Menu

श्रीमंती - दर्जदार गोष्ट लहान मुलांसाठी

image By Wayam Magazine 11 November 2022

नंदूला ते सगळं एकदम भारी वाटलं. पक्या नि जावेद या दोघांबरोबर चालता चालता नंदूच्या मनात विचार आले, किती वेगळं आहे हे सगळं. भीती वाटतेय, पण मजाही वाटतेय. आता आपणही असे पैसे कमवणार... वाचा ही रोचक कथा !

‘जईसे ज्याचे कर्म तईसे, फळ देतो रे ईशवर..’ किरट्या आवाजात बापू गात होता. त्याचा डावा हात नंदूच्या खांद्यावर होता, बापू हा नंदूचा आजोबा होता. १२-१३ वर्षांचा नंदू रोज त्याच्या आंधळ्या आज्याबरोबर ट्रेनमधून भीक मागत फिरायचा. मुंबईतल्या एका मोहल्ल्यात त्यांची झोपडी होती. नंदूची आई मोहल्ल्याच्या बाहेरच्या रस्त्यावर बांगड्या, कानातली विकायची. नंदूचा बाबा मिळेल त्या कामावर मजुरी करायचा.

रेल्वेतून बापूबरोबर फिरता फिरता नंदू गर्दीतल्या त्याच्यासारख्या लहान मुलांना बघायचा. फुलपॅन्ट, चकचकीत बूट घातलेली, केसांना तेल लावून, भांग पाडून फिरायला निघालेली मुलं. हातात आइस्क्रीम, कॅडबरी नाहीतर एखादं खेळणं...

नंदूने एकदा आईला विचारलं, "माय, आज्जा भीक का मांगतो?" आई म्हणाली, "आरं, आंदळ्यांना कुटं काम मिळनार बाबा. तेवडंच भिकेत चार पैकं भेटतात. तुजी आज्जी सारखी खोकल्यानं आजारी. मंग तिच्या औषदाचं पैकं तरी सुटत्यात या भिकेच्या पैक्यातनं."

"माय, त्या गाडीतल्या पोरांसारखं चकचकीत ऱ्हायचं तर पैकं हवंत ना. मग मी कुटून पैकं आणू?"

"तू नगं काय करू. तू जात जा बापूंसंग गपगुमान. दिसत न्हाई त्यास्नी. बस्स इतकंच कर पोरा आत्ता. बाकी साळंत तर तुला धाडू शकत न्हाय आता. आज्जाला सांबाळायचं काम कर बाबा."

नंदू विचारात पडला. दुस-या दिवशी सकाळी झोपडपट्टीतल्या सार्वजनिक नळावर जाऊन अंघोळ करताना नंदूच्या डोक्यात तेच विचार होते- पैसे कमवायचे!

तेवढ्यात मोहसीन तिथे आला. "क्या रे तू भी दादा के साथ भीख माँगने को जाता. कितना पैसा मिलता तेरेकु?"

"मिलता २०-२५ रुपया." ‘क्या होता रे उसमे. मै देख. दिन में दो-तीनसो कमाता हूं.’ डोळे मिचकावत मोहसीन म्हणाला.

नंदूने डोळे विस्फारले. "मेरेको बता ना क्या काम करता तू? मै बी करूंगा. मुझे बी मंगता पैसा."

"देख, अब्बी इधर नही बता सकता मै. तू दोपहरको तीन बजे आ. वो रद्दी का दुकान है ना, उसके पिछे. चल मै खिसकता अबी." असं म्हणून मोहसीन निघाला.

दुपारी तीनचं कडाक्याचं ऊन. मोहल्ल्यात शुकशुकाट होता. झोपड्यांच्या रांगांमधून वाहणा-या गटारांवरून उड्या मारत रद्दीच्या दुकानामागे नंदू धावतच गेला. तेवढ्यात त्याला जाणवलं, आपल्या पाठीशी कुणीतरी येतंय. मागून येणा-या इसमाने काही कळायच्या आत त्याच्या तोंडावर एक रुमाल ठेवला. कुठला तरी वास त्याच्या नाकात शिरला आणि त्याला गरगरायला लागलं. गुंगी येऊन नंदू तिथेच खाली पडला.

"चल, आंखे खोल." कुणीतरी दुरून सांगितल्यासारखं वाटत होतं. कुणीतरी त्याच्या डोळ्यांवर पाणी मारलं. डोळे चोळत चोळत, घाबरत नंदू आजूबाजूला बघू लागला. एक काळोखी खोली होती ती. समोर मोठ्ठी मिशी असलेला एक माणूस बसला होता.

तो म्हणाला, "ए पोरा, घाबरू नगं. बोल नाव बोल." "न.. न.. नंदू." नंदू चाचरत बोलला, "आमाला कळालं की, तुला पैकं हवंत. काम करून पैकं मिळवायचंय तुला." "आं... हां की... व्हय, व्हय... पैकं मिळवायचत मला. लई गरिबी हाय घरची." "साळा किती शिकलास?" मिशीवाल्यानी विचारलं. "चार यत्ता गेलो साळंत. बापू... म्हंजी माजा आज्जा आंधळा हाय. त्याच्या संग -हावं लागतं. भीक मागाया जावं लागतं ट्रेनमंदी. म्हनूनशान सोडली साळा." "आरारा, काय रं हे. भीक मांगाया लागती. बरं ऐक, म्या सांगीन ते काम कराचं. थोडं हुशारीनं कराचं. एका कामाचे शंभर रुपयं दीन. आत्ता सुर्वात हाय, म्हून एकच कराचं. नंतर बगू. काय?"

"व्हय व्हय... म्या करीन. तुमी सांगाल ते, सांगाल तसं करीन." "तू झ्याक काम कर. लगंच पैका भेटेल. पन एका अटीवर. कुनाला बी कळू द्याचं न्हाय. आईबापास्नी बी नाय. काय?" "व्हय... पन मग माज्याजवळ पैकं बगून माय नि बाबा इचारतील की." "सांग त्यास्नी काय बी. पार्ट टाईम नोकरी करतो म्हनावं. झाडू मारायची." नंदूला पटलं.

"काम काय आसंल?"

"ते तुला ही दोगं बी सांगतील. सांगा रं ह्येला. आन् लक्ष ठेवा ह्येच्यावर. काय?" त्या दोन मोठ्या मुलांकडे हात दाखवत मिशीवाला बोलला नि तिकडून निघून गेला.

"नंदू, म्या पक्या नि ह्यो जावेद. चल आमच्यासंग. तुला कळंल तुजं काम कसं नि काय हाय ते." डोळे मिचकावत पक्या बोलला. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. तिघे जण स्टेशनच्या रस्त्यावर चालत निघाले. रस्ता माणसांनी, वाहनांनी नुसता गजबजलेला. जावेद बोलला, "नंदू देख. तू वो सामनेवाली चाय की टपरी है ना, वहाँ जाके खडा रह. उधरसे एकदम ठीकसे देख, हम दोनो क्या करतें हैं." पक्या नि जावेद आता वेगवेगळे चालू लागले. पक्या पुढे. जावेद त्याच्यामागे. तेवढ्यात पक्याने पुढच्या बाईच्या पर्सला हात लावलेला नंदूला दिसला. काही कळायच्या आत जावेद झपाट्याने पुढे गेला आणि गर्दीत पक्या नि जावेद दोघंही नाहीसे झाले.

नंदूची नजर त्या दोघांना भिरभिरी होऊन शोधू लागली. पक्या नि जावेद त्याच्यामागे हसत उभे होते.
"चल."

गोंधळलेला नंदू त्यांच्यामागून चालू लागला. स्टेशनवर जायच्या भुयारी मार्गामध्ये तिघं आले. एका कोप-यात उभं राहिल्यावर जावेदने खिशातून एक पाकीट बाहेर काढलं. ते उघडल्यावर त्यात भरपूर पैसे दिसले. दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या.

"म्हंजी हे चोरीचं काम करता तुमी?" नंदू घाबरत बोलला.
"नंदू, आरं ह्या दुनियेत सगळेच चोर हाईत. आपून तर खुलेआम चोरी करतो. हां पन इमानदारीनी. आता ह्यो पाकीट आसंच्या आसं दादांच्या हातात हां. मंग त्ये देतील पैका... भरपूर. तुला हवाय ना?"

नंदूला ते सगळं एकदम भारी वाटलं. त्या दोघांबरोबर चालता चालता नंदूच्या मनात विचार आले, किती वेगळं आहे हे सगळं. भीती वाटतेय पण मजाही वाटतेय. आता आपणही असे पैसे कमवणार.

दुस-या दिवशी मोहसीन भेटला. "अबी दादा की नजर रहेगी तेरेपर. याद रखना. चल मै खिसकता."

नंदूकरता सगळंच नवलाचं होतं. त्या दिवसापासून नंदूचं ट्रेनिंग सुरू झालं. पक्या नि जावेद त्याला दुपारी स्टेशनजवळच्या गर्दीत ट्रेनिंग देऊ लागले.

मग ख-या चोरीचा दिवस उजाडला. सकाळपासूनच नंदूला काही सुचत नव्हतं. एका सायबाच्या ऑफिसात दुपारच्या वेळी साफसफाई करायला जाणार आहे, असं त्याने आधीच आईला नि बाबाला सांगून ठेवलं होतं. तेव्हा आई थोडी कुरकुरली होती. मग बाबा बोलला, "जाऊ दे की... नायतरी दुपारचा बापूबरोबर घरी आला की, निस्ता उंडारत असतो. जा रं नंद्या. मयनाभर जाऊन तर बग जमतंय का?"

धावत धावतच तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. त्याच्या पोटात मोठ्ठा गोळा आला होता. हातपाय गार पडले होते. आजपर्यंत त्याने असं चुकीचं काम कधीच केलं नव्हतं.

"नंदू, ये ले टोकरी... और ये ले दूसरी थैली. अपनी जगह पे बैठ." मोसंब्यांनी भरलेली टोपली नि ती फळांची थैली नंदूच्या हातात देत जावेद म्हणाला.

गर्दी वाढू लागली. नंदू धडधडत्या मनाने आणि भिरभिरत्या नजरेने इकडेतिकडे बघू लागला. पक्या गायब झाला होता. थोडं पलीकडे अजून एक मोठी टोपली घेऊन जावेद बसला.

जावेदने डोक्यावरची टोपी काढली की, समजायचं पक्या पाकीट मारून आणतोय. मग तयारीत राहायचं. पक्याने पाकीट फेकल्याबरोबर थैलीतली फळं टोपलीत ओतायची नि टोपली घेऊन ठरलेल्या रस्त्यावरून धावत सुटायचं.

नंदूने मनातल्या मनात एकदा सगळी उजळणी केली. त्याचं लक्ष जावेदच्या टोपीकडे होतं. अजून त्याने ती काढली नव्हती. म्हणजे पक्याला अजून चान्स मिळाला नव्हता चोरीचा.

'चोरी' या मनात आलेल्या शब्दावर नंदू परत अडकला. तीन वर्षांपूर्वी शाळेत असताना एका सुधारलेल्या चोराची गोष्ट ऐकली होती. तेव्हा नंदूला अचानक शाळा आठवली. छान छान गोष्टी सांगणारे शाळेतले ते टोपीवाले मास्तर. नंदूने दचकून जावेदकडे बघितलं नि जावेदने नेमकी त्या क्षणीच डोक्यावरची

टोपी काढली. शाळेच्या आठवणींतून नंदू जागा झाला. उजवीकडून येणा-या गर्दीतून पक्या झपाट्याने पुढे येताना दिसला... पापण्या लवायच्या आत पक्याने एक पाकीट नंदूच्या टोपलीत टाकलं. दुस-याच क्षणी नंदूने फळांची थैली त्यावर ओतली आणि टोपली डोक्यावर घेऊन तो सुसाट धावत सुटला. डोक्यावरच्या टोपलीचं वजन त्याला उगीच जास्तच वाटलं.

आता त्या दुस-या गल्लीत तो शिरणार तेवढ्यात त्याला जरा गलका ऐकू आला. एका दुकानाच्या पायरीवर एक माणूस डोकं धरून बसला होता. कुणी त्याला समजवत होतं. डोळ्यांत पाणी आणून तो शेजारच्याला काही सांगत होता.

नंदूने त्याच्याकडे पाहिलं पण त्याला वेळ घालवून चालणार नव्हतं. त्याच्यामागून येणा-या दोन माणसांचं बोलणं त्याला ऐकू आलं. "बेचारा, बच्चे के ऑपरेशन के लिये एटीएमसे पैसा निकाला. सब चोरी हुआ. भगवान सजा देगा उस चोर को."

"अभी उधर हॉस्पिटल में पैसा नही भरेगा तो डॉक्टर उसके बच्चेका ऑपरेशन नहीं करेगा. और अगर करेगा भी तो बाद में इतना पैसा ये आदमी कहाँ से लायेगा बेचारा. बेचारे की पसीने की, सच्चाई की कमाई थी?"

नंदू जागच्या जागी थबकला. म्हणजे आपल्या डोक्यावरच्या टोपलीतलं पाकीट त्या माणसाचं? ओह्.... त्याला काही सुचेना. "सोड रे तू. ..तू तुज्या दोनशे रुपयाकडं बग. लई धमाल येईल बग. आन् आज्जीचं औषद बी आनता येईल." नंदूचं एक मन म्हणालं. ‘औषद.... त्या माणसाचा पोरगा दवाखान्यात आहे. त्याचं ऑपरेशन आडलं असंल.’ नंदू स्वतःशीच पुटपुटला. गल्लीतल्या अंधारात एका बंद दुकानाजवळ तो बसला. फळांमध्ये हात घालून त्याने ते पाकीट उघडलं. त्यात त्याच माणसाचा एका लहान बाळाबरोबर फोटो होता आणि भरपूर नोटा होत्या.

नंदूचे डोळे त्या नोटा बघून चमकले, पण पुन्हा त्याची नजर त्या फोटोतल्या लहान बाळाकडे गेली. काही क्षण त्याने विचार केला नि मग फळांमध्ये ते पाकीट ठेवून तो उठला. ती टोपली घेऊन त्या माणसाच्या दिशेने चालू लागला. आता त्याचे पाय थरथरत नव्हते की, मिशीवाल्या दादाने दिलेली धमकी आठवून पोटात गोळा आला नव्हता. नजरेसमोर फक्त त्या लहान बाळाचा हसरा चेहरा होता. नकळतपणे नंदूला समजली होती, मनाची श्रीमंती.

-निर्मोही फडके
My Cart
Empty Cart

Loading...