मित्रांनो, तुम्ही कधी तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाला एखादं ग्रीटिंग कार्ड स्वतःच्या हाताने बनवून दिलं आहे का? आजकाल बाहेर दुकानांमध्ये कितीतरी ग्रीटिंग कार्ड मिळतात. पण आपल्या हातांनी केलेल्या कार्डाची मजा काही औरच असते नाही का. एखाद्या छोट्याशा ग्रीटिंग कार्डाविषयी तुम्हाला एवढा आनंद होतो, तर विचार करा, हजारो कामगारांनी कित्येक महिने झटून एक अवाढव्य युध्दनौका म्हणजेच लढाईसाठी उपयोगात येणारी बोट तयार केली तर? मग त्या कामगारांचा आनंद केवढा असेल, नाही का. आणि हो, ही युध्दनौका नंतर जेव्हा समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन बाहेरच्या देशांना भेटी देते, तेव्हा या युध्दनौकेच्या कॅप्टनची ऐट तर काय विचारता. थोडक्यात काय, तर आपल्या देशाकडे पाहण्याची परदेशातील लोकांची दृष्टीच पालटून जाईल.
मित्रांनो, मी जे काही सांगतोय, त्यात खोटं काहीच नाही. आपला स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे आणि त्यानिमित्ताने संरक्षण दलांमध्ये आपण स्वदेशी बांधणीची जी अभिमानास्पद कामगिरी करतोय ना, त्याची थोडी थोडी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.
साधारण पंधरा वर्षांपूर्वी आपल्या देशाची राजधानी दिल्ली या शहराच्याच नावाने एक मोठी युध्दनौका जिला विनाशिका किंवा डिस्ट्रॉयर म्हणतात, ती आपल्या भारताच्याच माझगाव गोदीने बांधली. 6700 टन इतकं वजन आणि त्यावर तोफा, क्षेपणास्त्र, दोन हेलिकॉप्टर्स वगैरे वगैरे. पण इतकी मोठी युध्दनौका आपण भारतीय इतक्या सुंदर रीतीने बांधू शकतो, हे पाहून सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. शिवाय स्वदेशातच बांधणी केल्यामुळे आपला पैसा वाचला, तो वेगळाच. पहा, हीच नौका परदेशातून आयात करायची झाली असती, तर आपल्याला डॉलर्समध्ये पैसे मोजायला लागले असते. म्हणजे आपल्या तिजोरीवर भार पडला असता. शिवाय एखाद्या देशाने कोणत्याही कारणाने सांगितलं की आम्हाला भारताला ही वस्तू विकायची नाही, तर? मग आयत्या वेळी आपण ती बनवण्यचं तंत्रज्ञान तरी शिकणार कसं ? आणि हो, आपल्याकडे काय कुशल कामगार कमी थोडेच आहेत. वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही ग्रीटिंग बनवू शकता, संगणकावर गेम खेळू शकता, विज्ञानातल्या आकृत्या काढू शकता, मेकॅनोतले आकार करू शकता, मग मोठे झाल्यावर विमानं किंवा नौका का बांधू शकणार नाही. नक्कीच.
मग तुम्ही म्हणाल, इतकी वर्षं आपण हे सगळं परदेशातून विकत का घेतोय.
पहा, आपला देश स्वतंत्र झाला, तेव्हा लगेच काही आपल्याकडे मोठमोठे उद्योग आले नव्हते, तंत्रज्ञान प्रगत झालेलं नव्हतं, तुमच्यासारखी सर्व मुलांना शिक्षणाची सोय आणि संधी नव्हती. आता आपण त्यात भरपूर मजल मारली आहे. पण एवढी वर्ष आपल्याकडे तंत्रज्ञान नाही, सुविधा नाहीत, म्हणून देशाचं संरक्षण थांबू शकतं का. शक्यच नाही. सैनिकांना लढण्यासाठी चांगल्या तोफा हव्यात, हवाई दलासाठी तेजतर्रार लढाऊ विमानं हवीत आणि किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी युध्दनौकाही हव्यात. त्यामुळे पूर्वी आपण हे सगळं रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, अमेरिका अशा देशांकडून विकत घ्यायचो. आजही घेतो. पण आता भारतीय बनावटीचं प्रमाण वाढतंय.
साहजिकच जगात आपली मान उंचावली गेली आहे. तुम्हाला माहिती आहेच की देशाच्या संरक्षणासाठी भारतात भूदल म्हणजे आर्मी, नौदल म्हणजे नेव्ही आणि हवाई दल म्हणजे एअर फोर्स अशी तीन दलं असतात. ती अनुक्रमे जमीन, हवा आणि समुद्र अशा तीन स्तरांवर आपलं रक्षण करण्यास सज्ज असतात. या तिन्ही दलांना वेगवेगळी सामग्री लागत असते. ही सामग्री आपण आता आपल्याच देशात तयार करू लागलो आहोत. काही मोजकी उदाहरणं आज मी तुम्हाला देणार आहे.
तुम्हाला थोडंफार माहिती असेल की कोणतंही युध्द जर समुद्रावरून खेळलं गेलं, तर त्यात विमानवाहू युध्दनौकेचं महत्त्व मोठं असतं. ही विमानवाहू युध्दनौका तिच्या डेकवरून कित्येक लढाऊ विमानं तसंच हेलिकॉप्टर्स घेऊन जाते. शिवाय समुद्रातून जातानाच तिचा डेक हा तरंगत्या विमानतळाचं काम करतो. म्हणजे या डेकवर एक धावपट्टी असते, ज्यावरून लढाऊ विमानं भरधाव जाऊन टेकऑफ करू शकतात. अर्थात हवेत उड्डाण करू शकतात. हे म्हणजे एखादा सांताक्रूझचा विमानतळ समुद्रातून तरंगत नेल्यासारखंच झालं की.
आतापर्यंत आपल्या नौदलात विक्रांत आणि विराट या दोन विमानवाहू युध्दनौका झाल्या. या दोन्ही आपण ब्रिटनकडून विकत घेतल्या होत्या. अलीकडेच आपण एक रशियाकडून विमानवाहू युध्दनौका विकत घेतली, तिचं नामकरण आपण केलंय विक्रमादित्य. पण एवढ्या महत्त्वाच्या युध्दनौकेसाठी दरवेळी परदेशावर अवलंबून का रहायचं. म्हणून काही वर्षांपूर्वी आपण भारतातच केरळमधल्या कोचीन गोदीमध्ये एक विमानवाहू युध्दनौका बांधण्यास सुरुवात केली. तिचंही नाव विक्रांत असंच ठेवण्यात आलं. थांबा, गोंधळू नका. मघाशी सांगितलेली विक्रांत नौदलात 1997पर्यंत सेवा बजावून निवृत्त झाली. त्यामुळे आपण नंतर स्वतः बांधायला घेतलेल्या नौकेचं नावही विक्रांत ठेवायचं ठरवलं. या विक्रांतचं वजन आहे तब्बल 40 हजार टन आणि ती 30 लढाऊ विमानं घेऊन जाऊ शकते.
1999 मध्ये या युध्दनौकेचं डिझाईन तयार करण्यात आलं. डिझाइन असाच शब्द वापरला, कारण ते भूमितीतील आकृती किंवा चित्रातील चित्र आणि विज्ञानातील आकारमान, वस्तुमान या सगळ्याचं अचूक मोजमाप त्यात असावं लागतं. म्हणजे यात भूमिती (जॉमेट्री), भौतिकशास्त्र (फिजिक्स), ड्रॉइंग (चित्रकला), गणित (मॅथ्स), रसायनशात्र (केमिस्ट्री), भूगोल (जिऑग्राफी) या सगळ्या सगळ्याचं कसब पणाला लागतं. इतक्या अवजड नौकेला पाण्यावर तरंगती तर ठेवायचीच, शिवाय भरपूर हादरा देणारी विमानं तिच्यावरून उडणार म्हणजे तिचा डेकही सक्षम हवा... हे खूपच कठीण काम.
विचार करा 40 हजार टनांच्या नौकेला स्टील तरी किती लागत असेल. विशेष म्हणजे या नौकेसाठी लागलेलं स्टीलही भारतातच बनवण्यात आलं. भिलाई आणि रुरकेला इथल्या स्टीलच्या कारखान्यांमध्ये ते घडवण्यात आलं. या नौकेतले स्टीअरिंग गिअर,स्वीचबोर्ड शिवाय वॉटरटाइट कक्षांचे दरवाजे हेसुध्दा भारतातल्याच लार्सन आणि टुब्रो कंपनीने मुंबई तसंच तळेगाव इथल्या कारखान्यांमध्ये तयार केले. पुण्याच्या किर्लोस्कर कंपनीने नौकेच्या वातानुकूलन यंत्रणेचं (एअरकंडिशनिंग) काम केलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एकेक नौका तयार करायची, तर किती उद्योग त्याच्याशी जोडले जातात. भिलाई, रुरकेलापासून मुंबई, पुणे, तळेगावपर्यंत प्रत्येक कारखान्याला काम मिळालंय. शिवाय प्रत्येक कारखान्यातील कामगारांच्या कुशलतेचं चीजही झालंय.
कोचीन गोदीमध्ये गेल्याच वर्षी या नौकेचं जलावतरण झालं. जलावतरण म्हणजे सुक्या गोदीत बांधून पूर्ण झालेली नौका प्रथमच जेव्हा पाण्यात तरंगू लागते, तो क्षण. गोदी कामगारांसाठी तर हा अत्युच्च आनंदाचा क्षण. विचार करा, सारे जहाँ से अच्छा ची धून वाजतेय आणि ही नौका समुद्राच्या पाण्यात प्रवेश करतेय. सर्व कामगारांचा ऊर अभिमानाने भरून येत असेल नाही का. तर आता ही नौका पाण्यात विहार करतेय, म्हणजे आपल्या इतर बोटींच्या जॉयराइडसारखी नव्हे हं. आता आणखी काही वर्षं या नौकेची समुद्री चाचणी सुरू राहील, त्यावर क्षेपणास्त्रे, टेहळणीची रडार बसविली जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर विमानं येतील आणि त्यांची उड्डाणाची चाचणी केली जाईल.
हे सगळं करून ही विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल होईपर्यंत 2018 साल उजाडेल. पण तोपर्यंत ती अगदी तावून सुलाखून निघालेली असेल. मग शत्रूची नजर या नौकेकडे डोळे वर करून बघूच शकणार नाही. या नौकेचं ब्रीदच आहे मुळी जयेम सं युधि स्पृधः म्हणजे जो कुणी माझ्याशी दोन हात करण्याचं धाडस करेल, त्याला मी धूळ चारल्याशिवाय राहणार नाही.
विक्रांतप्रमाणेच भारताने आणखीही अनेक युध्दनौका बांधल्या आहेत. आयएनएस दिल्लीपासून आधुनिक युध्दनौकांच्या बांधणीची सद्दी सुरू झाली. त्यानंतर याच श्रेणीतील म्हैसूर, मुंबई या युध्दनौका भारताने बांधल्या. आता याच श्रेणीतील आणखी आधुनिक अशी आयएनएस कोलकाता ही युध्दनौका बांधून तयार आहे. आयएनएस याचा अर्थ इंडियन नेव्हल शीप म्हणजेच भारतीय नौदलातील युध्दनौका एवढं लक्षात असू द्या.
नौदलातील आणखी एक प्रगती दखल घेण्याजोगी आहे. गेल्या काही वर्षात आपल्याकडच्या पाणबुड्या कमी झाल्या आहेत. पण आता भारताने विशाखापट्टणम येथे अणुइंधनावर चालणारी आयएनएस अरिहंत ही पाणबुडी तयार केली आहे. या पाणबुडीवरची अणुभट्टी कल्पक्कम इथल्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. आतापर्यंतच्या सर्व पाणबुड्या (सबमरीन)या डिझेल आणि बॅटरीवर चालणाऱ्या होत्या. अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्या या समुद्राखाली सहा सहा महिने राहू शकतात. पाणबुडीचं हेच तर मोठं सामर्थ्य असतं. शिवाय या पाणबुडीत अधिक संख्येने नौसैनिक राहू शकतात.
बरं आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे जशा पाणबुड्या आहेत, तशा इतर देशांकडेही असतील, मग काय करायचं. त्यासाठीच या पाणबुड्यांचा माग काढणारी हेलिकॉप्टर्स किंवा युध्दनौका आपल्याकडे असतात. या युध्दनौका पाणबुडीविरोधी तंत्रात (एन्टी समबमरीन वॉरफेअर) पारंगत असते. भारतातील कोलकात्याच्या गार्डनरीच गोदीने अलीकडेच आयएनएस कमोत्रा ही अशा प्रकारची एन्टीसबमरीन वॉरफेअरमधील युध्दनौका तयार केली. याला कॉरव्हेट असंही म्हटलं जातं. हिचा वेग इतर नौकांपेक्षा जास्त असतो.शिवाय ही नौका रडारच्या कक्षेत येणार नाही, अशी तिची बांधणी आहे. रडार चुकविण्याच्या या प्रकाराला स्टेल्थ असं म्हणलं जातं.
नौदलाप्रमाणेच हवाई दल आणि भूदलातही वेगवेगळी सामग्री आपण भारतात तयार करू लागलो आहोत. आपल्याला माहिती आहे की विमानबांधणीही खूप कठीण असते. आतापर्यंत आपण लढाऊ विमानांसाठी इतर देशांवरच अधिक अवलंबून होतो. खासकरून रशियाकडून घेतलेली मिग 21 ही विमानं आपल्या देशात बराच काळ सेवा देणारी ठरली. परंतु याच विमानांमध्ये आपल्या अनेक तरुण उमद्या वैमानिकांचे प्राणही गेले. त्यामुळेच अधिक विश्वासार्ह अशी लढाऊ विमाने आपण आपल्याकडेच तयार करावीत, असा विचार भारताने केला. 1980 मध्येच हा कार्यक्रम सुरू झाला. आता त्यात यश आलं असून भारताचं तेजस नावाचं तळपतं लढाऊ विमान तयार झालं आहे. ते हलक्या वजनाच्या प्रकारातलं लढाऊ विमान असल्यामुळे त्याला लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट अर्थात एलसीए म्हणून ओळखलं जातं. हे विमान ताशी 1350 किलोमीटर इतक्या वेगाने जातं. याच विमानाची नौदलासाठीची आवृत्तीही तयार होते आहे.
हवाई दलासाठी ध्रुव नावाचं प्रगत हेलिकॉप्टरही भारताने तयार केलं आहे. याला एएलएच ध्रुव म्हणजे एडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर म्हणून ओळखलं जातं. 2002 पासून ही हेलिकॉप्टर हवाई दल, तटरक्षक दल व नौदलाच्या ताफ्यांमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली. ही हेलिकॉप्टर सियाचीन ग्लेशियरची अत्युच्च उंची आणि अतिथंड गोठलेल्या प्रदेशातही कार्य करू शकतात. चाचण्यांदरम्यान या हेलिकॉप्टर्सनी 27 हजार 500 फुटांची उंची गाठली. या हेलिकॉप्टर्सचा वापर रुग्णवाहिका म्हणूनही करता येतो. याच हेलिकॉप्टरची सशस्त्र आवृत्ती म्हणजे रुद्र. ही हेलिकॉप्टर्स आपल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केली आहेत. हिंदुस्तान एअरोनॉटिक्सला एचएएल म्हणून ओळखलं जातं. एचएएएलचा कारखाना आपल्या महाराष्ट्रातच नाशिकजवळच्या ओझरमध्ये आणि कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये आहे. या प्रकारची हेलिकॉप्टर तयार करणारा भारत हा सहावा देश आहे. गेल्याच वर्षी या हेलिकॉप्टर्सनी एक लाख तासांचा उड्डाण कालावधी पूर्ण केला. आता ही हेलिकॉप्टर्स इक्वेडोर, मालदीव, नेपाळ, मॉरिशस या देशांना निर्यातही केली जातात. ध्रुव, रुद्र ही बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्स आहेत आणि दहा हजार फूट उंचीवरून 10 ते 15 जणांना घेऊन ते हेलिकॉप्टर सहज उडू शकतं.
या एचएएलच्याच कारखान्यात आता मूळच्या रशियन असलेल्या सुखॉय जातीची लढाऊ विमानंही तयार केली जातात. सुखॉय 30 हे पहिलं रशियन बनावटीचं लढाऊ विमान भारतीय हवाई दलात 2002 मध्ये दाखल झालं. त्यानंतर याच विमानाच्या भारतीय आवृत्तीचं उत्पादन 2004 मध्ये एचएएलच्या कारखान्यात सुरू झालं. भारतीय हवाई दलात आता या विमानांची संख्या 194 वर गेली आहे. भारत आणि रशिया यांच्याकडून संयुक्तपणे ब्राह्मोस नावाचं क्षेपणास्त्र (मिसाइल) विकसित केलं जातंय. ते क्षेपणास्त्र या विमानावरून डागण्याची चाचणी अलीकडेच यशस्वीही झाली. त्याचप्रमाणे याच सुखॉय 30 विमानावरून अगदी गेल्या महिन्यातच अस्त्र या क्षेपणास्त्राचीही गोव्यातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. 15 किलोचं अतिज्वालाग्राही स्फोटकं घेऊन शत्रूवर हवेतून हवेत अचूकपणे मारा करणारं अस्त्र हे क्षेपणास्त्र भारतातच डीआरडीओने म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशन अर्थात संरक्षणसामग्री संशोधन व विकास संस्थेने तयार केलं आहे. हे क्षेपणास्त्र कोणत्याही हवामानात डागता येतं. अस्त्र क्षेपणास्त्र काही वर्षातच सुखॉयप्रमाणेच तेजस या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानावरही लावता येईल.
हवाई दलाप्रमाणेच थोडक्यात भूदलातील घडामोडींची माहिती घेऊ. भूदल हे जमिनीवर लढणारं. धडाडत्या तोफा हे त्यांचं खरं सामर्थ्यं. त्यात धनुष नावाच्या 45 आणि 155 मिमी व्यासाच्या तोफा आपल्या दारुगोळा कारखान्याने तयार केल्या आहेत. त्यांच्या विविध हवामान व ऋतूंमधील चाचण्या आता सुरू आहेत. सिक्कीममध्ये हिवाळ्यातील चाचण्या झाल्या, तर राजस्थानात उन्हाळ्यातील चाचण्या होणार आहेत. या तोफा 38 किलोमीटर लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकतात. या तोफांप्रमाणेच विविध प्रकारची पाच हजार रॉकेट्स आपण तयार करतो आहोत.
वाळवंट किंवा उंचसखल प्रदेशात रणगाडा हा लष्कराचा कणा असतो. भारतात डीआरडीओतर्फेच अर्जुन हा रणगाडा बनविला गेला आणि आता त्याच्या अद्ययावत आवृत्तीची चाचणी राजस्थानच्या पोखरणमध्ये सुरू आहे.
भारताने पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी या नावांनी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तयार करण्यात तर मोठीच मजल मारली आहे. मित्रांनो जो देश उपग्रह अवकाशात सोडू शकतो,त्याला क्षेपणास्त्रांचं तंत्रज्ञान तर अवगत असणारच नाही का. पण त्याबद्दल कधीतरी स्वतंत्रपणे गप्पा मारूया. आजही तुम्हाला पोतडीतली सगळी माहिती मिळाली नसेलच. तेव्हा अधिक माहिती तुम्ही जमवायला लागा. तुम्हाला दिसलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या संरक्षण सामग्रीची माहिती आणि त्यातल्या गमतीजमती आम्हालाही जरूर कळवा. त्यांची चित्र काढून पाठवा. आणि हो, भविष्यात तुम्हीही विमानं, रणगाडे, तोफा, युध्दनौका तयार करण्याचं स्वप्न बाळगा.
समीर कर्वे.