On 22nd May 2020, Children Magazine
घरोघरी छोटे शेफ!
स्वयंपाकघर ही एक महत्त्वाची प्रयोगशाळा. पण व्यग्रतेमुळे मुलांना या घरच्या शाळेत वावरायला वेळही नसतो आणि वावही नसतो. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे मुलांचे पाय स्वयंपाकघरात खेचले गेले. लुडबूड करता करता ही मुले किचन चॅम्पियन झाली की! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात जी शेकडो मुले लिहिती झाली, त्यांतील अनेकांनी त्यांच्या ‘शेफ’गिरीबद्दल लिहिलंय!
आज वाचा भाग- 12.
मम्मीला फर्माइश करायची, आणि तिने केलेला पदार्थ जरा आवडला नाही की नावं ठेवायची, एवढंच आतापर्यंत केलं होतं. स्वयंपाक ही सोपी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात किती कठीण आहे, हे पहिल्याच प्रयोगात अनुभवलं. बासुंदी म्हणजे दूध फक्त आटवायचं असतं, त्यात काय विशेष, असं वाटायचं? पण 41 डिग्रीच्या उकाड्यात गॅसजवळ उभं राहून दूध तळाला करपू न देता अविरत ढवळून घामाघूम झाल्यावर काय होतं, याची कल्पना आली.
आता तर मी पूर्वतयारीपासून ओटा आवरण्यापर्यंत सगळं काम पूर्ण करायला शिकलोय. चाट बनवताना आधी जिभेवर ताबा ठेवण्यापासून ते कटलेटसाठी काळजीपूर्वक भाज्या बारीक चिरताना लागणारा पेशन्सही आलाय. अजून एक गोष्ट म्हणजे समस्त ‘होममेकर’ महिलांबद्दलचा माझा आदर अजून वाढला. त्यांनां ''''''''सॅल्यूट'''''''' म्हणून भविष्यात मी स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये मोठा शेफ व्हायचा विचार करतोय.
-आदित्य क्षीरसागर,
दहावी
पंडितराव आगाशे हायस्कूल, लॉ कॉलेज रोड, पुणे.
या काळात दिवसभर भरपूर व्यायाम, अभ्यास, वाचन, छंद जोपासणं यात माझा वेळ छान जाऊ लागला. मुख्य म्हणजे या सुट्टीत मी स्वयंपाक करायला शिकलो. कणिक मळायला व पोळ्या- भाज्या करायला शिकलो. शिवाय मी वेगवेगळी स्केचेस काढायला लागलो. स्केच प्रमाणबद्ध काढण्यासाठी मापं कशी घ्यावीत, हे शिकलो.
या काळात आकाश निरभ्र असल्याने आकाश-दर्शनाचा आनंद घेतला. उल्कावर्षावही बघता आला. रोटरी क्लबच्या इंटरॅक्ट क्लबच्या करोना जनजागृती मोहिमेत मी सहभागी झालो. आमची शाळा इंटरॅक्ट क्लबची सदस्य आहे आणि त्याचा मी व्हाइस प्रेसिडेंट असल्याने ते काम माझ्याकडे आलं होतं. प्रत्येकानं एक एक वाक्य घेऊन त्याचा व्हिडिओ केला. त्यांचं एकत्रीकरण करून पूर्ण व्हिडिओ बनवण्यात वेळ कसा गेला हे कळलंच नाही.
ही ''बहुरंगी’ सुट्टी ठरली, पण आता लॉकडाउन उठल्यावर बाहेर पडण्याचा कंटाळा येईल की काय, अशी भीती वाटते.
-सोहम कुलकर्णी,
इयत्ता- ९वी
शाळा- विद्याप्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम, नाशिक
Since I was in 10th standard, I did not have time to pursue any of my hobbies last year. This lockdown has given me time to do cakes and some hands-on work. My mum and dad both had their birthdays during this time. I wanted to do something for them. But I did not have all of the ingredients to bake a cake. So, I turned to the internet. Turns out, I could use biscuit crumbs as a substitute for Maida. My dad had his birthday on 1st April (seriously, I am not fooling you). I and my mum we both baked the cake together and I also cooked a meal. The cake was a huge success, but my cooking was not as much. Next came my mom''s birthday. This time it was just me who did all the baking. I had dark chocolate compound (thankfully) so I made a ganaché to pour on the cake as I wanted to make a chocolate cake. My mum loved the cake. We have a cheeky little 5 year old boy as my neighbour. He too, helped me in cake decoration. I enjoyed the process a lot.
-Aarya Rajesh Bhanushali
Standard: 10th
School: SVDD English medium High school, Ghatkopar East.
आमच्या बाल्कनीत चिमणी, कावळा, कबूतर, सूर्यपक्षी, बुलबुल, पोपट, मुनिया, भारद्वाज असे खूप पक्षी येतात. मी आणि दादा छोट्या दुर्बिणीतून त्यांचं निरीक्षण करतो. त्यांच्या हालचाली पाहतो. त्यांचे आवाज ऐकतो. त्यांना पाणी व खाऊही ठेवला आहे.
मी बार्बीशी खूप खेळते. त्यांच्यासाठी मी मास्क आणि ग्लोव्हज् तयार केले आणि खूप सारे ड्रेस शिवले.
मी, दादा, आई, बाबा मिळून रोज व्यायाम आणि प्राणायाम करतो. सगळे मिळून स्ट्रॉने मटार उचलणे, हत्तीला शेपूट काढणे, ट्रेझर हंट, जादूचे खेळ, पुस्तक वाचणे अशा अनेक गोष्टी करतो. मी रोज आईला घरकामात मदत पण करते. दादा मला ग्रह आणि तारे यांची माहिती देतो. Thank you lockdown!
-ओवी चौगुले,
दुसरी
आनंदनिकेतन, नाशिक
मे २०२० ‘वयम्’