Menu

स्पीकर शाळा

image By Wayam Magazine 07 November 2022

मुख्याध्यापक शांताराम बारगजे यांनी शिक्षण खात्याकडून आलेलं परिपत्रक नजरेखालून घातलं. १५ जून २०२० पासून सर्व शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्यास सुरुवात करावी, असं त्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं होतं. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा २२ मार्च २०२० पासून बंद होत्या.

आपल्या शाळेतील मुलांना ऑनलाइन शिकवणं सुरू करायचं असेल तर कोणत्या अडचणी येतील व त्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासंबंधी आपल्या शाळेतील शिक्षकांची मतं जाणून घ्यावी, म्हणून मुख्याध्यापक बारगजे यांनी सर्व शिक्षकांची बैठक आयोजित केली. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांवरून मुख्याध्यापक बारगजे यांनी नजर फिरवली. सर्व शिक्षक सुरक्षित अंतर राखून बसलेले आहेत, याचं त्यांना समाधान वाटलं. त्यांनी शिक्षकांना परिपत्रक वाचून दाखवलं. ते म्हणाले, “ऑनलाइन शिकवण्यात काही अडचणी येतील व त्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, त्याबाबत तुमची मतं जाणून घेण्यासाठी मी ही बैठक बोलवली आहे.”

दत्ताजी माने उठले, म्हणाले, “सर, प्राप्त परिस्थितीत ऑनलाइन शिकवण्यास माझा विरोध नाही, पण आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर आहेत. ऑनलाइन शिकण्यासाठी त्यांच्यापैकी किती लोकांकडे त्या क्वालिटीचे मोबाइल असतील, हा मूलभूत प्रश्न आहे.” अंकुश गाजरे उठले, म्हणाले, “माने सर म्हणाले ते खरं आहे. आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे तसे मोबाइल असण्याची शक्यता फार कमी आहे. अशा परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित कसं ठेवता येईल?”

मुख्याध्यापक बारगजे म्हणाले, “मग असं करूया. माने सर, गाजरे सर, सपकाळ सर आणि शिरसाठ सर यांची मी समिती नेमतो. या समितीने पालकांच्या घरी जाऊन याबाबतची पाहणी करावी व त्याचा अहवाल माझ्याकडे सादर करावा. पुढच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेऊ.”बैठकीत ठरल्यानुसार हाडोळती गावातल्या त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी हे चार शिक्षक गेले. पालकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या घरी मोबाइल आहे का, असल्यास तो कशा स्वरूपाचा आहे, याची प्रत्यक्ष पाहणी केली व त्याचा अहवाल त्यांनी मुख्याध्यापक बारगजे यांच्याकडे सादर केला.

मुख्याध्यापक बारगजे यांनी पुन्हा सर्व शिक्षकांची बैठक घेतली. या अहवालाच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, “आपल्या माध्यमिक शाळेत एकूण ३६० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यापैकी केवळ ८० विद्यार्थ्यांकडे चांगले स्मार्टफोन आहेत. याचाच अर्थ ऑनलाइन शिकवायचं म्हटलं तर २८० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवावे लागतील. त्यामुळे काय करायचे, याचा विचार करावा लागणार आहे.” ते पुढे म्हणाले, “हा अहवाल माझ्याकडे सादर करताना या शिक्षकांनी जे अनुभवकथन केले, त्याकडेही आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. करोनाची पालकांनी एवढी धास्ती घेतली आहे की, आपल्या मुलामुलींना ते घराबाहेर जाऊ देत नाहीत. बहुतांश घरांना अंगण उरलेलं नाही. त्यामुळे “जा, अंगणात खेळा” असं म्हणण्याची सोय उरलेली नाही. कोंडल्याप्रमाणं घरात बसावं लागल्यामुळे काही मुलं चिडचिडी झाली आहेत. शाळेचे वर्ग सुरू करा, सुरक्षित अंतर ठेवून, विद्यार्थ्यांना वर्गात बसवून शिकवणं सुरू करा, असं काही पालकांचं म्हणणं आहे. पण तसा शासनाचा आदेश असल्याशिवाय आपल्याला तसं करता येणार नाही.विश्वनाथ घोगरे म्हणाले, “आपण असं केलं तर...” “कसं?” “ज्याच्याकडे ऑनलाइन शिकविण्याजोगे मोबाइल आहेत, त्यांच्याकडे त्यांच्याच वर्गातील चार-पाच मुलांची शिकण्याची व्यवस्था करायची.” “घोगरे सर तुमची सूचना चांगली आहे; पण करोना काळात दोन्हीकडचे पालक असं करण्यास संमती देणार नाहीत.”मुख्याध्यापक बारगजे दत्ताजी माने यांच्याकडे बघत म्हणाले. “माने सर, तुम्ही कसला विचार करताय? कसला तरी वेगळा विचार तुमच्या मनात घोळतोय असं दिसतंय.” “सर, माझ्या मनात खरंच वेगळा विचार आलाय.” सर्वजण सरसावून बसले. दत्ताजी माने म्हणाले, “सर, आपल्या हाडोळती गावात दोन मंदिरं आहेत. या दोन्हीही मंदिरांवर स्पीकर आहेत. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी या स्पीकरचा उपयोग करून घेता येईल.”

“तो कसा?” “आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला जे शिकवायचं आहे, त्याच्या सीडी व पेनड्राइव्ह तयार करायचे व स्पीकरमधून ते त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांना ते ऐकवायचे.” संगीता कोळणे म्हणाल्या, “सर, माने सरांची ही योजना नावीन्यपूर्ण आहे. मात्र मंदिरांची व्यवस्थापन मंडळी आपल्या या योजनेला साथ देतील का? कारण मंदिरावरच्या स्पीकरचा उपयोग भजन, कीर्तन, पोथीवाचन यासाठी होत असतो. दत्ताजी माने म्हणाले, “मॅडम, तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण सध्या शासनानं मंदिरं उघडण्यास बंदी घातलेली आहे. का, तर धार्मिक कार्यक्रमासाठी लोक एकत्र येऊ नयेत. पण स्पीकरवरून सीडी किंवा पेनड्राइव्ह लावण्यासाठी कुणीतरी एकच जण तिथे जाईल.”

मुख्याध्यापक बारगजे म्हणाले, “ठीक आहे माने सर, तुम्ही दोघं असं करा या दोनही मंदिरांच्या व्यवस्थापन प्रमुखांना भेटा. आपली योजना त्यांना समजावून सांगा. त्यांचा मोबाइल नंबर मला कळवा. मीही त्यांच्याशी बोलतो. आपल्या संस्थेच्या स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षांशीही मी बोलतो. दरम्यान स्पीकरवरून किती वर्गांचं, किती विषयांचं अध्यापन कसं सुरू करता येईल, याचीही आपसांत चर्चा करा. मलाही सांगा.

एवढं बोलून मुख्याध्यापकांनी बैठक संपवली. बैठकीत ठरल्यानुसार दत्ताजी माने व अंकुश गाजरे दोनही मंदिरांच्या व्यवस्थापन-प्रमुखांना भेटले. मात्र या दोन्ही व्यवस्थापन प्रमुखांचं एकच म्हणणं पडलं- मंदिरावरच्या स्पीकरचा वापर मंदिरात चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी तसेच सकाळी गावातल्या लोकांना भक्तिगीतं ऐकण्यासाठी आम्ही करीत असतो. त्याव्यतिरिक्त स्पीकर वापरण्याची परवानगी देता येणार नाही!

दत्ताजी माने व अंकुश गाजरे यांनी त्यांना परोपरीने समजावलं; पण व्यर्थ! दोघेही पुन्हा मुख्याध्यापक बारगजे यांच्याकडे आले. मंदिरांच्या व्यवस्थापन प्रमुखांशी झालेलं बोलणं त्यांना सांगितलं. “ठीक आहे. मी आपल्या संस्थेच्या स्थानिक अध्यक्षांशी बोलतो. त्यांच्यामार्फत प्रयत्न करून बघूया.” सर म्हणाले. मुख्याध्यापक बारगजे संस्थेचे स्थानिक अध्यक्ष माधवराव मिरगे यांच्याकडे आले. मिरगे यांनी दोन्ही मंदिरांच्या व्यवस्थापनाच्या प्रमुखांशी मोबाइलवर संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं. शाळेत शिकणाऱ्या मुलांना मंदिरावरच्या स्पीकरवरून शिकण्यास तुम्ही परवानगी का नाकारली, असा त्यांना थेट प्रश्न विचारला. दोघांपैकी नारायणराव मुळावेकर म्हणाले, “त्याचं असं हाय भाऊ, स्पीकरचा उपयोग मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी व रामपारी गावातल्या लोकांना भक्तिगीतं ऐकण्यासाठी आपण करीत असतो. दोघांकडे रोखून बघत माधवराव मिरगे म्हणाले, “मंदिरावरच्या स्पीकरचा वापर गावातल्या शाळकरी मुलांना शिकण्या-शिकविण्यासाठी केला तर स्पीकर बाटणार आहे का?”

गोपाळराव ढगे दबकत बिचकत म्हणाले, “सरकारनं मंदिर बंद ठेवा म्हणून सांगितलंय, मंदिरावरच्या स्पीकरचा वापर करायचा म्हणल्यावर मंदिर उघडं ठेवावं लागंल.” “सध्या तुम्ही मंदिर उघडतंच नाही, असं म्हणा की.” “झाडझूड कराया पुरतं, सांच्याला मंदिरावरचा लाइट लावायापुरता उघडतो की.” मुख्याध्यापक बारगजे म्हणाले, “आम्ही सुट्टीचा दिवस वगळता इतर दिवशी सकाळी सात ते नऊ या दोन तासांत विद्यार्थ्यांना शिकविणार आहोत. शिवाय आमचा एकच माणूस देवळात थांबेल. मंदिराचा दरवाजा तो आतून बंद करेल. अखेर दोन्ही मंदिरांच्या व्यवस्थापक प्रमुखांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मंदिरावरच्या स्पीकरचा वापर करण्याची परवानगी दिली.

कसं व काय शिकवायचं या संदर्भात दत्ताजी माने यांनी एक टिपण सादर केलं. त्यावर चर्चा झाली व अखेर ठरलं ते असं- पहिल्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील मराठी, हिदं व इंग्रजी या भाषा विषयाच्या कविता MP-3 फॉरमॅटमध्ये रूपांतरित करून स्पीकरवरून ऐकवाव्या. तसंच गणिती पाढे ऐकवावे. इतर काही विषयांच्या ऑडिओ क्लिप बनवून त्याही ऐकवाव्या. दुसऱ्या टप्प्यात, जिथे फळा लागत नाही, असे पाठ स्पीकरवरून शिकवावे.” अशाप्रकारे आपली शाळा लवकरच सुरू होत आहे, असे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कळले तेव्हा त्यांच्यात उत्साहाचे वारे संचारले.

(कथाबीज : के. पी. गायकवाड हायस्कूल, बादोले, ता. अक्कलकोट या प्रशालेने राबवलेला उपक्रम) या उपक्रमाबद्दल ‘वयम्’ दिवाळी अंकात वाचलं होतं ना तुम्ही!

--रा. रं. बोराडे -रा. रं. बोराडे (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष)

'वयम्' मासिकाचा सदस्य होण्यासाठी कृपया वरच्या उजव्या कोपर्यातील सभासद व्हा बटनावर या क्लिक करून व ऑनलाइन पेमेंट करून तुम्ही सभासद होऊ शकता. धन्यवाद!

My Cart
Empty Cart

Loading...