड पाण्याच्या घड्या ठेवण्यापेक्षा पोटावर घड्या ठेवल्या किंवा अंग कोमट पाण्याने पुसलं तर त्या बाष्पीभवनाने त्वचेत खेळणाऱ्या रक्तातली उष्णता कमी होते.

भर उन्हाळ्यात,वाळवंटात,उन्हात काम करणाऱ्या लोकांना उष्माघात होतो. त्यांच्या शरीराचं तापमान थर्मोस्टॅटला दाद देत नाही आणि प्रमाणाबाहेर, ४१. डिग्री सेंटीग्रेड (१०६. डिग्री फॅरेनहाईट) पेक्षाही जास्त चढत जातं. त्याचा मेंदूवर दुष्परिणाम होतो आणि ते जीवघेणं ठरू शकतं. उष्माघातात क्रोसिनसारखी औषधं,कोमट पाण्याचं स्पंजिंग आणि पंख्याचा वारा ह्यांचा फायदा होतो.

पण ते सगळे उपाय तात्पुरते आणि वरवरचे आहेत. रणशिंग फुंकणाऱ्याला गप्प करून युद्ध संपत नाही. शत्रूचा समूळ नायनाट करायला हवा. तापाचं तसंच आहे. कुठल्याही तापाची इडापिडा टाळायची असली तर त्याचं नेमकं कारण शोधून त्याच्यावर योग्य तोच इलाज करायला हवा; त्याला पर्याय नाही.

-डॉ. उज्ज्वला दळवी

 

                        ***

 

My Cart
Empty Cart

Loading...