Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 11

image By Wayam Magazine 14 October 2022

निवांत काळातील निरीक्षण


एरव्ही दुर्मीळ असलेला वेळ मिळाल्यावर मुलं बारीक निरीक्षण करतात. अनोखे अनुभव मनापासून उपभोगतात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

आज वाचा भाग- 11.

1. चंद्रच माझ्यापाशी!

या सुट्टीत रोज आम्ही गच्चीवर जाऊ लागलो आणि ही जागा हळूहळू माझ्या आवडीची झाली. टाकीवर चढून उंचावरून सर्वत्र पाहायचं आणि रोज ढगांचे वेगवेगळे आकार, सूर्यकिरणांच्या आणि सूर्यास्ताच्या वेगवेगळ्या छटा यांचा अनुभव घ्यायचा! खूप निवांत वाटलं. एकदा मनात आलं की, आज आपण गच्चीवर झोपावं. मोकळ्या, चांदण्यांनी भरलेल्या आकाशात झोपायला सुरुवातीला छान वाटलं, पण डासांनी आमचा सगळा बेत हाणून पाडला. रात्री दोन वाजता मी आईला विनवण्या करून करून घरात आले. सगळे मला खूप हसत होते. खोलीत आल्यावर मी पाहिलं की, चंद्राच्या प्रकाशाचा एक हलकासा झोत माझ्या खिडकीतून खोलीत आला. तो क्षण नजरेत आणि मनात भरून राहिला. मनात आलं, ज्यासाठी एवढा अट्टहास केला, तो चंद्र तर माझ्याच खोलीत आला की! या काळात मला आवडलेली गोष्ट, म्हणजे माझी आई सतत माझ्यासोबत घरात होती. एरव्ही ती ऑफिसातून लवकर घरी यावी यासाठी मला हट्ट करावा लागतो.

अलीकडे मी छान पोळ्या करायला शिकले. दादाची व माझी मऊ पोळ्या करण्याची स्पर्धा सुरू झाली. शिवाय मला कविता करण्याचं वेड लागलं. मनाप्रमाणे कविता सुचल्याने मला प्रसन्न वाटलं. एकदा भिंती घासूनपुसून स्वच्छ केल्या. पुस्तक वाचलं. वेगवेगळी गाणी ऐकली. जुन्या कपड्यांपासून पायपुसणं शिवलं. रोज मला मी वेगवेगळ्या रूपांत, वेगळ्या गोष्टींत सापडू लागले...

-संस्कृती शिंदे,
दहावी
आनंद निकेतन, नाशिक

२. पहाटेचे सुरेल अनुभव

पहाटेचं सुरेल वर्णन मी फक्त पुस्तकातच वाचलं होतं. तो अनुभव घेण्यासाठी या सुट्टीत बरेचदा मी पहाटे पाचला उठले. नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, अंगाला झोंबणारं गार वारं हे सगळं अनुभवून मी मोहरून गेले.

मी व माझा भाऊ मिळून रोज घर व घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवत होतो. मी व आईने मिळून खूप झाडं लावली. ओरिगामीची खूप आवड असल्याने मी यूट्यूबवर बघून खूप वस्तू तयार केल्या.

सुंदर रांगोळी काढणे हेही नित्याचे झाले होते. शिवाय आजीच्या बटव्यातल्या काही गोष्टी माहीत करून घेतल्या.

-अदिती राजेंद्र जोशी,
सातवी
द. ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर

३. शिवारात मदत

मी पहाटे ५.३० वा. उठून डोंगरावर फिरायला जातो. वाचन करतो. माझं आणि माझ्या आईचं १०० ते १२५ पुस्तकांचं छोटं ग्रंथालय आहे. ते मी क्रमवार लावून ठेवलं. सध्या राजू शेट्टींचे ‘शिवार ते संसद’ वाचत आहे.

आईची उन्हाळ्याची कामं सुरू झाली आहेत. तिला सांडगे, पापड असे पदार्थ करायला मी मदत करतो. बाबाच्या सोबत शेतात जातो‌. शेतात मला जमतील तशी लहान-मोठी कामं करतो. शिवाय रोज एक चित्र काढतो. कागदापासून चिकटकाम करतो.

खूप दिवसांनी मला आई-बाबाचा सहवास असा पूर्ण दिवसभर मिळत आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे.

-ऋग्वेद विनोदकुमार पाटील,
पाचवी
रा. मजले ता‌. हातकणंगले, जिजाऊ बालविकास मंदिर

४. Yoga and 3D drawing

I newly learned Yoga and Pranayam which increases our immunity power. I watch "Ramayana". Before watching it, I knew God Ram, Hanuman but now I also know about Bibhishan, Sugriva, Meghnad and Kumbhakaran, etc. I also learned 3D drawing.

When we are safe at home some, great people like Police, Doctor, Nurses, Soldiers, Hospital Staff, Pharmacist, News Reporter are out to take care of us. Vegetable, Grocery Sellers are providing service to us. I salute all of them.

-Meet S. Labhasetwar, Std. VIII
Wani, Dist. Yavatmal
Swarnleela Int. School, Wani.


मे २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...